Monday, December 27, 2010

उत्तमराव, जबाबदारी तिहेरी आहे!


उत्तमराव, तुमची भेट सध्या जवळपास रोजच होते आहे! इतर वर्तमानपत्रांतून फारशी होत नसली तरी तुमच्या वर्तमानपत्रातून तुम्हाला कुठला तरी पुरस्कार मिळाल्याची, तुमचा कुणीतरी जाहीर वा नागरी सत्कार केल्याची वा तुमच्या एखाद्या पुस्तकाची नवी आवृत्ती प्रकाशित झाल्याची सचित्र बातमी एकदोन दिवसाआड तरी वाचायला मिळतेच मिळते. परवाच पुण्यात तुमच्यावर ‘अस्वस्थ नायक’ हा माहितीपट प्रकाशित झाल्याचीही बातमी वाचली. त्याआधीच्या आठवडय़ात तुमच्या ‘आई समजून घेताना’ या पुस्तकाच्या अकराव्या विशेष आवृत्तीचं प्रकाशन मुंबईत झालं. (हे पुस्तक इंग्रजीतही गेलं आहे. तुमच्या समग्र साहित्याचा कन्नडमध्ये अनुवाद होतोय.) नुकत्याच तुमच्या दीर्घ मुलाखती साप्ताहिक ‘साधना’ आणि ‘साप्ताहिक सकाळ’मधून प्रकाशित झाल्या आहेत. ‘साधना’तली मुलाखत पूर्वायुष्याबद्दल असल्यानं ती उत्तम आहे आणि ‘सकाळ’मधली, मुलाखत आजच्या प्रश्नांबद्दल असल्यानं ती वाचवतसुद्धा नाही इतकी नीरस आणि अपेक्षाभंग करणारी आहे! उत्तमराव, अतिशय तळागाळातून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदार्पयत झालेला तुमचा प्रवास केवळ थक्क करणारा आहे. जीवघेण्या संघर्षाशी कायम दोन हात करत, तुमच्याच शब्दांत सांगायचं तर ‘भाकरीची शिकार करत’ तुम्ही इथर्पयत पोहोचलात! त्यातही ‘सकाळ’ वृत्तपत्रसमूहाचे मुख्य संपादक असताना साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद तुमच्या वाटय़ाला आलं! हा दुग्धशर्करा योग आहे. आजवर पत्रकार असलेल्याही कुणाही अध्यक्षाच्या वाटय़ाला असं भाग्य आलेलं नाही!!
एखाद्या महाकाव्यात शोभावं असंच तुमचं सगळं आयुष्य आहे. त्यामुळे तुम्ही बेभान व्हावं हेही साहजिक आहे, समजण्यासारखंही आहे! पण तुमचं भान हरवत तर नाही ना? उत्तमराव, तुम्हाला पूर्वायुष्यात एवढं मोठं अपयश पचवता आलं, पण हे यश तुम्हाला संयमानं पचवता येत नाहिए का? कारण संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यापासूनचं तुमचं वर्तन न पटणारं आणि प्रसंगी क्लेशदायी वाटावं असंच आहे. कुठल्याही सत्कार समारंभात, कुठल्याही भाषणात, आणि तुमच्या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यांत तुम्ही ‘माझी आई आणि मी’ याच विषयावर तरी बोलता किंवा तो विषय तुमच्या बोलण्यात एकदा तरी येतो. वरवर पाहता यात काही वावगंही नाही. पण पत्रकारितेसारख्या बौद्धिक क्षेत्रात इतकी वर्षे राहूनही उत्तमरावांकडे एवढीच एक गोष्ट सांगण्यासारखी आहे, असं समजायचं का? ‘माझं जीवन हाच माझा संदेश आहे’ असं गांधींजींसारखं तुम्ही सुचवू पाहात आहात का? तुमचं पूर्वायुष्य सर्वसामान्यांनी आणि महाराष्ट्रातल्या यच्चयावत तरुणांनी प्रेरणा घ्यावी असं आहे, हे खरं. पण तोच एकमेव तुमचा संदेश आहे का?
