Wednesday, November 21, 2012

लेखक अर्धाच पूल बांधू शकतो...

LOKSATTA, Sunday, November 11, 2012
कादंबरीकार- नाटककार किरण नगरकर यांच्याशी बोलणं हा एक सुंदर अनुभव असतो. आपण सेलिब्रेटी लेखक आहोत, याचा जराही अहंकार त्यांच्या बोलण्यामध्ये डोकावत नाही. उलट, स्वतकडे कमीपणा घेऊन ते आपल्या पुस्तकांच्या निर्मितीबद्दल, त्यामागच्या प्रेरणांबद्दल बोलतात. त्यांच्या 'रावण अँड एडी', 'गॉड्स लिटिल सोल्जर', 'ककल्ड' आणि 'द एक्स्ट्राज' या कादंबऱ्यांनी इंग्रजीमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. एक मराठी माणूस इंग्रजीमध्ये 'हायली रिडेबल' आहे याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. मराठीविषयी त्यांना कमालीचं प्रेम आहे.
पण मराठीतल्या साहित्यिक राजकारणाचा, गटबाजीचा आणि पूर्वग्रहांचा त्यांना भयंकर तिटकारा आहे. त्याविषयी बोलताना ते कळवळतात. नगरकरांना नुकताच जर्मन सरकारनं नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं. त्यानिमित्तानं दिवाळीच्या प्रसन्न वातावरणात एका वेगळ्याच विश्वात रमलेल्या लेखकाशी राम जगताप यांनी मारलेल्या या गप्पा...


तुमच्या जवळपास सर्व पुस्तकांचे अनुवाद जर्मनमध्ये झाले आहेत. या लेखनामुळे जर्मनी-भारत यांच्यामध्ये सांस्कृतिक अनुबंध निर्माण झाला. त्यासाठी नुकतंच तुम्हाला जर्मन सरकारतर्फे 'ऑर्डर ऑफ मेरिट' या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. जर्मनी हा भारताचा जुना मित्र आहे. नेहरूंच्या काळापासून जर्मनीशी भारताचे अतिशय सौहार्दाचे संबंध राहिले आहेत. त्याला तुमच्या सन्मानानं एक वेगळा आयाम मिळाला आहे. लेखन हीच लेखकाची कृती असते असं म्हणतात. त्यामुळे हा पुरस्कार विशेष मोलाचा वाटतो. तुमच्या काय भावना आहेत या पुरस्काराविषयी?
- आजच्या जमान्यात लेखनाला महत्त्व देणं दुर्मीळ आहे. त्यामुळे या पुरस्काराचा मला नक्कीच आनंद आहे, प्रश्नच नाही. मी जर्मनीत अनेक ठिकाणी बोलतो.. बोलत आलेलो आहे. मला त्यांचं नेहमी कौतुक वाटतं. अहो, ते वाचताहेत हो चक्क! कठीण पुस्तकंही ते वाचतात. अमेरिकेतही पुस्तकं भरपूर आहेत; पण जर्मनांचं प्रेम औरच. जर्मन लोक मला नेहमी सांगतात की, आमच्याकडे किती कमी अनुवाद होतात. जागतिक पातळीवर पाहता ३.५ टक्के अनुवाद फक्त जर्मनीत होतात. मला वाटतं अमेरिकेत ०.३ टक्के पण होत नाहीत. त्यामुळे ही खरोखरच गौरवाची गोष्ट आहे, की त्यांना अजूनही वाचनाचा नाद आहे. आपल्याकडे मी नेहमी स्वत:ची थट्टा करतो की, माझ्या पुस्तकाचं जेव्हा अभिवाचन असतं, तेव्हा मला लोकांना पैसे देऊन बोलवावं लागतं. याउलट जर्मनीमध्ये लेखक अभिवाचन करायला आला की ते पैसे देऊन ते ऐकायला येतात. हे तुम्हाला कुठे मिळणार आहे? अहो, इथं महाराष्ट्रात माझं नाव कुणी ऐकलंय का?


