Sunday, January 2, 2011

फॅशनेबल प्रयोगांची सुगी


‘खेळ’, ‘दर्शन’, ‘ऐवजी’, ‘अनाघ्रात’ ही अनियतकालिकं सध्या मराठीमध्ये प्रकाशित होत आहेत. ‘अभिधानंतर’ हे अनियतकालिक काही महिन्यांपूर्वीच ‘सांगण्यासारखं काहीच राहिलं नसल्याचं’ कारण देत हेमंत दिवटे या कवीमित्रानं बंद केलं. या अनियतकालिकांमध्ये काही समान धागे आहेत. ही सर्व नव्वदोत्तर काळात सुरू झालेली आणि त्याच काळात लिहू लागलेल्या कवींनी सुरू केलेली आहेत. त्यांचा प्रधान विशेषही कविता हाच आहे.
नुकतंच शेगावहून ‘अतिरिक्त’(ऑक्टोबर 10) या नावानं दा. गो. काळे आणि दिनकर मनवर या कवीमित्रांनी नवं अनियतकालिक सुरू केलं आहे. त्याचं प्रयोजन सांगताना त्यांनी म्हटलं आहे की, ‘ ‘शब्दवेध’ आणि ‘अभिधानंतर’ बंद पडल्यानं निर्माण झालेली रिक्तता कारणीभूत ठरली आहे.’ पुढे म्हटलं आहे की, ‘‘आज कवी/लेखक/कलावंतांना असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करावा लागेल. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची कुणी हमी देऊ शकेल असे आजचे वास्तव नाही. आज किंवा मागच्या काही घटनांकडे दृष्टिक्षेप टाकल्यास समोर येणारे वास्तव नाउमेद करणारे आहे. एखाद्या चित्रकाराने देश सोडून जाणे, लेखक, कलावंत देशोधडीला लागणे, संपूर्ण कलाव्यवहार मूलतत्त्ववाद्यांच्या दहशतीखाली जाणे ही गोष्ट आजच्या प्रगत समजल्या जाणाऱ्या समाजाशी सुसंगत नाही. हा विचारही ‘अतिरिक्त’च्या प्रयोजनामागे असणार आहे.’’
हा मनोदय स्तुत्यच आहे. पण त्यासाठी संपादकांनी काही प्रयत्न केले आहेत का? त्यांनी तर मंगेश नारायणराव काळे या आपल्या कवीमित्राच्या कवितेविषयीचा विशेषांक म्हणूनच पहिला अंक काढला आहे. म्हणजे संपादकांचा मनोदय नेमका काय आहे? आधीच्या अनियतकालिकांप्रमाणे त्यांनाही आपल्याच गोतावळ्यातल्या लोकांचं साहित्य छापायचं आहे? आणि त्यालाच ‘साहित्यातला नवा प्रवाह’ असं नाव द्यायचं आहे?
कारण आधीच्या अनियतकालिकांमध्ये त्यांच्याच मित्रांच्या मुलाखती, त्यांच्याच कवितेवर लेख, विशेषांक असतात. त्यांचं कवितेबद्दलचं प्रकट चिंतन वगैरे असतं! तो सारा प्रकार कमालीचा एकसाची/एकछापी आहे. या साऱ्या कवींच्या कविता एकत्र छापल्या आणि त्यासोबत त्यांची नावं दिली नाहीत तर कुठली कविता कुणाची आहे, हे बहुधा त्या कवींनाही लवकर सांगता येणार नाही. दासू वैद्य यांच्या शब्दात सांगायचं तर हे सारे ‘शब्दांचेच मुके घेणारे’ आणि ‘सारा जोर घरातच’ काढणारे लोक आहेत. असं साहित्य हे कधीच केंद्रस्थानी येत नसतं. कारण राजकारणात-अर्थकारणात पोकळी नसते असं म्हणतात, तशी ती साहित्यातही नसते. चांगल्या साहित्याची वानवा निर्माण झाली की, त्याची जागा कमअस्सल साहित्य घेऊ लागतं. सध्या मराठी कवितेच्या बाबतीत तेच होताना दिसत आहे. पण म्हणून ते केंद्रस्थानी आहे असं अजिबात नाही.
नव्वदीच्या दशकात जगभर जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. आणि त्यातून जगभरातल्या मानवी समुदायासमोर आपापल्या भाषा, संस्कृती, कला, आचारविचार, प्रथा, परंपरा यांच्या जतन-संवर्धनाचं, त्या प्राणपणानं जपण्याचं संकट उभं राहिलं. त्यातून नवे सांस्कृतिक संघर्ष उभे राहिले. मराठी साहित्य संमेलन सुरू झालं, तेव्हापासूनच मराठी भाषेच्या भवितव्याच्या नावानं कंठशोष चालू होता. त्यानं या काळात पुन्हा उचल खाल्ली. आणि झालं काय तर मराठीमध्ये नव्यानं लिहू लागलेल्या बहुतेकांनी कविता हेच आपल्या अभिव्यक्तीचं माध्यम निवडलं. त्यातच हिमनगाचे पाण्याखालचे भाग उघड होत जावेत, तसा व्यक्तिवाद जागतिकीकरणाच्या काळात समोर येत गेला. त्यामुळे या काळातली कविताही अधिकाधिक व्यक्तिवादी आणि आत्मकेंद्री होत गेली.