अशानं तुमची गणनाही अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत केवळ आत्मपुराणंच सांगणा-या माडगूळकर बंधू, वामन चोरघडे, गो. नी. दांडेकर या प्रभृतींच्या मांदियाळीत होणार नाही का? ‘माझ्यात एक समाज तयार झाला आहे!’ हे तुमचं विधान चलाख आहे, बुद्धिभेद करणारं आहे असं कुणाही सुबुद्ध माणसाला म्हणताच येणार नाही. पण तीच आपल्या आयुष्याची इतिकव्र्यता आहे, असा समज तर तुम्ही करून घेत नाही आहात ना? आपल्या अतिशय दुर्धर संघर्षानं भरलेल्या पूर्वायुष्यातलं एक पर्व तुमच्याकडून ‘युटोपियन फँटसी’ म्हणून तर रंगवलं जात नाही ना? उत्तमराव, ही भूतकाळातच रमून जाण्याची आणि केवळ त्याच्याच गोष्टी करण्याची वेळ नव्हे, हे तुमच्यासारख्या पत्रकाराला सांगण्याची गरज नसावी.
सध्या मराठी साहित्यापुढे, समाजापुढे कितीतरी प्रश्न आ वासून आहेत!
ज्यांच्या साहित्यसेवेचा धाक वाटावा आणि ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर वाटावा अशी विजय तेंडुलकर, विंदा करंदीकर, नारायण सुर्वे यांच्यासारखी माणसं आता मराठी साहित्यातून दुर्मीळ होत चालली आहेत. वेळीच दक्षता घेतली नाही तर त्यांची जागा दुय्यम दर्जाची लोकं घेण्याचं मोठं संकट उभं ठाकलं आहे.
एकटय़ादुकटय़ाचं हे काम नाही हेही खरंच! पण तुम्ही सुरुवात तरी करू शकता.
निदान हे वर्षभर तरी तुमच्या शब्दाला महाराष्ट्रात मोठा मान असणार आहे. ती संधी तुम्ही घेणार की नाही? निदान हाकारे देण्याचं काम तरी तुम्ही करायलाच हवं. उत्तमराव, तेवढं कराच तुम्ही!
साहित्य महामंडळात यच्चयावत सगळी दुय्यम दर्जाचीच माणसं का बरं असावीत? अर्थात अशा माणसांचीही गरज असतेच. पण ही माणसं काम तरी त्या प्रतवारीचं करतात का? तर तसंही दिसत नाही हे आपण पाहतोच आहोत. त्यांच्या कामाची प्रतवारी तिय्यम दर्जाची असते. म्हणजे स्वत:कडे असलेल्या क्षमतांचाही ही मंडळी धड वापर करत नाहीत. एकंदर मराठी साहित्यातच या रोगाची लागण झपाटय़ानं होत चालली आहे, हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळींचा ऱ्हासकाळ कधीच सुरू झालेला आहे, प्रसारमाध्यमांचाही एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातच सुरू झाला, असंही म्हटलं जातं आहे. मराठी साहित्याचा अस्तकाळ तर ऐंशीच्या दशकातच सुरू झाला आहे. अशा ऱ्हासपर्वात समाजाचं नेतृत्व करण्यासाठी स्वत:हून पुढाकार घ्यावा लागतो. ही जबाबदारी सुशिक्षित आणि बुद्धिवादी समाजावर असते हेही मान्य आहे. आता तर तुम्हाला सामान्यांपासून अभिजनांर्पयत सर्वाचीच मान्यता मिळाली आहे. तेव्हा या समाजाला गदगदून हालवण्याचा प्रयत्न तरी तुम्ही करणार की नाही?
साहित्य संमेलनाचे संस्थापक न्यायमूर्ती रानडय़ांना अभिप्रेत असलेल्या ‘विवेकी नेतृत्वा’च्या रूपात आम्ही तुम्हाला पाहतो आहोत. त्यामुळे तुमच्याकडून कार्यकर्त्यांपेक्षा संपादक आणि संमेलनाध्यक्ष म्हणून अधिक जबाबदारीची अपेक्षा आहे. एरवीही पत्रकाराला बोलण्याची संधी क्वचितच मिळते. तुम्हाला तर पुढचं सबंध वर्ष मिळालं आहे बोलायला!