वाङ्मयीन संस्कृती आणि वाङ्मयीन लोकशाही याविषयी जर्मनीकडून आपण बरंच शिकण्यासारखं आहे..?
- जर्मनीच्या बाजूनं बोलावं तेवढं कमीच. पहिली गोष्ट तर कधी विसरता येत नाही, की नाझींचा ज्यूसंहार कधीच विसरता येत नाही. सहा मिलियन ज्यूंना त्यांनी मारलं. त्याविषयीचा गिल्ट त्यांच्या लेखनात, कलेत सतत येत राहतो. याउलट आपण! आपल्याकडे 'ओलावा' नावाचा शब्द आहे. त्यामुळे आपण सगळं भावनिक करून टाकतो आणि नाकारतोही. आपल्या देशात काही थोर लोक होऊन गेले आहेत, त्यांनीपण काही भयाण गोष्टी केलेल्या आहेत. त्याविषयी आपण बोलू शकतो का? सुभाषचंद्र बोसांबद्दल कठोर सत्य बोलता येतं का? 

म्हणजे वाचकाकडून लेखकाला ज्या प्रकारचा प्रतिसाद हवा असतो, ज्याचा लेखक भुकेला असतो.. वाचक म्हणून लेखनाला न्याय देण्याचं काम जर्मनमध्ये खूप चांगल्या प्रकारे होतं असं तुम्हाला म्हणायचंय का?
- मला तरी तसं वाटतं. मी जेव्हा 'गॉड्स लिटिल सोल्जर' लिहिलं, तेव्हा त्यांनी ते ताबडतोब अनुवादित केलं. 'गॉड्स..'मधील एक अतिशय महत्त्वाची व्यक्तिरेखा शेवटच्या पन्नास पानांत येते. त्याविषयी लिहिताना एका जर्मन समीक्षकानं असा प्रश्न विचारला की, ६००-७०० पानांचं पुस्तक लिहावं, तरीही अतिशय तुफान गती असावी. मात्र, इतका महत्त्वाचा विषय गंभीरपणे हाताळणं, हे जमू शकतं का? पुढे त्यानं लिहिलंय की, शेवटच्या पानांत महत्त्वाच्या व्यक्तिरेखांची ओळख करून द्यायची, हा मॅडनेस आहे. थोडक्यात- ते बारकाईनं वाचतात.
आणखी एक : 'गॉड्स लिटिल सोल्जर'चा विषय आहे जहालमतवाद आणि दहशतवाद. हा आजच्या घडीला अतिशय महत्त्वाचा आहे. मुंबईवर इतक्या वेळा हल्ला झालेला आहे! मुस्लीम राष्ट्र नसलेलं असं दुसरं कुठलंही शहर जगात नसेल. पण याविषयी आपल्या समाजामध्ये कधी बोलणं होतं का हो? त्याविषयी आपण सार्वजनिक चर्चा करतो का? कशामुळे हे होतंय? या हल्ल्यासाठी नेहमी मुस्लीम समाजाला दोषी ठरवलं जातं. एक गोष्ट लक्षात घ्यायलाच पाहिजे. आपण 'ब्लॅक फ्रायडे' पाहतो तेव्हा ती बरोबर कळते.. मुस्लीम समाज पण किती दु:खी आहे! मुंबईत दंगली झाल्या तेव्हा आपण त्यांची काय वाट लावली! 'मॅक्झिम सिटी'मध्ये सुकेतू मेहतानं एकाचं अवतरण दिलंय. तो माणूस म्हणतो- आग लागली ना, मग तेल बाहेर येतं!
व्ही.टी. - ताज- ओबेरॉयवर हल्ला झाला तेव्हा मी जर्मनीत होतो. ते मला विचारत होते- यू आर द एक्स्पर्ट ऑन धिस. मी त्यांना परत परत सांगत होतो की, मी कसला एक्स्पर्ट? बॉम्बहल्ला झाला की मला पहिल्यांदा वाटतं- मला काय समजलं यातून? हे कधीच थांबणार नाही का? कोणाला तरी मारायचं, यामागे काही एकच प्रेरणा असत नाही; कित्येक प्रेरणा असतात. मी फक्त एक प्रेरणा घेऊन 'गॉड्स लिटिल सोल्जर' लिहिलंय. याविषयी आणखी १०० लोकांनी लिहिलं तर उत्तम होईल. 


