Monday, September 7, 2015

सत्यान्वेषी विचारवंत

५ आणि ६ सप्टेंबर रोजी अंदमान येथे चौथे विश्वसाहित्य संमेलन पार पडले. त्याचे अध्यक्षस्थान भूषवणारे शेषराव मोरे हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व आहे. ते राष्ट्रवादी लेखक आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल भयानक आणि अगणित गैरसमज आहेत. पण कुठल्याच विचारसरणीत ते बसू शकत नाहीत. प्रचंड अभ्यास, संशोधन आणि सत्यान्वेष हाच त्यांचा ध्यास आहे.
................................................
साहित्य महामंडळ या महाराष्ट्रातल्या साहित्यातील शिखर संस्थेकडून कधीच कुणाच्याच फारशा अपेक्षा नसतात. आणि तशाही किमान तारतम्यपूर्ण अपेक्षा पूर्ण करण्याबाबत या मंडळातील कुणाचाच लौकिक नाही.  हा डाग आपल्याकडून कधीतरी धुतला जावा, किमान नव्या डागाचे आपण धनी तरी होऊ नये, इतकी पोचही या मंडळींना नसते. अर्थात हेही तितकेच खरे की, दुय्यम दर्जाच्या लोकांकडून पहिल्या दर्जाच्या कामगिरीची अपेक्षा करणे हाच मुळी वेडपटपणा असतो. साहित्य महामंडळ हे तर सुमार वकुब असलेल्या न-साहित्यिकांचेच कुरण आहे.
 विश्वसाहित्य संमेलन हा त्याचाच उत्तम पुरावा आहे. पण तरीही उद्यापासून अंदमान येथे सुरू होत असलेल्या चौथ्या विश्व साहित्य संमेलनाबाबत एक चांगली गोष्ट घडली आहे. त्याच्या अध्यक्षपदी महामंडळाने डॉ. शेषराव मोरे यांची निवड केली आहे. त्यासाठी महामंडळातील तमाम न-साहित्यिक अभिनंदनास पात्र आहेत. कधी कधी फारसे भरवशाचे नसलेले खेळाडू एखादा षटकार सुरेख पद्धतीने मारतात, त्यातला हा प्रकार आहे. हे अध्यक्षपद शेषराव समर्थपणे निभावतील यात काही शंका नाही. हे विश्वसाहित्य संमेलन सावरकरांच्या चरणी अर्पण केले गेले असले तरी त्याची धुरा शेषराव यांच्यासारख्या सच्चा सावरकरांच्या भाष्यकाराकडे सोपवलेली असल्याने फारशी काळजी करण्याचे कारण नाही.
शेषराव मूळचे मराठवाड्यातील. नांदेडचे. त्यांचा जन्म परंपरागत मराठा कुटुंबात झाला. वडील वतनदार पोलिस पाटील. लहानमोठ्या चुकांसाठी वडिलांकडून त्यांना बेदम मार मिळे. वडिलांच्या धाकाला आणि माराला कंटाळून ते दहावीत असताना घरातून पळून गेले. पुढचे शिक्षण त्यांनी काही शिक्षकांच्या मदतीने पूर्ण केले. शाळेत असताना वैजनाथ उप्पे यांच्यामुळे त्यांना इतिहास आणि राष्ट्रपुरुषांची चरित्रे वाचनाची गोडी लागली होती. महाविद्यालयीन शिक्षण होईपर्यंत त्यांचा महाराष्ट्रातील बहुतेक राष्ट्रपुरुषांचा अभ्यास झाला होता. यावरून त्यांच्या वाचनाचा झपाटा आणि आवाका लक्षात यावा. शेषराव पुढे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक झाले, पण या नोकरीत ते कधी रमले नाहीत. कारण त्यामुळे त्यांना सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करता येत नव्हता. शेवटी वीस वर्षे पूर्ण होताच त्यांनी १९९४मध्ये स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. तेव्हापासून ते पूर्णवेळ लेखन-वाचन करतात.
