Saturday, March 9, 2013

चरित्रकाराचे रसाळ चरित्र

कथा- कादंबरी- कविता यांच्यापेक्षा एखाद्या व्यक्तीचे चरित्र लिहिणे हे अवघड काम मानले जाते. कारण त्यात कल्पनेच्या भराऱ्या मारता येत नाहीत की वस्तुस्थितीचा विपर्यास करता येत नाही. (आणि ज्या पुस्तकांमध्ये असे प्रकार होतात त्यांना 'चरित्र' मानले जात नाही.) चरित्रनायकाकडे निरक्षीरविवेकानेच पाहावे लागते. समतोल आणि तटस्थपणा या कसोटय़ा लावून त्याचे मूल्यमापन करावे लागते. तत्कालीन सर्व प्रकारची संदर्भसाधने, चरित्रनायकाने स्वत: केलेले आत्मपर वा इतर लेखन, त्याचा इतरांशी वा इतरांचा त्याच्याशी असलेला खासगी पत्रव्यवहार, समकालिनांची चरित्रे-आत्मचरित्रे, रोजनिश्या, तत्कालीन वर्तमानपत्रे यांची बारकाईने छाननी करून माहिती मिळवावी लागते. ती संगतवार लावून त्यांचा योग्य अन्वयार्थ लावावा लागतो. पुराव्यांची विश्वासार्हता पडताळून घेऊन त्यांची खातरजमा करावी लागते. यातून अभ्यासाअंती जे निष्कर्ष येतील ते तितक्याच स्पष्टपणे मांडण्याचे धैर्य दाखवावे लागते. थोडक्यात- चरित्रनायकाचा कैवारही घेता येत नाही आणि त्याला केवळ आरोपीच्या पिंजऱ्यातही उभे करून चालत नाही.


या कसोटीला बऱ्याच प्रमाणात पत्रकार व प्राध्यापक न. र. फाटक यांनी लिहिलेली चरित्रे उतरतात असा निर्वाळा अनेक मान्यवर देतात. फाटक हे मराठीतले एक साक्षेपी चरित्रकार मानले जातात. फाटकांनी न्या. रानडे, ना. गोखले, लोकमान्य टिळक, यशवंतराव होळकर, नाटय़ाचार्य खाडिलकर यांच्याबरोबरच समर्थ रामदास, संत एकनाथ, ज्ञानेश्वर या संतांची साक्षेपी चरित्रे लिहून मोठेच सांस्कृतिक संचित पुढील पिढय़ांसाठी उपलब्ध करून दिले आहे.

फाटक यांनी १८-१९ वर्षे पत्रकारिता केली. त्यानंतर ते रुईया महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथूनच ते निवृत्त झाले. 'मी प्रथम वृत्तपत्रकार, नंतर प्राध्यापक व ग्रंथकार आहे,' असे स्वत: फाटकांनीच एका कार्यक्रमात म्हटल्याचे म. म. अळतेकर यांनी नमूद केले आहे. फाटक पत्रकार व प्राध्यापक होतेच; पण तितकेच चांगले चरित्रकारही होते. त्यामुळेच आज त्यांची ओळख ही मुख्यत: त्यांच्या चरित्रलेखनामुळेच आहे. त्यांनी वयाच्या पंचविसाव्या वर्षी लिहिलेले न्या. रानडे यांचे चरित्र आजही महत्त्वाचे मानले जाते. रानडे यांच्याविषयी आजवर बरेच लिहिले गेले आहे; परंतु त्यांच्याविषयी जाणून घेताना वा लिहिताना फाटकांचे चरित्र वगळून पुढे जाता येत नाही.

अशा चरित्रकार फाटकांचे चरित्र त्यांच्या विद्यार्थिनी अचला जोशी यांनी लिहिले आहे. त्यामुळे 'चरित्रकाराचे चरित्र' असे या पुस्तकाचे वर्णन करावे लागेल. अचला जोशी यांना आधी विद्यार्थिनी म्हणून आणि नंतर स्नेही म्हणून फाटकांचा सहवास लाभला. शिवाय त्यांचे फाटकांच्या कुटुंबाशी घरगुती संबंध होते. त्यामुळे या चरित्राला एक आपलेपणाचा आणि आदराचा स्पर्श झालेला आहे.

फाटकांचे चरित्र लिहिताना केवळ त्यांच्या चरित्राचाच विचार करून चालणार नव्हते. त्यांच्या 'अठराशे सत्तावनची शिपाईगर्दी', 'मुंबई नगरी', 'नारायणराव पेशवे यांचा खून की आत्महत्या?' अशा इतर लेखनाचाही विचार करावा लागणार होता. शिवाय फाटकांनी वेळोवेळी दिलेल्या व्याख्यानांची संख्याही पाचशेहून अधिक आहे. म्हणजे चरित्रनायक फाटक यांची ग्रंथसंपदा आणि कर्तृत्व औरसचौरस म्हणावे असे आहे. जोशी यांनी त्यापैकी शक्य तेवढे लेखन नजरेखालून घालून हे चरित्र पूर्ण केले आहे.