भारतीय मुस्लिमांचं चुकीचं आणि विपर्यस्त चित्रण केल्याबद्दल नुकत्याच मुंबईत झालेल्या साहित्य महोत्सवामध्ये ज्येष्ठ नाटककार गिरीश कार्नाड यांनी नोबेलविजेते व्ही. एस. नायपॉल यांच्यावर जाहीर टीका केली. या विपर्यस्त लेखनामुळेच नायपॉल यांना नोबेल मिळालं असावं, असं कार्नाड यांनी उपहासानं म्हटलं आहे.
- कार्नाडांचा मुद्दा अतिशय चांगला आणि ठळक आहे! कार्नाड हा अतिशय शांत प्रकृतीचा माणूस आहे. त्यामुळे त्यांना तीव्रपणे तसं वाटलं असणार, तेव्हाच ते हे बोलले असतील. 


सध्या लेखनावर केवळ आपल्याकडेच नव्हे तर जगभर घोषित-अघोषित आणि सरकारबाह्य़ सेन्सॉरशिप लादल्या जात आहेत. त्यांचं प्रमाण वाढत आहे. जर्मनीत काय स्थिती आहे?
- तिथे अशा सेन्सॉरशिप बिलकुल नाहीत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे विद्यापीठांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. वेगवेगळी मतं, दृष्टिकोन मांडण्याचं स्वातंत्र्य जर्मनीमध्ये निश्चित आहे; तितकं अमेरिका-युरोपमध्येही नसेल.


'रावण अ‍ॅण्ड एडी' आल्यावर काही समीक्षकांनी तुमच्याविषयी म्हटलं होतं, ''Wow, you must have been born in the toilets of chawl'' आता त्याचा दुसरा भाग 'द एक्स्ट्राज' आल्यावर त्याच्याविषयी काय प्रतिक्रिया आहेत?

- ''रावण अ‍ॅण्ड एडी' इज लास्ट वर्ड ऑन बॉम्बे!' असं एकानं लिहिलं होतं. तेव्हा त्याला मी सांगितलं- धिस इज नॉट फायनल बुक ऑन बॉम्बे. कितीतरी लोकांनी लिहिलं आहे. तो खूप प्रामाणिक होता. त्यानं म्हटलं की, नगरकर माझ्याशी बिलकुल सहमत नाहीत. असो.
'द एक्स्ट्राज'मध्ये व्हेरी व्हेरी फनी सेक्स आहे. आपल्याकडच्या शिल्पांमध्ये, मंदिरांमध्ये सेक्स आहेच की! पण आपल्याला शरम कसली? कपडे काढल्याची! 'द एक्स्ट्राज'मध्ये गंभीर विनोद आहे, पण त्यात भरपूर मजा आहे. मला तमाशा फार आवडतो. आपल्या लोककलांमध्ये सेक्सबद्दल काहीही प्रॉब्लेम नाही. स्त्री-पुरुष देवांची छानपैकी टर उडवतात. फॅन्टॅस्टिक खरं बोलतात. हे आपल्या रक्तामध्येच आहे. त्यामुळे ते माझ्या पुस्तकामध्येही येतं. पण 'द एक्स्ट्राज'मधल्या मुंबईविषयी, बॉलीवूडविषयीच बोललं जातं. हे पुस्तक खदाखदा हसवतं, याच्याकडे कुणी लक्षच द्यायला तयार नाही.


आपल्या लोककलांमध्ये हा जो निरागस, स्वच्छंदी मनमोकळेपणा आहे, तो साहित्यातून व्यक्त झाला की आपल्याला पचवणं कठीण जातं..?
- तुम्ही अगदी बरोबर बोललात. पचवणं कठीण जातं! मग आमच्यातली दांभिकता बाहेर येते. आमचा समाज असा नाही. आम्ही सभ्य लोक आहोत. मला वाटतं, देवांना २४ हात असतील, पण आपल्याकडच्या लोकांना कमीत कमी दहा करोड हात आहेत. जेवढे पैसे खिशात भरता येतील तेवढे भरायचे आणि वर चांगुलपणाचा आव आणायचा.


