Tuesday, July 28, 2015

कादंबरीचे अक्षांश-रेखांश पणाला लावणारा कादंबरीकार

आदर्श, परंपरा, प्रेरणा, मानदंड, निकष, धारणा या सतत बदलणाऱ्या गोष्टी असतात, असायला हव्यात. कारण प्रत्येक नवी पिढी ही आधीच्या पिढीची टीकाकार असते. आधीच्या पिढीने जी काही मांडणी केलेली असते, त्यातील उणिवा शोधणे, त्या मांडणीत नवी भर घालणे, प्रसंगी त्यातील कालबाह्य भाग नाकारून नवी मांडणी करणे ही नव्या पिढीची कामे असतात. एवढेच नव्हे, तर कर्तव्य असते. कुणाही एका व्यक्तीने केलेल्या मूल्यमापनाला मर्यादा असतात. कारण त्या व्यक्तीच्या साहित्याचे काहीच पैलू उलगडले जाऊ शकतात. त्यामुळे कुठल्याही साहित्याचे पुन्हापुन्हा मूल्यांकन करणे हे समीक्षकांचे कामच असते. त्यामुळे त्या व्यक्तीचे योगदान नेमकेपणाने जाणून घ्यायला मदत होते. काळाच्या ओघात त्या व्यक्तीबद्दल निर्माण झालेले गैरसमज दूर होण्यास मदत होते. आधीच्या समीक्षकांकडून कळत-नकळत झालेला अन्याय दूर करता येतो. मात्र, याबाबतीत मराठी साहित्यातील समीक्षक कमी पडतात, ही वस्तुस्थिती आहे. मराठी समीक्षकांनी साठोत्तरी प्रवाहानंतर फारसे नवे सिद्धान्त मांडलेले नाहीत आणि ज्यांनी ते मांडण्याचा प्रयत्न केला, त्यांची दखलही घेतलेली नाही. अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे, तर प्राध्यापक रा. ग. जाधव यांनी ‘साहित्याचे परिस्थितीविज्ञान’ (ecology off literature) हा आधी मांडलेला आपला सिद्धान्त दोनेक वर्षांपूर्वी नव्याने मांडून दाखवला आहे; पण त्याची साधी दखलही मराठी समीक्षकांनी घेतलेली नाही. त्याची जाधव यांनाही पूर्वकल्पना होती, म्हणूनच त्यांनी माझे पुस्तक कोणी वाचणार नाही, असे नि:संदिग्धपणे सांगितले होते.
अशा प्रकारची उदासीनता ही अनभ्यस्ततेतून निर्माण होते. जुन्याच जोखडांना चिकटून राहिल्याने आणि जे आपल्याला पटत नाही, ते सरसकट नाकारायचेच या वृत्तीने मराठी समीक्षा विद्यापीठीय वर्तुळापुरती मर्यादित झाली. तिचा समाजाशी असलेला अनुबंध तुटला; पण त्याचे सोयरसुतक समीक्षकांना आहे, याचे दाखले फारसे सापडताना दिसत नाहीत.
या प्रकारामुळे प्रयोगशीलता, नवे रचनाबंध, नवे दृष्टिकोन यांची उपेक्षा करणे, त्याची दखल न घेणे वा त्यावर अनभ्यस्त पद्धतीने टीका करणे हे प्रकार वाढीला लागलेले दिसतात.
याची अलीकडची दोन महत्त्वाची उदाहरणे म्हणजे विलास सारंग आणि श्याम मनोहर.
 सारंग यांची अकारिक प्रयोगशीलता तर मराठी समीक्षक, लेखक आणि वाचक यांना पेलवलीच नाही. ज्यांनी सारंग यांची पुस्तके प्रकाशित केली, त्या प्रकाशकांना ती कळली असेही नाही. शिवाय, सारंग यांनी आपला शिष्य संप्रदाय जमवला नाही. अशा प्रयोगशील लेखकाकडे नवे लेखक आकर्षित होतात; पण सारंग यांच्या बाबतीत तेही फारसे झालेले दिसत नाही. त्यामुळे सारंग यांच्या साहित्याचे यथोचित मूल्यमापन तर सोडाच; पण ते नीट समजून घेण्याचा आणि देण्याचा प्रयत्न मराठी समीक्षेकडून पुरेशा प्रमाणात झाला आहे, असे दिसत नाही.
जी उपेक्षा सारंग यांची झाली, तोच प्रकार श्याम मनोहर यांच्या बाबतीत होताना दिसतो आहे.
खरं म्हणजे श्याम मनोहर यांच्या सुरुवातीच्या कथा-कादंबरी-नाटक या वाङ्मय प्रकारातील लेखनाची दखल काही प्रमाणात घेतली गेली आहे, नाही असे नाही; पण मूल्यमापन मात्र काही विशेषणाच्या पलीकडे जाताना दिसत नाही. ‘ब्रेन टीझर कादंबरीकार’, ‘प्रयोगशील कादंबरीकार’, ‘विक्षिप्त कादंबरीकार’ या विशेषणांपलीकडे मनोहर यांच्या कादंबऱ्यांकडे पाहिले जाते आहे, असे जाणवत नाही. ‘शंभर मी’ या कुठलाच नायक नसलेल्या आणि फारसे घटनाप्रसंग नसलेल्या मनोहरांच्या कादंबरीवरील प्रतिक्रिया पाहिल्या तर ते प्रकर्षाने जाणवते.