चरित्रलेखनामागच्या आपल्या भूमिकेविषयी जोशी यांनी प्रास्ताविकात म्हटले आहे की, 'सरांच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या घटना-प्रसंग लिहीत गेले. एका वेळी अनेक स्तरांवर चालत असलेल्या सरांच्या अनेकविध भूमिकांचे पेड विणत हे चरित्र पुरं केलं. सरांच्या जीवनाच्या त्या- त्या कालखंडात जे मुख्यत्वानं घडलं, त्याला अनुसरून या चरित्राची 'संपन्न संस्कारांचं बाळकडू', 'पत्रकार : चरित्रकार : टीकाकार', 'मूर्तिभंजक', 'अध्यापनपर्व व संस्थाजीवन', 'ग्रंथनिर्मिती', 'निर्भय, निर्भीड साहित्यप्रवास', 'वन्स अ टीचर, ऑलवेज अ टीचर' आणि 'अखेर' अशा आठ प्रकरणांमध्ये विभागणी केली आहे.

फाटकांच्या महत्त्वाच्या चरित्रांचा, त्यांच्या वर्तमानपत्रातील आणि प्राध्यापकीय कारकीर्दीचा जोशी यांनी सविस्तर आढावा घेतला आहे. फाटकांच्या कौटुंबिक जीवनाचा आणि घरगुती आठवणींचा यातला भागही रसाळ झाला आहे. त्यातून घरातले फाटक चांगल्या प्रकारे उभे राहतात. लेखनाच्या बाबतीत अतिशय आग्रही, सडेतोड आणि निर्भीड असणारे फाटक प्रत्यक्षात आपले कुटुंब, मित्र, विद्यार्थी यांच्याशी किती ममत्वाने आणि अगत्याने वागत याचे हृदयस्पर्शी चित्र यात रेखाटलेले आहे. नको तितका फटकळपणा, पूर्वग्रह आणि काही बाबतीतला पक्षपात या फाटकांच्या स्वभावदोषांबद्दलही लेखिकेने स्पष्टपणे लिहिले आहे.

मराठीतली चरित्रलेखन परंपरा ही साधारणपणे चरित्रनायकाच्या बाजूची वा स्तुतीपर अशीच आहे. चरित्रनायकाविषयी आदर वा भक्ती ठेवूनच चरित्रे लिहिली जातात. त्यामुळे चरित्रनायकाला झुकते माप देण्याचा प्रयत्न होतो. याउलट, चरित्रनायकाचे दोष व मर्यादा सांगण्याच्या प्रयत्नांत त्याच्यावर कधी कधी अन्यायही होतो. या दोन्ही गोष्टी फाटकांनी लिहिलेल्या चरित्रांमध्येही काही प्रमाणात घडलेल्या आहेत. म्हणूनच 'नामदार गोखले' या फाटकांच्या चरित्राचे परीक्षण करताना संशोधक य. दि. फडके यांनी म्हटले होते की, 'चरित्र लिहिणे म्हणजे चरित्रनायकाचे वकीलपत्र घेणे नव्हे.' तेव्हा फाटकांच्या चरित्राची कालसुसंगत समीक्षा करण्याचीही गरज होती असे वाटते. शिवाय फाटक यांनी केलेल्या आत्मपर लेखनाचा वापर केला किंवा नाही, याचा अचला जोशी यांनी उल्लेख केलेला नाही. त्यातून कदाचित 'मी प्रथम वृत्तपत्रकार..' या त्यांच्या विधानाचा आणि त्यांच्या एकंदर निर्भीड लेखनाचा अन्वयार्थ लागू शकला असता. पण ही काही जोशी यांच्या या चरित्राची मर्यादा नव्हे; कारण त्यांनी फाटक यांचे कौटुंबिक जीवन आणि त्यांच्या ग्रंथसंपदेचा आढावा या दोन विषयांभोवती या चरित्राची गुंफण केली आहे. त्यातून फाटक एक व्यक्ती व पत्रकार-प्राध्यापक म्हणून उलगडण्यास मदत होते.

या पुस्तकाची निर्मिती मुंबई साहित्य संघाने उत्तमरीत्या केली आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ, मांडणी, छपाई, कागद या सर्वच बाजू देखण्या झाल्या आहेत. त्यामुळे या चरित्राची किंमत जरा जास्त झाली आहे. मात्र, हे चरित्र विद्यार्थी, प्राध्यापक, पत्रकार आणि जिज्ञासूंनी आवर्जून वाचावे असे आहे. कारण लोकोत्तर पुरुषांची नवनवी चरित्रे लिहिली जाणे, ती समाजामध्ये त्या- त्या वेळी वाचली जाणे, हा त्या समाजाच्या सांस्कृतिक प्रगल्भतेचा पुरावा असतो.

'ज्ञानतपस्वी रुद्र' (नरहर रघुनाथ फाटक यांचे चरित्र) - अचला जोशी, मुंबई मराठी साहित्य संघ, पृष्ठे- २८०, मूल्य- ४५० रुपये.



No comments:

Post a Comment