'सात सक्कं त्रेचाळीस' या माझ्या पुस्तकाच्या २७ वर्षांत फक्त एक हजार प्रती विकल्या जात असतील तर मराठीत लिहू कशाला?', असा प्रश्न तुम्ही याआधीही उपस्थित केला आहे. ही तुमची खंत काहीशी अस्वस्थ करणारी आहे. पण ती तितकीशी बरोबर नाही असं वाटतं. एक म्हणजे तुमची ही कादंबरी साठोत्तरी काळातील एक महत्त्वाची कादंबरी मानली जाते. दुसरं म्हणजे खप आणि वाचकप्रियता म्हणाल तर या दोन्ही गोष्टी एका मर्यादेनंतर मार्केटिंग, जाहिरात, वितरण यावरच अवलंबून असतात ना..
- तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. 'सात सक्कं त्रेचाळीस' प्रकाशित झाली त्या काळात एवढं मार्केटिंग नव्हतं. पण मी तुम्हाला एक सांगू का, ज्याविषयी मराठी वर्तमानपत्रं वा मासिकं कधी बोलत नाहीत- मी मराठीमध्ये लिहायला कसा लागलो? फक्त चौथीपर्यंत माझं शिक्षण मराठीतून झालं, त्यानंतर माझा मराठीशी संबंध पूर्णपणे तुटला. इंग्रजीशिवाय मला इतर कुठलीही भाषा येत नव्हती. कर्मधर्मसंयोगानं मी मराठी लिहायला लागलो. माझं मराठीला जे देणं आहे, ते मला कधीच फेडता येणार नाही.. आणि फेडायचंही नाही मला. भाषेचं ऋण कशाला फेडायचं? भाषेचं म्हणणं एवढंच- माझा आदर करा. भाषेतले शब्द म्हणजे गोल्ड कॉइन. २४ कॅरेट. ते सांभाळून वापरावेत. आजकाल कुठलंही पुस्तक 'फॅन्टॅस्टिक', कशालाही 'ग्रेट'! अरे, आहे काय? 'न्यूयॉर्कर'च्या पहिल्या संपादकानं असा कायदाच केला होता की, 'ग्रेट' हा शब्द वापरायचा नाही. कारण लोक त्याचा फार गैरवापर करतात. आता तर 'ग्रेट' हा शब्द मराठीच झालेला आहे. अहो, टॉलस्टॉय, शेक्सपीअर, कबीर हे लोक 'ग्रेट' असतील तर बाकीचे लोक 'ग्रेट' होऊ शकत नाहीत. त्यांना खालीच ठेवायला लागतं.


तुमची 'ककल्ड' कादंबरी भक्ती-परंपरेविषयी, 'रावण अ‍ॅण्ड एडी' ही मुंबईतल्या चाळसंस्कृतीविषयी, 'गॉड्स लिटिल सोल्जर' दहशतवादाविषयी.. टोकाचे म्हणता येतील असे हे विषय आहेत.. कुठल्याच कादंबरीचं एकमेकीशी साम्य नाही. हे कसं जमतं तुम्हाला?
- काही नाही, देवाची कृपा. आणि देवकृपेनं ते तसंच राहावं. आय डोन्ट वॉण्ट टु रिपीट मायसेल्फ. आपण कुणी खास आहोत असं प्रत्येकाला स्वत:बद्दल वाटत असतं. पण मला तसं वाटत नाही. 'सात सक्कं त्रेचाळीस'ची वेगळी शैली होती. तेव्हा ती काहींना आवडलीही होती. पण अमुक एक गोष्ट सक्सेसफुल झाली म्हणून परत परत तेच करत बसणं मला नाही पटत. नवे नवे फॉर्म शोधावेसे वाटतात. मला ओरिजिनल असण्याचा काहीही अभिमान नाही. कोण ओरिजनल बनणार आहे? महाभारतानं सगळं करून ठेवलेलं आहेत. इलियट-ओडिसीनं सगळं करून ठेवलेलं आहे. त्यामुळे ओरिजिनलच्या पाठीमागे जे लागतात ना, ते खरोखरच धन्य आहेत. मला त्यांच्याबद्दल काही म्हणायचं नाही. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण मला काही ते जमायचं नाही बुवा. माझी इच्छाही नाही. मला फक्त वेगवेगळ्या विषयांवर लिहायचंय, माझ्या परीनं.


