Saturday, September 4, 2010

चळवळया रंगकर्मी


‘‘ये दिल माँगे गुरूजी, ये दिल माँगे मोअर
माँगे मथुरा माँगे काशी, माँगे ताजमहल
काबा मंदिर हो तो गुरूजी तंटे हो सब हाल
पंगे माँगे मोअर गुरूजी, दंगे माँगे मोअर
ये दिल माँगे गुरूजी’’

हा संवाद आहे ‘जन नाट्य मंच’च्या ‘ये दिल माँगे मोअर गुरूजी’ या नाटकातील. या नाटकात सुधन्वा देशपांडे यांनी काम केले आहे. जून 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर‘जन नाट्य मंच’ने हिंदुत्ववादी विचारसरणीची खिल्ली उडवणारे हे पथनाट्य केले होते. तात्कालिक आणि निकडीच्या सामाजिक प्रश्नांवर पथनाटय़ांच्या माध्यमातून प्रहार करण्याचे काम ‘जन नाट्य मंच’ ही दिल्लीस्थित संस्था 1973पासून करते आहे. अतिशय रोखठोक आणि प्रसंगी जहाल वाटावी अशी ही नाटकं असतात. त्यामुळेच या संस्थेचे संस्थापक सफदर हाश्मी यांची 1989मध्ये हत्या झाली. पण म्हणून ही संस्था बंद झालेली नाही आणि पथनाटय़ंही थांबलेली नाहीत. हाश्मी यांच्या पत्नी मौलश्री व सुधन्वा देशपांडे त्यांच्या इतर सहकाऱ्यांसह संस्थेची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत.
पण हाश्मींच्या निधनामुळे संस्थेचं नुकसान झालंच. एक धगधगता अंगार अचानक विझला. हाश्मींच्या आठवणीने सुधन्वा आजही व्याकूळ होतो, म्हणतो, ‘सफदरसारखा अतिशय प्रतिभावान, नाट्यकर्मी, नेता जातो तेव्हा नुकसान तर होतंच. विशेषत: ग्रूप छोटा असतो तेव्हा ते अधिकच जाणवतं. सफदरचा खून झाला तेव्हा तो 34 वर्षाचा होता. पण त्यानं जे फाउंडेशन केलं होतं ते एकदम सॉलिड होतं. सफदरच्या खूनानंतर ग्रुपला एकत्र ठेवणं, त्याला धीर देणं यात मौलश्रीचा फार मोठा वाटा होता. सफदर अतिशय चांगला ऑर्गनायझर होता. तो नाटकं लिहायचा, गाणी लिहायचा, लहान मुलांकरता कविता लिहायचा आणि संस्कृती-कलेवरही लिहायचा. तो खूप देखणा होता. मला तरी आठवत नाही की, एखादा त्याच्या संपर्कात आला आणि त्याच्या प्रेमात पडला नाही, असं झालेलं. अनेक लोक म्हणतात- सफदरने किती त्याग केला! त्यानं ठरवलं असतं तर तो मोठय़ा कंपनीत नोकरीला लागला असता वगैरे.. पण मला तरी यात काही त्याग वाटत नाही. कारण सफदर जे करत होता, त्यात तो समाधानी होता. त्यानं कमिट केलं, पण त्याग केला नाही. मी अमूक सोडून हे करतोय असं त्याला कधीच वाटलं नसेल. वाटलं नाही, हे मला नक्की माहीत आहे. तो ते करायचा कारण त्याला खूप मजा यायची. ’ त्याग आणि कमिटमेंटबाबतच बोलायचं झालं तर ते सुधन्वाबद्दलही बोलता येईल. त्यानेही ठरवलं असतं, तर तो उत्तम करिअर करू शकला असता. मराठीतले प्रसिद्ध नाटककार गोविंद पुरुषोत्तम देशपांडे आणि सामाजिक कार्यकर्त्यां कालिंदी देशपांडे यांचा मुलगा असणं हेही त्याचं अ‍ॅडिशनल क्वॉलिफिकेशन होऊ शकलं असतं. पण सुधन्वानेही यापैकी काहीच केलं नाही. उलट ‘आपण आजवर कुठलीच गोष्ट फार विचारपूर्वक केली नाही’ असे तो सांगतो, ‘ मी तरी विचार करून कधीच काही केलेलं नाही. मी कॉपोरेट क्षेत्रात गेलो असतो, तर तिथे टिकू शकलो असतो का? नाही. ती माझी टेंपरामेंटच नाही. कोणत्याही क्षणी आपल्यासमोर ऑप्शन असतात आणि खूपदा नसतातही. गोष्टी होतात त्या बाय चान्स. नंतर आपल्याला असं म्हणता येईल की मी हाच चॉइस केला होता, पण तो काही चॉइस नसतो. ती एक वस्तुस्थिती असते आपल्यासाठी.’’
