Tuesday, June 24, 2014

कर्तेपणाकडून शहाणपणाकडे?

भारतीय प्रशासन सेवेतील माजी ज्येष्ठ अधिकारी पवन के. वर्मा यांची वर्तमान भारतीय समाजाचे भाष्यकार म्हणून ओळख झाली ती, १९९८ साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या 'द ग्रेट इंडियन मिडल क्लास' या पुस्तकामुळे. जागतिकीकरणोत्तर भारतीय लोकव्यवहाराचे, विशेषत: मोठय़ा शहरांमधील नव्याने उदयाला येत असलेल्या मध्यमवर्गाचे वर्मा यांनी या पुस्तकात अतिशय यथार्थ विश्लेषण केले आहे. साहजिकच या पुस्तकाचे अनेक भारतीय भाषांमध्ये आणि विदेशी भाषांमध्येही अनुवाद झाले. त्यानंतर २००० साली वर्मा यांनी पत्रकार रेणुका खांडेकर यांच्यासह 'मॅक्झिमाइज युवर लाइफ- अ‍ॅन अ‍ॅक्शन प्लॅन फॉर द इंडियन मिडल क्लास' या पुस्तकाचे लेखन केले. त्यानंतर 'बिइंग इंडियन- द ट्रथ अबाऊट व्हाय द २१ सेन्चुरी विल बी इंडियाज' (२००४), 'बिकमिंग इंडियन - द अनफिनिश्ड रिव्हॉल्युशन ऑफ कल्चर अँड आयडेंटिटी' (२०१०) ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यातील पहिल्या पुस्तकाची आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली गेली. म्हणजे गेली सोळा-सतरा वर्षे वर्मा सातत्याने भारतीय मध्यमवर्गाचे निरनिराळे प्रकारे विश्लेषण करत आहेत, त्याला त्याच्या कर्तव्याची, पूर्वाश्रमीच्या समृद्ध वारशाची, भारतीय संस्कृतीची, समाजाप्रतिच्या उत्तरदायित्वाची आणि भविष्यातील आव्हानांची जाणीव करून देत आहेत.
जागतिकीकरणोत्तर भारतीय मध्यमवर्ग हा महत्त्वाकांक्षी आणि सुख-समृद्धीला प्राध्यान्य देणारा आहे. सुशिक्षित, करिअरिस्ट असलेल्या या वर्गाला देशाचे राजकारण स्वच्छ, कार्यक्षम आणि विकासाभिमुख हवे आहे. साहजिकच या वर्गाच्या इच्छा-आकांक्षांचा प्रतिध्वनी उमटायला सुरुवात झाली. दुसरीकडे जागतिकीकरणामुळे शिक्षण, आरोग्य, राहणीमान, संधी यांचा लाभ मिळवून या वर्गाच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत गेली. त्यामुळे भारतीय राजकारणाचे कर्तेपणही याच वर्गाकडे आले. त्याचे ठसठशीत प्रतिबिंब २०१४च्या निवडणुकांत उमटलेले पाहायला मिळाले. त्यामुळे 'भारतीय राजकारणाचा चेहरामोहरा बदलणारी निवडणूक,' असे भविष्यात या निवडणुकीचे वर्णन केले जाण्याची शक्यता आहे.
आजच्या भारतीय मध्यमवर्गाची भूमिका बदलण्याची सात कारणे वर्मा यांनी पहिल्या प्रकरणात दिली आहेत. या वर्गाची वाढती आणि मतपेटीवर परिणाम करू शकणारी संख्या, पॅन-इंडियनसारखा स्वत:चा विस्तारलेला समूह, आपल्या वर्गाबाबतची सजगता, हा वर्ग वयाने पंचविशीच्या आतबाहेर असणे, या वर्गाचे सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, मोबाइल या साधनांवरील आधिपत्य, सामाजिक प्रश्नांविषयीचे भान आणि सरकार-प्रशासन यांच्या अकार्यक्षमतेविषयीची चीड, ही ती सात कारणे. या सात कारणांमुळे या मध्यमवर्गाच्या व्यक्तिमत्त्वात, भूमिकेत, प्रभावात आणि गुणवत्तेत बदल झाला आहे. त्यामुळे सामाजिक प्रश्नांबाबत हा वर्ग रस्त्यावर उतरू लागला आहे, आपल्यापरीने त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करू लागला आहे, ही चांगली गोष्ट आहे, असे वर्मा म्हणतात. पण त्याच वेळी काही कळीचे प्रश्नही उपस्थित करतात. याची भविष्यातील दिशा काय असेल, मध्यमवर्गाच्या या संतापाला आणि सामाजिकतेला भविष्यात क्रांतिकारी, सकारात्मक बदलाचे कोंदण मिळू शकेल काय? की आहे ते बदला, पण नवे काहीच धोरण नाही, असा हा प्रकार आहे का? मध्यमवर्गाची ही ऊर्जा 'गेम चेंजर' ठरणार की हा 'सिनिकल गेम प्लॅन' ठरणार?
दुसऱ्या प्रकरणात मध्यमवर्गाच्या सामाजिक आणि राजकीय भूमिकेविषयी नेमके प्रश्न विचारले आहेत. त्यासाठी त्यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मध्यमवर्गाची भूमिका नेमकेपणाने विशद केली आहे. म. गांधी, पं. नेहरू, आणीबाणी, बाबरी मशीद, आरक्षण, आर्थिक सुधारणा याबाबतच्या तत्कालीन मध्यमवर्गाच्या भूमिकेचे दाखले दिले आहेत.
तिसऱ्या प्रकरणात मध्यमवर्गाला राजकारणात बदल हवाय, पण त्या बदलाची दिशा काय असायला हवी, याचा ऊहापोह केला आहे.
शेवटच्या समारोपाच्या प्रकरणात वर्मा  मध्यमवर्गाने राज्यकर्त्यांची मानसिकता त्यांना विविध प्रकारचे प्रश्न विचारून बदलायला हवी, असे सांगतात. कारण योग्य प्रश्न विचारण्यातून तुमचे शहाणपण सिद्ध होत असते. हे शहाणपण दाखवतानाच भारतात धार्मिक सौहार्द आणि सुप्रशासन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्या दोन्ही तितक्याच सामंजस्याने हाताळल्या जायला हव्यात, हेही वर्मा नमूद करतात.
थोडक्यात कर्त्यांच्या भूमिकेत गेलेल्या मध्यमवर्गाने शहाण्यासुरत्याचीही भूमिका निभवायला हवी आणि त्यासाठी कशाकशाचे भान ठेवायला हवे, हे सांगणारे हे पुस्तक आहे.
द न्यू इंडियन मिडल क्लास -
द चॅलेंज ऑफ २०१४ अँड बियाँड :
पवन के. वर्मा,
हार्पर कॉलिन्स, नोएडा,
पाने : १०१, किंमत : २९९ रुपये.

No comments:

Post a Comment