तुम्ही 'ककल्ड' ही मीराबाईविषयीची कादंबरी लिहिली. तिला साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला. पण तुम्हाला तर मीरेवर लिहायचं नव्हतं..?
- बिलकुल हात लावायचा नव्हता. 


म्हणजे मीरेनं तुम्हाला तुमचे शब्द मागे घ्यायला लावले..?
- अहो, तिनं माझ्या थोबाडीत मारली. माझे शब्द माझ्याच घशात घातले. मी लहानपणापासून पोस्टरवरील किंवा कॅलेंडरवरील मीरेचा फोटा पाहत आलो होतो. म्हणून मला तिच्यावर लिहायचं नव्हतं. पण तो माझा मूर्खपणा होता. आपल्या हिंदी चित्रपटांनीसुद्धा तेच केलेलं आहे. परत परत तोच क्लिशे पुढे आणला जातो. पण मीरा क्लिशे नाही, ती बंडखोर आहे. शी इज वन ऑफ द फर्स्ट रिव्होल्यूशनरी. शी इज ऑल्सो फर्स्ट फेमिनन.
दुसरं इतिहास आणि भक्ती हे विषय 'ककल्ड'मध्ये ज्या पद्धतीनं मी हाताळले आहेत, तसे फार क्वचित कुणी हाताळले असतील. महाराजा कुमार मीरेशी लग्न करतो, पण ती त्याला सांगते- 'सॉरी, माझं कुणावर तरी प्रेम आहे!' तिचा प्रियकर हा कुणी साधासुधा माणूस नाही, तर तो साक्षात् भगवान श्रीकृष्ण आहे. हा जो प्रेमाचा त्रिकोण आहे, तो अतिशय वेगळ्या प्रकारचा आहे. आणि तो भक्तीचा त्रिकोण आहे. पण यात आणखी एक गंमत आहे. महाराजा कुमारचा रोल मॉडेल आहे कृष्ण. गोपींबरोबर फिरणारा नाही, तर 'गीता'कर्ता कृष्ण! तो सगळं काही कृष्णाकडून शिकलेला आहे. तो त्याचा सखा, त्याचा देव साक्षात् त्याच्याच बायकोचा प्रियकर आहे. ही फार विचित्र परिस्थिती आहे. महाराजा कुमार तिचा खून करायचाही प्रयत्न करतो. पण त्याला शेवटी समजतं की, मीरेचं कुणावरच प्रेम नाही, तिचं फक्त कृष्णावरच प्रेम आहे. ही जी या कादंबरीतली गुंतागुंत आणि तणाव आहेत, ते या पुस्तकाचं वेगळेपण आहे असं मला वाटतं. मी 'ककल्ड' लिहायला घेतली तेव्हा आपण काय लिहिणार आहोत, याची मला काहीही कल्पना नव्हती. मला फक्त इतकंच माहीत होतं की, कुठल्यातरी एका क्षणी महाराजा कुमार स्वतला निळा बनवणार आहे.


मघाशी तुम्ही 'देवाची कृपा आहे,' असं म्हणालात म्हणून विचारतो- देवावर तुमचा विश्वास आहे?
- जेव्हा भक्तीचा संबंध येतो ना, तेव्हा! नारायणराव व्यास म्हणून एक गाणारे होते. एरवी कृष्णाची प्रेमगीतं मला सहन होत नाहीत अगदी. पण नारायणराव ती गीतं गातात तेव्हा मी त्यांचे पाय धरतो. तेव्हा मला कृष्ण खरा वाटतो.