नाटक हा सुधन्वाचा वीक पॉइंट आहे. तो अगदी लहानपणापासून नाटकात काम करतो आहे. त्याची पहिली आठवणही नाटकाविषयीचीच आहे. कॉलेजात असताना तो नाटकाकडे गांभीर्याने पाहायला लागला. गो. पु. त्या वेळी दिल्लीच्या ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठा’त होते. सुधन्वाची आई कालिंदीताई महिला चळवळीत, तर मोठी बहीण अश्विनी विद्यार्थी चळवळीत काम करत होती. त्यांच्यामुळे सुधन्वाने 1985-87 या काळात ‘जन नाट्य मंच’ची खूप नाटकं पाहिली. त्यातून त्याची सफदर हाश्मी यांच्याबरोबर यारी झाली. हाश्मींनी त्याला ‘काय रे तू नाटकं करतोस. मग आमच्याबरोबर का नाही करत?’ असा सवाल करून त्याला आपल्या संस्थेत बोलावून घेतलं. ते वर्ष होतं 1987 आणि सुधन्वा होता 18 वर्षाचा. तेव्हापासून सुधन्वा ‘जन नाट्य मंच’बरोबर काम करतोय. हाश्मींबरोबर सुधन्वाला जेमतेम तीनेक वर्षच काम करायला मिळालं. पण तो त्याच्यासाठी समृद्ध करणारा अनुभव होता. कुठल्याही विद्यापीठात शिकायला मिळणार नाहीत, इतक्या गोष्टी या काळात तो शिकला.
‘‘सफदर मस्त माणूस होता. मुख्य म्हणजे तो हसमुख होता. तो डायनॅमिक होता, आणि त्याच्याकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोन होता. दुसरी गोष्ट म्हणजे, तो हायरार्कल नव्हता. त्यामुळे तरुण मुलांबरोबर त्याला मैत्री करायला कधीच प्राब्लेम नसायचा. त्याच्याभोवती नेहमी त्याच्यापेक्षा दहा-पंधरा वर्षानी लहान अशी पोरं असायची. पण ती फक्त हिरोवर्शिप नाही करायची. सफदर आमचा हिरो होता, पण तो फक्त हिरो नव्हता; ही गोष्ट पण खरी आहे. त्याच्याबरोबर आम्ही खूपदा वादही घालायचो. तशी स्पेस होती. सफदरने एखादा सीन लिहिलाय आणि तो एखाद्याला आवडला नाही, तर अशा गोष्टींना सफदर नेहमी पॉझिटिव्ह प्रतिसाद द्यायचा. त्यामुळे सफदरसमोर आपल्याला काही बोलता येणार नाही, आपला विकास होणार नाही, आपली ग्रोथ होणार नाही असं कधीच वाटलं नाही.’’
सुधन्वानेही हाश्मींबरोबर असा वाद घालून ‘चक्काजाम’ या नाटकात त्यांना बदल करायला लावला होता. ‘चक्काजाम’चा काही भाग सुधन्वाला पटला नाही. पण तोवर सुधन्वाला लेखनाचा काहीच अनुभव नव्हता. मात्र एके दिवशी अचानक त्याला स्फूर्ती झाली अन् त्याने मजा म्हणून पूर्णपणे वेगळा असा सीन लिहिला. तो घेऊन सुधन्वा रिहर्सलला गेला. तो सीन हाश्मींना एवढा आवडला की, त्यांनी त्याला मिठी मारली आणि तो सीन घेऊन ते नाटक नव्यानं लिहिलं. या नाटकाची पुढे हाश्मींनी आणखी एक आवृत्ती केली, त्याचं नाव होतं ‘हल्लाबोल’. या नाटकातही सुधन्वाचा सीन होता.