शेषरावांची महाराष्ट्राला पहिली ओळख झाली ती त्यांच्या सावरकरांवरील पुस्तकांमुळे. प्रत्येक महापुरुषाचा पराभव हे त्याचे अनुयायीच करत असतात, असे म्हणतात. सावरकरांचा पराभवही त्यांच्याच अंध अनुयायांनीच केला आहे. हिंदुत्ववाद्यांनी त्यांना आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला असला तरी सावरकरांच्या बौद्धिक दृष्टिकोन, त्यांची विज्ञाननिष्ठा, त्यांचा बुद्धिवाद हा हिंदुत्ववाद्यांना झेपणारा नव्हता, नाही. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांनी सावरकरांचे आपल्याला सोयीचे तेवढेच उदात्तीकरण केले. त्यातून सावरकरांविषयी अनेकांच्या मनात नाहक प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या विपर्यस्त चौकटीतून सावरकरांना बाहेर काढून त्यांचे अतिशय ठोस पुनर्मूल्यांकन करण्याचे काम पहिल्यांदा कुणी केले असेल तर ते शेषराव मोरे यांनी. ‘सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद’ आणि ‘सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग’ या दोन पुस्तकांतून शेषराव यांनी सावरकरांची जी मांडणी केली आहे, ती हिंदुत्ववाद्यांनाच नव्हे, तर इतरांनाही तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. मुळात ही दोन्ही पुस्तके शेषरावांनी दीर्घ स्वरूपात लिहिली होती. ‘सावरकरांचा बुद्धिवाद - एक चिकित्सक अभ्यास’ या मूळ पुस्तकाची ‘सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद’ ही, तर ‘सावरकरांचे समाजकारण - सत्य आणि विपर्यास’ या मूळ पुस्तकाची ‘सावरकरांच्या सामाजक्रांतीचे अंतरंग’ ही संक्षिप्त आवृत्ती आहे. या दोन्ही मूळ पुस्तकांत सावरकरांकडे नव्याने पाहताना शेषराव यांनी आधी ज्यांनी ज्यांनी सावरकरांविषयी लेखन केले आहे, त्यांच्या उणिवाही दाखवून दिल्या होत्या. या पुस्तकांविषयी यदुनाथ थत्ते यांनी लिहिले आहे- “...अशी तार्किक मांडणी क्वचितच कोणी केली असेल. मांडणी सज्जड पुराव्यांच्या आधारे अशी केली आहे की, ती सहसा खोडून काढता येणार नाही आणि त्यामुळे त्यांच्या भक्तांची आणि विरोधकांची मोठी पंचाईत झाली आहे...” तर प्रसिद्ध चरित्रकार डॉ. द. न. गोखले यांनी म्हटले आहे - “...सावरकरांकडे इतक्या बुद्धिपूर्वक पूर्वी कोणी पाहिले नसेल. फार दिवसांनी सावरकरांना एक तोलामोलाचा समीक्षक लाभला...” हिंदुत्ववाद्यांच्या अपप्रचारामुळे सावरकरांविषयी महाराष्ट्रात कसे वातावरण होते, याविषयी शेषराव यांनी वीसेक वर्षांपूर्वी ‘सावरकरांच्या नादी लागून वाया गेलो त्याची गोष्ट’ या शीर्षकाचा लेख लिहिला होता.
इस्लाम धर्म आणि मुस्लिमांची मानसिकता यावरून महाराष्ट्रात आणि भारतात गेली अनेक वर्षे खडाजंगी होत आली आहे, पण अभ्यासाच्या पातळीवर कुणी या विषयाला मुळातून भिडले नव्हते. शेषराव यांनी ते आव्हान पेलून ‘मुस्लिम मनाचा शोध’ हे अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले. तोवर निदान मराठीत तरी एखाद्या बिगर-मुस्लिमाने या विषयावर पुस्तक लिहिलेले नव्हते. त्यामुळे शेषराव यांनी आधी त्याची निवडक प्रतींची ‘अभिप्राय आवृत्ती’ काढली. ती आवृत्ती त्यांनी मुस्लिम अभ्यासकांना आणि संघटनांना वाचायला देऊन त्यावर त्यांची मते मागवली. त्यातील बहुतांश अभिप्राय हे समाधानकारक होते. जे वादाचे मुद्दे होते, त्यातील पटले त्यानुसार पुनर्लेखन करून त्याची नियमित आवृत्ती काढली. त्यानंतर त्यांनी २००६मध्ये ‘प्रेषितानंतरचे चार आदर्श खलिफा’ हे पुस्तकही लिहिले. प्रेषित पैगंबराविषयी आपण निदान ऐकून तरी असतो, पण त्यांच्यानंतरही मुस्लिम धर्मात चार आदर्श व्यक्ती होऊन गेल्या हे महाराष्ट्राला विदित झाले ते या पुस्तकामुळे. आजही त्यांचा इस्लामचा अभ्यास चालू आहे. इस्लाम धर्माचा संपूर्ण करायला ४० वर्षेही पुरणार नाहीत, असे शेषराव मोरे म्हणतात.
दोनेक वर्षांपूर्वी शेषरावांचे ‘काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. “गांधीजींनी हिंदूंना फाळणी स्वीकारल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही, म्हणून ४२च्या लढ्याची हूल उठवली. कारण त्यामुळे ब्रिटिशांशी वाटाघाटी करायच्या आणि त्यावेळी हिंदू आणि काँग्रेसला फाळणीशिवाय स्वातंत्र्य मिळू शकत नाही, असे पटवून द्यायचे अशी गांधीजींची रणनीती होती”, अशी मांडणी शेषराव यांनी या पुस्तकात केली आहे. भारत-पाक फाळणीची नव्याने मांडणी करणारे हे पुस्तक वादग्रस्त होणार याची अटकळ लेखक-प्रकाशक यांना आधीपासूनच होती. त्यामुळे शेषरावांचे प्रकाशक असलेल्या ‘राजहंस’च्या दिलीप माजगावकरांनी महाराष्ट्रातील काही मान्यवर लेखकांना या पुस्तकावर लिहायला सांगून आणि त्यातील आक्षेपांवर शेषराव यांनाही लिहायला सांगून ‘प्रतिवाद’ हे पुस्तक प्रकाशित केले. हा मराठीतला अभिनव असा प्रयोग आहे. असा प्रकार यापूर्वी मराठीत कधी झाला नसावा. 