भक्तीपरंपरेबद्दलची ही तुमची ओढ कुणामुळे निर्माण झाली? अरुण कोलटकरांमुळे?
- कोलटकर तुफान माणूस. हसून पोट दुखायचं. त्याचा सेन्स ऑफ ह्य़ूमर जबरदस्त होता. वाचन अगाध. समज बेफाम. दुसरं- माझ्या घरचे लोक प्रार्थना-समाजी. त्यामुळे आमच्याकडे ते होतंच. संतांचं तर आमच्याकडे फार कौतुक.


लेखकानं नैतिकता आणि न्याय यांच्यासाठी आपल्या लेखनाच्या माध्यमातून हस्तक्षेप करायचा असतो असं मानलं जातं. तसा हस्तक्षेप तुम्ही करत आला आहात. तुम्हाला मराठीमध्ये नैतिकता व न्यायासाठी झगडावं लागतं आहे का?
- कोलटकर, कधी कधी चित्रे यांनाही झगडावं लागलंच की! कोलटकरांचं तर बघायलाच नको. मला एकच वाईट वाटतं- हे लोक कसे गट करतात हो! जिथे कुठे चांगलं साहित्य असेल, तर तो एकच गट असायला हवा ना? मग एवढे गट कशासाठी करायचे, मला हे समजत नाही. 


तुम्ही अजूनही स्वतला कॉन्झर्वेटिव्ह (परंपरावादी) आणि अन्अ‍ॅडव्हेंचरस (अ-साहसी) मानता का?
- हो. जेवढी करामत करायला हवी होती, तेवढी मी केलेली नाही. त्यामुळे मी तसंच मानतो. प्रश्नच नाही. लोकांना ओरिजिनॅलिटीमध्ये अ‍ॅडव्हेंचर वाटतं. मला त्यात पडायचं नाही. मी गोष्टी सांगणारा माणूस. मला एका अत्यंत यशस्वी नाटककारानं सांगितलं होतं- तुला जमत नाही, तर तू कशाला लिहितोस? तू लिहायचं बंद कर. तेव्हा मी अर्थातच दुखावला गेलो होतो. त्यानंतर एक महिना, दोन महिने, तीन महिने गेले. मग मी स्वतला विचारलं, अरे बाबा, तू दुखावला गेलास त्याचं कौतुक आता पुरे. आता पुढे चल. 


आपल्याकडे गोष्ट रंगवून सांगण्याची बखरगद्याची परंपरा होती. ती आपण साहित्यातून फारशी पुढे आणली नाही. त्यामुळे मराठीचं नुकसान झालं असं म्हणता येईल का?
- हो, अगदी बरोबर. आपण ते समजून घ्यायला तयार नाही. सगळं काही आपल्याकडे आहे. शेक्सपीअर, टॉलस्टॉय, गार्सिया माक्र्वेझ मला पाहिजे; पण मला संतांशिवाय कधीच जगता येत नाही. काय म्हणून जगू मी? अहो, केवढी मोठी परंपरा आहे आपल्याकडे! चोखामेळा, नामदेव, बहिणाबाई.. तुफान. काय सेन्स ऑफ ह्य़ूमर बहिणाबाईचा! किती हलकंफुलकं, पण महत्त्वाचं बोलून जाते ती! मुक्ताबाई घ्या! ती आपल्या भावाला सांगते- दार उघड रे!


