Sunday, September 19, 2010

मराठीतला भारतीय दिग्दर्शक


सिनेमा, लघुपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांत प्रभावीपणे काम करणारा आणि तरीही, ‘मला मराठी सिनेमा करायचाच आहे.. पण मी मराठीत भारतीय सिनेमा करतो आहे’ असं बजावून सांगणा-या आजच्या पिढीचा दिग्दर्शक सचिन कुंडलकरविषयी..।

............................................................

‘‘मला एकदा शनिवारवाडय़ावर सभा घेऊन सूज्ञ प्रेक्षकांना हे सांगायचे आहे की, प्रायोगिक नाटके हीच खरी जिवंत नाटके आहेत. त्यांच्यात खरे रसरशीत नाटक अनुभवायला मिळते. व्यावसायिक मराठी नाटके ही तिकिटाबरोबर दोन रुपयांची कुल्फी मोफत देऊन बालबुद्धीच्या प्रेक्षकांनी बघावीत इतकी कंटाळवाणी असतात. दुसरं म्हणजे ‘आर्ट फिल्म’चा काळ 1980 मध्ये संपला आहे. सिनेमा ही व्यावसायिक कला आहे आणि कुणाकडेही सध्या आर्ट फिल्मस् बनवत बसायला वेळ नाही. त्यामुळे अर्धशिक्षित प्रेक्षकांनी स्वत:ला न समजणाऱ्या चित्रपटांना आर्ट फिल्मस् म्हणणे कृपया बंद करावे आणि टीव्ही बघत उर्वरित आयुष्य घालवावे. स्मरणरंजन (नॉस्टॅल्जिया) आणि उपभोगवाद या दोन आजारांनी हळूहळू भ्रष्ट होत चाललेल्या मराठी प्रेक्षकाने समंजसपणे स्वत:कडे पाहिले, तर अजूनही वेळ गेलेली नाही. टीव्हीवरच्या गवईशोध स्पर्धा आणि मतिमंद पात्रांच्या मालिका बघण्यापेक्षा स्वच्छ, ताजेतवाने होऊन नाटय़गृहात वा चित्रपटगृहात जाऊन नवे, ताजे व खऱ्या अर्थाने मनोरंजक असे काही बघितलंत तर तुमच्याच मनाला बरे वाटेल. तुम्ही जे जगता आहात ते जगणे मांडणारी ही नाटके आणि चित्रपट आहेत. तुमच्यासाठीच हे बनवले आहे. स्वत:मधल्या प्रेक्षकाला अधिकाधिक जाणकार व समृद्ध केल्याने आयुष्य जगायला एक नवे परिमाण मिळते हा माझा अनुभव आहे.’’
सचिन कुंडलकरने 2008 मध्ये ‘प्रेक्षकहो’ या नावाने लिहिलेल्या लेखातील हा उतारा. मराठी प्रेक्षकांना इतकं खणखणीत आवाहन करणा-या प्रशिक्षित रंगकर्मीची एक अख्खी पिढीच अलीकडच्या काळात उदयाला आली आहे. आज 30 वर्षाचा असणा-या सचिन कुंडलकरखेरीज संदेश कुलकर्णी, किरण यज्ञोपवित, शशांक शेंडे, मोहित टाकळकर, विवेक बेळे, इरावती कर्णिक, मनस्विनी लता रवींद्र, अद्वैत दादरकर, सतीश मनवर अशा अनेकांचा त्यात समावेश आहे. ही पिढी स्वत:ला अतिशय जोरकसपणे आणि ठोसपणे व्यक्त करू पाहत आहे. या सर्वाची नाटके स्वत:ला पडलेले प्रश्न आणि समस्या मांडताना दिसतात. आपल्या वयाशी आणि जीवनाशी सुसंगत विचार करणारी ही पिढी आजूबाजूच्या परिस्थितीतून आलेलं गोंधळलेपण, त्यांची