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला कुठलेही अधिकार नसतात, हे खरं आहे. पण संमेलनाध्यक्षाला वर्षभर महाराष्ट्रात मोठा मान असतो. त्याचं म्हणणं गांभीर्यानं घेतलं जातं. पत्रकारासाठी एवढी संधीही खूप झाली! एवढय़ा जोरावर तुम्ही बरंच काही करू शकता. लेखकांच्या आरोग्य निधीचा जो संकल्प तुम्ही सोडला आहे, तो अत्यंत स्तुत्यच आहे. पण अशा उपक्रमांचा आजवरचा इतिहास मात्र फार निराशाजनक आहे. हे उपक्रम मोठय़ा उत्साहाने सुरू होतात, पण नंतर त्यांचं काहीच होत नाही. साहित्य महामंडळाच्या महाकोशाचं काय झालं हे तुम्हाला सांगायला नकोच. तेव्हा तुमच्या उपक्रमाचंही तसं होऊ नये असं वाटतं. त्यासाठी वर्षभर शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक प्रयत्न करावे लागतील. पत्रकार या नात्यानं तुमचा राजकारणी, उद्योगपती, लेखक, कार्यकर्ते अशा समाजातल्या विविध घटकांशी संपर्क आहे, येतो. त्यामुळे येत्या वर्षाअखेर या निधीत किमान काही कोटींची भर पडायला हरकत नाही. एवढं एकच काम तुम्ही तडीस नेलं, तरी ती तुमच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतली अपूर्व कामगिरी ठरेल!
आणखी एक. सध्या महाराष्ट्रात समाजकारण आणि साहित्य या दोन गोष्टींची ताटातूट झाली आहे. कुठल्याही सामाजिक प्रश्नावर मराठी साहित्यिक आणि संपादकही मूग गिळून गप्प बसतात. मग ते जेम्स लेन प्रकरण असो, बाबरी मशिदीबाबतचा निकाल असो, जैतापूर प्रकल्प असो किंवा लवासा प्रकरण असो.. अशा प्रश्नांवर सामान्य लोक भांबावून जातात, गोंधळून जातात. अशा वेळी जनमानसाची भूमिका घडवण्याची जबाबदारी वृत्तपत्रांच्या संपादकांची असते. महाराष्ट्रात आजघडीला जी तीन-चार आघाडीची दैनिकं आहेत, त्यातल्या एका वृत्तपत्रसमूहाचे तर तुम्ही मुख्य संपादक आहात. संपादकाला समाजकारणापासून राजकारणार्पयत आणि साहित्यापासून अर्थकारणार्पयत, अनेक विषयांच्या आंतरसंबधांची चांगली जाण असते. काय हितावह आहे आणि काय नाही याबाबतची व्हिजन असते. त्यामुळे तुम्ही या प्रश्नांवर साहित्यिक - संपादक या नात्याने रोखठोक आणि सडेतोड भूमिका घेतली तर जनसामान्यांच्या मनातला गोंधळ दूर होऊ शकेल, विरोधासाठी विरोध करणाऱ्यांची धार बोथट होऊ शकेल आणि आमजनांना आपली मतं बनवता येतील. शब्दांचं सामर्थ्य तुम्ही जाणून आहात. त्यासाठी तुम्हाला कुणाच्याही मार्गदर्शनाची गरज नाही.
तेव्हा उत्तमराव, तुमच्याकडून अधिक जबाबदारपणाची अपेक्षा आहे. तशा क्षमता तुमच्याकडे निखालसपणे आहेत. तुम्ही सध्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आहात. त्याला साजेलशा वर्तनाची, जबाबदारीची आणि विचारांची अपेक्षा तुमच्याकडून करणं अनाठायी नाही! तेव्हा तुम्ही इतकं हुरळून जाऊ नये. सद्सद्विवेकाला तिलांजली देऊ नये. थोडं वास्तवातही राहावं असं वाटतं.उत्तमराव, अनेक जण तुमच्याकडून अनेक अपेक्षा व्यक्त करत आहेत. पण समाजातल्या कळीच्या प्रश्नाविषयी साहित्यिकांनी, पत्रकारांनी आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ब्रँड अ‍ॅम्बेसिडरनं फटकून राहणं हे निकोप सांस्कृतिक पर्यावरणाच्या दृष्टीनं फारसं भूषणावह नाही आणि स्पृहणीय तर नाहीच नाही!

1 comment:

  1. Please send me your mobile number or call Moin Chaudhary Mobile No 9326424200

    ReplyDelete