सुधन्वाचा सफदर हाश्मींसोबत काम करण्याचा अनुभव जसा त्याला समृद्ध करणारा होता, तसाच तो हबीब तन्वीर यांच्याबरोबरचाही. गंमतीचा भाग म्हणजे ‘जन नाट्य मंच’ सुरू झालं, तेच मुळी ‘इप्टा’पासून प्रेरणा घेऊन आणि तन्वीरांच्या नाटकीय कारकिर्दीला सुरुवात झाली, तीही मुंबईतल्या ‘इप्टा’तच. 1988मध्ये तन्वीर यांनी ‘जन नाट्य मंच’साठी ‘मोटेराम का सत्याग्रह’ हे नाटक दिग्दर्शित केलं होतं. त्या वेळी सुधन्वाचा त्यांच्याशी परिचय झाला, मग दोस्ती झाली. त्यांचा स्वभावही हाश्मींप्रमाणेच असल्याने सुधन्वाचं त्यांच्याशीही जमून गेलं. सुधन्वानं हबीब तन्वीर आणि त्यांच्या ‘नया थिएटर’वर 2005 साली संजय महारिषी यांच्यासोबत ‘गाँव का नाम थिएटर, मेरा नाम हबीब’ हा लघुपटही केला आहे. ‘विसर्जन’ या टागोरांच्या कथेवर आधारित नाटकावरचा सुधन्वाचा सविस्तर अभिप्राय ऐकून तन्वीरांनीही ते नाटक बदललं होतं.
पण हे सगळं झालं नाटकाविषयी. सुधन्वा याशिवायही खूप गोष्टी करतो. तो ‘लेफ्टवर्ड’ या प्रकाशन संस्थेचा व्यवस्थापकीय संपादक आहे. सुधन्वा प्रकाशन व्यवसायात आला तोही बाय चान्स. त्याआधी तो अहमदाबादच्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन’मध्ये लेक्चरर म्हणून काम करत होता. समाजशास्त्राचा प्राध्यापक म्हणून सुधन्वा तिथे वयाच्या चोविसाव्या वर्षी जॉइन झाला. एक-दीड वर्ष त्याने शिकवलंही. तो सांगतो, ‘‘तिथे मी शिकवलं कमी, स्वत:च जास्त शिकलो. पण ‘जन नाटय़ मंच’चं काम माझ्यासाठी तितकंच महत्त्वाचं होतं. ती नोकरी मला आवडत होती, पण ‘जन नाटय़ मंच’कडे पाहणं त्यामुळे शक्य होत नव्हतं. मग मी ते सोडून परत आलो.’’
परत दिल्लीला आल्यावर त्याला काही मित्रांनी सुचवलं की, ‘तुझं इंग्रजी चांगलं आहे. तू लिहितोस चांगलं. इतिहास तुझा अभ्यासाचा विषय आहे. मग तू प्रकाशन संस्थांमध्ये का नाही प्रयत्न करत?’ तेव्हा खरं तर सुधन्वाला संपादनाबद्दल काही म्हणजे काही माहिती नव्हती. पण तरीही त्यानं ‘ओरिएंट लाँगमन’ या प्रख्यात संस्थेत अप्लाय केला आणि त्याला तिथे नोकरीही लागली. पण सुधन्वा तिथे नोकरी करतोय हे समजल्यावर त्याच्या आई-बाबांची मैत्रीण आणि ‘तुलिका प्रकाशन’संस्थेची मुख्य संपादक इंदर चंद्रशेखर सुधन्वावर रागावली. म्हणाली, ‘तू तिथे का काम करतोयस? माझ्याकडे येऊन काम कर.’ सुधन्वा त्यांच्याकडे गेला आणि तिथे रमलाही. पाच-सहा वर्षे त्याने तिथे राजकारण, समाजकारण, इतिहास, समाजशास्त्र अशा अनेकविध विषयावरील पुस्तकांचं संपादन केलं. पण या कामाचाही कंटाळा आल्यावर सुधन्वानं ठरवलं की,आता आपण फुलटाईम अ‍ॅक्टिव्हिस्ट होऊ. पण त्यांच्या मित्रांनी स्वत:च प्रकाशन संस्था काढायची ठरवलं आणि त्यात काही दिवसांपुरतं म्हणून सुधन्वाला अडकवलं. त्यालाही आता अकरा वर्षे झाली. त्याविषयी सुधन्वा म्हणतो, ‘अजून दुसरी काही ऑफरही आली नाही आणि या कामात मला मजा येतेय. यात ‘डिप सॅटीसफॅक्शन ऑफ सेन्स’ आहे, म्हणून मी हे करतोय.’’