संभ्रमावस्था, त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग आपल्या नाटकांतून मांडताना दिसतात. सचिन कुंडलकर हा त्यातला आघाडीचा दिग्दर्शक आणि नाटककार. शाळेत असतानाच सचिनचं आपण सिनेमाच करायचा हे ठरलं होतं. आशुतोष गोवारीकर हे त्याचे फॅमिली फ्रेंड. आशुतोष त्या वेळी ‘नशा’ हा त्याचा पहिला चित्रपट करत होते. सचिन त्यांच्याकडे गेला. तेव्हा आशुतोषने त्याला चांगला सल्ला दिला, ते म्हणाले, ‘‘तू आधी तुझं बेसिक शिक्षण पूर्ण कर. काम आपलंच आहे, तू येऊन कधीही जॉइन हो.’’ पण त्यानंतर सचिनचं मन शाळेत लागेना. तरीही त्यानं बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि तो सुमित्रा भावेंकडे गेला. पुढची आठेक वर्षे सचिननं त्यांच्याबरोबर काम केलं. त्याविषयी तो म्हणतो, ‘‘सुमित्रा भावेंबरोबर अनेक ठिकाणी फिरलो, प्रवास केला; चित्रपट महोत्सव पाहिले. 1999 साली पॅरिसला जाईपर्यंत मी त्यांच्यासोबत काम करत होतो. परत आल्यावरही त्यांच्याकडे एक वर्षे काम केलं. त्यामुळे त्यांचा माझ्यावर थेट प्रभाव नसला तरी मी त्यांच्यासारखा विचार करतो. आमची कामं वेगळी आहेत पण ती एका विचाराची वाटतात, त्याचं हे कारण आहे.’’
सचिनच्या चित्रपटांचे विषय, त्यांची मांडणी भाव्यांच्या चित्रपटांसारखी बांधेसूद वाटते, असं जाणकार सांगतात. आपला विषय आपल्याच पद्धतीनं मांडणं, मुख्य म्हणजे त्याचा व्हिज्युअली विचार करणं या गोष्टी सचिनच्या सिनेमा आणि लघुपटात प्रकर्षाने जाणवतात. तो म्हणतो, ‘‘माझ्या दृष्टीनं सिनेमा म्हणजे नक्कल नसून आपल्या संस्कृतीतलं आणि वातावरणातलं ताकदीनं मांडणं आहे. माझ्या आयुष्यातलं आणि आजूबाजूचं मी माझ्या सिनेमांतून मांडत असतो. सामाजिक, राजकीय चित्रपट मला बनवता येत नाहीत. दहा माणसं एकत्र आली तर मला त्यांचं काय करावं ते समजत नाही. पात्र हे माझा विचार सांगण्याचं माध्यम आहे असं मला वाटतं, म्हणूनच माझा एकल माध्यमावर जास्त भर असतो.’’ सचिनचे ‘रेस्टारंट’, ‘गंध’, ‘निरोप’ हे चित्रपट काय किंवा ‘द बाथ’, ‘आऊट ऑफ बॉक्स’, ‘शुभ्र काही’ हे लघुपट काय, या सर्वामध्ये जाणवते ती माणसांमधल्या नात्यांबद्दलची अतीव ओढ. माणसांमाणसांमधील नाती, त्यातील ताणतणाव यांचा सचिन अनेक अंगानं शोध घेताना दिसतो. सचिननं ‘छोटय़ाशा सुटीत’, ‘फ्रीजमध्ये ठेवलेलं प्रेम’, ‘चंद्रलोक कॉम्प्लेक्स’ ही नाटकंही लिहिली आहेत. त्यातही हेच जाणवतं. ‘छोटय़ाशा सुटीत’ हे सचिनचं नाटक दोन पुरुषांच्या समलिंगी संबंधाविषयीचं आहे. त्याचबरोबर त्यात आपल्या लग्नसंस्थेवर आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’वरही मार्मिक भाष्य आहे. ‘फ्रीजमध्ये ठेवलेलं प्रेम’मध्ये माणसाच्या एकाकीपणाची, एकारलेपणाची सहन न करत येणारी तडफड अ‍ॅब्सर्ड पद्धतीनं मांडली आहे, तर ‘चंद्रलोक कॉम्प्लेक्स’मध्ये विकासाच्या अटळतेतून होणारं शहरीकरण, माणसांचं मोठय़ा प्रमाणावर होणारं स्थलांतरण, त्यातून निर्माण होणारे प्रश्न यातील ताणतणावांचा आलेख मांडला आहे. पण हे एकटय़ा सचिनमध्ये नाही तर त्याच्या पिढीतल्या इतर नाटककार-दिग्दर्शकांमध्येही हेच जाणवतं. मनस्विनी लता रवींद्रच्या ‘सिगारेटस्’ आणि ‘अलविदा’ या नाटकात आजच्या युवापिढीचं जगणं, त्यांना पडणारे लैंगिकतेविषयीचे प्रश्न यांची रोखठोख मांडणी आहे, तर हेमंत ढोकेच्या ‘लूज कंट्रोल’मध्ये वयात येणाऱ्या मुलांना भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल वाटणाऱ्या आकर्षणाची चर्चा आहे. म्हणजे ही पिढी किती एकसारखा, आपल्या वयाशी आणि जीवनाशी सुसंगत विचार करते!
सचिनच्या ‘गंध’ या चित्रपटाला 2007 सालचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘गंध’मध्ये ‘लग्नाच्या वयाची मुलगी’, ‘औषधे घेणारा माणूस’ आणि ‘बाजूला बसलेली बाई’ अशा तीन स्वतंत्र कथा आहेत. या चित्रपटाची पहिली कथा सचिनच्या आईने ‘सुगंध’ या नावाने लिहिली होती. ती एकदा सचिनला कपाटात मिळाली. तेव्हा त्याला त्यावर शॉर्ट फिल्म करावीशी वाटली. दरम्यान त्याच्या पाहण्यात मल्याळम् दिग्दर्शक अडूर गोपाळकृष्णन यांचा ‘फोर विमेन’ हा चित्रपट आला. त्यात चार स्वतंत्र कथा होत्या. तो सिनेमा पाहिल्यावर सचिनला दुसरा एक अख्खा चित्रपटच सुचला आणि त्यातून ‘गंध’ तयार झाला. सचिन त्याच्या चित्रपटाविषयीच्या दृष्टिकोनाबद्दल म्हणतो, ‘‘मी मराठी सिनेमा करत नाही तर भारतीय सिनेमा करतो. सिनेमाची भाषा प्रादेशिक वगैरे नसते. ती स्वतंत्र असते आणि ती सिनेमाचीच असते. त्यामुळे मी सिनेमाकडे सिनेमा म्हणून पाहतो.’’
सचिनच्या या भारतीय धारणेमुळेच त्याचे सिनेमे वेगळे ठरतात हे नक्की. सध्या मराठी चित्रपटांमध्येही नाटकांप्रमाणेच नव्या दिग्दर्शकांची फळी पुढे आली आहे. त्यामुळे मराठीत अलीकडच्या काळात नवनवे प्रयोग घडताना दिसतात. त्यावर सचिन म्हणतो, ‘‘मराठी चित्रपट नव्या जाणिवांना, प्रयोगांना प्रतिसाद द्यायला शिकला असला तरी, मराठी प्रेक्षक आणि वितरक हे मात्र पारंपरिक मानसिकतेचेच आहेत. त्यामुळे दिग्दर्शकांची नवी पिढी आली असली तरी त्यांना योग्य हातभार मिळत नाही. आणि तो लवकर मिळाला नाही तर ती एक छोटी लाट ठरेल आणि काही दिवसांनी ओसरून जाईल.’’
