Monday, June 21, 2010

आपला पण परका लेखक



























मनोहर माळगावकर हे महाराष्ट्रीय पण इंग्रजीत लिहिणारे लेखक. त्यामुळे त्यांना नाव-प्रसिद्धी मिळाली ती इंग्रजी वाचकांमध्ये. आणि याच कारणामुळे ते आपले असूनही काहीसे परकेच पाहिले. पण त्यांच्या साहित्याचे विषय मात्र शेवटपर्यंत महाराष्ट्रीय म्हणता येतील असेच होते. नव्हे तोच त्यांचा ‘यूएसपी’चा होता.


स्वातंत्र्योत्तर दोन दशकांत मुल्कराज आनंद, आर. के. नारायण, खुशवंतसिंग, कमला मार्कण्डेय या भारतीय लेखकांनी इंग्रजीत लेखन करून मोठे नाव कमावले. या नामावलीत बसणारे आणि त्यांना समकालीन असणारे आणखी एक नाव म्हणजे मनोहर माळगावकर. माळगावकरांनीही कादंब-या, कथा आणि निबंध या प्रकारात प्रामुख्याने लिहिले. त्यांच्या ब-याच कादंब-यांना ब्रिटिशकालीन भारताची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे एका अर्थाने त्या या काळाचा दस्तऐवज ठरतात. भारत-ब्रिटिश नातेसंबंध आणि पूर्व-पश्चिमेतील झगडा ही त्यांच्या कादंब-यांची वैशिष्टय़े मानली जातात.




मनोहर माळगावकर यांचा जन्म 12 जुलै 1913 साली मुंबई येथे झाला. घराणं गर्भश्रीमंत. माळगावकरांचं कॉलेज शिक्षण मुंबई विद्यापीठात झालं. पुढे त्यांनी ‘मराठा लाइट इन्फन्ट्री’मध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून नोकरी केली. भारत-पाक फाळणीच्या काळात आलेल्या विदारक अनुभवानंतर मात्र त्यांनी ती नोकरी सोडली. लष्करातून बाहेर पडल्यानंतर नंतर त्यांनी बेळगाव-गोव्याच्या सीमेवरील जगलपेट येथे निसर्गरम्य ठिकाणी सुंदर बंगला बांधला आणि पुढचा सर्व वेळ लेखन करण्यात घालवण्याचे ठरवले. माळगावकरांचा हा बंगला एकदम घनदाट म्हणाव्या अशा जंगलात आहे. तरीही तो अत्याधुनिक सुखयोयींनी युक्त असा आहे. त्यामागे सुंदर डोंगर आहे. याच बंगल्यात 14 जून 2010 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.




माळगावकरांसारखा ब्रिटिश शिस्तीत वाढलेला आणि ब्रिटिश शिष्टाचार अंगवळणी पडलेला लष्करी अधिकारी एकदम ललितलेखनाकडे कसा काय वळला? त्याचा किस्सा त्यांनीच एका मुलाखतीत सांगितला होता. त्यांच्या एका मित्राने थोडेफार पैसे मिळवण्यासाठी माळगावकरांना लघुकथा लिहायला सुचवले. त्यानुसार केवळ पैशाच्या अभिलाषेने त्यांनी कथा लिहायला सुरुवात केली. त्यांची पहिली लघुकथा ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’च्या अंकात प्रसिद्ध झाली आणि त्यांच्या ललितलेखनाचा श्रीगणेशा झाला. माळगावकर म्हणत, ‘‘लेखन हा माझ्या आयुष्यातील तिसरा व्यवसाय आहे. यापूर्वी मी लष्करी अधिकारी होतो आणि त्याच्याही अगोदर मी शिकारींची व्यवस्था करत असे.’’ यामुळेच वयाच्या 47व्या वर्षी त्यांचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले.




इतिहास हा त्यांचा खास आवडता विषय. त्यांच्या ब-याच कादंब-यांना ही पार्श्वभूमी आहेच, पण याशिवाय ‘पवार्स ऑफ देवास सीनिअर’, ‘द सी हॉक- लाइफ अ‍ॅण्ड बॅटल्स ऑफ कान्होजी आंग्रे,’ आणि ‘छत्रपतीज ऑफ कोल्हापूर’ ही त्यांची पुस्तके याच इतिहासप्रेमातून लिहिली गेली आहेत. कोल्हापूरचे छत्रपती हे माळगावकरांचे मित्र होते. तेथील संग्रहालयाच्या उभारणीसाठीही माळगावकरांनी बरीच मेहनत घेतली आहे. कोल्हापूरच्या राजघराण्याविषयी त्यांना विशेष आस्था होती.




‘प्रिन्सेस’ ही माळगावकरांची कादंबरी 1963 साली प्रकाशित झाली. ही काही त्यांची पहिलीच कादंबरी नव्हे. पण ती इंग्लंडच्या प्रकाशकाने प्रकाशित करणे आणि लंडनमध्ये तिचे प्रकाशन होणे या गोष्टी माळगावकरांच्या पथ्यावर पडल्या. ही कादंबरी प्रचंड गाजली. तिच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. या कादंबरीने माळगावकरांना प्रचंड पैसा मिळवून दिला. या पुस्तकाची रॉयल्टी त्यांना ब्रिटिश पौंडात मिळत असे. नंतर मात्र माळगावकरांचं प्रत्येक पुस्तक इंग्लंडमध्ये प्रकाशित होऊ लागलं आणि भारतात त्याच्या स्वस्त आवृत्त्या निघू लागल्या. आता त्यांच्या ब-याच कादंब-या भारतात मिळतात.




