Monday, August 30, 2010

इथे चमत्कार नव्हे, माणसं घडतात!‘व्यसनमुक्त समाजनिर्मिती हे आमचे ‘स्वप्न’ आहे,’ या ध्येयातून 29 ऑगस्ट 1986 रोजी पुण्यातील येरवडा भागात सुरू झालेलं ‘मुक्तांगण’हे व्यसन मुक्ती केंद्र आज रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. व्यसनमुक्तीच्या कामाची निराळी पद्धत राबवणा-या, पेशंटला केंद्रस्थानी मानणा-या या केंद्राच्या आजवरच्या वाटचालीचा हा आढावा..

‘मुक्तांगण’ हे राज्यातलं पहिलंच व्यसन मुक्ती केंद्र. ते सुरू कसं झालं याची कहाणीही थोडीशी गंमतीशीर आहे. अनिल अवचट त्या वेळी सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत होते, सामाजिक प्रश्नावर लिहीत होते; तर डॉ. सुनंदा (अनिता) अवचट येरवडा मेंटल हॉस्पीटलमध्ये सायकॅट्रिस्ट म्हणून काम करत होत्या. त्या वेळी व्यसनी व्यक्तीवर उपचार करण्याची खास अशी काही पद्धत नव्हती. उपचार म्हणजे त्याला सरळ मेंटल हॉस्पिटलला पाठवणे. तिथे काही उपचार नव्हते. ते फक्त झोपेच्या गोळ्या द्यायचे. थेरपी वगैरे काही नव्हती. तसे पेशंट येरवड्याच्या रुग्णालयात भरती व्हायचे. पण यांच्यावर वेगळ्या पद्धतीने उपचार केले पाहिजेत, यांना इथं ठेवणं बरोबर नाही असं सुनंदा अवचटांना वाटत असे. दरम्यान त्यांच्या मैत्रिणीचा मुलगाच गर्दच्या विळख्यात सापडला. मग सुनंदाताईंनी त्याच्यावर घरीच उपचार सुरू केले. तो ब-यापैकी बाहेर आल्यावर अनिल अवचट त्याला फिरायला नेऊ लागले. त्यातून त्यांना या व्यसनाबाबत माहिती झाली.
तोवर त्यांना वाटायचं की, हे श्रीमंतांचं व्यसन आहे, आपल्याला काही देणंघेणं नाही. सामाजिक प्रश्न असेल तर आपण त्याकडे लिहिण्यासाठी बघू. पण गरीब लोकांमध्येच- कामगार, रिक्षा ड्रायव्हर, कचरा वेचणारे-यांच्यामध्येच हे व्यसन जास्त आहे हे समजल्यावर अवचटांनी त्यावर लिहायचं ठरवलं. आधी‘गर्द’लेखमाला प्रसिद्ध झाली. ती वाचून लोक त्यांच्याकडे जायला लागले. मग अवचट पती-पत्नी खात्री करून त्या पेशंटना ससूनकडे पाठवायचे. पण ससूनच्या लोकांनी एक-दोन दिवसांतच‘आमच्याकडे पाठवू नका’असं सांगितलं. मग करायचं काय? दरम्यान ‘गर्द’ पु. लं. नी वाचलं होतं. त्यानं ते खूप अस्वस्थही झाले होते. त्यांना ही हकिकत समजली. मग त्यांनी अवचट पती-पत्नीला बोलावून घेतलं. ते म्हणाले, ‘यांच्यासाठी तुम्ही काहीतरी सुरू करा. पैशाला आम्ही कमी पडू देणार नाही.’
येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये डॉ. सुनंदा अवचटांकडे अल्कोहोलिक पेशंट यायचे. तेव्हा सुनंदाताईंना वाटायचं की, या लोकांना इथं ट्रीटमेंट देणं काही बरोबर नाही. कारण एक दारूचं व्यसन सोडलं तर ते तसे नॉर्मल असायचे. परंतु त्यांच्यासाठी दुसरी कुठलीच सोय उपलब्ध नव्हती.
