Monday, December 6, 2010

उन्हाळी राजधानीतला फेरफटका


सिमल्याला जाण्याची संधी अवचित चालून आली. ‘सेमिनार’ या महत्त्वाच्या इंग्रजी मासिकाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सिमल्याच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज’मध्ये (पूर्वीश्रमीच्या ‘राष्ट्रपती निवास’मध्ये) दोन दिवसांचं चर्चासत्र भरतंय, हे मुख्य आमिष! चर्चासत्रात रामचंद्र गुहा (प्रसिद्ध इतिहासकार), गोपाल गांधी (प. बंगालचे राज्यपाल), नयनतारा सहगल (लेखिका), सुनील खिलनानी (‘आयडिया ऑफ इंडिया’चे लेखक), दिग्दर्शक श्याम बेनेगेल, परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन, अल्पसंख्याक मंत्री सलमान खुर्शीद आणि ‘सेमिनार’ची टीम- मालविका सिंग, तेजबीर सिंग, हर्ष सेठी. एवढंच अमिष पुरं होतं सिमल्याला जाण्यासाठी! तिथं सप्टेंबर ते नोव्हेंबर हा उत्तम सीझन मानला जातो. आणि हे चर्चासत्र नेमकं ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात!!
सिमल्याची एक दिवस सैर करण्याचीही व्यवस्था संस्थेनं केली होती. शिवाय ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे याच संस्थेत गेली दोन वर्षे फेलो होते. त्यांचीही अनायसे भेट होणार होती. त्यामुळे ‘आंधळा मागतो एक डोळा..’ अशी काहीशी भावविभोर अवस्था झाली होती. एके दिवशी सहज गप्पा मारता मारता एका कविमित्राला ही बातमी सांगितली. कविलोक मुळात तुमचा बुद्धिभेद करण्यात पटाईत! हे मित्र तर दोन-तीन वेळा सिमल्याला जाऊन आलेले.. त्यांनी सल्ला दिला, सिमल्याला जायचं तर दिल्लीहून थेट कालकाला जायचं. तिथून सिमल्याला नॅरोगेज झुकझुक ट्रेन आहे. या ट्रेनचा प्रवास एकदम मस्त!! मग काय, दिल्लीहून थेट कालका गाठलं. तिथून सिमल्याचं अंतर 94 किलोमीटर. रस्त्यानं ते कापायला फक्त तीन तास लागतात, पण ट्रेननं त्यासाठी तब्बल सहा तास. पण हा प्रवास खरोखरच अद्भुत होता. बागा-शेतं, दऱ्या-खोरी, 103 लहान-मोठे बोगदे आणि ‘पृथ्वीवरच्या परमेश्वरां’नी (मूळ शब्द नारायण सुव्र्याचा) तयार केलेले तब्बल 806 पूल. 2008 मध्ये युनेस्कोनं या मार्गाला ‘वर्ल्ड हेरिटेज साइट, माउंटन रेल्वेज् ऑफ इंडिया’चा दर्जा दिला आहे. ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही त्याची नोंद झाली आहेच. इतका रोमांचक आणि थरारक प्रवास कधीच करायला मिळाला नव्हता!
सिमल्याला सकाळी साडेपाच-पावणे सहाला पोचलो, तेव्हा एकदम हुडहुडीच भरली. सोबत काही नव्हतं. एका जागी किती वेळ थरथरणार? मग सिगरेट शिलगावली. पण छे! काही उपयोग नव्हता. तेवढय़ात संस्थेचा ड्रायव्हर गाडी घेऊन आला अन् सुटका झाली!
‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज’चा परिसर नयनरम्य आहे. ब्रिटिश जमान्यात सिमला ही ‘उन्हाळी राजधानी’ होती, तेव्हाचं हे ‘व्हाइसरीगल लॉज’- नंतर राष्ट्रपती निवास म्हणूनही या वास्तूचा वापर झाला. आजही ही संस्था त्याच्या दिमाखदार खाणाखुणा आपल्या अंगा-खांद्यावर मिरवत आहे. दिल्लीच्या तापदायक उष्णतेवर थंडाव्याचा उतारा म्हणून ऑकलंड, लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलनी सिमल्याला जायला सुरुवात केली. ते अक्षरक्ष: सिमल्याच्या प्रेमातच पडले. 1864 मध्ये व्हाईसरॉय लॉरेन्स याच्या भेटीनंतर सिमला ‘उन्हाळी राजधानी’ म्हणून जाहीर करण्यात आलं. 1888 मध्ये तिथे ही वास्तू उभारण्यात आली. सिमल्याला येणारा पर्यटक या वास्तूला भेट द्यायला येतोच येतो. वास्तू गॉथिक शैलीतली. व्हाईसरॉय राहायचा ती रूम बघितली. त्यात त्याचा बेड, सोफासेट अजूनही चांगल्या स्थितीत आहे. आता तिथं संस्थेचे चेअरमन राहतात. नेमाडे सरांच्या शिफारशीमुळे तळमजला पाहायला गेलो. खरं तर तो ब्रिटिशांच्या काळातला खलबतखानाच असावा! त्याला तब्बल पाचसहा दारं होती आणि ती लांब डोंगरद-यात निघत होती. प्रत्येक गुप्तहेराला वेगवेगळ्या मार्गानं बोलवायचं आणि वेगवेगळ्या मार्गानं पाठवायचं, असा तो ब्रिटिशांचा ‘गनिमी कावा’ असावा!
सिमला हे शिवालिक रांगांमध्ये वसलेलं आणि समुद्र सपाटीपासून सात हजार फूट उंचीवर असलेलं थंड हवेचं ठिकाण. असं म्हणतात की, एवढय़ा उंचीवरील सिमला हे जगातील बहुधा एकमेव ठिकाण असावं. ‘सिमला’ किंवा ‘शिमला’ हे नाव ‘शामलादेवी’ या कालीमातेच्या एका रूपावरून पडलं असावं असं मानलं जातं. पण त्याबाबत एकवाक्यता नाही. ब्रिटिशांच्या काळात हे अतिशय पारंपरिक पण गजबज नसलेलं ठिकाण होतं, पण आता हिमाचल प्रदेशची राजधानी झाल्यापासून ते अतिशय गजबजून गेलं आहे.
सिमल्यात सलग अशी जमीन कुठेच नाही. सारी वस्ती डोंगर उतार आणि शिखरांवरच. आजूबाजूला सर्वत्र लहान-मोठे डोंगर आणि ओक, फर, पाईन, -होएडेंड्रॉन या वृक्षांनी नटलेला निसर्ग आणि तेवढय़ाच निसर्गसंपन्न द-या.
सिमल्याच्या आसमंतात दूरवर बर्फाच्छादित शिखरं दिसतात. ती आपल्याला साद घालतात, बोलावतात. पण चढण-उतरणीनं आपण इतके मेटाकुटीला आलेलो असतो की, पाय एका जागी थांबायचे आदेश देत राहतात आणि मन हिमशिखरांकडे झेपावत राहतं. मोठा बाका प्रसंग निर्माण होतो!
या सा-याचा कडेलोट झाला तो, जाखू या सिमल्यातल्या सर्वोच्च शिखरावर गेल्यावर. हे आठ हजार फूट उंचीवर आहे. सकाळी आठ-साडेआठची वेळ होती. नुकताच सूर्य हिमशिखरांच्या मागून ‘प्रगट’ झालेला. त्याची कोवळी किरणं हिमशिखरांना अभ्यंगस्नान घालत होती. त्याच्या प्रकाशानं सभोवतालच्या टेकडय़ा पाचूमय झालेल्या.. हाच तो ऋतु बरवा!
जाखू हिलवरून संपूर्ण सिमला दिसतं. तो देखावा मोठा नयनरम्य आणि भकास वाटवणारा होता. म्हणजे निसगाचं सौंदर्य कसं अगाध असतं याची तिथं प्रचिती येत होती आणि माणसांची घरं, सिमेंटच्या इमारती, अधेमधे डोकावणारी मोठेमोठे होर्डिंग्जही त्या सौंदर्यावर काजळीसारखी वाटत होती. या एवढ्या उंचीवरही बलोपासना करणा-या हनुमानाचं मंदिर आहे.
