Thursday, August 1, 2013

निरलस वैयाकरणी

(कृष्ण श्री. अर्जुनवाडकर-31 Oct. 1926-30 July 2013)

संस्कृत साहित्य, भारतीय तत्त्वज्ञान, साहित्यशास्त्र, मराठी व्याकरण, शुद्धलेखन अशा विषयांचा साक्षेपाने आणि शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारा विद्वान कधीच लोकप्रिय असत नाही आणि अलीकडच्या महाराष्ट्रात तर अशा विद्वानांची महत्ता कळण्याचीही सोय नाही. त्यामुळे कृष्ण श्री. अर्जुनवाडकर यांच्याविषयी महाराष्ट्रातल्या बुद्धिवंतांचीही पाटी कोरी असण्याचाच संभव अधिक. 'मराठी-घटना, रचना, परंपरा'; 'अर्धमागधी- घटना, रचना, परंपरा'; 'मम्मटभटकृत काव्यप्रकाश'; मोरो केशव दामले यांच्या 'शास्त्रीय मराठी व्याकरणा'चे संपादन, 'मराठी व्याकरण-वाद आणि प्रवाद', 'मराठी व्याकरणाचा इतिहास' असे महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिणारे अर्जुनवाडकर हे आयुष्यभर 'एकला चलो रे' या न्यायाने आपल्या संशोधनकार्यात मग्न राहिले. त्या न्यायाने भाषाशास्त्रज्ञ डॉ. अशोक केळकर, भाषातज्ज्ञ विश्वनाथ खैरे हेही त्यांच्या विद्वत्कुळातले. 'शास्त्रीय मराठी व्याकरण' या १९११ साली प्रकाशित झालेल्या दामले यांच्या ग्रंथाची अर्जुनवाडकर यांनी १९७० साली विस्तृत संदर्भटिपांसह नवी आवृत्ती संपादित केली. तिचा 'संपादनाचा आदर्श' या शब्दांत अभ्यासकांनी गौरव केला होता. व्याकरण हे भाषेचे शास्त्र असते, म्हणून त्याचा शास्त्रीय पद्धतीनेच विचार करायचा असतो. त्यामुळे त्यांनी इंग्रजी व संस्कृत व्याकरणाच्या बेडय़ा पायात अडकवलेल्या मराठी व्याकरणाच्या अभ्यासकांना त्याकडे पाहण्याची शास्त्रीय दृष्टी दिली. त्यासाठी 'मराठी व्याकरण-वाद आणि प्रवाद' हा ग्रंथ लिहून त्यांनी मराठी व्याकरणाची शास्त्रीय मांडणी केली. अर्जुनवाडकर यांचे व्यक्तिमत्त्व निरलस आणि सालस होते. नवनव्या गोष्टी शिकण्याची त्यांना हौस होती. संगणकावर मजकूर जुळणीला सुरुवात झाल्यावर त्यांनी ते तंत्र केवळ आत्मसातच केले नाही तर आपल्याला सोयीस्कर असे फाँटही बनवून घेतले. काही काळ त्यांनी छायाचित्रणाचा, त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर प्रकाशचित्रणाचा छंदही जोपासला. स्वा. वि. दा. सावरकर यांचे डावीकडे चेहरा करून विचारमग्न मुद्रा असलेले जे प्रकाशचित्र अनेक ठिकाणी वापरले जाते, ते अर्जुनवाडकरांनी टिपले होते! देशविदेशातल्या अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी प्राध्यापक, अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीपासून केंब्रिज विद्यापीठापर्यंत अनेक ठिकाणी संस्कृत, योग, उपनिषदे, रससिद्धान्त या विषयांवर व्याख्याने दिली. संस्कृतमध्ये काव्य, विडंबन काव्ये लिहिली. पण त्यांच्या अपरिमित कष्टांची आणि बहुमोल कामाची महाराष्ट्राने उपेक्षाच केली. पुण्यात राहून आयुष्यभर संशोधनात गढून गेलेला, शास्त्राभ्यासाच्या धुंदीत रमून गेलेला आणि अखंड संशोधनात बुडून गेलेला एक विद्वान वैयाकरणी आता आपल्यातून कायमचा निघून गेला आहे. ज्यांना व्याकरणाचे महत्त्व मान्य नाही, त्यांना व्याकरणाचा शास्त्रीय अभ्यास वा त्याचा इतिहास जाणून घेण्यात कितीसा रस असणार? मराठीच्या प्राध्यापकांना अर्जुनवाडकर यांचे नाव माहीत असेल की नाही याचीही शंकाच आहे. रॉबर्ट ब्राउनिंग या ब्रिटिश कवीने त्याच्या देशातल्या वैयाकरणीच्या निधनावर 'अ ग्रॅमेरियन्स फ्युनरल' नावाने कविता लिहून आदरांजली व्यक्त केली होती, आपण निदान अर्जुनवाडकर नेमके कोण होते, हे तरी जाणून घेणार की नाही?

No comments:

Post a Comment