पु. लं. च्या आश्वासनानं सुनंदाताईंना हुरूप आला. मेंटल हॉस्पिटलच्या आवारात एक वापरात नसलेली इमारत होती. तिथे ‘मुक्तांगण’ सुरू करायचं ठरलं. मग सरकारी परवानग्या वगैरे सुरू झाल्या. सरकारने ब-याच अटी लादल्या, पण एकदाची परवानगी दिली अन् ‘मुक्तांगण’ सुरू झालं.
सुनंदाताई सायकॅट्रिस्ट असल्या तरी व्यसन मुक्ती केंद्र चालवण्याचा त्यांच्याकडे कुठलाच अनुभव नव्हता आणि अशा प्रकारच्या कामाची त्यांना माहितीही नव्हती. त्यावर त्या म्हणायच्या, ‘गरज आहे, करायचं. आपल्याला जे ज्ञान नाही ते पेशंटकडून शिकायचं.’आणि खरोखरच पेशंटकडून त्या प्रत्येक गोष्ट शिकत गेल्या. त्या येणा-या पेशंटला विचारात, ‘तुझ्यासाठी काय झालं असता तुझं व्यसन सुटेल?’ त्यांचं हे शिकणं कधी थांबलं नाही. आपल्या पेशंटविषयी कमालीची आत्मीयता आणि त्याला विश्वासात घेणं हा त्यांचा मूलमंत्र होता. त्याविषयी अनिल अवचटांनी एका लेखात म्हटले आहे, ‘‘एक उद्योगपती त्यांच्या अ‍ॅडिक्ट मुलाला अ‍ॅडमिट करायला आले. ते सुनंदाला सांगू लागले, ‘याला हे सांगा, ते सांगा.’ सुनंदा त्यांना म्हणाली,‘त्याला काय सांगायचं ते मला कळतं, मी जेव्हा तुम्हाला काही विचारेन, तेव्हा तुम्ही सांगा.’ ते चमकलेच. त्यांच्या आक्रमकतेला असं कुणी अडवलं नव्हतं; पण हे ऐकणारा तिचा पेशंट मात्र खूश झाला, की तो सुनंदाचा भक्तच झाला. सुनंदाला कुठल्याही उच्च पदस्थाचं कधी दडपण येत नसे. एकदा एक खासदार बाई त्यांच्या मुलाला दाखल करायला आल्या. बरोबर इथल्या अ‍ॅडिशनल कमिशनरना घेऊन आल्या. त्या बोलत सुटल्या. सुनंदानं त्यांना थांबवले. म्हणाली, ‘हे तुम्ही आधी सांगितलं आहे. काही नवीन असलं तर सांगा.’ त्या एकदम थांबल्याच. नंतर सावरून शेजारच्या कमिशनरना म्हणाल्या, ‘बघा, आमचं राजकारणी लोकांचं असंच असतं. बोलतच राहतो; पण कोणी अडवत नाही. या बाईंनी हे केलं नसतं, तर समजलं नसतं.’ तिच्यामध्ये गरीब-श्रीमंत असाही कधी वागण्यात फरक पडत नसे. ज्याला कोणी नाही त्याला तर ती अधिक जवळ करीत असे.’’
एक पेशंट दहा-बारा वेळा अ‍ॅडमिट झाले. नंतरनंतर त्याला ‘मुक्तांगण’मध्ये अ‍ॅडमिट करायला घरचे वैतागायचे. पण सुनंदाताई मात्र शांत असायच्या. त्या म्हणायच्या, ‘तो दमतोय का मी दमतेय ते मी बघणार. तोपर्यंत मी त्याला उपचार देणार.’ शेवटी त्या पेशंटने हार मानली. नंतर तो अतिशय चांगला राहिला. या उलट एखादा पेशंट परत पिऊन यायचा, तेव्हा त्या त्याला म्हणायच्या, ‘हरकत नाही. आपलं मागच्या वेळेला काय चर्चा करायचं राहिलंय. आपण परत चर्चा करू. ही तुझी पहिलीच अ‍ॅडमिशन आहे, असं समजू.’ हे लोक चुकताहेत, वाईट वागताहेत या दृष्टीनं त्यांनी कधी पेशंटकडे पाहिलं नाही.