सिमल्यात बघण्यासारखं बरंच काही आहे. पण फिरायचं म्हणजे हा डोंगर चढायचा-उतरायचा, तो डोंगर चढायचा-उतरायचा. सपाटी अशी नाहीच. त्यामुळे एकटं फिरण्यात फार मजा नव्हती. फार लवकर दमवणूक होई. या ठिकाणी सोबत कुटुंबकबिला नेणंही गैरसोयीचंच. मित्रांचा ग्रुप हवा, आणि भरपूर वेळ. मगच सिमल्याच्या सौंदर्याचा अनुभव पूरेपूर उपभोगता येणार.
हिवाळा असल्यानं देखण्या चांदण्या रात्रीची मजाही अनुभवता आली. ‘व्हाइसरीगल लॉज’च्या टेरेसवरून साऱ्या आसमंतात पसरलेल्या चांदण्याच्या साम्राज्याच्या सीमांचा थांग लागत नव्हता. चांदोबाची स्वारी मात्र स्वत:वरच खूश असावी तशी वाटत होती. रात्रीचं सिमला इलेक्ट्रिक बल्बच्या झगमगाटात राहुटय़ांचा अंतराअंतरानं पडाव पडावा तसं वाटत होतं!
तिस-या दिवशी पुन्हा सिमला पाहायला निघालो. सोबत पद्मदेव हा संस्थेचा ड्रायव्हर होता. नावाप्रमाणंच स्वभावानं आणि भाषेनं गोड माणूस. पण तो देवच शेवटी, त्यामुळे पहिल्यांदा घेऊन गेला तो ‘संकटमोचन’ मंदिरात. मग प्रॉस्पेक्ट हिलवर गेलो. तिथेही कामना मातेचं मंदिर होतं. साधंच होतं पण तिथून आजूबाजूच्या द-या-खोऱ्याचा छान व्ह्यू दिसत होता. दूरवरली हिमालय-शिखरांची रांग पद्मदेवनं दाखवली, तेव्हा मात्र क्षणभर जागच्या जागी थिजल्यासारखं झालं. पण तो वर्ण्यविषय म्हणता येणार नाही इतका दूर आणि बर्फाची क्षितिजावर छोटीशी रेषा दिसावी तसा दिसत होता. या हिलवर दोन कंपन्यांचं मोबाईल टॉवर उभारायचं काम चाललं होतं. देवदर्शनानं सुरुवात केल्यानं निघताना पद्मदेवला सरळ सांगितलं, ‘अब मंदिर मत ले चलो, यार!’ तोही हुशार होता. त्यानं गाडी स्टेट म्यूझियमला वळवली. तिथं 16-17व्या शतकातल्या बौद्ध आणि इतर राजेमहाराजे-देवादिकांच्या मूर्ती अप्रतिम म्हणाव्या अशा होत्या. मग आर्मी हेड क्वार्टर पाहायला गेलो.
दुपारी सिमल्यातल्या माल रोडवर पायी गेलो. तर तिथल्या गेइटी थिएटरमध्ये श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांचा महोत्सव चालू होता. माल रोडवरील द रीज, स्कँडल पॉइंट ही दोन ठिकाणंही पाहण्यासारखी होती. मुंबईतल्या चर्चचं वास्तुसौंदर्य जसं भूरळ घालणारं आहे, तसंच हेही पुरातन म्हणावं असं वैशिष्टय़पूर्ण चर्च. माल रोडवरील त्रिशूल बेकरीची शिफारस संस्थेतल्या काही लोकांनी केल्यानं तिथल्या पेस्ट्रीचा स्वाद घेतला. पण काही खास नव्हती. खाण्यापिण्याबाबत ‘अंदाज़्‍ा अपना अपना’च असतो! निघताना मात्र सरळ बाय रोड निघालो. हा ‘झुकझुक आगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी’पेक्षा वेगळा अनुभव होता. ‘पृथ्वीवरच्या परमेश्वरां’च्या लीलाही अगाध असतात, हेच खरं!

No comments:

Post a Comment