Monday, April 27, 2015

पादस्पर्शे क्षमस्व मे...

अर्कचित्र - सुरेश लोटलीकर
नेमाडेमास्तरांचे भाषण वाचोन वा लेखन वाचोन काहीएक तात्पर्यवजा निष्कर्ष काढण्याची फ्याशन पूर्वीपासोन मराठी भाषेंत पडली म्हणतात, ती चांगली गोष्ट म्हटली पाहिजे शेवटी. त्यांत काहीएक बरा वाटावा असा तथ्यांश दडून बसलेला असण्याची हमी देता येत नसली, तरी ती सपशेल करोन नाकारावी अशी सांप्रत परिस्थिती दुर्लभ म्हणावी इतकी दुर्घट नाही, हे आम्हांस कळून चुकले. आता रा. रा. नेमाडेमास्तर, जे की, देशीवादाचे जन्मदाते मानिले जातात, नव‘देशी’वादाचे शिल्पकार नमोजी यांच्या हस्ते ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारून वर हितोपदेश सांगते जाहले की, देशीवाद संकुचित नाही. ते म्हणतात म्हण्जे तो तसा नसणारच. देशीवादाला ताणले की मूलतत्त्ववाद जन्म घेऊ शकतो, हे आत्मज्ञान उशिरा का होईना नेमाडेमास्तरांस झाले, हे ऐकोन संतोष जाहला. प्रंतु नेमाडेमास्तर भारतीय लोक विवेकवादी असल्याचे सूचित करितात, तो मूलतत्त्ववादी होणार नाही, असा आशावाद व्यक्त करितात. तो खचितच समाधानास पात्र म्हणून वाटावा असा नाही. नेमाडेमास्तरांस जें जें म्हणून बरें वाटतें तें तें सर्व उत्तमच असें सर्वांनी मानिल्यास त्यांच्या भक्तांना परमसुख लाभेलही, न जाणो.
नेमाडेमास्तर आतां बरें बोलतील, मग बोलतील यांची आम्हांस आंस लागलेलीं, प्रंतु त्यांनी कशास कांहीं हातीं लागूं देऊ नये व एकंदरींत आम्ही जे दुर्भागीच कीं नुसती आशा करीत बसावें. त्यांतहि त्यांनी टाळ्याखाऊं मजकूर ओरडून बोलावा आणि वेळ मारून न्यावीं, असा एकंदरीने सारा भाषणप्रपंच म्हणावयाचा. अरुण शौरीनामक मजकूरमहाशय जीं जीं लबाडी करितात, इतरांच्या बुकांतून खचित अभ्यासाचा बहाणा करितात, कुणाची मुरवत न धरतां बेलाशक नापसंत असे दाखले जुळवितात आणि दांडगे शब्द वापरितात व अर्थांनी भेडसावितात. तशा तऱ्हेचें आपमतलबी वर्तन शौरीस शोभा देत नाही तद्वत आम्हांसही देत नाही. सबब आम्हीही तो मार्ग पत्करण्यास नाखूशच आहो. प्रंतु नेमाडेमास्तरांचे काही मासले मांडावयास अपरिहार्य करितात, सबब त्यांची अनिवार्यता नोंदविलेली बरीं. ‘...विकास हे काही संस्कृतीचे एकमेव व्यवच्छेदक लक्षण नाही’ ह्या नेमाडेमास्तरांच्या सिद्धांतात तदंतर्गत कस असा नाहीं कीं ज्यामुळें त्यास महत्त्व द्यावें अथवा त्याचा कांहीं कुणास उपयोग व्हावा. ‘...भारतीय नृत्य आणि भारतीय संगीत हे दोन कला प्रकार कोणत्याही परकीय प्रभावापासून दूर आहेत. म्हणून त्या महान आहेत.’ हाही नेमाडेमास्तरांचा सिद्धांत नव्या देशीचाच प्रकार म्हणावयाचा. त्यात नावीन्य म्हणून काडीचें नाही. इतरांच्या अनेक प्रकारच्या मजकुरांचा गडबुडगुंडा करोन व आपल्या तिरकस संमोहनविद्येचा प्रयोग करून पामर वाचकांस उगाचच चमकाविण्याची ही बहादुरी म्हटली पाहिजे. त्यांकरिता चिंतनाचा आव आणावयाची काहींएक गरज नव्हतीं.