हल्ली मराठीच्या भवितव्याची चिंता मोठय़ा प्रमाणावर व्यक्त होऊ लागली आहे. मराठीपुढे इंग्रजीचं संकट उभं राहिलं आहे असं सांगितलं जातं. त्याविषयी काय वाटतं?
- मला यात अत्यंत खोटेपणा वाटतो! पण आग्र्युमेन्ट इज अ‍ॅब्स्युलिट्ली राइट. अशी कुठलीही भाषा म्हणत नाही, की फक्त मलाच आपुलकी दाखवा. भारतात चार भाषा बोलणं हे आरामात जमायला पाहिजे. सगळ्या प्रादेशिक भाषा म्हणतात की, इंग्रजीनं आमची वाट लावली. पण या भाषांना परस्परांबद्दल आदर वाटतो का? तुम्ही कधी बघितलंय- कुणी मराठी माणूस तमिळमध्ये इंटरेस्टेड आहे? गुजराती माणूस कन्नडमध्ये इंटरेस्टेड आहे? नाही. हे फक्त बोलण्यासाठी! मराठी माझी मातृभाषा आहे. त्यामुळे मला मातृभाषा आणि इंग्रजी बोलण्यामध्ये काही प्रॉब्लेमच वाटत नाही. शरमेची गोष्ट एवढीच, की मी फक्त दोनच भाषा बोलू शकतो. त्याही बेताच्या; चांगल्या नाही.


आपल्याकडे जी भाषा, लिंग, धर्म, पंथ आदी विविधता आहे, आणि या विविधतेतही वेगळ्या प्रकारची एकता आहे, त्या परंपरेला अलीकडच्या काळात काही भारतीय लेखकांकडूनच तडे जायला सुरुवात झाली आहे. भाषेचं राजकारण केलं जाऊ लागलं आहे..
- अगदी बरोबर बोललात तुम्ही. अहो, भाषा म्हणजे आपली आई. केवळ गोंजारणारी आई नाही. अतिशय कठीण आणि कठोर बाई आहे ती. त्यामुळे भाषेचं राजकारण केलं जाणं ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. मला याचा राग येतो की, काही लोक म्हणतात मराठीवर आमचं प्रेम आहे. मग तुमच्या पोरांना कामापुरतं बोलता-लिहिता येऊ नये मराठी? आपल्याकडची कुठली भाषा अप्रतिम नाही? हिंदी-बंगाली याही अप्रतिम भाषा आहेत. आपल्याकडे किती भाषा आहेत! केवढी मोठी संपत्ती आहे ही! ही संपत्ती जगात कुणाकडे आहे? आपण शिक्षणाच्या माध्यमात किमान चार भाषांचा का समावेश करत नाही?


मराठीमध्ये तुमचा म्हणून एक चाहतावर्ग आहे. तो संख्येनं छोटा असेल; पण आहे. पण त्यांच्यासाठी तुम्ही दुर्मीळ असता. लेखक दुर्मीळ असणं हे त्याच्या वाचकासाठी अन्यायकारक असतं..
- मराठी वाचकांचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमीच ठरतील. लेखक फक्त अर्धा पूल बांधू शकतो; उरलेला अर्धा पूल त्याचे वाचक बांधत असतात. कुणीही मला कधीही सांगावं- नगरकर तुमचा अमुक एक दिवस आम्हाला हवा आहे.. आपण तुमच्या साहित्याचं वाचन आणि चर्चा करू. माझी कधीही तयारी आहे. माझ्या अपेक्षा फार कमी आहेत. आय नीड एन्टायर वर्ल्ड ऑफ माय रीडर. माझ्या वाचकांसाठी कुठलीही तडजोड करायला माझी हरकत नाही. नाहीतर लिहायचं कशासाठी? 


... किरण नगरकरांशी बोलताना जाणवते ती त्यांची कमालीची लेखननिष्ठा, त्यांचं लेखकपण. लेखक म्हणून जगणं नेमकं काय असतं, याचा सच्चा अनुभव घ्यायचा असेल तर नगरकरांना भेटलंच पाहिजे. कारण लेखनाशी निगडित असलेल्या सर्व प्रकारच्या राजकारणापासून कटाक्षानं अलिप्त राहणारा हा मनस्वी कादंबरीकार 'निवडितो ते सत्त्व' या धारणेनं लिहीत आहे, जगत आहे...

2 comments:

  1. विचारचक्र... :)

    तुमचे बहुतेक सगळेच लेख विचारांना खाद्य देणारे असतात. आवडतातही. आवर्जून वाचावे असेच !

    ReplyDelete
    Replies
    1. भानस
      आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद! आपल्या लेखनातून वाचकांना काहीतरी मिळावे असाच माझा प्रयत्न असतो.

      Delete