मनोहर यांच्या अलीकडच्या कादंबऱ्यांची चमत्कारिक वाटणारी नावे (उदा. खूप लोक आहेत, उत्सुकतेने मी झोपलो, खेकसत म्हणणे आय लव्ह यू, शंभर मी) याचीच चर्चा अधिक होते आहे; पण मनोहर या कादंबऱ्यांमधून जे सांगू-मांडू पाहत आहेत, त्याला भिडण्याची तयारी मराठी समीक्षा दाखवताना दिसत नाही. “ही काय कादंबरी आहे का?”, “हा तर चक्रमपणा झाला!”, “तत्त्वज्ञानच झोडायचे आहे, तर मग तसे पुस्तकच लिहावे ना, ते कादंबरीत कशाला घुसडायचे?” असे प्रश्नोपनिषद उभे केले जात आहे. “मनोहर यांना सरळपणे काहीच सांगता येत नाही. ते कायम वळसे घेत काहीतरी दुर्बोध सांगण्याचा प्रयत्न करतात,” हा समज तर मराठी साहित्यात सार्वत्रिक होत चालला आहे. मनोहर हे मराठी कादंबरीचे अक्षांश-रेखांश पणाला लावू पाहणारे कादंबरीकार आहेत. (हाच प्रकार नाट्यदिग्दर्शक म्हणून पं. सत्यदेव दुबे यांनी केला आहे. फरक एवढाच की, दुबेंनी ते इतरांच्या संहितेच्या बाबतीत केले आहे. मनोहर यांची नाटककार म्हणून ओळख झाली ती दुबेंमुळेच.) कादंबरीच्या अक्षांश- रेखांशमध्ये जे-जे काही करता येणे शक्य आहे, त्याच्या जेवढ्या म्हणून शक्यता आहेत, त्या-त्या पणाला लावून पाहण्याचा प्रयत्न ते त्यांच्या प्रत्येक कादंबरीत करत आले आहेत.
या साऱ्या प्रयोगातून मनोहर यांना काय सांगायचे आहे? मनोहर म्हणतात, “मला कादंबरीची नवी संकल्पनात्मक मांडणी करायची आहे. मी तिची नवी व्याख्या करू पाहतो आहे. बदलती समाजाची सभ्यता आणि ‘मी कोण आहे’ या दोन्ही प्रश्नांना कादंबरीच्या माध्यमातून भिडण्याचा प्रयत्न करतो आहे. ‘मी कोण आहे’ हा प्रश्न आपण अध्यात्मात लोटून दिला आहे. त्याला मला कादंबरीत आणून, त्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न करायचा आहे.”
मराठी कादंबरीकार बौद्धिक प्रश्नांशी झोंबी घेत नाहीत, ही तर वस्तुस्थिती आहे. श्याम मनोहर यांनी जेवढ्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत, तेवढीच नाटकंही लिहिली आहेत. त्यांचे प्रयोगही झालेले आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांचे अभिवाचन, त्यावर आधारित नाट्यप्रयोगही होत आहेत; पण त्यांचे स्वरूप प्रायोगिक असेच आहे. ही दखल घेण्यासारखी गोष्ट आहे की, ते तरुण लेखक-कलाकार आहेत. नव्यांना रूढ संकेतांना फाटा देणाऱ्या, अब्सर्ड धर्तीच्या आणि प्रसंगी आपल्याला नीट न उमगलेल्या गोष्टींची ओढ अधिक असते. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले पाहिजे; पण त्यांच्याकडून मूल्यमापनाची, समग्र आकलनाची फारशी अपेक्षा ठेवता येत नाही. त्यासाठी अभ्यस्त समीक्षकांचीच गरज असते; पण मराठी समीक्षेचा निदान अलीकडच्या काळातला लौकिक तरी आस्वादक आकलनाच्या पलीकडे फारसा जाताना दिसत नाही. मनोहरांच्या बाबतीत तर तो खूपच जाणवतो. त्यांच्या कादंबऱ्या आस्वादाच्या पातळीवर समजून घ्यायला-द्यायला मराठी समीक्षा कमी पडते आहे. उदा. ‘शंभर मी’ ही कादंबरी पाहू. या कादंबरीत १२५ हून अधिक प्रकरणे आहेत; पण या कादंबरीला कुठलाही नायक नाही. फारसे घटनाप्रसंगही नाहीत. माणसाच्या शंभरहून अधिक प्रवृत्ती त्यांनी एकेका प्रकरणातून मांडल्या आहेत. ही कादंबरी नीट वाचली तर कळते की, या प्रवृत्तीच या कादंबरीच्या नायक आहेत; पण व्यक्तीला नायक मानून त्याला चांगल्या-वाईट प्रवृत्ती चिकटवण्याची मराठी कादंबरीकारांची परंपरा असल्याने मराठी समीक्षकांना या कादंबरीकडे कसे पाहावे, हेच कळेनासे झाले आहे. कमी-अधिक फरकाने मनोहरांच्या सर्वच कादंबऱ्यांबाबत अशीच स्थिती आहे. सामान्य माणूस त्याच्या दैनंदिन जगण्याकडे कसे पाहतो, त्यातील संगती-विसंगती आणि विक्षिप्तपणा आपल्या कादंबऱ्यांमधून मनोहर मांडण्याचा प्रयत्न करतात. माणूस हे किती गुंतागुंतीचे प्रकरण असते, एकाच माणसामध्ये किती प्रकारच्या प्रवृत्ती असतात, त्याचा शोध घेण्याचे काम मनोहर करू पाहतात; पण ही गोष्ट समजून घेण्यात मराठी समीक्षा उणी पडते आहे, असे खेदाने म्हणावे लागते.