सुनंदाताईंनी एक उपचाराची पद्धत शोधून काढली, ती फॉलो करणारा स्टाफ तयार केला. तोही नव्वद टक्के ‘मुक्तांगण’मध्ये व्यसनमुक्त झालेल्या लोकांमधूनच. शिक्षण कमी असलं तरी ती इथं आडकाठी ठरत नाही. कामावर निष्ठा आणि निष्ठेनं काम हाच प्राधान्यक्रम मानला जातो. आता सुनंदाताई नाहीत, तरीही ‘मुक्तांगण’चे काम याच पद्धतीने चालले आहे. त्याविषयी अनिल अवचट म्हणतात, ‘‘आम्हाला फक्त ‘मुक्तांगण’ चालवायचं होतं. लोक म्हणत होते, तुमचं सेंटर बंद पडणार. कारण डॉक्टरच्या नावावर दवाखाने चालतात. हासुद्धा सुनंदाचा एक प्रकारे दवाखाना होता. पण तसं काही झालं नाही. तिच्या काळात पेशंटला जी आत्मीयता मिळायची, जो अनुभव मिळायचा तसाच आताही मिळेल अशा जिद्दीनं आम्ही ‘मुक्तांगण’ चालवलं. त्यामुळे अनेक पेशंट सांगतात, ‘आम्हाला जावंसं वाटत नाही.’ ते येतात तेव्हा त्यांना इथं थांबायचं नसतं. ते पळून जायचे प्रयत्न करतात. खूप आरडाओरडा करतात. ते एका आठवड्यानंतर शांत होताना आम्ही पाहतो. जाताना त्यांचा पाय निघत नाही, याचा अर्थ सुनंदानं घालून दिलेला रस्ता नीट आहे.’’
1997 साली डॉ. सुनंदा अवचटांचं दीर्घ आजारानं निधन झालं. त्यानंतर ‘मुक्तांगण’च्या ट्रस्टींनी मुक्ता पुणतांबेकर यांच्यावर उपसंचालक म्हणून जबाबदारी सोपवली. मुक्ताताई सांगतात, ‘आईबरोबर मला चार वर्षे काम करायला मिळालं. सुरुवातीचे एक-दोन महिने तर मी फक्त तिच्या रूममध्ये बसून ती रुग्णांशी कसं बोलते, कसं वागतं हे शिकू लागले. मला तिचा काम करतानाचा उत्साह बघायला खूप आवडायचं, ती आजारी असली तरी. आमच्याकडे जे रुग्ण मित्र येतात. त्या प्रत्येकाला एकच गोष्ट खूप वेळा सांगायला लागते. आई पहिल्या पेशंटशी ज्या उत्साहाने बोलायची त्याच उत्साहाने ती शेवटच्या पेशंटशीही बोलायची. ती याबाबतीत दमायची नाही. मी तिला एकदा विचारलं, ‘तुला कसा एवढा उत्साह?’ तेव्हा ती म्हणाली, ‘तो माणूस हे पहिल्यांदाच ऐकतोय याचं भान मला ठेवावं लागतं.’ आईच्या अशा छोट्या छोट्या गोष्टींतून मी खूप शिकत गेले.’’
‘मी कधीच लीडर नव्हते. आय वाज ऑलवेज फॉलोअर. पण ती लीडरशिप माझ्यावर पडली.’ असं मुक्ताताई म्हणत असल्या तरी ही लीडरशिप त्या उत्तम प्रकारे निभावत आहेत.
2000 साली ‘मुक्तांगण’ येरवडय़ाच्या जागेतून प्रतीकनगरातल्या स्वत:च्या स्वतंत्र वास्तूत गेलं. सध्या ‘मुक्तांगण’मध्ये एका वेळी 120च्या आसपास रुग्ण असतात. त्यातील सत्तर टक्के दारूचे असतात. पूर्वी ब्राऊन शुगरचे 80 टक्के आणि दारूचे 20 टक्के असायचे. आता ते उलट झालं आहे. सध्या मेडिसिनल अ‍ॅब्यूजचं प्रमाण खूप वाढतंय. औषधांचा दुरुपयोग केला जातो. हे प्रमाण बायकांमध्येही वाढतंय. व्हाइटनर आणि इंटरनेटचेही ‘व्यसनी’ असतात. या वर्षात मुक्ताताईंनी इंटरनेटचे व्यसन असलेल्या तिघांवर उपचार केले. फक्त जुगाराचे व्यसन असलेले पेशंट येतात; पण यातल्या 90 टक्के लोकांना निकोटीनचंही व्यसन असतं.