‘ड्रीम्ज् ऑफ तालीम’ हे सचिननं नुकतंच (आणि पहिलं) इंग्रजी नाटक लिहिलंय. सुनील शानभाग यांनी ते दिग्दर्शित केलं आहे. त्याचे सध्या मुंबईत आणि इतर ठिकाणी प्रयोग होत आहेत. या नाटकाची जानेवारी 2011 मध्ये होणा-या ‘भारतीय रंगमहोत्सवा’साठी निवड झाली आहे. चेतन दातार या आपल्या मित्राला आदरांजली म्हणून सचिननं हे नाटक लिहिलंय. चेतनच्या नाटकाची तालीम असं त्याचं स्वरूप आहे. सिनेमा, लघुपट आणि नाटक अशा माध्यमांत काम करत असल्याने सचिनचा सतत अनेक लोकांशी संपर्क येतो. शिवाय ही सर्वच कामं टीमवर्कची असल्याने लेखनासाठी सचिनला मुद्दामहून आणि ठरवून वेळ काढावा लागतो.
नुकतीच अनुराग कश्यप या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दिग्दर्शकाने सचिनला आणि राही अनिल बर्वेला त्याच्यासाठी सिनेमे करण्याची ऑफर दिली आहे. त्या दोघांसाठीही ही मोठी संधी आहे. सचिनचा हा पहिलाच हिंदी सिनेमा असेल. त्याविषयी सचिन सांगतो, ‘‘अनुराग कश्यप हा माझा खूप आवडता दिग्दर्शक आहे. त्याने माझी ‘गंध’ ही फिल्म पाहिली होती. तिचा पहिला शो पाहायला मुंबईत जे मोजके लोक आले होते, त्याला अनुरागही आला होता. त्याला ती आवडली असावी. त्यानंतर त्याने मला हिंदी सिनेमाविषयी विचारलं. अनुरागबरोबरची ही फिल्म रोमँटिक कॉमेडी आहे. आम्ही दोघांनीही कधी केली नसेल अशी ती फिल्म आहे. 2011 च्या मे मध्ये तिचं शूटिंग सुरू होईल.’’ या सिनेमाचंही स्टोरी-स्क्रीन प्ले-डायलॉग असं सर्व नेहमीप्रमाणे सचिनचंच आहे. म्हणजे हीदेखील सबकुछ सचिन कुंडलकर फिल्म आहे का, असं विचारल्यावर तो पटकन म्हणतो, ‘नाही, कश्यप-कुंडलकर.’
पण हिंदी चित्रपट करतोय तसा सचिन एक इंग्लिश-फ्रेंच सिनेमाही करतो आहे. त्याचं काम दोन वर्षानी- 2012 मध्ये सुरू होणार आहे. त्याविषयी तो सांगतो, ‘‘माझा हा सिनेमा महाराष्ट्रात आणि पॅरिसमध्ये घडतो. त्या अर्थाने तो बहुसांस्कृतिक आहे. पुढचा अख्खा महिना मी त्यासाठी फ्रान्सला जाणार आहे. मला हे करता येतं कारण मी कुठल्याही भाषेला, संस्कृतीला बांधून घेतलेलं नाही. मला मराठी, हिंदी, इंग्रजी आणि फ्रेंच या चारही भाषा बोलता येतात. या सगळ्या भाषांमध्ये विचार करता येतो.’’ पण मग मराठी सिनेमाचं काय? त्यावर सचिन तत्परतेनं म्हणतो, ‘‘एका मराठी सिनेमाचं स्क्रिप्ट लिहून तयार आहे. मला मराठी सिनेमा करायचाच आहे.’’ दृश्यात्मकतेची उत्तम जाण, अन्य कलांमधला संचार आणि त्या त्या माध्यमांतल्या चांगल्या गोष्टींचा योग्य वापर करून घेण्याची हातोटी यामुळे सचिनचे सिनेमे, लघुपट आणि नाटकंही वेगळी ठरत आली आहेत. शिवाय आपण जे काही करतो त्याबद्दलचं उत्तम भान आणि जाण त्याला आहे. त्याची मतं ठाम आणि प्रगल्भ असतात, त्याचं कारणही पुन्हा हेच आहे.

No comments:

Post a Comment