मराठी समीक्षकांमध्ये एक (दुष्ट) प्रवृत्ती आहे की, ते काय लिहिले आहे, ते काय प्रतीचे आहे, यापेक्षा काय लिहिले नाही, याचीच जास्त चर्चा करतात. याचा अर्थ असा होतो की, प्रत्यक्षात लेखकाला काय म्हणायचे आहे, हे मराठी समीक्षक फारसे समजून घेताना दिसत नाहीत. त्यात केवळ कथा-कादंबऱ्या-नाटके लिहिणाऱ्या आणि सार्वजनिक सभा-समारंभात न बोलणाऱ्या, फारसे गद्यही न लिहिणाऱ्या मनोहरांसारख्या लेखकाविषयी कसे जाणून घेणार, हाही प्रश्न असतोच; पण आता त्याची सोडवणूक श्याम मनोहर आणि चंद्रकान्त पाटील यांनी केली आहे. मनोहर यांच्या निवडक भाषणांचे व लेखांचे ‘श्याम मनोहर : मौखिक आणि लिखित’ हे सव्वाशे पानी पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यामुळे मनोहर केवळ कादंबरीच नाही, तर एकंदर फिक्शनचा कसा विचार करतात हे जाणून घेण्याची मोठीच सोय झाली आहे. या पुस्तकातील ‘फिक्शन हीही ज्ञानशाखा आहे’ या लेखात मनोहर म्हणतात, “माणसाच्या स्वत:च्या आवडीनिवडी असतात. स्वत:चे कल असतात, माणसात कुटुंबाचे असते. माणसात समाजघटकाचे वा जातीचे असते. शैक्षणिकतेवरूनचे, व्यावसायिकतेवरूनचे असते. भाषेचे असते. देशाचे असते. हे सगळे होत माणसाच्या माणूसपणापर्यंत जायचे असते. इतका पल्ला फिक्शनमध्ये घ्यायचा असतो आणि माणूस म्हणजे काय याचा शोध घ्यायचा असतो. त्या माणूसपात्राने त्याचे वर उल्लेखलेले सर्व बाळगत, त्यातील काही दुरुस्त करीत, त्यातील काहींना प्रश्न करीत, काहींचे विनोद करीत, काही लपवत त्या माणूसपात्राने जीवनाचा त्याचा स्वत:चा अर्थ शोधायचा असतो. हे माणसाचे कर्तव्य आहे. माणूस म्हणून हे करत नसेल, तर हे फिक्शनने करायचे असते किंवा फिक्शनने नागरिक वाचकांना त्याची जाणीव करून द्यायची असते.”
या उताऱ्यावरून मनोहरांची फिक्शनमागची नेमकी भूमिका काय आहे, हे सहज समजून घेता येईल.
आता प्रश्न एवढाच आहे की, मनोहर यांचे हे नवे पुस्तक वाचून मराठी समीक्षक त्यांच्या कादंबऱ्यांना नव्याने भिडण्याचे धाडस करतील की नाही? जे करतील, त्यांना हे लक्षात ठेवावे लागेल की, जुन्या हत्यारांनी नव्या लढाया लढता येत नाहीत. जिंकता तर अजिबातच येत नाहीत.   

No comments:

Post a Comment