‘डेव्हिल्स विंड’ ही त्यांची नानासाहेब या 1857च्या उठावातील नेत्याविषयीची चरित्र कादंबरी. ‘द बेंड इन द गॅजेस’ आणि ‘प्रिन्सेस’ या त्यांच्या दोन कादंबऱ्या मराठीत अनुवादित झाल्या आहेत. ‘द सी हॉक-लाइफ अ‍ॅण्ड बॅटल्स ऑफ कान्होजी आंग्रे’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद तर दस्तुरखुद्द पु. ल. देशपांडे यांनी केला आहे. ‘इनसाइड गोवा’ हे माळगावकरांचे एक वैशिष्टय़पूर्ण पुस्तक. या पुस्तकासाठी त्यांचे जिवलग मित्र आणि प्रसिद्ध कार्टूनिस्ट मारिओ मिरांडा यांनी चित्रे काढली आहेत. गोव्याचा प्राचीन इतिहास, तेथील नमुनेदार माणसे आणि गोव्याच्या अंगाखांद्यावरील पोर्तुगीजपणाच्या खुणा यामुळे हे पुस्तकही खूप गाजले होते. ‘द मॅन हू किल्ड गांधी’सारखे पुस्तक त्यांनी लिहिले, त्यामागेही त्यांच्यातील संशोधक वृत्ती कारणीभूत असावी.




माळगावकर माणूस म्हणूनही ग्रेट होते. अत्यंत सुस्वभावी आणि आदरातिथ्यशील होते. पाहुणचार करायला त्यांना खूप आवडत असे. आपल्या सगळ्याच पुस्तकांच्या अनुवादाचा करार त्यांनी पुण्यातील ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’शी करायची तयारी दाखवली होती. पण काही कारणाने तो पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची सर्व पुस्तकेही मराठीत येऊ शकली नाहीत. मराठी प्रकाशन परदेशातील प्रकाशन संस्थासारखं चालावं, असं त्यांना वाटत असे.




1960-70च्या दशकात मनोहर माळगावकर यांनी राजकारणातही प्रवेश केला होता. सी. राजगोपालाचारी, मिनू मसानी, पिलू मोदी, मधू मेहता आदींच्या ‘स्वतंत्र पक्षा’त ते गेले होते. पण बुद्धिवाद्यांचे हे राजकारण त्यांना मानवले नाही. या पक्षाकडून ते लोकसभेच्या निवडणुकीसाठीही उभे राहिले खरे, परंतु त्यामध्ये त्यांना यश आले नाही. शिकारीची मात्र त्यांना मनस्वी आवड होती. सुरुवातीच्या काळात त्यांनी काही वाघांची शिकारही केली. पण नंतर त्यांनी शिकार करणे सोडून दिले. ते ‘वाघ बचाव’ मोहिमेत सामील झाले, अगदी पर्यावरणवादी बनले.




माळगावकरांचे अगदी अलिकडचे लेखन म्हणजे, त्यांनी आपले मित्र मारिओ मिरांडा यांच्याविषयी लिहिलेला दीर्घ लेख. 2007 साली मारिओ यांच्या समग्र कारकीर्दीचा आढावा घेणारे पुस्तक गेरार्ड डा कुन्हा यांनी गोव्यातून प्रकाशित केले. त्या पुस्तकाच्या सुरुवातीलाच माळगावकरांनी मारिओचे व्यक्तिचित्रण करणारा उत्तम लेख लिहिला आहे. तो बहुधा त्यांचा शेवटचाच लेख असावा. माळगावकरांच्या एकूण लेखनाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांची साधी, सोपी आणि रसाळ इंग्रजी आणि छोटी छोटी वाक्यरचना. यामुळे त्यांची पुस्तके मनाची पकड घेतात.


1960च्या दशकात इंग्रजीत लिहू लागलेल्या भारतीय लेखकांना त्या काळात मोठीच लोकप्रियता मिळाली. त्यांना इंग्रजीत मोठा वाचकवर्ग मिळाला. पण तो काळ वेगळा होता, त्या काळाचे लेखकही वेगळे होते. साठीनंतर मराठी साहित्यात मोठी उलथापालथ होऊ लागली. वाचकांच्या जाणीवाही रुंदावत होत्या. ऐंशीनंतर तर काळ खूपच बदलला. त्यात मनोहर माळगावकर तर इंग्रजीत लिहिणारे. मराठीत त्यांच्या अवघ्या तीन-चार पुस्तकांचे अनुवाद झाले आहेत. त्यामुळे तसेही माळगावकर आधीपासूनच मराठी वाचकांना काहीसे अपरिचितच होते. मुळात ते मराठी, पण त्यांनी जवळपास सर्वच लेखन इंग्रजीत केले. त्यामुळे आपलेपणा-परकेपणा या सीमेवरच त्यांना राहावे लागले. प्रत्यक्षात आणि लेखनातही. महाराष्ट्राबद्दल मात्र त्यांना खूप प्रेम होते आणि महाराष्ट्रीयांबद्दल कमालीचा जिव्हाळाही.

No comments:

Post a Comment