ज्याचा त्या लोकांना अजिबात सिरिअसनेस वाटत नाही.
आतापर्यंत ‘मुक्तांगण’ने 18,500 पेशंटवर उपचार केले आहेत. ‘मुक्तांगण’कडून प्रेरणा घेऊन दुसरीकडे सुरू झालेलीही काही व्यसनमुक्ती केंद्रे आहेत. नागपूरला ‘मुक्तांगण’चा पूर्वीचा एक पेशंटच केंद्र चालवतो आहे, महेश फडणीस हेही ठाण्यानजीक, कळवा इथं केंद्र चालवत आहेत. शिवाय अशा प्रकारचे काम जे करू इच्छितात, त्यांना प्रशिक्षण देण्याचंही काम ‘मुक्तांगण’मध्ये केलं जातं. महाराष्ट्राखेरीज छत्तीसगड, मध्यप्रदेश, गोवा, गुजरात या राज्यांतल्या 92 केंद्रांना असं प्रशिक्षण देणारी संस्था, म्हणूनही ‘मुक्तांगण’ कार्यरत आहे.
‘मुक्तांगण’चा 18,500 हा आकडा महाराष्ट्राच्या तुलनेत लहान असला तरी एका संस्थेसाठी तो खूप मोठा आणि आश्वासक आहे. आजकाल व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे. अ‍ॅडिक्ट असणा-यांची मोठी फौज तयार होते आहे.‘मुक्तांगण’त्यातल्या काहींनाच दुरुस्त करू शकते. अनिल अवचटांच्या भाषेत सांगायचं तर ‘हे गणित कायमच विसंगत दिसणार. या परिस्थितीत आम्ही काय करू शकतो? जो माणूस अडकला आहे, त्याला मदत करणं हे आमचं काम आहे.’ नुसतं कामच नाही तर स्वप्न आणि ध्येयही. ‘मुक्तांगण’ सुरू झाले तेच मुळी ‘व्यसन मुक्त समाज निर्मिती हे आमचे ‘स्वप्न’ आहे’ या ध्येयातून. गेल्या पंचवीस वर्षातली ‘मुक्तांगण’ची त्या वाटेवरील कामगिरी कौतुकास्पद म्हणावी अशीच आहे।
.........................................................................................................................................
महिलांसाठी ‘निशिगंध’
अलीकडच्या काळात महिलांमध्येही व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढले आहे. हे लक्षात घेऊन ‘मुक्तांगण’ने जानेवारी 2009मध्ये खास अशा महिलांसाठी ‘निशिगंध’ हा वेगळा विभाग सुरू केला. या विभागात एका वेळी आठ-नऊ महिला उपचारासाठी अ‍ॅडमिट होतात. त्याविषयी मुक्ताताई सांगतात, ‘‘एक गोष्ट चांगली की, बायकांचा रिकव्हरी रेट जास्त चांगला आहे. तो जवळपास 85 टक्के दिसतो.’ मात्र बायका सुरुवातीला जास्त त्रास देतात, खूप आरडाओरडा करतात, सारखं रडत राहतात.. असाही अनुभव आहे. पण आठवडा झाला, त्या नीट सेट झाल्या की अगदी भरभरून प्रतिसाद देतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपला असा समज असतो की, व्यसनाधीनतेमध्ये एकतर झोपडपट्टीतल्या किंवा श्रीमंतच बायका असतात. ‘मुक्तांगण’मध्ये मात्र अगदी टिपिकल मध्यमवर्गीय गृहिणीही पाहायला मिळतात. त्याखालोखाल कॉल सेंटर, आयटी क्षेत्रातल्या महिलांचं प्रमाण वाढतं आहे. विशेष म्हणजे ज्या स्त्रिया ‘निशिगंध’मध्ये काऊन्सिलर म्हणून काम करतात, त्यांचे नवरे आधी व्यसनाधीन होते. त्यांचा ‘मुक्तांगण’मध्ये ‘सहचरी’ नावाचा ग्रूप होता. त्यातल्याच काही महिला ट्रेनिंग घेऊन आता ‘निशिगंध’मध्ये काम करतात

No comments:

Post a Comment