गेल्या दोन दशकांमध्ये मोठय़ा शहरांमधला मध्यमवर्ग अधिकाधिक स्वार्थी, आत्मकेंद्री, समाजाविषयी असंवेदनशील आणि स्वत:च्याच खुज्या भावभावनांचं स्तोम माजवू लागला आहे. तोच प्रकार या शहरांमधून लिहिणाऱ्या लेखक-कवींच्या लेखनातही चालू झाला. आणि त्यालाच त्यांची ‘अभिव्यक्ती’, ‘नवा प्रवाह’ म्हणण्याची फॅशनही सुरू झाली. या फॅशनपासून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करणारे काही लोक आहेत, नाही असं नाही. पण त्यांची संख्या इतकी रोडावत गेली की त्यांच्या मोजदादीसाठी दोन्ही हातांची बोटंसुद्धा जास्त भरावीत. या थोडय़ा लेखक-कवींनी जागतिकीकरणाच्या लाटेत दिवसेंदिवस होत असलेल्या मूल्यांचा ऱ्हास आपल्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केला, करत आहेत. पण आत्मकेंद्रीपणाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या लेखक-कवींची संख्या इतक्या झपाटय़ानं वाढत जात आहे की, ती आता फक्त मुंबई-पुणे या शहरांपुरतीच मर्यादित राहिली नसून औरंगाबाद, नाशिक, नागपूर, लातूर, बीड, उस्मानाबाद या शहरांपासून अगदी तालुक्यापर्यंत पोचली आहे. या लोकांची साहित्यिक आकांक्षा इतकी मध्यमवर्गीय आहे की विचारता सोय नाही! त्यामुळे शहरी मध्यमवर्गीय लेखक-कवी आणि खेडय़ातले लेखक-कवी यांच्यातला भेदच नाहीसा होत आहे.
पॅरिस शहरात नवनव्या फॅशन्स जन्माला येतात, पण सध्या महाराष्ट्रात आणि विशेषत: मराठी साहित्यात फॅशनेबल विचार, फॅशनेबल भूमिका, फॅशनेबल आचार, फॅशनेबल नकार (म्हणजे प्रत्यक्ष आयुष्यात सर्व सुखं-सोयींचा उपभोग घ्यायचा, पण आपल्या साहित्यातून मात्र त्यांच्याविषयी तुच्छतेनं लिहायचं.) आणि फॅशनेबल अभिव्यक्ती यांची सुगी सुरू आहे. आपल्याला वाटतं आणि आपण म्हणू तेच व तेवढंच खरं असा खाक्या झाला आहे. यांना आधीचं सगळं नाकारायचं आहे का? तर तसंही दिसतं नाही, आणि यांच्याकडे नवी कुठली मांडणीही नाही. म्हणून मग आधीच्या पिढीतले जे लोक आपल्याला बरं म्हणतील ते चांगले आणि बाकीचे वाईट अशी पद्धत सुरू झाली आहे. ‘अभिधानंतर’च्या दृष्टीनं दिलीप चित्रे चांगले होते, ‘दर्शन’, ‘ऐवजी’च्या दृष्टीने भालचंद्र नेमाडे चांगले आहेत, तर ‘खेळ’च्या दृष्टीने वसंत आबाजी डहाके चांगले आहेत. आधीच्या लोकांनाही आपल्या कंपूशाहीत सामील करून घ्यायचं आणि जे आपल्याबरोबर यायला तयार नाहीत त्यांच्यावरच कंपूशाहीचा आरोप करायचा असा सारा उफराटा प्रकार सुरू आहे.
सध्याच्या परिस्थितीचा अन्वयार्थ लावता येत नाही वा तो आवाक्यात येत नाही. आणि त्यात लेखक-कवी म्हणून असलेली नैतिकताही टिकवता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली की तिचं ‘संक्रमणाचा काळ’ असं वर्णन करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. पण सध्या तर सगळीच परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की, त्याच्यापुढे विचारवंतांपासून सामान्यजनांपर्यंत सारेच हतबल झाले आहेत. या हतबलतेवर नव्वदोत्तर काळात लिहू लागलेल्या लेखक-कवींनी मोठा नामी उपाय शोधला आहे. त्यांनी सरळ आपल्या गोंधळलेपणाचा उरूस साजरा करायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला उल्लेख केलेल्या सर्व अनियतकालिकांमधून त्याचाच प्रत्यय येतो.
एक गोष्ट मात्र फार चांगली आहे की, या अनियतकालिकांना इतक्या दिवसांनंतरही फारसा वाचकवर्ग मिळालेला नाही. त्याचं कारण समाजात वाचनाचं प्रमाण कमी झालं आहे, गंभीर वाचणारे वाचक राहिले नाहीत अशी उत्तरं हे लोक देतीलही. पण खरी गोष्ट अशी आहे की, मराठी वाचक बराचसा सुज्ञ आहे. तो या फॅशनेबल प्रयोगांना फार गांभीर्यानं घेत नाही. त्यामुळे फार काळजीचं कारण नाही.

1 comment:

  1. खरे तर ह्या सवयी नियतकालिक निर्मित करणार्‍या मंडळींच्या स्वयम केंद्रित आहे. दिवटेने जे केले ते इतर सो कॉल्ड कविनी केले ह्यात आणखी मजेची गोष्ट आहे ते स्वतही चित्रकार रेखाकार झाले. ह्या मागे फार मोठी अनुकरणाची सवय जी कवितेत आहे ती चित्रात आली. ह्याचा शोध घे म्हणजे समजेल.
    पुन्हा खाजगितले लिहिले तर आणखी मजेशीर गोष्टी बाहेर येतील. त्याचे एकदा मंथन कर. विषय मजेशीर आहे.

    ReplyDelete