सध्या सुधन्वा आणि त्याची ‘जन नाट्य मंच’ ही संस्था स्वत:च्या जागेसाठी प्रयत्नशील आहे. पण दिल्लीसारख्या ठिकाणी स्वत:ची जागा हवी म्हणजे किमान एक कोटी रुपये उभे करायला हवेत. ‘जनम’ सध्या ते पैसे उभे करण्याच्या कामात गुंतली आहे. त्यातील काही पैसे देणग्या आणि नाटय़ महोत्सवाच्या माध्यमातून उभे करण्यात येणार आहेत. डिसेंबर महिन्यात दिल्ली आणि मुंबईला आठ-आठ दिवसांचे नाटय़ महोत्सव ‘जनम’ करते आहे. या महोत्सवात शबाना आझमी, रजत कपूर आणि गुलजार यांची नाटकं असतील, ‘नया थिएटर’चं नाटक असेल. सुधन्वा म्हणतो,‘‘आम्हाला दोन कारणांसाठी हक्काची जागा हवी आहे. ‘जनम’चं मुख्यत: लेफ्ट- विंग रॅडीकल पोलिटीकल थिएटर अशा स्वरूपाचं काम आहे. लहान मुलं-तरुण यांची इच्छा खूप असते पण त्यांना काही जमत नाही. अशा लोकांसाठी एक सेंटर असेल, तर लोक तिथे येऊ शकतात, भाग घेऊ शकतात. दुसरं म्हणजे, समजा एक ग्रुप नाटक करतोय. त्याची रिहर्सल तो उघडय़ावर, पार्कमध्ये, गॅरेजमध्ये कुठेही करतो. ती केल्यावर ते नाटय़गृहात जाऊन प्रयोग करतात. यात काय होतं की, त्यांचा पहिला शो टेक्निकली अनरिहर्सल्ड असतो. त्यामुळे आमचा प्रयत्न असा आहे की, एक व्हिडिओ थिएटर काढावं. तिथे नाटकवाल्या मंडळींना फायनल शोच्या आधी दहा-पंधरा दिवस प्रयोग करता येतील.’’
सुधन्वा हा असा आहे. ज्या कामात मजा येतेय, समाधान मिळतंय तेच काम तो करतो. तो डाव्या विचारसरणीकडे वळला ते नाटकांमुळे आणि डाव्या प्रकाशनसंस्थेकडे वळला, तो नाटक करत करता येईल असं काम आहे म्हणून. शिवाय तो ‘द ड्रामा रिव्ह्यू’,‘क्रॉस कल्चरल पोएटिक्स’,‘द सीगल थिएटर क्वार्टली’ आणि ‘द इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली’ या नियतकालिकांत राजकारण, समाजकारण, नाटक, सिनेमा अशा विषयावर लिहितोही. एवढे सगळे उद्योग करण्यासाठी वेळ तरी कसा मिळतो असा प्रश्न आपल्याला पडू शकतो, पण तो त्याला पडत नाही. तो म्हणतो,‘‘यात खरं तर काही नवल नाही. खूप लोकं अशी काम करत असतात. माझ्या अवतीभोवती खूप लोक आहेत, जे एका वेळी तीन-चार कामं करत असतात. त्यांच्याकडे पाहून वाटतं, असं आपल्याला जमलं पाहिजे.’
अर्थात सुधन्वाला हे जमलेलं आहेच. तो एकाच वेळी अनेक गोष्टी यशस्वीपणे करत असतो. मात्र त्याविषयी तो फार आग्रही नसतो. कारण तो त्याचा स्वभाव नाही. तो म्हणतोच मुळी- ‘बेसिकली मी समाधानी प्रवृत्तीचा मनुष्य आहे. मी खूप महत्त्वाकांक्षी नाही.’
पण समाधानी आहे म्हणूनच सुधन्वा जे काही करतो, ते मूलगामी स्वरुपाचं असतं. चळवळीला बळ देणारं असतं।

No comments:

Post a Comment