Thursday, July 17, 2014

नदीन गॉर्डिमर

20 November 1923 – 13 July 2014
वर्णविद्वेषाच्या काळ्याकुट्ट अरण्याला भेदत जाणारी लेखिका म्हणून नदीन गॉर्डिमरचे नाव १९९१ सालच्या नोबेल पुरस्काराने सर्वतोमुखी झाले असले तरी ती त्याआधी कित्येक वर्षांपासून रस्त्यावर आणि कागदावर त्या विरोधात सातत्याने झगडत होती. नदीनचे वडील ज्यू तर आई ब्रिटिश. व्यवसायानिमित्त हे कुटुंब दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झाले. वडिलांच्या दुकानात येणाऱ्या काळ्यांना ज्या तुच्छतेने वागवले जाई, ते पाहून लहानग्या नदीनच्या संवेदनशील मनावर ओरखडे उमटत. या ओरखडय़ांनी नदीन वयाच्या नवव्या वर्षांपासूनच लिहायला लागली. पंधराव्या वर्षी तिचे पहिले पुस्तक  प्रकाशित झाले.
आफ्रिकेत काळ्या-गोऱ्या वर्णसंघर्षांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांमध्ये काही गोरेही होते. त्यापैकी एक बुलंद आवाज होता नदीनचा. महात्मा गांधींच्या सविनय कायदेभंगाच्या धर्तीवर 'आफ्रिकन नॅशनल काँग्रेस' शांततामय मार्गाने काम करीत असे. त्यात नदीन रुजू झाली. गोऱ्या सत्ताधीशांना नदीनचा हा संघर्ष कळत नव्हता. 'ही बया, गोरी असून काळ्यांच्या बाजूने का लढते?' असा त्यांचा सवाल असे. पण नदीन आपल्या अवतीभवती काळ्यांना जनावरांपेक्षाही अमानुष पद्धतीने वागवले जात असताना पाहूच शकत नसे. तिचा शांत स्वभाव अशा वेळी चवताळून उठे, तिच्या आवाजाला आणि शब्दांना धार येई. तिचे हे प्रखर शब्द आफ्रिकन सरकारला चटके देऊ लागले, तेव्हा 'द लेट बर्जर्स वर्ल्ड', 'अ वर्ल्ड ऑफ स्ट्रेंजर्स', 'बर्जर्स डॉटर', 'जुलैज पीपल' या तिच्या चार पुस्तकांवर सरकारने बंदी घातली. यातील पहिल्या दोन्ही पुस्तकांवरील बंदी दशकाहून अधिक काळ होती. मग नदीनची लढाई सेन्सॉरशिपच्या विरोधातही सुरू झाली. नदीनसाठी परदु:ख शीतल नव्हतेच. दु:खात असा भेदभाव करताच येत नाही, याचा वस्तुपाठ म्हणजे नदीनच्या कादंबऱ्या आणि कथा. १९९१ साली तिला नोबेल जाहीर करताना समितीने, 'तिच्या भव्य महाकाव्यासारख्या लेखनात परदु:खाबद्दलची तिची आत्मीयता प्रखरपणे प्रकट होते' असे नमूद केले. नोबेलबद्दल नदीनचे नेल्सन मंडेलांकडून अभिनंदन अपेक्षितच होते, पण जेव्हा तत्कालीन (आणि द. आफ्रिकेचे शेवटचे गोरे) राष्ट्राध्यक्ष फ्रेडरिक विलेम दि क्लर्क यांनीही तिचे अभिनंदन केले, तेव्हा नदीनला एक संघर्ष तडीस गेल्यासारखे वाटले. १५ कादंबऱ्या, २० कथासंग्रह आणि पाच लेखसंग्रह लिहिणारी नदीन जशी समर्थ लेखिका होती, तशीच समर्थ कार्यकर्तीही होती आणि तितकीच समर्थ आईसुद्धा. नव्वदच्या दशकात आफ्रिकन समाजाला एड्ससारख्या दुर्धर आजाराने ग्रासायला सुरुवात केली, तेव्हा त्याविषयी नदीनने तडफेने आणि हिरिरीने जनजागृती केली. ही संघर्षयात्रा १३ जुलै रोजी तिच्या निधनाने संपली.

No comments:

Post a Comment