‘काश्मीर - एक शापित नंदनवन’,  ‘डॉ. आंबेडकरांचे सामाजिक धोरण-एक अभ्यास’, ‘शासनपुरस्कृत मनुवादी - पांडुरंगशास्त्री आठवले’, ‘१८५७चा जिहाद’, ‘विचारकलह-भाग १’, ‘विचारकलह-भाग  २’, ‘अप्रिय पण...भाग १’, ‘अप्रिय पण...भाग २’ ही पुस्तकेही शेषरावांच्या अभ्यासूपणाची द्योतक आहेत. आंबेडकरांवर मराठीत कितीतरी पुस्तके लिहिली गेली आहेत, आजही जात आहेत, पण त्यांच्या सामाजिक धोरणांचे शेषरावांनी केलेले विश्लेषण वेगळे आणि तितकेच महत्त्वाचे आहे.
शेषराव जसे सावरकरांना मानतात, तसेच ते नरहर कुरुंदकर यांनाही मानतात. अनेकांना हे चमत्कारिक वाटते. तसे ते आहेही. कुरुंदकर स्वतः ला कम्युनिस्ट मानत आणि समाजवादी त्यांना ‘आपला’ मानत, तसाच काहीसा हा प्रकार आहे. शेषराव आणि कुरुंदकर दोघेही नांदेडचे. शिवाय कुरुंदकर केवळ विद्यार्थीप्रियच नाही तर शिक्षक, प्राध्यापक आणि समस्त नांदेडकरांचे दैवत. कुरुंदकर तटस्थ वैचारिक बाण्याचे, कुणाचीही भीडभाड न बाळगणारे, ‘अभ्यासेनि प्रगटावे...’ या शिस्तीचे. त्यांचा हाच वारसा नेमका शेषराव यांनी घेतला. ‘तर्कशुद्ध विचारांती जे निष्कर्ष येतील ते निर्भीडपणे मांडण्याचा धीटपणा आम्ही कुरुंदकरांकडून शिकलो’ असे शेषराव म्हणतात.
पण हेही तितकेच खरे आहे की, शेषराव राष्ट्रवादी लेखक आहेत. राष्ट्रवाद ही एक मोठी भानगड होऊन बसली आहे. म्हणजे हा शब्द आपण बदनाम करून ठेवला आहे. प्रत्येक दहशतवादी हा जसा योगायोगाने मुस्लिमच असतो, तसा प्रत्येक राष्ट्रवादी हा हिंदुत्ववादी असतो. निदान तसे मानले जाते. त्यामुळे शेषरावांबद्दल भयानक आणि अगणित गैरसमज आहेत. समाजवादी, मार्क्सवादी आणि पुरोगामी यांना ते संघिस्ट वाटतात, तर त्यांच्या राष्ट्रवादी लेखनामुळे संघिस्टांना ते ‘आपले’ वाटतात. खरे म्हणजे शेषराव कुणाचेच, कोणत्याच विचारसरणीचे नाहीत. सखोल अभ्यास, सत्यकथन, मांडणीतील समतोलपणा हे शेषरावांच्या लेखनाचे विशेष आहेत, पण त्यांच्या लेखनाचे विषय मात्र राष्ट्रीय हिताचे असतात. जो विषय तसा नसेल, तो बहुसंख्य वाचकांच्या आवडीचा नसतो. त्यामुळे त्याच्या वाट्याला शेषराव जात नाहीत. दुर्दैवाने राष्ट्रहिताचा मक्ता हिंदुत्ववाद्यांनी घेतल्यामुळे शेषरावांना ते आपल्या कळपात ओढण्याचा प्रयत्न करताना दिसतात. कालपर्यंत त्यांची महाराष्ट्राने बऱ्यापैकी उपेक्षा केल्यामुळे त्यात त्यांना यशही येत होते, पण आता शेषराव संमेलनाध्यक्ष झाले आहेत. साहित्यवर्तुळात मान्यता पावू लागले आहेत. त्यामुळे यापुढच्या काळात बहुदा तसे घडणार नाही, घडूही नये.
एखाद्या विषयाच्या मुळाशी जाऊन त्याचा गाभा उकलून सांगण्याची परंपरा महाराष्ट्रात एकेकाळी जोरावर होती. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र ती क्रमाक्रमाने क्षीण होत गेलेली दिसते. म्हणूनच “जगाला काही सांगण्याची मानसिकता आपल्या लेखकांकडे नाही. करिअर वा पोटापाण्यापुरता अभ्यास करणे, अशाच चौकटबंद मानसिकतेत आपला समाज गुरफटला आहे. सखोल अभ्यासाचा असा अभाव असल्यामुळेच आपली पीछेहाट होत आहे,” असे शेषराव सांगतात. आजघडीला तर शेषराव यांच्यासारखी अहोरात्र लेखन-वाचन-संशोधन यात गढून गेलेली माणसे भिंग लावून शोधायला लागतील.

1 comment: