Tuesday, August 20, 2013

आगरकरांचा वारसदार

नरेंद्र दाभोलकर यांची आज सकाळी पुण्यात गोळ्या घालून हत्त्या करण्यात आली, या धक्यातून बाहेर यायला जर वेळ लागला म्हणून ही नोंद करायला उशीर होत आहे.  दाभोलकरांच्या जाण्याचे भयावह परिणाम महाराष्ट्रातील सामाजिक चळवळी-आंदोलने यांच्यावर होणार आहेत. पुरोगामी महाराष्ट्र या एका घटनेने १०० वर्ष मागे गेला आहे. विचारांचा सामना विचारांनी करायचा असतो. लोकशाहीत सतत वाद-संवाद करणारी माणसं असतील तरच लोकशाही अधिकाधिक रुजायला, जीवनप्रणाली म्हणून स्वीकारली जायला मदत होते. कारण आमचे मित्र विनय हर्डीकर म्हणतात त्याप्रमाणे 'शंभरातील एक टक्का लोक विचार करतात, नऊ टक्के लोक आपण विचार करतो असा विचार करतात आणि उरलेले ९० टक्के एक वेळ जीव देतील पण विचार करणार नाहीत, हे लोकशाहीचं दारूण वास्तव असतं. ' त्यामुळे लोकशाहीची सारी भिस्त ही या एक टक्का लोकांवरच असते. समाजावरील बरे-वाईट परिणाम, रूढ संकेतांना धक्के देणे, नव्या दिशेने, विवेकपूर्ण बुद्धीने विचार करायला लावणे, हे या एक टक्का लोकांचे काम असते. आजघडीला महाराष्ट्रात दाभोलकर यांच्या इतका सहिष्णू, उदारमतवादी आणि बुद्धिनिष्ठ सामाजिक कार्यकर्ता दुसरा दाखवता येत नाही. 'बांधव हो विचारकलहाला का भिता?' या 'सुधारक'कार आगरकर यांची उक्ती प्रमाण मानून महिन्याचे २५-२७ दिवस महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून समाज प्रबोधनाचे काम करत होते. निखळ वैज्ञानिक आणि विवेकी दृष्टीकोन बाळगत धार्मिक अनाचार, फाजील कर्मकांडे, बुवाबाजी, जादूटोणा यासारख्या गोष्टींविरोधात रणशिंग फुंकत फिरणारे दाभोलकर अफाट आणि अचाट उर्जेने काम करत. त्यांच्या उत्साहाकडे पाहून आम्हा तरुणांनाही लाज वाटत असे. 'हे सर्व कोठून येते?' हा प्रश्नाचे दाभोलकर यांच्यापुरते असे होते कि, समाज कळकळीची आच असल्यावर हे सर्व होते.   

२००४ साली संभाजी ब्रिगेडने पुण्यातील भांडारकर संस्थेवर हल्ला करून तेथील दुर्मिळ कागदपत्रांची नासधूस केली. या घटनेने महाराष्ट्रातील बुद्धिवंत बुचकळ्यात पडले आणि त्यांनी मराठा समाजाविषयी बोलणेच थांबवले. परिणामी मराठा समाजाची सरंजामी वृत्ती पुन्हा उफाळून आली. राजकीय हेतूंनी प्रेरित असणाऱ्यांनी याचा फायदा उठवत आरक्षण नामक अफूचे गाजर दाखवायला सुरुवात केली. आणि मग आक्रमक मराठ्यांच्या २२ संघटना महाराष्ट्रात उभ्या राहिल्या. आणि या संघटनांनी मराठा समाजाला, त्यातही सुशिक्षित तरुणांना मागे खेचायला सुरुवात केली. जातीय विद्वेषाचे विष त्यांच्या मनात पेरायला सुरुवात केली. पण सगळेच संधिसाधू असल्याने त्यांच्यात आता श्रेयाची चढाओढ सुरु झाली आहे. आता या संघटनांचा प्रवास एकमेका नामशेष करू या दिशेने होऊ घातलाय. आणि तसेच होणार होते. यात नुकसान झाले ते सुशिक्षित मराठा तरुणांचे. त्यांना या लोकांनी १०० वर्ष मागे नेऊन ठेवले.  दाभोलकर यांच्या हत्त्येने कोणा एका समाजाचे नुकसान होणार नसून सबंध महाराष्ट्राचेच मोठे नुकसान होणार आहे.  

समाजहितासाठी स्वता:चा स्वार्थ, अहंकार आणि आवडीनिवडी यांना कात्री लावावी लागते. दाभोलकर यांनी समाजहित हेच आपले जीवनकार्य मानले होते. समाजाचे नेतृत्व करण्यासाठी स्वताला समाजाबरोबर आणून ठेवावे लागते. तो गुण दाभोलकर यांच्याकडे जन्मजात म्हणावा इतका सहज होता. अतिशय साधी राहणी, कुठलेही व्यसन नाही, बोलण्यात ऋजुता आणि वागण्यात आदाब, ही  त्यांची वैशिष्ट्ये होती. 

देवावर दाभोलकर यांचा विश्वास नव्हता. पण बुवाबाजी आणि कर्मकांड यांना मात्र प्रखर विरोध होता. आणि त्यासाठीचे वैज्ञानिक, तार्किक  आणि बौद्धिक युक्तिवाद त्यांच्याकडे होते. कोणतीही गोष्ट पुराव्याने सिद्ध करता आली पाहिजे आणि बुद्धीच्या कसोटीला उतरली पाहिजे, हा त्यांचा दृष्टीकोन होता. आजच्या वैज्ञानिक प्रगतीच्या जगात हा दृष्टीकोनच सर्वात महत्त्वाचा आहे, या धारणेने दाभोलकर महाराष्ट्रभर अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत होते. अनेक बुवा-बाबांचा त्यांनी भांडाफोड केला, महाराजांना जाहीर चर्चेचे आव्हान देऊन त्यांना निरुत्तर केले आणि लेखन करून समाजप्रबोधन केले. पण त्यांचे हे काम काही सनातनी विचाराच्या मंडळींना पसंत नव्हते. त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या जात होत्या. हल्ली भावना ही इतकी उथळ गोष्ट झाली आहे की ती कशाने दुखावेल याचा काही भरवसा राहिला नाही. भावना दुखावल्या म्हणणारी मंडळी खर तर कांगावखोर असतात. आणि त्यांच्या भावना सोयीस्कर असतात. आपली दुकानदारी राजरोसपणे चालू राहावी म्हणून त्यांनी अनेक सोंगे घेतलेली असतात आणि अनेक मतलबी भ्रमही तयार केलेले असतात. अशा लोकांना दाभोलकर यांचे काम पटणे शक्य नव्हतेच. ही मंडळी सतत त्यांच्याविषयी गरळ ओकत असत. पण ती या धराला जातील याची कल्पना कुणी केली नव्हती. 

दाभोलकर यांच्या हत्त्येने या तथाकथित लोकांची भोंदूगिरी निदान काही काळ चालू राहीलही, पण ती सर्व काळ चालू राहील अशा भ्रमात त्यांनी राहता कामा नये. कारण ऑरवेलने म्हटले आहे की, काही लोकांना काही काळ, सर्व लोकांना काही काळ मुर्ख बनवता येते, पण सर्व लोकांना सर्व काळ मुर्ख बनवता येत नाही.       
  

26 aug
दाभोलकर यांची हत्या होऊन आता पाच दिवस होत आलेत. पण अजूनही हल्लेखोरांचा शोध पोलिसांना लागलेला नाही. पोलिसांची अनेक पथके आपआपल्यापरीने शोध घेत आहेत, पण त्यांचा तपास अजून नीट दिशा पकडताना दिसत नाही. तर दुसरीकडे दाभोलकर यांच्यावर कुणी हल्ला केला असावा याचे अनेक तर्क पोलीस, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि इतर लोक लावत आहेत. प्रत्येक जन आपल्या कुवतीनुसार अंदाज व्यक्त करतो आहे. तर बुद्धिवंत महाराष्ट्र पुरोगामी कधी होता किंवा आज आहे कि नाही याची चर्चा करत आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची चर्चा अधूनमधून होतच आली आहे. त्यात नवीन काही नाही. एकोणीसाव्या शतकात महाराष्ट्रात अनेक चळवळी, आंदोलने झाली. सामाजिक बदलांसाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न झाले. एकोणिसावे शतक हे महाराष्ट्राचे प्रबोधन शतक होते. त्या काळातही महाराष्ट्र १०० टक्के पुरोगामी नव्हता, तर पुरोगामित्वाच्या दिशेने वाटचाल करत होता, असे फारतर म्हणता येऊ शकते. विश्वास दांडेकर यांनी कालच्या लोकसत्ता मधील लेखात म्हटले आहे, त्यानुसार पुरोगामी महाराष्ट्र हे मिथक आहे. आणि त्याकडे तसेच पाहायला हवे. 

या मिथकाला अलीकडच्या काळात बराच धक्का लागला आहे. बलात्कार, खून, अराजक सदृश घडामोडी यांची सातत्याने होत असलेली पुनरावृत्ती, या काही कारणामुळे महाराष्ट्राचे पुरोगामित्व पणाला लागले आहे. त्याची दिशा परत योग्य रीतीने जायची असेल तर सामाजिक चळवळी मोठ्या प्रमाणात सुरु व्हायला हव्यात. पण गेल्या दोन दशकात तर सामाजिक चळवळी खूपच थंडावल्यात आणि दुसरीकडे अध्यात्माला चांगले दिवस आले आहेत. बुवा, बाबा, महाराज, साधू यांची लोकप्रियता, त्यांची संपत्ती आणि त्यांचे कारनामे यांची रसभरीत वर्णने सतत वाचायला, ऐकायला मिळतात. या दांभिक लोकांचा सुळसुळाट हा निर्बुद्ध समाजाच्या प्रवृतीचे निदर्शक आहे. झटपट श्रीमंती, मनशांती, सुख-समाधान, कुटुंब कलह अशा प्रश्नांची उत्तरं या बुवा, बाबा, महाराज, साधू यांच्याकडे मिळतील या आशेने लोक त्यांच्याकडे जातात, तसा या बुवा, बाबा, महाराज, साधू यांचा दावा असतो. त्याबदल्यात ते या पीडित लोकांचा ब्रेन वाश करून त्यांना आपल्या भजनी लावतात. आणि आपली दुकानदारी चालू करतात. अशा काळात विज्ञानवादी, विवेकनिष्ठ आणि बुद्धिवादी पद्धतीने जगणे, वागणे, विचार करणे यासाठी काम करणाऱ्या दाभोलकर यांच्यासारख्या व्यक्ती समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतात, तर हे बुवा, बाबा, महाराज, साधू समाजाला मागे नेण्याचा प्रयत्न करतात. पण समाजाला श्रेयस-प्रेयस काय याचे तारतम्य नसते. 

तर दुसरीकडे कर्मठ लोक आपल्या संघटना, संस्था चालू करून समाजात अनाचार माजवण्याचा प्रयत्न करतात. अशा आक्रमक आणि जातीयवादी संघटनांची संख्या अलीकडच्या काळात सतत वाढताना दिसते आहे. ब्राम्हण समाज, मराठा समाज आणि दलित समाज या तीन समाजात अशा संघटनांची संख्या सर्वात जास्त दिसते. या संघटना आधुनिक संपर्क साधनांचा वापर करून आपली दांडगटशाही पुढे रेटण्याचा प्रयत्न करत राहतात. यामुळे समाज चिकित्सा, समाज बदल, टाकाऊ सामाजिक रूढी या विषयी बोलण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. परिणामी सामाजिक सहिष्णुता कमी होत चालली आहे, तर आक्रमकता वाढत चालली आहे. परिणामी सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. सामाजिक अनारोग्य वाढत चालले की, समाजाची झपाट्याने घसरण सुरु होते. 

दाभोलकर यांच्यासारख्या लोकशाहीवादी कार्यकर्त्याची हत्त्या ही या चढेल आक्रमकपणातून घडली आहे. आणि प्रशासनाच्या पातळीवरही कार्यक्षमपणे काम करण्याची सवय हरवत चालल्यामुळे गुन्हेगारांचा छडा लावण्याची चुरस दिसत नाही. केवळ वरिष्ठांकडून आदेश आला म्हणून प्राथमिकता पूर्ण केली जाते आहे. यामुळे पोलीस नामक यंत्रणेचा धाक वाटेनासा होतो. आणि दाभोलकर यांच्यासारखे प्रामाणिक लोक गमावण्याची पाळी येते. 

हे असेच चालू राहिले तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही, असेही म्हणता येत नाही, कारण बिहारमध्येही हल्ली असे भीषण प्रकार घडत नाहीत.          

....

दाभोलकर यांच्या जाण्यामुळे अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे महाराष्ट्रभर पसरलेले काम थांबणार नाही, ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे.  दाभोलकर यांनी आपल्या हयातीतच कार्यकर्त्यांची दुसरी फळी तयार केली आहे आणि ती समर्थपणे आपले काम करत आहे, राहणार आहे. देवा-धर्माच्या नावाने आपल्या तुंबड्या भरणाऱ्या बुवा-बाबांची दुकानदारी उद्धवस्त करण्याचे काम यापुढेही चालू राहणार आहेच. महाराष्ट्र सरकारनेही वटहुकूम काढून जादूटोणा विरोधी कायदा लागू केला आहे. त्याची सरकारकडून नीट अंमलबजावणी झाली तर त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. आणि एकट्यादुकट्या व्यक्तींची फसवणूक करणाऱ्या बुवा-बाबांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवता येईल.   

Tuesday, August 13, 2013

गोष्टींच्या गोष्टींची गोष्ट

Published in LOksatta : Saturday, August 10, 2013

कवी, गीतकार, चित्रपट दिग्दर्शक, संवादलेखक, अशी बहुआयामी प्रतिभा असलेल्या गुलज़ार यांची नव्याने ओळख करून द्यायची गरज नाही आणि ही गोष्ट ज्याला कळते त्याला गुलज़ारांच्या लेखणीच्या गुणवत्तेविषयीही सांगण्याची गरज नाही. त्याची आवश्यकताच नाही मुळी.
तेव्हा थेट सुरुवात करू. गुलज़ार यांनी मुलांसाठी लिहिलेल्या गोष्टींचे हे पुस्तक, ‘बोस्कीज पंचतंत्र’. खरं तर हे विधान थोडं दुरुस्त करून असं म्हणावं लागेल की, गुलज़ारांची एकुलती एक मुलगी, मेघना हिच्यासाठी त्यांनी पंचतंत्रातल्या गोष्टींना दिलेलं हे नवं रूप आहे. मेघनाला गुलज़ारांनी लाडानं ‘बोस्की’ असं नाव ठेवलं, कारण तिचा पहिला स्पर्श मुलायम वस्त्रासारखा होता. आपल्या मुलांना कुणी वस्त्राचं नाव ठेवत नाही, पण गुलज़ारांसारख्या अलवार प्रतिभेच्या कवीनं ठेवलं!
बोस्की लहान असताना तिची आई, प्रसिद्ध अभिनेत्री राखी, तिला बंगाली बडबडगीते म्हणून दाखवत असे. आईची गीतं संपल्यावर बाबाची पाळी आली. बोस्कीला गोष्टी हव्या असत. गुलज़ार नवनव्या गोष्टी बनवून तिला सांगत, पण रोज मुलीला नवी गोष्ट देणार कुठून?  मग गुलज़ारांनी पंचतंत्रातल्या गोष्टींना नवं रूप देऊन त्या सांगायला सुरुवात केली. म्हणजे गोष्टी पंचतंत्रातल्या पण गुलज़ारांनी सांगितलेल्या. त्यामुळे त्या काव्यमय झाल्या. मोठय़ाने वाचता येऊ लागल्या आणि त्यांचा आनंदही घेता येऊ लागला. शिवाय त्यात आजच्या काळानुसार बदल केल्याने त्यांची खुमारीही वाढली. म्हणून हे गुलज़ारनिर्मित बोस्कीसाठीचं पंचतंत्र आहे. म्हणजे लहानग्यांसाठीचं.
आचार्य विष्णू शर्मा यांनी लिहिलेल्या गोष्टी ‘पंचतंत्र’ या नावाने ओळखल्या जातात. या गोष्टींचे पाच आहेत, म्हणून त्यांना ‘पंचतंत्र’ असे म्हटले जाते. एका राजाची तिन्ही मुलं आळशी असतात. नादान आणि बेजबाबदार मुलांमुळे राजा चिंतेत असतो. एके दिवशी राजाकडे विष्णू शर्मा नावाचा ब्राह्मण जातो. तो या तीन मुलांना सुधारण्यासाठी गोष्ट सांगायला सुरुवात करतो. त्याच या गोष्टी.
भारतीय साहित्यातील नीतिकथा या जागतिक पातळीवर मान्यता पावलेल्या आहेत. त्यात पंचतंत्राचा समावेश केला जातो. अकराव्या शतकापर्यंत पंचतंत्र पाश्चात्त्य जगात पोहोचले. तिथेही त्याला मोठी लोकप्रियता मिळाली आणि ती आजही टिकून आहे. मठ्ठपणा आणि हुशारी, खोडकरपणा आणि शहाणपण, चातुर्य आणि कपट या मानवी नीतिमूल्यांची ओळख प्राण्यांच्या पात्रांद्वारे करून देण्याची कल्पकता अभिनव म्हणावी अशी आहे.
मानवी वृत्ती-प्रवृत्तींचं यथार्थ दर्शन घडवणाऱ्या पंचतंत्राच्या गोष्टी मुख्यत: मुलांसाठी लिहिलेल्या असल्या तरी त्या सर्व वयोगटातल्यांना आवडतात. बोलणारे प्राणी आणि लहान्यांची मोठय़ांवर मात, हा मुलांच्या जास्त कुतूहलाचा आणि आवडीचा विषय असल्यामुळे, त्यांना त्या जास्त आवडतात एवढंच.
पंचतंत्रातल्या गोष्टी लिहिल्या गेल्या तेव्हापासूनच म्हणजे तिसऱ्या शतकापासूनच समकालीन आणि सार्वकालिक ठरत आल्या आहेत. आजही त्या तितक्याच आवडीने वाचल्या जातात. मूळ गोष्टींमध्ये नंतरच्या काळात अनेकांनी आपापल्या परीने भर घातली. आता गुलज़ार यांनी त्याच कथा आपल्या प्रतिभेने नव्याने लिहिल्या आहेत. हा या गोष्टींचा गुलज़ारकृत नवा अवतार नितांतसुंदर आणि मनोरम आहे.
गुलज़ारांनी पंचतंत्रातल्या निवडलेल्या गोष्टी आणि त्यांना चढवलेला साज, यामुळे हे पुस्तक वाचणं, पाहणं, चाळणं आणि इतरांना वाचून दाखवणं या सर्वच दृष्टींनी उत्तम म्हणावं असं झालं आहे.
या पुस्तकात एकंदर तेरा गोष्टी आहेत. उंदराशी आपल्या एकुलत्या एक मुलीचे लग्न लावून देणारा बाप, बलाढय़ सिंहाला फसवणारा चिमुकला उंदीर, पाहुण्यांचा कडकडून चावा घेणारा डास, गायचं न थांबणारं गाढव, स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलाचा जीव वाचवणारं मुंगूस, हलव्याचं भाडं मिळाल्यावर स्वप्नरंजनात अडकलेला मूर्ख पंडित.. खरं तर या पुस्तकातल्या सर्वच गोष्टी अनेकांना ऐकून, वाचून माहीत असतीलच. पण त्या पुन्हा वाचायला, वाचून दाखवायलाही आवडतील, कारण पुन:पुन्हा वाचाव्या अशाच त्या आहेत.
या पुस्तकाची अर्पणपत्रिकाही गमतीशीर आहे. गुलज़ारांनी हे पुस्तक त्यांच्या सूर, ताल आणि लय यांना अर्पण केले आहे. सूर म्हणजे त्यांचा नातू समय, ताल म्हणजे जावई गोविंद आणि लय म्हणजे मुलगी बोस्की (मेघना). तुम्हीही तुमच्या मुलांना, नातवंडांना या गोष्टी वाचवून दाखवू शकता. आणि गाऊनसुद्धा! हो, गाऊनच. कारण या गोष्टी काव्यमय आहेत. गाणं गुणगुणावं तशा या गुणगुणता येतात. लयीत वाचता येतात आणि त्यांच्याशी तालही मिळवता येतो.
रोहिणी चौधरी यांनी या मूळ हिंदीतल्या गोष्टींचा सुरेख इंग्रजी अनुवाद केला आहे, तर राजीव इपे यांनी त्यांना साजेशी चित्रं काढून त्यांच्या देखणेपणात भर घातली आहे.
अरेबियन नाइट्सबाबत अनेक वर्षे गैरसमज होता की, त्या लहान मुलांच्या गोष्टी नाहीत. त्या फार अश्लील आहेत वगैरे वगैरे. तशाच काहीसा गैरसमज पंचतंत्राविषयीही आहे की, या फक्त मुलांच्या गोष्टी आहेत. कुठलेही अभिजात पुस्तक हे फक्त अमुकांसाठी असे नसते, ते सर्वासाठी असते. पंचतंत्रातल्या गोष्टी वाचून मुलांना आनंद मिळतो, तर मोठय़ांना त्यातून शहाणपण मिळते आणि जगण्याचं इंगित नीट समजूनही घेता येतं. गुलज़ारांच्या लेखणीतून उतरलेल्या या पंचतंत्रीय गोष्टीही त्याला अपवाद नाहीत. त्यांचं पुनर्वाचन सर्वासाठी आनंददायी ठरेल, यात शंका नाही.

बोस्कीज पंचतंत्र : गुलज़ार,
प्रकाशक : रुपा-रेड टर्टल, नवी दिल्ली,
पाने : १०७, किंमत : १९५ रुपये.

Thursday, August 1, 2013

निरलस वैयाकरणी

(कृष्ण श्री. अर्जुनवाडकर-31 Oct. 1926-30 July 2013)

संस्कृत साहित्य, भारतीय तत्त्वज्ञान, साहित्यशास्त्र, मराठी व्याकरण, शुद्धलेखन अशा विषयांचा साक्षेपाने आणि शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारा विद्वान कधीच लोकप्रिय असत नाही आणि अलीकडच्या महाराष्ट्रात तर अशा विद्वानांची महत्ता कळण्याचीही सोय नाही. त्यामुळे कृष्ण श्री. अर्जुनवाडकर यांच्याविषयी महाराष्ट्रातल्या बुद्धिवंतांचीही पाटी कोरी असण्याचाच संभव अधिक. 'मराठी-घटना, रचना, परंपरा'; 'अर्धमागधी- घटना, रचना, परंपरा'; 'मम्मटभटकृत काव्यप्रकाश'; मोरो केशव दामले यांच्या 'शास्त्रीय मराठी व्याकरणा'चे संपादन, 'मराठी व्याकरण-वाद आणि प्रवाद', 'मराठी व्याकरणाचा इतिहास' असे महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिणारे अर्जुनवाडकर हे आयुष्यभर 'एकला चलो रे' या न्यायाने आपल्या संशोधनकार्यात मग्न राहिले. त्या न्यायाने भाषाशास्त्रज्ञ डॉ. अशोक केळकर, भाषातज्ज्ञ विश्वनाथ खैरे हेही त्यांच्या विद्वत्कुळातले. 'शास्त्रीय मराठी व्याकरण' या १९११ साली प्रकाशित झालेल्या दामले यांच्या ग्रंथाची अर्जुनवाडकर यांनी १९७० साली विस्तृत संदर्भटिपांसह नवी आवृत्ती संपादित केली. तिचा 'संपादनाचा आदर्श' या शब्दांत अभ्यासकांनी गौरव केला होता. व्याकरण हे भाषेचे शास्त्र असते, म्हणून त्याचा शास्त्रीय पद्धतीनेच विचार करायचा असतो. त्यामुळे त्यांनी इंग्रजी व संस्कृत व्याकरणाच्या बेडय़ा पायात अडकवलेल्या मराठी व्याकरणाच्या अभ्यासकांना त्याकडे पाहण्याची शास्त्रीय दृष्टी दिली. त्यासाठी 'मराठी व्याकरण-वाद आणि प्रवाद' हा ग्रंथ लिहून त्यांनी मराठी व्याकरणाची शास्त्रीय मांडणी केली. अर्जुनवाडकर यांचे व्यक्तिमत्त्व निरलस आणि सालस होते. नवनव्या गोष्टी शिकण्याची त्यांना हौस होती. संगणकावर मजकूर जुळणीला सुरुवात झाल्यावर त्यांनी ते तंत्र केवळ आत्मसातच केले नाही तर आपल्याला सोयीस्कर असे फाँटही बनवून घेतले. काही काळ त्यांनी छायाचित्रणाचा, त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर प्रकाशचित्रणाचा छंदही जोपासला. स्वा. वि. दा. सावरकर यांचे डावीकडे चेहरा करून विचारमग्न मुद्रा असलेले जे प्रकाशचित्र अनेक ठिकाणी वापरले जाते, ते अर्जुनवाडकरांनी टिपले होते! देशविदेशातल्या अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी प्राध्यापक, अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीपासून केंब्रिज विद्यापीठापर्यंत अनेक ठिकाणी संस्कृत, योग, उपनिषदे, रससिद्धान्त या विषयांवर व्याख्याने दिली. संस्कृतमध्ये काव्य, विडंबन काव्ये लिहिली. पण त्यांच्या अपरिमित कष्टांची आणि बहुमोल कामाची महाराष्ट्राने उपेक्षाच केली. पुण्यात राहून आयुष्यभर संशोधनात गढून गेलेला, शास्त्राभ्यासाच्या धुंदीत रमून गेलेला आणि अखंड संशोधनात बुडून गेलेला एक विद्वान वैयाकरणी आता आपल्यातून कायमचा निघून गेला आहे. ज्यांना व्याकरणाचे महत्त्व मान्य नाही, त्यांना व्याकरणाचा शास्त्रीय अभ्यास वा त्याचा इतिहास जाणून घेण्यात कितीसा रस असणार? मराठीच्या प्राध्यापकांना अर्जुनवाडकर यांचे नाव माहीत असेल की नाही याचीही शंकाच आहे. रॉबर्ट ब्राउनिंग या ब्रिटिश कवीने त्याच्या देशातल्या वैयाकरणीच्या निधनावर 'अ ग्रॅमेरियन्स फ्युनरल' नावाने कविता लिहून आदरांजली व्यक्त केली होती, आपण निदान अर्जुनवाडकर नेमके कोण होते, हे तरी जाणून घेणार की नाही?

Monday, July 8, 2013

पुस्तके आणि समृद्धी



''पुस्तके पूर्णपणे वाचून ती वाईट, असे जेव्हा तुम्ही ठरवता तेव्हा तुमची समृद्धी वाढलेली असते.'' - स्वामी रामानंद तीर्थ 

Sunday, June 23, 2013

उदारमतवादी समीक्षकाच्या गुजगोष्टी

LOKSATTA, Published: Sunday, June 23, 2013


प्रा. रा. ग. जाधव हे साठच्या दशकातले एक मान्यवर समीक्षक. दहा वर्षे एस.टी.त कारकुनी, दहा वर्षे प्राध्यापकी आणि वीस वर्षे मराठी विश्वकोशात मानव्य विद्यांचा प्रमुख संपादक, अशी रा.गं.ची व्यावसायिक कारकीर्द. त्यांनी थोडंफार कवितालेखनही केलं आहे, अलीकडे ललित लेखनही केलं आहे. पण त्यांची मुख्य ओळख आहे ती समीक्षक म्हणूनच. मराठी साहित्य-समीक्षेच्या क्षेत्रात त्यांचा अतिशय आदरपूर्वक आणि कौतुकाने उल्लेख केला जातो. त्या रा. गं.च्या निवडक लेखाचे हे पुस्तक, 'संध्यासमयीच्या गुजगोष्टी'. त्याचे शीर्षक पुरेसे बोलके आणि सूचक आहे. रा. ग. हे वृत्तीने समीक्षक आहेत आणि स्वभावाने निरागस. त्यामुळे त्यांच्या लेखनात आणि जगण्यात एक अलवार हळुवारपण असते. याचा अर्थ असा नव्हे की, त्यात ठामपणा नसतो. तो तर असतोच. पण सर्जनशील साहित्याविषयी एका मर्यादेनंतर फार ठाम विधानं करता येत नाहीत, याची स्पष्ट जाणीव असते. आणि रा. ग. पुस्तकाला एक सेंद्रिय कलाकृती मानतात. काही महिन्यांपूर्वीच त्यांचे 'साहित्याचे परिस्थितीविज्ञान' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. वय वर्षे ऐंशीच्या सांजपर्वात त्यांची लेखणी धीम्या गतीने चालूच आहे, नव्हे ती नवा काहीतरी विचार मांडू पाहते आहे, याची चुणूक त्यांनी 'इकॉलॉजी ऑफ लिटरेचर' ही संकल्पना मांडून दाखवली आहे. त्याची मराठी साहित्यविश्व कितपत दखल घेईल माहीत नाही. रा. गं.नाही त्याची खात्री नाहीच. माझे पुस्तक कोणी वाचणार नाही, असे त्यांनाही वाटते. असो.

प्रस्तुत पुस्तक मात्र रा. गं.च्या इतर पुस्तकांपेक्षा बरेचसे वेगळे आहे. यात साहित्यविषयक लेख आहेत, पण हे रूढार्थाने समीक्षेचे पुस्तक नाही. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर या गुजगोष्टी आहेत. मुख्य म्हणजे त्या सांजपर्वातील आहेत. म्हातारपण हे दुसरे बालपण असते, असे गमतीने(च) म्हटले जाते. पण रा. गं.बाबत ते गमतीने म्हणण्याचीही सोय नाही. कारण ते म्हणतात, ''सांजपर्व माणसाला मीविषयी बोलायला प्रवृत्त करते, खरे तर संधीच देते. पूर्वी हिरीरीने मांडलेल्या विचारांना परिपक्व सहिष्णुता देते. स्वत:कडे व स्वत:च्या सर्व पूर्ण संचिताकडे हळुवार तटस्थपणे पाहण्याची दृष्टी देते. सांजपर्वाच्या छायेत म्हणून संकीर्णतेचे रंगरूप ल्यालेल्या गुजगोष्टी सुचू लागतात.''


थोडक्यात सांजपर्व हे स्वत:कडेच नव्याने पाहायला लावणारे, स्वत:चा शोध घ्यायला लावणारे वय असते. त्यात रा. ग. समीक्षक. त्यामुळे ते स्वत:कडेही समीक्षकाच्याच नजरेतून पाहतात, आणि स्वत:ला अजिबात झुकते माप देत नाहीत.  'उदारमतवादी समीक्षक' अशी रा. गं.ची मराठी साहित्यविश्वात ओळख असली तरी ते स्वत:बाबत मात्र तितकेसे उदार नाहीत, असे दिसते. यातले काही लेख इतर लेखकांविषयीही लिहिलेले आहेत. त्यांना आदरांजली म्हणून किंवा त्यांचं अभिनंदन करण्यासाठी. त्या सर्वामध्ये मननीयता आणि सात्त्विक स्वीकारशीलता आहे. हळुवार परिपक्वता या पुस्तकातील सर्वच लेखांमधून जाणवते.


या पुस्तकात एकंदर अठ्ठावीस लेख असून ते चार भागांत विभागले आहेत. पहिल्या विभागातील नऊ लेख हे स्वत:विषयी आहेत. त्यातून रा. गं.च्या व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू जाणून घेता येतील. एरवी कमालीचे संकोची, भिडस्त असणाऱ्या रा. गं.नी या विभागात स्वत:च्या मनीचे काही गुज सांगितले आहे. पण तरीही ते लिहितात, 'काही जण मला आत्मचरित्र लिहायचा आग्रह करतात. आत्मचरित्र म्हणजे सत्याचे प्रयोग. आहे का धाडस? मग कशाला लिहा? त्या वाटेनं मी जाणार नाही. आत्मप्रौढी करण्यासाठी आत्मचरित्र लिहू नये.'


'सध्या थोर लेखकांची अनुपस्थिती आहे, आव्हानात्मक साहित्यकृतीही निर्माण होत नाहीत, प्रयोगशीलताही कमीच दिसते. या अंधाऱ्या पोकळीत समीक्षेचे अभ्यासकच प्रकाशाचे दीप उजळतील, असे मला वाटते.' असा विश्वास रा. ग. दाखवतात. 'दलित लेखकांनी गांधीजींचं 'माय एक्स्परिमेंट विथ ट्रथ' वाचावं..मराठीखेरीज अन्य भारतीय भाषांतील दलित वाङ्मयात आयडियॉलॉजी कमी आणि वाङ्मय अधिक आहे. आपल्याकडे उलट आहे.', 'मनमोहन आणि ग्रेस यांच्या कवितेत फँटसी आणि इमॅजिनेशनचा संगम आहे', 'प्रत्यक्ष जगण्याच्या परीक्षेत बहुतेक लोक नापासाच! कारण जगातील सर्वात अप्रिय सत्य हे 'मी'विषयीच असते' असे काही चांगले तुकडे वा ओळी या पुस्तकातील लेखांत सापडतात. आणि त्या आपल्याला थोडय़ाशा चमकावून जातात. रा. गं.नी त्या फार साधेपणाने सांगितल्या आहेत, पण त्या तशा नाहीत.


दुसऱ्या विभागात साहित्यसंस्कृती, भाषा, साहित्य संमेलनाचे औचित्य, साहित्यातील बाप, लेखक-वाचक यांच्यातील अंतर, परिभाषा, सार्वजनिक ग्रंथालय, प्रादेशिक साहित्य या विषयांवरील एकंदर नऊ लेख आहेत. तिसऱ्या विभागातील 'बन्सीधर, तू आता कुठे रे जाशील?' आणि 'अद्भुताचे ब्रह्मांड' हे दोन्ही लेख, एकंदर जीवनाविषयी रा. गं.ना काय वाटतं, याविषयी आहेत. मात्र जीवनाकडे पाहण्याची रा. गं.ची या दोन्ही लेखांतील दृष्टी ही समीक्षकाची नसून ललित लेखकाची आहे. चौथ्या विभागातील आठही लेख तसे पाहिले तर समीक्षकीय दृष्टीचे, पण टिपणवजा आहेत. त्यातून फारसं काही नवीन हाती लागत नाही. पण तरीही काही निरीक्षणे, मुद्दे जाणून घेता येतातच. 'श्यामची आई', 'स्वामी', 'कोसला' या तीन कादंबऱ्या, नारायण सुर्वे, जी. ए. कुलकर्णी, वसंत आबाजी डहाके यांच्यावरील लेख हे प्रासंगिक असले तरी त्यातून रा. ग. 'कसं पाहतात?' हे जाणून घेता येतं. पण या लेखांची लांबी-रुंदी छोटी असल्याने त्यातून त्यांनी फार मोठा व्यूह मांडलेला नाही. 'आधुनिक मराठी विनोद-परंपरा'हा शेवटचा लेख मराठीतील विनोदी लेखनाचा धावता आढावा घेणारा आहे. 


दोनेक वर्षांपूर्वी ज्येष्ठ कोकणी लेखक रवींद्र केळेकर यांचे 'ओथांबे' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. (ओथांबे म्हणजे ओथंबून आलेले दवबिंदू) केळेकर यांचे विविध विषयांवरील विचार त्यात एकत्र केले आहेत. रा. गं.चे हे पुस्तक काही तसे नाही. 'माझे चिंतन' हे त्यांचे पुस्तक त्यांच्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने प्रकाशित झाले आहे, त्यातून त्यांच्या विचारांचा गाभा चांगल्या प्रकारे समजावून घेता येतो. त्या तुलनेत प्रस्तुत पुस्तकात चिंतन फारसं नाही, पण मननीयता आणि एकंदरच जगणं, मराठी साहित्य याविषयीची स्वीकारशीलता आहे.

 
यातील सर्वच लेख हे आठ-दहा पानांचेच आहेत. शिवाय हे समीक्षक रा. गं.नी गप्पा माराव्या तसं लिहिलेलं 
पुस्तक आहे, हेही वैशिष्टय़च की! त्यामुळे त्यात समीक्षकीय परिभाषा फारशी नाही. अनौपचारिक शैली, साधीसोपी भाषा आणि काहीशी काव्यमय लय, ही काही यातील लेखांची वैशिष्टय़े आहेत. 'खेळीमेळी', 'वासंतिक पर्व' हे रा. गं.चे दोन ललित लेखसंग्रह अनुक्रमे २००८ व २००९ साली प्रकाशित झाले. त्यानंतरचा हा तिसरा. शिवाय सांजपर्वातला. त्यामुळे यातलं मार्दव व लालित्य मनमोकळं आणि दिलखुलास म्हणावं असं आहे. 


एका परीने हे बहुधा रा. गं.चं शेवटचं पुस्तक असण्याची दाट शक्यता आहे. कारण उरलंसुरलं असं या पुस्तकाचं पुस्तक आहे. वय वर्षे ऐंशीमध्येही रा. गं.ना नव्या पुस्तकाचं अप्रूप वाटतं. त्याचा पहिला पहिला नवाकोरा वास सुखावतो. गेली ४०-५० पन्नास वर्षे सातत्याने, निरलस वृत्तीने लेखन करणाऱ्या एका उदारमतवादी समीक्षकाच्या या पुस्तकाचं वाचकांनाही अप्रूप वाटावं आणि त्याच्या वाचनानं तेही सुखावेत. कारण गेली पन्नासहून अधिक वर्षे केवळ मराठी साहित्याचं चिंतन-मनन करणयात घालवलेल्या एका व्रतस्थ समीक्षकाचं हे लेखन आहे. जगाकडे, जीवनाकडे आणि मराठी साहित्याकडे सतत कुतूहलाने पाहात राहिल्याने रा. गं.कडे चार वेगळ्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत..आणि त्या या पुस्तकात उतरल्या आहेत. त्यातून निदान काही जणांना तरी काही नव्याने सापडू शकेल.


'संध्यासमयीच्या गुजगोष्टी' - प्रा. रा. ग. जाधव, 

साधना प्रकाशन, पुणे, 
पृष्ठे - १७२, मूल्य - १२५ रुपये.

Monday, June 17, 2013

सावध ऐका पुढल्या हाका...

LOKSATTA : Sunday, June 16, 2013


उदारीकरणाच्या गेल्या दोन दशकांमध्ये शेती, सेवा, उद्योग, शिक्षण, आरोग्य, प्रसारमाध्यमं, चित्रपट, संगीत, साहित्य या क्षेत्रांमध्ये झपाटय़ानं अनेक स्थित्यंतरं झाली. यातल्या काही क्षेत्रांचा तर नव्या तंत्रज्ञानानं अगदी कायापालट करून टाकला आहे. तो केवळ स्तिमित करणारा आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर संगीताचं घेता येईल. एकेकाळी संगीताच्या तबकडय़ा होत्या. मग एल. पी. आल्या. नंतर कॅसेट निघाल्या. त्यानंतर सी.डी.चं आगमन झालं. आणि आता मोबाइल आणि आयपॉड आलेत. यातल्या प्रत्येक नव्या तंत्रानं आधीचं तंत्र मोडीत काढलं. पण या सर्व प्रवासात संगीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदतच झाली. पूर्वी संगीत ऐकण्यावर बऱ्याच मर्यादा होत्या आणि त्यामुळे ती एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती. पण मोबाइल आणि आयपॉड या दोन्हींनी संगीताला फारच सोयीस्कर, सर्वगामी आणि सर्वसंचारी करून टाकलं. त्यामुळे संगीत ही कुठेही, केव्हाही ऐकण्याची गोष्ट झाली. लोकही त्याचा फायदा घेऊ लागले. लोकल, बस, शाळा-कॉलेज, ऑफिस, घरी, प्रवासात, अगदी टॉयलेटमध्ये असतानाही आता संगीत ऐकता येतं. लोक ते ऐकतातही. तंत्रज्ञानानं संगीताच्या बाबतीत ही जी काही उलथापालथ घडवली आहे, ती लोकांच्या संगीताविषयीच्या दबावामुळे घडली नसून त्या- त्या क्षेत्रातल्या शक्यता तपासण्याच्या महत्त्वाकांक्षेतून घडली आहे. या नवनव्या तंत्रांमुळे संगीताची उपयुक्तता वाढली आणि ते सहजसाध्य झालं, म्हणून त्याचा वापर वाढला. असे बदल इतरही काही क्षेत्रांमध्ये होत आहेत. त्यात मराठी प्रकाशन व्यवहाराचाही उल्लेख करावा लागेल. संगीताइतक्या पटीत नाही, पण तशा प्रकारे मराठी पुस्तकांबाबतही स्थित्यंतरं झाली आहेत, होत आहेत.

एकेकाळी पुस्तकं विकत घेणं ही खास मध्यमवर्गाची चैन होती. पण गेल्या वीस वर्षांच्या काळात मध्यमवर्गाचे उच्च, मध्यम आणि निम्न असे तीन वर्ग झाले असून त्यात फार मोठय़ा समाजसमूहाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे आता पुस्तक विकत घेण्याविषयीची अनुकूलता कितीतरी पटींनी वाढली आहे. पूर्वी आवडही कमी आणि अनुकूलताही कमी होती. आता सेवासुविधांच्या साधनांमुळे, माहितीच्या प्रचंड स्फोटामुळे आणि पैशाच्या खुळखुळण्यामुळे आवड आणि अनुकूलता या दोन्हींबाबत परिस्थिती खूपच सुधारली आहे. साहित्य संमेलनामध्ये तीन दिवसांत होणारी काही कोटींची पुस्तकविक्री, गावोगावी सातत्याने होणारी पुस्तक प्रदर्शने, ५० रुपयांत पुस्तकं मिळताहेत म्हटल्यावर तासन् तास रांगा लावून पुस्तकं विकत घेणारे लोक- ही काही उदाहरणं यासंदर्भात लक्षात घेण्यासारखी आहेत.


कथा-कादंबरी-कविता या सर्जनशील विषयांवरील पुस्तकांची संख्या 'जैसे थे' असताना उपयुक्ततावादी पुस्तकांची संख्या मात्र कमालीची वाढली आहे. त्यांना वाचकांचा खूप चांगला प्रतिसादही मिळतो आहे. पण या पुस्तकांना खुद्द काही प्रकाशकांकडून नाकं मुरडली जातात. वस्तुत: उपयुक्ततावादी पुस्तकं म्हणताना आपल्याला नेमकं काय अभिप्रेत आहे, हे नीट समजून घेतलं पाहिजे. त्यात मानसिक आरोग्य, अध्यात्म, जीवनशैली, स्वास्थ्य, आहार, करिअरविषयक, संभाषणकौशल्य अशा पुस्तकांचा समावेश होईल. पण त्यातच अपारंपरिक प्रकारातल्या पुस्तकांना टाकून चालणार नाही. या प्रकारात खूप वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकं प्रकाशित होत आहेत. आयुष्यभर तोंडी तलाकच्या विरोधात काम करणाऱ्या सय्यदभाई यांचे 'दगडावरची पेरणी', विठ्ठल कामत यांचे 'इडली, ऑर्किड आणि मी', शोभा बोंद्रे यांचे 'मुंबईचे डबेवाले', सुनील ठाणेदार यांचे 'ही तो श्रींची इच्छा', रमेश जोशी यांचे 'माझी कॉपरेरेट यात्रा' अशा अनेक पुस्तकांचा उल्लेख करता येईल. राजहंस, मनोविकास यासारख्या प्रकाशन संस्था अपारंपरिक पुस्तकं मोठय़ा प्रमाणावर प्रकाशित करत आहेत. त्यांना वाचकांचा चांगला प्रतिसादही मिळतो आहे. या प्रकारच्या पुस्तकांचं वाढलेलं मार्केट ही खरं तर फार आश्वासक अशी संधी आहे मराठी प्रकाशकांसाठी.


इंटरनेट, ब्लॉग, इंग्रजी वर्तमानपत्रे यांच्यामुळे जगातील बेस्टसेलर आणि गाजलेल्या पुस्तकांची माहिती सहजासहजी वाचकांपर्यंत पोहोचू लागली आहे. त्यातून गाजलेली पुस्तकं, त्यांचे लेखक यांच्याविषयी उत्सुकता निर्माण होत आहे. हे लक्षात घेऊन आधी मेहता पब्लिशिंग हाऊस आणि नंतर साकेत प्रकाशन यांनी अनुवादित पुस्तकं प्रकाशित करायला सुरुवात केली. मेहताने तर कितीतरी विषयांवरील पुस्तके अनुवादित केली आहेत, करत आहेत. ही सर्व पुस्तकं बेस्टसेलर तरी आहेत किंवा गाजलेली तरी. त्यांच्याविषयी मराठी वाचक आता पुरेसा सजग झाल्यामुळे या पुस्तकांना बाजारात मागणी आहे. 


एकेकाळी वर्षांला किमान हजार-बाराशे पुस्तकं मराठीत प्रकाशित होत. ही संख्या गेल्या वीस वर्षांच्या काळात वाढून आता तीन हजारांच्याही पुढे गेली आहे. म्हणजे दर महिन्याला २५०-३०० नवी पुस्तकं बाजारात येतात. त्यांच्या प्रत्येकी एक हजार प्रती गृहीत धरल्या तर साधारणपणे तीन लाख पुस्तकांच्या प्रती छापल्या जातात. प्रत्येक पुस्तकाची किंमत ढोबळमानाने शंभर रुपये धरली तर किती कोटी रुपयांची उलाढाल होते, याचा अंदाज करता येईल. 


पण तरीही पुस्तकांच्या किमती हा अजूनही कळीचा मुद्दा ठरतो आहे. इंग्रजीमध्ये एकाच पुस्तकाच्या साधारणपणे हार्डबाऊंड आणि पेपरबॅक अशा दोन प्रकारांतल्या आवृत्त्या काढल्या जातात. काही वर्षांपूर्वी आधी फक्त हार्डबाऊंड आवृत्ती प्रकाशित केली जायची. मग त्यानंतर काही महिन्यांनी वा एखाद् दुसऱ्या वर्षांने पेपरबॅक आवृत्ती काढली जायची. आता इंग्रजी प्रकाशक तसे करत नाहीत. ते एकाच वेळी दोन्ही आवृत्त्या बाजारात आणू लागले आहेत. म्हणजे त्या पुस्तकाबद्दलची वाचकांची ओढ तीव्र असतानाच ते बाजारात येते आणि त्याची चांगली विक्री होते. मराठी प्रकाशकांनाही हा पर्याय स्वीकारता येण्यासारखा आहे. मध्यंतरी '५० रुपयांत एक पुस्तक' या योजनेला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, त्यावरून याची खात्री पटायला हवी. तसे झाले तर पुस्तकांची विक्री कितीतरी पटींनी वाढेल. 


काळ बदलतो तशी वाचकांची अभिरुची बदलते. एकेकाळी शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, लेखक, संशोधक, शास्त्रज्ञ अशा बुद्धिजीवी लोकांपुरतीच पुस्तकं ही 'नडीव' गोष्ट होती. आता ती तशी राहिलेली नाही. तिचा परीघ कितीतरी पटींनी विस्तारला आहे. मात्र, त्या आसुसलेल्या, पुस्तकांची वाट पाहणाऱ्या वाचकांपर्यंत पोहोचण्यात मराठी प्रकाशकच कमी पडत आहेत. 


कुठलंही नवं माध्यम आलं की, त्याचे फायदे आणि तोटे सांगणारे लोक पुढे येत असतात. म्हणजे स्वागत करणारे आणि विरोध करणारे. ते मराठी प्रकाशन व्यवहारातही आहेत. ई-बुक रीडरमुळे छापील पुस्तकांचं भवितव्यच धोक्यात येणार असल्याची हाकाटी काहींनी सुरू केली आहे. छपाईचा शोध हा मानवाला लागलेला सर्वात महत्त्वाचा आणि मूलभूत स्वरूपाचा शोध आहे. म्हणजे असं की, छपाईचा शोध विजेच्या शोधासारखा आहे. वीज वेगवेगळ्या प्रकारांत उपलब्ध होईल, तिचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करता येईल; पण तिला मोडीत काढून नवंच काहीतरी उभं राहणं हे जसं कठीण आहे, तसंच पुस्तक छपाईचंही आहे (सौरऊर्जा, बायोगॅस हे विजेला पर्याय म्हणून शोधले गेले असले तरी त्यामुळे विजेची अपरिहार्यता अजिबात कमी झालेली नाही!). त्यामुळे ई-बुक रीडरमुळे पुस्तकवाचनावर काही परिणाम होईल असे वाटत नाही. शिवाय त्यांची संख्या जेमतेम दोन टक्के भरेल इतकीही नाही. पण नको त्या गोष्टीसाठी आरडाओरड करणं ही काही मराठी प्रकाशकांची फॅशन झाली आहे. 


इंटरनेटमुळे बातम्या, छायाचित्रं, लेख, पुस्तकं, कोश सहजासहजी उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे लोकांची माहितीची भूक वाढली आहे. कारण माहिती मिळवणं सोपं झालं. त्यामुळे लोक इंटरनेटवर बऱ्याच गोष्टींसाठी अवलंबून राहू लागले आहेत. त्यातून वाचनाच्या दिशा विस्तारायला मदतच झाली आहे. 


याचं चांगलं प्रत्यंतर येतं ते 'अक्षरधारा'च्या पुस्तक प्रदर्शनात. महाराष्ट्रभर फिरून पुस्तक प्रदर्शन करणाऱ्या या संस्थेने इंटरनेट आणि इतर ठिकाणांहून माहिती पोहोचून उत्सुकता चाळवलेल्या लोकांना आधी पुस्तकांपर्यंत आणण्याचं काम केलं. मग त्यांच्यापुढे वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकांचे अगणित पर्याय उपलब्ध करून दिले. त्यामुळे केवळ पुस्तकं पाहण्यासाठी, कुणाला तरी भेट देण्यासाठी वा मुलांसाठी पुस्तकं विकत घ्यायला येणारा मध्यमवर्ग हळूहळू चाराऐवजी सहा आणि सहाऐवजी दहा पुस्तकं एकाच वेळी विकत घेऊ लागला. 'अक्षरधारा'च्या पुस्तक प्रदर्शनात येणारा बहुतांश ग्राहक हा पुस्तकांविषयी उत्सुकता असणारा, पण वाचनाविषयी तसा अनभिज्ञ असलेला असतो. 
उदारीकरणाचा काळ हा अधिक चांगल्या प्रकारे व्यावसायिकता अंगी बाळगण्याचा काळ आहे. त्या तुलनेत मराठी प्रकाशन व्यवहार मात्र अजून सुशेगात आहे. लेखकाचे मानधन, पुस्तकांची विक्री, जाहिरात, वितरण, प्रसिद्धी यांबाबत ते गाफील म्हणावे इतके मागे तरी आहेत किंवा रडके तरी आहेत. शिवाय जुनी नीतिमूल्यं उराशी कवटाळून बसलेले आहेत. स्वत:हून कुठलाही नवीन बदल स्वीकारायचा नाही; पण इतर कुणी करत असेल तर त्याला मात्र नावं ठेवायची! 


आजचं बदलतं समाजवास्तव टिपणाऱ्या, त्यांना भिडू पाहणाऱ्या विषयांचा शोध घेऊन त्यावर पुस्तकं लिहून देणाऱ्या लेखकांचा शोध घेणं आणि त्यांना लिहितं करण्याची गरज आहे. लेखकानं प्रकाशकाकडे हस्तलिखित आणून देणं आणि प्रकाशकाने ते प्रकाशित करणं, यापेक्षा आता प्रकाशकांनी नव्या विषयांचा आणि नव्या लेखकांचा शोध घेणं गरजेचं झालं आहे. साधना प्रकाशनाला फारसं मनुष्यबळ हाताशी नसताना, कुठलीही यंत्रणा नसताना जे शक्य होत आहे, ते ज्या प्रकारची पुस्तकं प्रकाशित करत आहेत, आणि त्यांना जो प्रतिसाद मिळत आहे, त्यातून चार गोष्टी व्यावसायिक प्रकाशकांना शिकता येण्यासारख्या आहेत. नक्षलवाद ही आजची अतिशय ज्वलंत राष्ट्रीय समस्या आहे. त्यावरचं मराठीतलं पहिलं पुस्तक साधनानं प्रकाशित केलं. हे इतर कुठल्याही प्रकाशकाला सुचलं नाही. अजूनही या विषयावर मराठीत लेखन होण्याची नितांत गरज आहे. अशीच- बदलता ग्रामीण महाराष्ट्र, बदलती शहरं यांची स्पंदनं टिपणारं, त्यात होणाऱ्या बदलांना गवसणी घालू पाहणारी पुस्तकं येण्याचीही तेवढीच निकड आहे. उदारीकरणाचं समर्थन करणारं, त्याचं स्वागत करणारं लेखन मराठीत कुणीही करताना दिसत नाही. समर्थन न करू दे; पण होत असलेले बदल तरी आपण नीटपणे समजून घेणार आणि समजावून देणार आहोत की नाही, याचा मराठी प्रकाशकांनी गांभीर्याने विचार करायची गरज आहे.

  
थोडक्यात, उदारीकरणाच्या काळाने मराठी प्रकाशन व्यवहारात अनेक संधी निर्माण केल्या आहेत, तशी काही आव्हानेही उभी केली आहेत. या संधीचा मराठी प्रकाशक जितक्या चांगल्या प्रकारे लाभ उठवतील आणि आव्हानांना जेवढय़ा धीराने सामोरे जातील, तेवढं त्यांच्या आणि वाचकांच्याही फायद्याचंच आहे!

Thursday, June 6, 2013

वाचलीच पाहिजेत अशी ४० पुस्तकं


प्रत्येक जण आपल्याला आवडेल ते वाचतच असतो. पण वाचलंच पाहिजे असं काय काय आहे मराठीत.

१) भारतीय संविधान (अधिकृत प्रत)
आपल्या राज्यघटनेत काय काय आहे हे आपल्याला माहीत असलंच पाहिजे. ती वाचणं अपरिहार्यच!


२) स्त्रीपुरुषतुलना - ताराबाई शिंदे
एकोणिसाव्या शतकात स्त्रीवादी मांडणी करणारे, काळाच्या अत्यंत पुढे असलेले हे पुस्तक म्हणजे भारतातील स्त्रीवादी मांडणीचा एन्सायक्लोपीडियाह्णच आहे.


३) स्मृतिचित्रे - लक्ष्मीबाई टिळक
एका सामान्य स्त्रीच्या संसारातील साध्यासुध्या, कडू-गोड, आंबट-तुरट आठवणींनी, संगती-विसंगतींनी भरलेली, पण प्राजंळपणे, सूक्ष्मपणे आणि विनोदबुद्धीने सांगितलेली ही असामान्य आणि अद्वितीय कलाकृती आहे.


४) झेडुंची फुले - केशवकुमार
विडंबन या विषयावरचं मराठीतलं एकमेव पुस्तक आहे. यानंतर एकाही पुस्तकाचं नाव घेता येत नाही.


५) मर्ढेकरांची कविता 
ज्या कवितांविषयी गेली साठ-सत्तर र्वष सातत्याने लिहिलं जात आहे, त्या मर्ढेकरांच्या कवितांचा हा छोटासा संग्रह. 


६) मुंबईचे वर्णन - गोविंद नारायण माडगावकर
मुंबईविषयीचं हे पुस्तक मुंबईविषयीच्या आजवर लिहिल्या गेलेल्या सर्व पुस्तकांमध्ये श्रेष्ठ आहे.


७) आगरकर वाङ्मय (खंड १ ते ३)- संपा. दि. य. देशपांडे व नातू
आगरकर वाचल्याशिवाय बुद्धिवाद म्हणजे काय आणि विचारकलह म्हणजे काय, हे समजून घेता येत नाही.


८) दिवाकरांच्या नाटय़छटा
नाटय़छटा हा वाङ्मयप्रकार मराठीमध्ये फक्त दिवाकरांनीच लिहिला आणि तोही उत्तम प्रकारे. 


९) भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास - इतिहासाचार्य वि. का. राजवाडे
आजच्या र्निबधपूर्ण शरीरसंबंधांच्या काळात एकेकाळी भारतात विवाहाचे आणि शरीससंबंधांचे कोणकोणते मार्ग होते, याचा इतिहास यात वाचायला मिळतो.


१०) युगान्त - इरावती कर्वे
महाभारताकडे कसं पाहावं आणि महाभारत कसं वाचावं याचे वस्तुपाठ जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचावं. 


११) निवडक ठणठणपाळ - जयवंत दळवी
मराठीतलं सर्वाधिक काळ चाललेलं सदर आणि मराठी साहित्यिकांची इतक्या निर्भेळपणे टिंगलटवाळी करणारं सदाबहार पुस्तक.


१२) मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास - पु. ल. देशपांडे
पुलंचं हे दुर्लक्षित पण महत्त्वाचं पुस्तक आहे. 


१३) गावगाडा - त्रिंबक नारायण आत्रे
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील बारा बलुतेदार व्यवस्थेचं समाजशास्त्रीय रीतीने चित्रण करणारं हे पुस्तक आहे. आत्रे यांच्या करडय़ा नजरेतून ग्रामीण भागाचा कुठलाच भाग आणि विषय सुटलेला नाही. 


१४) साता उत्तराची कहाणी - ग. प्र. प्रधान
समाजवादी, साम्यवादी, रॉयवादी, पत्री सरकार, आंबेडकरवादी, हिंदुत्ववादी आणि गांधीवादी अशा सात विचारसरणींची १९४० ते ८० याकाळातली वैचारिक चर्चा ललित अंगाने करणारे आणि त्यासाठी पत्रे, आठवणी, गप्पा आणि फ्लॅशबॅक असा तंत्रांचा वापर करणारे हे पुस्तक. 


१५) न्या. रानडे यांचे चरित्र - न. र. फाटक
ऐन पंचविशीत फाटकांनी लिहिलेलं हे न्या. महादेव गोविंद रानडे यांचं चरित्र वाचल्याशिवाय रानडय़ांविषयी जाणून घेता येणं शक्य नाही.


१६) बहिणाबाईची गाणी 
जगण्याचं तत्त्वज्ञान इतक्या सोप्या आणि नेमक्या शब्दांत तत्त्वज्ञानाच्या पुस्तकातही सापडत नाही.


१७) आधुनिक भारत- आचार्य शं. द. जावडेकर
‘गीतारहस्य’नंतरचा थोर ग्रंथ असं या पुस्तकाचं वर्णन प्रसिद्ध लेखक वा. म. जोशी यांनी केलं आहे. याच वर्षी या पुस्तकाला पंचाहत्तर र्वष पूर्ण होतील. 


१८) मी कसा झालो- आचार्य अत्रे
अत्रे यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, त्यांची भाषा, वाक्यरचना आणि विचारसौंदर्य जाणून घेण्यासाठी हे पुस्तक लेखन करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने वाचलेच पाहिजे.


१९) निवडक म. श्री. माटे (खंड १ व २)
विचार असाही करायचा असतो आणि खरं तर असाच करायचा असतो, याचं तारतम्य माटेंच्या या निवडक लेखनातून ठसठशीतपणे दृग्गोचर होते.


२०) खरे मास्तर - बाळुताई खरे
मराठीमध्ये एकंदरच वडिलांविषयी लिहिलेली पुस्तके फारच कमी आहेत. हे पुस्तक वडिलांविषयी मुलीने लिहिलेले असले तरी त्यातून दोन पिढय़ांतील बदल, ताणेबाणे आणि बदलते प्राधान्यक्रम यांची ही कहाणी आहे. यातून विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा काळ चांगला टिपला गेला आहे.


२१) वाचू आनंदे (बालगट व कुमारगट) - संपा. माधुरी पुरंदरे
बालवयीन आणि कुमारवयीन मुलांचे भावविश्व आणि जाणिवा समृद्ध करणारा हा पुस्तकसंच (मुले आणि पालकांसाठीही) नितांत वाचनीय आहे.


२२) जागर - नरहर कुरुंदकर
विचार कसा करावा हा कुरुंदकरांच्या एकंदरच लेखनाचाच गाभा आहे. जागरह्णमध्ये तो अधिक तीव्रपणे समोर येतो आणि आपले विचारविश्व बदलून टाकतो.


२३) रामनगरी - राम नगरकर
स्वत:कडे इतक्या तटस्थपणे पाहून, स्वत:च्याच बावळटपणाची, चुकांची खिल्ली यात लेखकाने ज्या खिळाडूवृत्तीने सांगितली आहे, तशी मराठीतल्या इतर आत्मचरित्रांमध्ये क्वचितच दिसते.


२४) नपेक्षा - अशोक शहाणे
मराठी लघुनियतकालिकांचे जनक असलेल्या अशोक शहाणेंचं हे एकमेव पुस्तक. अतिशय बेरकीपणाने मराठी वाङ्मय व वाङ्मय संस्कृतीची झाडाझडती त्यांनी यात घेतली आहे. 


२५) निशाणी डावा अंगठा - रमेश इंगळे उत्रादकर
कोटय़वधी रुपये खर्च करून महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या साक्षरता मोहीमेचं नेमकं काय झालं, याचं भेदक चित्रण या कादंबरीत आहे. 


२६) विठोबाची आंगी - विनय हर्डीकर
१९८०ते २००० या दोन दशकातील फर्स्ट पर्सन डाक्युमेंटरीह्ण या प्रकारातील दीर्घ लेखांचा संग्रह. यातला प्रत्येक लिहिताना आपला घाम निघाला असे लेखकाने म्हटले आहे आणि यातला प्रत्येक लेख वाचताना वाचकाचाही घाम निघतो. 


२७) वैचारिक व्यासपीठे - गोविंद तळवलकर
भारतातील सात, युरोप-अमेरिकेतील सात आणि पाकिस्तानतील एक अशा एकंदर पंधरा इंग्रजी नियतकालिकांची वैशिष्टय़ूपर्ण ओळख. ही सर्व नियतकालिके तळवलकर अनेक र्वष सातत्याने वाचत आले आहेत. 


२८) सारांश - अरुण टिकेकर
आजच्या सामाजिक अनारोग्याची कारणं आणि त्यावरील उपाय या पुस्तकातील सात निबंधांतून जाणून घेता येतात. 


२९) बदलता भारत - भानू काळे
उदारीकरणाला १९९१मध्ये भारतात सुरुवात झाल्यावर पहिल्या १०-१२ वर्षांतल्या भारतीय समाजमनाचा शोध घेणारं पहिलं पुस्तक. तो लेखकाने भारतभर फिरून घेतला आहे. जागतिकीकरण समजून घ्यायला निदान आत्ता तरी मराठीतलं हे एकमेव पुस्तक आहे.


३०) कथा आणि कथेमागची कथा 
(खंड १ व २) - राजन खान
एक आघाडीचा सर्जनशील कथाकार (आणि कादंबरीकारही) आपल्या कथा लिहिताना काय काय पूर्वतयारी करतो, त्याविषयी कसकसा विचार करतो, त्याला विषय कसे सुचतात, तो ते कसे फुलवतो, अशा वाचकांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं एक कथा आणि त्या कथेमागचा लेख या उदाहरणांसह यात वाचता येतो.


३१) श्यामकांतची पत्रे
रियासतकार गो. स. सरदेसाई यांच्या मुलाने १९१२ ते १९१५ या काळात शांतिनिकेतनमधून वडिलांना लिहिलेल्या १८७ पत्रांचा हा संग्रह. अशा प्रकारच्या पत्रसंग्रहाचं मराठीतला पहिलाच प्रयत्न असलेलं हे पुस्तक नितांत वाचनीय आहे.


३२) तुकारामदर्शन - डॉ. सदानंद मोरे
तुकाराम आधुनिक काळात कुठे कुठे आणि कसेकसे सापडतात, त्याचं हे विविधांगी दर्शन थक्क करणारं आहे. तुकाराम महाराष्ट्राचं जगणं किती व्यापून राहिले आहेत, त्याची यातून प्रचीती येते.


३३) दगडावरची पेरणी - सय्यदभाई
तोंडी तलकाच्या विरोधात हमीद दलवाई यांच्या प्रेरणेने आणि स्वत:च्या बहिणीच्या अनुभवाने गेली ३०-४० र्वष मोहीम चालवणाऱ्या एका जिद्दीच्या कार्यकर्त्यांचे हे कार्यकथन आहे.


३४) शतकांचा संधिकाल - दिलीप पुरुषोत्तम चित्रे
विसाव्या शतकाच्या शेवटाला एक दशक बाकी असतानाच या शतकातल्या उलथापालथींचा आढावा यात घेतला आहे. गेलं शतक किती बदललं याचा अंदाज यावरून येऊ शकतो.


३५) गांधींनंतरचा भारत - रामचंद्र गुहा, अनु. शारदा साठे
भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास अतिशय नेमकेपणाने, तटस्थपणे आणि रंजकपणे सांगणारे हे पुस्तक भारतीय राजकारण समजून घेण्यासाठी आवर्जून वाचावे असे आहे.


३६) आठवले तसे - दुर्गा भागवत
दुर्गाबाईंच्या परखड समीक्षेचा आणि समतोल दृष्टिकोनाचा प्रत्यय देणारे हे पुस्तक आहे.


३७) शाळा - मिलिंद बोकील
पौगंडवस्थेतून प्रत्येक जण जातो. त्यामुळे त्या प्रत्येकाच्या मनात एक ‘शाळा’ असते. कधीतरी शाळेत गेलेल्या आणि कधीही न गेलेल्या असा सर्वाची ही कादंबरी आहे. 


३८) चनिया मनिया बोर - चंद्रकांत खोत
मुलांसाठीच्या गोष्टींचं इतकं भन्नाट लिहिलेलं, सजवलेलं आणि छापलेलं दुसरं पुस्तक मराठीमध्ये नसावं.


३९) नक्षलवादाचे आव्हान - देवेंद्र गावंडे
नक्षलवादी चळवळीचे इतके जवळून, इतके सत्यपूर्ण आणि वास्तव चित्रण करणारे हे पुस्तक वाचल्यावर सदसद्विवेदबुद्धी असलेली कुठलीही व्यक्ती नक्षलवादाच्या रोमँटिसिझममध्ये अडकणार नाही.


४०) अरेबियन नाईट्स (खंड १ ते १६)- रीचर्ड बर्टन, अनु. गौरी देशपांडे
माणसांच्या चांगूलपणाच्या, दांभिकतेच्या, नैतिक-अनैतिकतेच्या, वासना-आकांक्षेच्या, असूया-मत्सर-द्वेष आणि सद्भावनेच्या इतक्या धमाल आणि रंजक गोष्टी केवळ याच पुस्तकात वाचायला मिळतात.

Tuesday, June 4, 2013

आम्हास आम्ही पुन्हा पाहावे, काढुनी चष्मा डोळ्यांवरचा!

नकारात्मकता हा एकच दृष्टिकोन ठेवून उदारीकरणामुळे झालेल्या बदलांकडे पाहण्याचं वळण बहुतेकांना पडत आहे, पडले आहे. त्यामुळे या बदलांकडे पाहण्याचा वेगळा कोणता दृष्टिकोन असू शकतो आणि त्यातून पाहिल्यानंतर चित्र कसं दिसतं, याची ही चाचपणी.  मराठी साहित्यातील काही सकारात्मक बदल टिपण्याचा प्रयत्न.
LOKSATTA, Published :  Sunday, June 2, 2013.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

उदारीकरणाच्या गेल्या वीस-बावीस वर्षांत राजकारण, समाजकारण, सोयीसुविधा, शिक्षण, उद्योग, पत्रकारिता, शेती, सामाजिक चळवळी अशा अनेक क्षेत्रांत जे बदल झाले आहेत, त्याला मराठी साहित्यही अपवाद नाही. जागतिकीकरणात मराठी साहित्याचा परीघ वाढला आहे आणि केंद्रही बदललं आहे. एकेकाळी साडेतीन टक्क्यांचं साहित्य म्हणून ज्याची हेटाळणी केली जात होती, ते साहित्य आपल्या महानगरी कक्षा सोडून ग्रामीण पर्यावरणाला भिडलं आहे. तेव्हा महानगरी साहित्य हेच एकंदर मराठी साहित्य होतं. आता त्याचं स्वरूप बदलून एकंदर मराठी साहित्याच्या केंद्रस्थानी ग्रामीण साहित्य आलं आहे. आजचं सर्जनशील साहित्य सर्वाधिक प्रमाणात ग्रामीण भागातूनच येत आहे. महानगरी साहित्याची निर्मिती बऱ्यापैकी रोडावली आहे. मिलिंद बोकील, मेघना पेठे, कविता महाजन अशी काही मोजकी नावं सोडली तर महानगरी साहित्यात फारसं काही नवं लिहिलं जात नाही. फारसं काही घडतानाही दिसत नाही.
साहित्याचं केंद्रच बदल्याने मराठी साहित्यातील सर्वात मोठी घडामोड मानली जाणारी घटना, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं स्वरूपही गेल्या बारा-पंधरा वर्षांत कमालीचं बदललं आहे. ते अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक होऊ पाहत आहे. पण हाच कळीचा आणि वादाचा मुद्दाही होऊ पाहत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून बुजुर्ग आणि सध्याचे आघाडीचे साहित्यिक फटकून राहतात. किंबहुना त्याविषयी फार नकारात्मकतेने बोलतात. ही साहित्य संमेलने बंद करून टाकली पाहिजेत, तिथे साहित्याचं काहीही घडत नाही; या संमेलनात आणि गावातल्या उरुसात काहीही फरक राहिलेला नाही; साहित्य संमेलन ही राजकारणाची भाऊगर्दी झाली आहे, अशी टीका सातत्याने केली जात आहे. 
यामुळे होतं काय की, संमेलनाविषयी आणि तिथल्या वातावरणाविषयी जरा जास्तच निराशाजनक चित्र रंगवलं जात आहे. परिस्थिती आहे त्यापेक्षा जास्तच फुगवून सांगण्याचा प्रकार आणि समस्यांचा बागुलबुवा करण्याचा प्रयत्न केला जातो आहे असं वाटतं. 'आमच्या काळी असं होतं' वा 'अमुक काळी असं होतं' हा तर ज्येष्ठांचा शिरस्ताच असतो. त्यातूनच संमेलनाविषयीची टीका अधिकाधिक कडवट होत चालली आहे. शिवाय राजकारण आणि राजकीय नेते यांच्याविषयीची नकारात्मकता हा कॉमन म्हणावा असा फॅक्टर आहे. जगाला एका विशिष्ट दिशेनं ढकलण्याचं काम करायचं असेल तर आधी जगाचं नीट आकलन करून घेण्याची गरज असते. जग जसं आहे, ते तसं का आहे हे समजून घेतल्याशिवाय त्याविषयी काही विधानं करणं हे फारसं बरोबर ठरत नाही.
१८७८ साली न्या. महादेव गोविंद रानडे यांनी पहिलं ग्रंथकार संमेलन भरवलं, ते नियमितपणे दरवर्षी भरायला पुढची जवळपास पन्नास र्वष जावी लागली आणि या काळात हे संमेलन ही फक्त अभिजनांची मक्तेदारी होती. त्यामुळेच म. फुल्यांनी पहिल्याच संमेलनाच्या निमंत्रणाचा स्वीकार केला नव्हता. फुल्यांना अपेक्षित असलेला बदल व्हायला पुढची पंचाहत्तर वर्षे जावी लागली. १९९५ साली परभणीला नारायण सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली ६८वं साहित्य संमेलन भरलं. त्याला एक ऐतिहासिक महत्त्व होतं. एक तर ते सुव्र्यासारख्या कामगारवर्गातून पुढे आलेल्या साहित्यिकाच्या अध्यक्षतेखाली भरलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आधीच्या पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सातारा यांसारख्या मोठय़ा शहरांपेक्षा मराठवाडय़ातील परभणीसारख्या शहरात भरलं होतं. या संमेलनाला साहित्य रसिकांचा मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून संमेलनाची गर्दी हा चर्चेचा विषय ठरू लागला. ही गर्दी उत्तरोत्तर वाढतच जात आहे. २००६ साली मारुती चितमपल्ली यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूरला भरलेल्या ७९व्या संमेलनात या गर्दीने उच्चांक नोंदवला. ती गर्दी २००२ साली पुण्यात भरलेल्या आणि २०१० साली ठाण्यात भरलेल्या साहित्य संमेनाच्या वेळी मात्र दिसली नाही. म्हणजे महानगरातला साहित्याचा टक्का आता साडेतीन टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे. 
याउलट गेल्या वीस-बावीस वर्षांत ग्रामीण भागात शिक्षणाचं प्रमाण कमालीचं वाढलं आहे. शाळा, त्यांची संख्या, शाळेत जाणाऱ्या मुलामुलींची संख्या, गळतीचं कमी होत गेलेलं प्रमाण यामुळे शिक्षणाचा टक्का उत्तरोत्तर वाढतच गेला आहे. वीस-पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर किमान दहावीपर्यंतचं शिक्षण उपलब्ध होतं, ते आता पाच-सात किलोमीटरवर आलं आहे आणि या सर्व शाळा हा केंद्र सरकारच्या उदारीकरणाच्या- खासगीकरणाच्या धोरणामुळे निर्माण झालेल्या आहेत. आरक्षणाच्या धोरणामुळे बहुजन समाजाला मोठय़ा प्रमाणावर शिक्षणाची संधी मिळून तो त्याचा लाभ घेतो आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सुशिक्षित वर्गाचं प्रमाण वाढत आहे. याशिवाय टीव्ही, मोबाइल, वाहतुकीच्या सोयीसुविधा, प्रसारमाध्यमांची उपलब्धता या गोष्टीही दाराशी आल्याने ग्रामीण जनतेच्या आकलनाच्या कक्षा वाढल्या आहेत. लेखन, वाचन, कला, संस्कृती यांविषयी आस्था निर्माण झाली आहे. साहित्य संमेलनाला होणारी गर्दी ही या सगळ्याचा परिपाक आहे. या गर्दीला साहित्य रसिकांमध्ये परावर्तीत करण्याचं आव्हान आहे, नाही असं नाही. पण ही प्रक्रिया जरा वेळ घेणारी आहे. ती सुरू झाली असली तरी तिची गती बरीच संथ आहे. त्यामुळे आता त्याविषयी आशावादी राहणं हाच सर्वात चांगला पर्याय आहे. 
साहित्य संमेलनासारखी मोठी घडामोड तीन दिवस आपल्या गावाजवळ भरणं, तिथे आपण कालपर्यंत ज्यांची केवळ नावंच ऐकून होतो वा वाचून होतो असे जानेमाने साहित्यिक पाहायला, जमल्यास त्यांच्याशी बोलायला मिळणं, परिसंवाद, कविसंमेलनं यातून या गर्दीच्या मनात कुठेतरी साहित्याविषयी आस्था निर्माण करणारं बीज पडतं आहे. त्याचे कोंब व्हायला वेळ लागेल, पण ते आज ना उद्या नक्की होतील. ग्रामीण भागातल्या लोकांना लेखक माहीत नसतात, पुस्तकं माहीत नसतात. एवढंच नाहीतर पुस्तकं म्हणजे नेमकं काय हेही माहीत नसतं. अशा लोकांना साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपला आवाका वाढवण्याची संधी मिळते आणि संमेलनही तळागाळात रुजायला मदत होते. तेच गेल्या काही वर्षांत होत आहे. 
अ. भा. साहित्य संमेलन हा मराठी साहित्यातला मुख्य प्रवाह आहे, हे एकदा नीट समजून घेतलं पाहिजे. तो 'मास'साठीचा उपक्रम वा सोहळा आहे. त्यामुळे तिथे ज्या मोठय़ा साहित्यिकांना जावंसं वाटत नाही, त्यांनी जाऊ नये. ते गेले वा न गेल्याने संमेलनाची उपयुक्तता कमी होत नाही. त्यामुळे या लोकांनी संमेलनाला तुच्छ लेखण्याचा उद्योग मात्र बंद केला पाहिजे. कारण संमेलन त्यांच्यासाठी नाही. साहित्य संमेलन हा सर्वसामान्य रसिकांशी होणारा साहित्यसंवाद आहे. त्यामुळे तो त्यांच्या पातळीवर उतरूनच केला पाहिजे. 
अ. भा. मराठी साहित्य संमेलन दिवसेंदिवस अधिकाधिक देखणं, भव्य होत आहे, त्याविषयीही नापसंती व्यक्त केली जाते. पण इथे हे लक्षात घ्यायला हवं की, मोठय़ा समूहाला आकर्षित करायचं असेल, आपल्याकडे खेचून घ्यायचं असेल तर गोष्टी जरा भव्यदिव्य कराव्या लागतात. त्यात चुकीचं काही नाही. कारण शेवटी संमेलन हे त्यांच्यासाठीच आहे. तो काही विद्यापीठीय पातळीवरील परिसंवाद नसतो की, तिथे एका प्राध्यापकाने बोलायचं आणि इतर प्राध्यापकांनी आपली बोलायची वेळ येईपर्यंत ऐकायचं. तशा आंबट चर्चा गंभीर चेहरा धारण करून अशा संमेलनात व्हायला लागल्या तर या संमेलनाकडे सर्वसामान्य रसिक फिरकणार नाहीत. विचारवेध साहित्य संमेलन, विद्रोही साहित्य संमेलन, आंबेडकरी साहित्य संमेलन, ओबीसी साहित्य संमेलन अशा स्वरूपाच्या साहित्य संमेलनात अतिशय बोजड आणि विद्यापीठीय पातळीवरच्या सैद्धांतिक चर्चा केल्या जातात. अशी संमेलनं यशस्वी होतात असा दावा केला जातो. पण छोटय़ा स्वरूपाची संमेलन यशस्वी होतातच, मात्र तिथंही दर्जाचं आव्हान असतं. आणि त्या निकषावर त्यांची परिस्थिती यथातथाच असते, हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. शिवाय तेथे रसिक-श्रोत्यांची उपस्थितीही मर्यादित व बऱ्यापैकी एकसाची असते. महत्त्वाचं म्हणजे, या संमेलनांचं स्वरूप आणि उद्दिष्ट मर्यादित असल्याने ती सर्वसामान्य रसिकांची न होता, त्या त्या क्षेत्रातल्या कार्यकर्त्यां लेखकांपुरतीच मर्यादित झाली आणि परिणामी हळूहळू निष्प्रभ होत गेली.
अ. भा. साहित्य संमेलन हा मराठी साहित्यातला मुख्य प्रवाह आहे. त्यात सर्वाना सामावून घेण्याचा प्रयत्न केला जातो. पण या संमेलनाचीही एक मर्यादा आहे. सर्व असंतुष्ट गटातटांना आणि समूहांना सामावून घेण्याचीही एक स्थिती असते. त्यामुळे ते शंभर टक्के कधीच होणार नाही. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर संमेलन पार पाडायचं असेल, अधिकाधिक लोकांना त्यात सामावून घ्यायचं असेल तर गुणवत्ता वा दर्जाबाबत फार आग्रही राहता येत नाही. 
एकेकाळी ग्रामीण भागातल्या जनतेला आपल्या आवडत्या साहित्यिकांना पाहण्यासाठी कित्येक र्वष वाट पाहावी लागत होती. आता टीव्ही, प्रसारमाध्यमांच्या सहज उलब्धतेमुळे ते खूप सुकर झालं आहे. त्यामुळे त्यांची उत्सुकता खूप वाढली आहे. जी गोष्ट सहजासहजी उपलब्ध होते, तिचा पटकन स्वीकार केला जातो. हल्ली ग्रामीण भागातही बरेचसे साहित्यिक उपक्रम होऊ लागले आहेत. पुणे-मुंबईतील जानेमाने साहित्यिक, वक्ते, नेते तिथपर्यंत सहजासहजी जात आहेत. याचा फार सकारात्मक परिणाम होत आहे. साहित्य संमेलनाविषयीची उत्सुकता वाढण्याचं हेही एक कारण आहे.
राहता राहिला मुद्दा संमेलनाचं व्यासपीठ राजकीय होत असल्याचा. अ. भा. साहित्य संमेलनासारखी घडामोड भव्यदिव्य स्वरूपात करायची तर त्यासाठी मोठं मनुष्यबळ आणि आर्थिक बळ लागतं. या दोन्ही गोष्टी साहित्यिकांकडे वा चळवळी करणाऱ्यांकडे असत नाहीत. त्या राजकीय नेत्यांकडेच असतात. त्यामुळे त्यांची मदत घ्यावीच लागते. त्याबाबत 'अहो पापम्' असा दृष्टिकोन बाळगून काहीही साध्य होणार नाही. गेल्या काही वर्षांत राजकारण करण्यासाठी- म्हणजे निवडणुका लढवण्यासाठी आणि जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड पैसा लागतो. राजकीय नेत्यांच्या सभा पुणे-मुंबईसारख्या मोठय़ा शहरात असोत की, हिंगोली, वसमतसारख्या जिल्हा-तालुक्याच्या ठिकाणी असोत, त्यासाठीचे श्रोते रीतसर जमवावे लागतात. साहित्य संमेलनात जर लाखोंच्या संख्येने लोक येत असतील, तर राजकीय नेते त्याचा आपल्या राजकारणासाठी वापर करून घेणारच ना! इतक्या मोठय़ा जनसमुदायाशी फारशी यातायात न करता संवाद करता येत असेल, आपला अजेंडा त्यांच्यापर्यंत पोहोचवता येत असेल तर राजकीय नेते संमेलनाचं आयोजक पद, स्वागताध्यक्षपद राजीखुशीने स्वीकारतील, ते अधिकाधिक देखणं कसं होईल हे पाहतील. 
अ. भा. साहित्य संमेलनाचं स्वरूप गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने बदलण्यामागे अशी काही कारणं आहेत आणि हे बदल काही फार वाईट नाहीत. उलट ही चांगल्या दिशेने प्रवास करायच्या बदलाची सुरुवात आहे. त्यामुळे साहित्य संमेलनात जे काही घडकं, ते फार काही वाईट नाही.
 त्यामुळे समाजातील विशिष्ट वास्तवाला भिडणारे साहित्य आणि प्रत्यक्ष समाजातील समस्यांना भिडणारे कार्यकत्रे यांनी किमान सकारात्मक विचार करावा आणि किमान सकारात्मक कृती करावी, ही अपेक्षा अगदीच अनाठायी म्हणता येणार नाही. पण विचार करणाऱ्यांनी कुठलीच कृती करायची नाही आणि कृती करणाऱ्यांनी कुठलाच, किमान तारतम्यपूर्ण ठरेल असा विचार करायचा नाही, असंच ठरवलं असेल तर परिस्थिती कठीणच राहणार.. तिच्यात सुधारणा होण्याची फारशी शक्यता नाही. 
अ. भा. साहित्य संमेलनाकडे तुम्ही कसं पाहता, हे जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या डोळ्यावरच्या जुन्याच चष्म्यातून न पाहता, त्याच्या काचा साफ करून अधिक समंजस आणि व्यापकपणे पाहण्याची नितांत गरज आहे. मर्ढेकर म्हणतात तसे, आम्हास आम्ही पुन्हा पाहावे, काढुनी चष्मा डोळ्यांवरचा! आणि तसं पाहायला लागलं तर लक्षात येईल की, परिस्थिती आपण समजतो तितकी वाईट नाही.

Monday, April 1, 2013

मराठा समाजमनाची वस्तुनिष्‍ठ चिकित्सा

31 March 2013 वासंती दामले यांनी दिव्य मराठी मध्ये केलेले आमच्या पुस्तकाचे परीक्षण.  
कधी कधी असे होते, की निव्वळ कुतूहलाने एखादे पुस्तक हातात घेतले जाते व वाचताना माहितीचा एक मोठा खजिनाच हाती लागतो. हेही पुस्तक कुतूहलापोटी हातात घेतले होते. वाचतानाच लक्षात आले होते की, मराठा जातीबद्दल ब-यापैकी चांगले विश्लेषण वाचायला मिळणार आहे व पुस्तक वाचल्यावर ही अपेक्षा पुरी झाली. वाचताना असेही वाटू लागले, की यावर चर्चा होणे आवश्यक आहे व त्यासाठी हे पुस्तक जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचले पाहिजे. या पुस्तकाचे संपादक आहेत राम जगताप व सुशील धसकटे! अनेकदा असे बघण्यात येते की, एखाद्या विषयावरील काही लेख गोळा करून, ते वाचण्याची तसदीही न घेता, संपादित पुस्तक प्रकाशित केले जाते. त्यामुळे सर्वच लेखात पुनरुक्ती मोठ्या प्रमाणावर आढळते. परंतु हे संपादन विषयाच्या जिव्हाळ्यापोटी व दुसरी कुठलीही आकांक्षा (वरील पद अथवा श्रेणी) न बाळगता केलेले असल्याकारणाने पुनरुक्ती टाळून पुस्तकाची वाचनीयता वाढलेली आहे. हे श्रेय संपादकांना निश्चितच द्यायला हवे. शिवाय त्यांची भूमिका त्यांनी मनोगतातच स्पष्टपणे मांडली आहे. ते म्हणतात, ‘तरुणवर्गाला जर काही भरीव कामगिरी करून दाखवायची असेल तर ‘संस्कृतीच्या अपरिवर्तनीय भ्रमापासून’ आणि ‘प्रादेशिक-भाषिक-जातीय अस्मिते’पासून त्यांनी दूर होण्याची गरज आहे.’ त्यासाठी या संग्रहात निवडलेले सर्वच लेख कठोर शब्दात मराठा माणसाची चिकित्सा करणारे आहेत. सर्व लेखांचा परामर्श घेणारी डॉ. सदानंद मो-यांची प्रस्तावना मुळातूनच वाचावी इतकी सुरेख आहे. या संग्रहात त्यांचा ‘मराठ्यांचे नायक’ या विषयावर एक सुंदर लेख आहे. त्यांनी तसेच इतरांनी सयाजीराव गायकवाड व महर्षी वि. रा. शिंदे यांच्या कामगिरीकडे मराठा नेत्यांनी व पर्यायाने मराठा समाजाने केलेल्या दुर्लक्षाविषयी लिहिले आहे.

लेखसंग्रहाचा उद्देशच मराठा समाजाला स्वमग्नतेतून व निष्क्रियतेतून जागे करणे हा असल्याने बहुतेक लेखांची भाषा कठोर आहे व ती तशी असणे गरजेचेच होते. डॉ. बाबा आढावांनी ब्राह्मणेतर चळवळीतील त्रुटी दाखवताना, शाहू महाराजांच्या भूमिकेतील त्रुटीही दाखवल्या आहेत. काळाच्या मानाने शाहू महाराज कितीतरी पुढे होते. परंतु स्वत:ला क्षत्रिय सिद्ध करण्याच्या प्रयत्नात त्यांच्याही प्रागतिक कृतींना मर्यादा पडल्या. आढाव म्हणतात की, जिथे शाहू महाराजांना मर्यादा पडल्या तिथे ब्राह्मणेतर चळवळ ब्राह्मणांना विरोध या पलीकडे जाऊ शकली नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाड सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी- त्यात ब्राह्मण असता कामा नयेत- ही पूर्वअट बाबासाहेबांना मान्य नव्हती. बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे ब्राह्मण्य व अब्राह्मण यात फरक करणे ब्राह्मणेतर चळवळीला जमले नाही. त्याचप्रमाणे फुल्यांच्या सत्यशोधक समाजाला अभिप्रेत होते ते ब्राह्मणेतर जातींचे एकीकरण.
 
स्वत:च्या जातीबाहेर पडू न शकल्याने मराठ्यांना तेही शक्य झाले नाही. म्हणूनच ही चळवळ फक्त श्रीमंत व स्वत:ला शहाण्णव कुळी समजणा-या मराठ्यांचीच राहिली. हे म्हणणे आढावांप्रमाणेच इतर अनेक लेखांतून पुढे येते. . . साळुंखे यांनी मराठ्यांची सत्ता गेली हे बरेच झाले, असे एका टप्प्यावर प्रतिपादन केले आहे. त्यामागे त्यांची भूमिका स्वच्छ आहे. त्यांनी, रंगनाथ पठारे व शेषराव मोरे यांनीही हे वेगवेगळ्या शब्दांत म्हटले आहे की, मराठा समाजात शिक्षणाला महत्त्व नाही. साळुंखे म्हणतात की, सगेसोयरे आमदार, खासदार असल्याने त्यांच्या वशिल्याने नोकरी मिळेल; तेव्हा शिक्षणासाठी फारशी तोशीस घ्यायची जरूर नाही, असाच कल मराठा समाजातील तरुणांचा असतो. त्यामुळे त्यांचेच नुकसान होते. शेषराव मोरे यांनी स्वत:च्या कुटुंबाची व नातलगांची उदाहरणे देऊन ही बाब स्पष्ट केली आहे. एकेकाळी मो-यांच्या आजोबांच्या जवळ बरीच जमीन असली तरी आता वाटणी होता होता इतकी थोडी जमीन या पिढीच्या वाट्याला आली आहे, की त्यावर कुटुंबाची उपजीविका चालणे शक्य नाही. तरीही शिकण्याकडे कल नाही. पठारे म्हणतात की, शेतीत काबाडकष्ट उपसणा-यांची तरुण मुले शहरात शिकायला आल्यावर त्यांच्या दशांशानेही शिक्षणासाठी मेहनत घेत नाहीत. यामुळे बहुसंख्य मराठा समाज हा मागासलेला, गरीब व परंपरागत राहिला आहे. अविद्येने किती नुकसान होते ते फुल्यांनी सांगून ठेवलेच आहे. दीपाकर गुप्तांचे म्हणणे या प्रतिपादनाला छेद देणारे वाटते. त्यांच्या मते, महाराष्ट्राचा ग्रामीण भागही बदलला आहे व शिक्षणाविषयी आस्था व निकड वाढीला लागली आहे. तसेच असेल तर चांगलेच आहे. अर्थात, हे त्यांचे मत सर्व जातींविषयी असण्याची शक्यता आहे व मराठ्यांची स्थिती अजूनही पुस्तकात लिहिल्याप्रमाणे असण्याची शक्यता आहे.

स्त्रियांच्या स्थितीबद्दल ताराबाई शिंदे यांचा ‘स्त्री-पुरुष तुलना’ हा लेख प्रसिद्ध आहे. त्याशिवाय डॉ. बाबा आढावांचा दुसरा लेख ‘देशमुख मराठा स्त्रियांचे दास्य’ असा आहे. मराठ्यांचा खानदानीपणा स्त्रीच्या दास्यावरच टिकून आहे, हे या दोन्ही लेखांनी स्पष्ट केले आहे. स्त्रीच्या डोक्यावरचा पदर ढळता कामा नये, त्यांनी जास्त शिकण्याची गरज नाही, त्यांनी नोकरी करणे खानदानीपणाला बाधा आणते, विधवाविवाहाला मान्यता नाही, हे आजही मानले जाते. यापेक्षा वेगळा विचार आजही समाजमान्य नाही. अर्थात, जिथे अनैसर्गिक रूढींचे प्राबल्य असते तिथे भानगडींनाही भरपूर वाव असतो. या प्रकारांमुळे इतरही अनेक प्रश्न- जसे दासी वंश व रांडेच्या अवलादी- उभे राहतात. आढावांनी आपल्या लेखात अशी बरीच उदाहरणे दिली आहेत. कुमार सप्तर्षि आपल्या लेखात लिहितात की, ज्या दिवशी मराठा मुली पदवीपर्यंत शिक्षण पुरे करतील, अठराव्या वर्षानंतर लग्न करतील, त्या दिवशी मराठा समाजाच्या बदलाला सुरुवात होईल. आढाव म्हणतात तसे हे सर्व आपोआप कधीच होत नसते. कारण समाज बदलाला चळवळीचे स्वरूप प्राप्त व्हावे लागते.

 
या पुस्तकात ब्राह्मण व महार समाजाचे उदाहरण दिले आहे. या दोन्ही समाजात शिक्षणप्रसार एखाद्या चळवळीप्रमाणे फैलावल्याचे आढळेल. कारण एखाद-दुस-या व्यक्तीच्या शिक्षणामुळे समाज बदलत नसतो, त्यासाठी समाजाने मोठ्या प्रमाणावर हे बदल स्वीकारावे लागतात. त्याऐवजी बाळासाहेब विखे-पाटील म्हणतात, ‘राखीव जागा याच आपल्या विकासातील अडसर आहेत, अशी धारणा घेऊन हा समाज वावरतो आहे. नव्या वाटा शोधण्याऐवजी राखीव जागांना विरोध हेच राजकारण झाले, शिवाय राजसत्ता हाती असतानाही मराठी तरुणांना योग्य मार्गदर्शन करण्याची तसदी या समाजातील नेत्यांनी कधी घेतली नाही.’ विखे-पाटील पुढे म्हणतात, की पुढा-यांनी तरुणांना फक्त स्वत:च्या मागे उभे राहून ‘बोंबा’ मारायला तेवढे शिकवले. सामाजिक सुधारणा व शिक्षण हे चळवळीसारखे समाजात पसरले पाहिजे, असा सूर यातील लेखांचा वाटतो.मराठा समाजाने अंतर्मुख होऊन विचार करावा, असे बरेच या लेखसंग्रहात मिळेल. तरीही कोकणी मराठ्यांविषयी यात काहीच नाही. त्यांची परिस्थिती आणखी वेगळी आहे. कदाचित एवढी वाईट नसावी. अर्थात कोकणाव्यतिरिक्तही मराठा समाज खूप मोठा आहे व संपादकांनी म्हटल्याप्रमाणे या समाजाने प्रगती केल्याशिवाय महाराष्ट्राची प्रगती होणे अशक्य आहे अथवा सध्या चाललेली अधोगती थांबवणेही अवघड आहे. म्हणूनच मराठी समाजाविषयी आस्था बाळगणा-या प्रत्येकाला हे पुस्तक वाचावेसे वाटावे व त्यावर चर्चा करावीशी वाटावी. त्यासाठी परत एकदा संपादकांचे आभार.

मराठा समाज : वास्तव आणि अपेक्षा
संपादक-राम जगताप, सुशील धसकटे
राजहंस प्रकाशन पुणे. मूल्य- 200 रुपये.