Tuesday, February 9, 2016

माणूसपणाचा चिद्घोष करणारा बुलंद शायर

रस्ते में वो मिला था, मैं बच कर गुज़र गया
उस की फटी क़मीज़ मेरे साथ हो गयी

औरों जैसे हो कर भी हम बाइज्जत हैं बस्ती में
कुछ लोगों का सीधापन है, कुछ अपनी अय्यारी है

शहर में सब को कहाँ मिलती है रोने की जगह
अपनी इज़्जत भी यहाँ हँसने-हँसाने से रही

घर से मस्जिद है बहुत दूर चलो यूँ कर लें
किसी रोते हुए बच्चे को हँसाया जाए

पत्थरों की जुबाँ होती हैं दिल होते हैं
अपने घर के दरो-दिवार सजा कर देखो

इतक्या साध्या शब्दांत गहिरा आशय व्यक्त करणारी उच्च प्रतिभा लाभलेले शायर आणि गीतकार मुक़्तदा हसन उर्फ निदा फ़ाज़ली यांच्या निधनाने भारताने एक बुलंद आशावादी आणि निधर्मी कवी गमावला आहे. दिल्लीत जन्मलेले, ग्वाल्हेरमध्ये वाढलेले आणि मुंबईला कर्मभूमी मानलेले फ़ाज़ली हे उर्दूतील सत्तरच्या दशकानंतरचे महत्त्वाचे शायर होते. ग़ज़ल, कविता, दोहे यांच्या माध्यमातून त्यांनी अतिशय तरल, सुबोध आणि मार्मिक लेखन केले. त्यांचे साहित्य जनसामान्यांचे जगणे मुखर करते. मीर, ग़ालिब यांच्याइतकाच त्यांच्यावर कबीर, सूरदास, मीरा यांचाही प्रभाव होता. मराठीतील ज्ञानेश्वर, तुकोबा, नामदेव ढसाळ यांच्याविषयी त्यांना नितांत आदर होता. अल्लाइतकीच त्यांची राधा, कृष्ण, राम, महादेव या हिंदू देवतांवरही श्रद्धा होती. सूरदासाच्या कवितेने प्रभावित होऊन फ़ाज़ली यांनी शायर बनण्याचा निर्णय घेतला. देशाची फाळणी झाली होती आणि त्यांचे सारे कुटुंब त्यांना एकट्याला इथेच टाकून पाकिस्तानात निघून गेले होते, तेव्हाची ही गोष्ट आहे. एके दिवशी एका मंदिरासमोरून जाताना त्यांच्या कानावर सूरदासांची रचना पडली. त्यात राधा-कृष्णाच्या विरहाचे वर्णन होते. त्याने फ़ाज़ली इतके प्रभावित झाले की, त्यांनी त्याच क्षणी शायर व्हायचे ठरवले. तशी फ़ाज़ली यांना शायरी वारसाहक्काने मिळाली होती. त्यांचे वडील शायर होते. घरात उर्दू, फ़ारसीमधील कितीतरी कवितासंग्रह होते. लहानपणापासून फ़ाज़ली ते वाचत होते. पण, आपल्या काव्यात अरबी-फारसी भाषेतील कठीण शब्दांचा वापर फ़ाज़ली यांनी कटाक्षाने टाळला. हिंदी आणि उर्दू भाषेतील दिवार तोडून साध्या सोप्या शब्दांत कविता, ग़ज़ला आणि दोहे लिहिले. भारतीय लोकभावना सहजपणे व्यक्त करण्याचे लाजवाब कसब फ़ाज़ली यांच्याकडे होते. तात्त्विक विचार, भाष्य किंवा विवशतेला, अगतिकतेला शरण जाणे, या गोष्टींच्या मागे फ़ाज़ली यांची शायरी जात नाही, ती वास्तव समजून घेते. ते अव्हेरून लावत नाही की त्याच्यापासून लांब पळायचा प्रयत्न करत नाही. त्यांच्या शायरीतून व्यक्त होणारा आत्मविश्वास त्या वास्तवाशी संघर्ष करण्याची प्रेरणा देतो. साठच्या दशकात मुंबई हे उर्दू-हिंदी साहित्याचे केंद्र होते. तेव्हा फ़ाज़ली मुंबईत आले. ‘धर्मयुग’, ‘सारिका’ ही हिंदीतील नामांकित नियतकालिके मुंबईतून निघत होती. सत्तरच्या दशकात फ़ाज़लींनी अर्थार्जनासाठी हिंदी चित्रपटांसाठी गाणी लिहायला सुरुवात केली. पहिल्याच वेळी कमाल अमरोही यांच्या ‘रझिया सुलतान’साठी दोन गाणी लिहिण्याची संधी त्यांना मिळाली. दशकभर संघर्ष केल्यानंतर १९८०मध्ये ‘आप तो ऐसे न थे’ या चित्रपटातील त्यांचे ‘तू इस तरह से मेरी जिंदगी में शामील है’ हे गाणे हिट ठरले. नंतर ‘आहिस्ता-आहिस्ता’मधील ‘कभी किसी को मुक्कमल जहाँ नहीं मिलता’ हे गाणेही हिट ठरले. १९९९साली आलेल्या ‘सरफरोश’मधील त्यांची ‘होशवालों को खबर क्या’ ही जगजीत सिंह यांनी गायलेली ग़ज़लही हिट ठरली. त्यांचे अनेक दोहे आणि ग़ज़ला जगजीत सिंह यांनी लाखो लोकांपर्यंत पोहचवल्या. नव्वदच्या दशकात आलेला त्यांचा ‘इनसाइट’ हा अल्बम जगजित सिंह यांनी गायला होता. तोही तुफान लोकप्रिय झाला. त्यांचे कवितासंग्रहही लोकप्रिय ठरले. बशीर बद्र, जाँ निसार अख्तर, दाग़ देहलवी, मुहम्मद अलवी, जिगर मुरादाबादी यांच्या शायरीचे संग्रह त्यांनी संपादित केले. अनुवाद हा कवी-शायरसाठी रियाज असतो, या धारणेतून अनेक अनुवादही केले. फ़ाज़ली यांच्याकडे ‘चांगल्याला चांगले’ म्हणण्याची अफलातून स्वीकारशीलता होती. इतरांचे खुलेपणाने कौतुक करण्याचा मनाचा उमेदपणा होता. ते सौंदर्याचे चाहते होते आणि माणसांचे लोभी. ते अल्ला-देवालाही प्रश्न विचारत. म्हणूनच ते सामान्य माणसांसाठी पसायदान मागू शकले. त्याच्या जगण्याला शहरात राहूनही भिडू शकले. त्याला त्याच्या पातळीवर जाऊन समजून घेऊ शकले. जाती-धर्माच्या, अस्मितेच्या भिंती तोडून माणसांकडे माणूस म्हणून पाहू शकले. हा वारसा त्यांना कबीर, सूरदास, तुकोबा यांच्याकडून मिळाला होता. तो त्यांनी आपल्या लेखनातून भारतीयांपर्यंत पोहचवण्याचे काम इमाने-इतबारे केले. ती माणूसपणाची मैफल आता कायमची निमाली आहे.

No comments:

Post a Comment