‘आपले पूर्वज आपल्यापेक्षा अधिक बुद्धिवादी आणि हुशार होते, यात काही शंकाच नाही,’ आणि ‘...गुलामांची पुढील पिढीच अधिक बुद्धिमान असते,’ असे नेमाडेमास्तर बोलोन बैसले. व स्वत:बद्दलही मूळ मुद्दा भुलून होत्साते तारतम्य सोडून दिले, ह्यास काय म्हणावें? शब्दांच्या एकंदर कल्पनेमध्येंच कांहीं फेरफार करावयाचें तेवढें स्वातंत्र्य त्यांस घेण्यास कोणा गनिमाने आडकांठीं केलीं म्हणायची? स्वत:बद्दल कांहीं टीकाविवेचन न करणें हें शहाणपणाचेंच ठरेल असें कांहीं त्यांस वाटले नाहीं, हे नि:संशय कांहीं भलतेंच धारिष्ट्य म्हणावें लागेल.
असो. तर पुढील मुद्द्याकडे काळजीपूर्वक वळूं. ते म्हणतात कीं, ‘वैश्विकीकरण ही शुद्ध फसवणूक आहे.’ येथें आपल्या बेलाशक देशीवादाचे समर्थन करावयाचें असल्यानें त्यांनीं अर्धसत्याची भाषा सुरूं केली! वस्तुत:  अशा प्रकारचे सिद्धांत गेल्या २५ सालांत इतक्यांदा सिद्ध करून झाले आहेत म्हणतां, त्यांस पुन्हा सिद्ध करण्याजोगेंहि कांहीं उरलेलेंच नाहीं. ‘जागतिकीकरण ही शुद्ध भांडवलशाही आहे’ म्हणून ज्या कशास म्हणतात कीं जें ऐकतां ऐकतां आमचे कान दुखले आहेत असें अतिपरिचित कांहीं गृहीत धरणें हा एक धाडसी प्रकारच आहे असें म्हणावें लागतें.
‘माझ्यावरही परकीय प्रभाव आहे आणि मी तो नाकारत नाही,’ या नेमाडेमास्तरांच्या विधानाचें महत्त्व स्पष्टीकरण दीर्घ करण्याइतके आहे खास. केवळ हे शब्द वापरोन मोकळे झाले असें समजून न चालतां तें त्याविषयी लिहिते होतील याची आशा नजरअंदाज करूं नये.
नेमाडेमास्तरांस ‘हिंदू’चे पुढील भाग लिहायला सवड कशी म्हणतां ती गवसत नाही, मात्र भाषणे द्यायला, देशीवादाच्या टीकाकारांना बदडून काढायला, उपहासाचे डोस पाजायला, विरोधकांना अनुल्लेखाने जिवंतपणीच मारून टाकायला सवडच सवड काढिता येतें. त्यापरांस त्यांनीं देशीवादाची तरी अंमळ सवड काढून संगतवार तपशिलाबरहुकूम मांडणी करावी की नाही?
प्रंतु त्यांस देशीवादाची सविस्तर मांडणी करण्यास अंमळ खटाटोप करूनहि आजवर काही साधता आलें असें कांहीं वाटत नाहीं. प्रेमचन्द यांच्याबद्दल आम्हांस आदरच आहे, जसा नेमाडेमास्तरांबद्दलही आहे. पण नेमाडेमास्तरांसारिखे प्रेमचंद यांना मोठे करण्यासाठी आम्हांस शेक्सपीअरांस लहान करण्याची गरज वाटत नाही. नेमाडेमास्तरांस स्वत:कडे विधायकपणा घेण्याची खबरदारी घेतां आली नाही, आम्ही मात्र तो घेऊं इच्छितो. म्हणून होतकरू लेखकूंनी, कवीवंशूनी, कादंबरीगिरमटूंनी नेमाडेमास्तरांचे ठायीं स्वत:बद्दल अप्रीति मात्र उत्पन्न करून घेऊन त्यांच्या या भाषणाकडे दुर्लक्ष करून आपली नुकसानी करून घेऊं नये. एकंदरीने देशीवादाच्या टीकाकारांवर टीका टीका म्हणून म्हणतात ती त्यांस नाना खटाटोप करूनहि साधली आहे, असें कांहीं वाटत नाही. आता तर नेमाडेमास्तरांनी इंग्रजीच्या गुलामगिरीची जबाबदारी सपशेल पुढील पिढ्यांवर ढकलून दिली आहे. आपल्या दारातील घाण दुसऱ्याच्या दारात अशा प्रकारे परभारेच लोटून दिली म्हण्जे आपली जबाबदारी झटकता येते की काय? एकंदरीने हाच तो संकुचित नसलेला देशीवाद म्हणायचा, झाले!

No comments:

Post a Comment