Tuesday, October 11, 2011

जगण्याला भिडणारा नाटककार

 (महेश एलकुंचवार यांना जनस्थान पुरस्कार जाहीर झाल्यावर प्रहार मध्ये लिहिलेला लेख 
   - १९ जानेवारी २०११ )
एखाद्या व्यक्तीचा उचित पुरस्कार देऊन गौरव करणे हा समाजाने त्या व्यक्तीविषयी व्यक्त केलेला आदरभाव असतो तसेच ती त्या व्यक्तीच्या योगदानाची पोचपावतीही असते. असे योग हल्ली महाराष्ट्रात फारसे येत नाहीत. पण साक्षात कुसुमाग्रजांनीच पुढाकार घेऊन सुरू केलेला आणि दर दोन वर्षानी दिला जाणारा जनस्थान पुरस्कारमात्र याला सुरुवातीपासून अपवाद ठरला आहे. या वर्षी तो महेश एलकुंचवार यांच्यासारख्या मराठी नाटय़सृष्टीला नवीन वळण देणा-या आणि नवे आयाम आजमावणा-या नाटककाराला जाहीर झाला आहे. एलकुंचवार हे अगदी योगायोगाने नाटय़लेखनाकडे वळले असले तरी त्यांनी आजवर एकाहून एक श्रेष्ठ अशा नाटय़कृती दिल्या आहेत. 1967 मध्ये त्यांनी लिहायला सुरुवात केली. म्हणजे गेली 43 वर्षे त्यांच्या एकांकिका, दीर्घाक आणि नाटके यांनी महाराष्ट्रातल्या जाणकार प्रेक्षक-रसिकांच्या पसंतीची मोहोर मिळवलेली आहे. पश्चिमप्रभाआणि मौनरागही दोन अलीकडची पुस्तके सोडली तर एलकुंचवार यांनी नाटकाव्यतिरिक्त इतर फारसे काही लिहिलेले नाही, ही गोष्ट त्यांच्या नाटय़धर्मीत्वाची निजखूण मानायला हरकत नाही. विजया मेहता, विजय तेंडुलकर, सत्यदेव दुबे, डॉ. श्रीराम लागू यांच्या प्रभावळीत शोभून दिसणारे आणि तिथेही स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करणारे ते नाटककार आहेत. एलकुंचवार हे प्रायोगिक नाटककार आहेत असे म्हटले जाते. पण त्यांच्या नाटय़प्रतिभेने प्रायोगिक नाटकाच्या सर्व शक्यता ज्या ताकदीने वापरल्या आहेत, तशा क्वचितच इतर कुणी वापरल्या असतील. वाडा चिरेबंदी-भग्न तळ्याकाठी-युगान्तही त्रिनाटय़धारा हे याचे उत्तम उदाहरण. विजय तेंडुलकर, सतीश आळेकर आणि महेश एलकुंचवार हे एका मांदियाळीतले नाटककार आहेत. या तिन्ही दिग्गजांमधला समान दुवा म्हणजे मानवी संबंधांचा नितांत शोध घेण्याची वृत्ती. एलकुंचवारांची नाटके ही मानवी जगण्याशी दोन हात करणारी आहेत. ती व्यावसायिककधीच नव्हती. तसा प्रयत्नही एलकुंचवारांनी  केला नाही. आपली नाटके मध्यमवर्गीय आहेत, याची पुरेपूर जाणीव एलकुंचवारांनाही आहे. विजय तेंडुलकर, विजया मेहता आणि श्री. पु. भागवत यांचे ऋण एलकुंचवारांनी स्वत:च मान्य केलेले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे असा भाग्ययोग फार कमी लोकांच्या वाटय़ाला येतो हेही खरे. पण या भाग्यालाच एलकुंचवारांनी कधी सार्थकता मानली नाही. एकेकाळी गाबरेहे नाटक- टाकतोच आता महाराष्ट्रावर बॉम्बया अभिनिवेशाने लिहिले, पण ते आता मलाच वाचवत नाही, असे स्पष्ट आणि जाहीरपणे सांगण्याचे धाडस एलकुंचवारच करू जाणोत. सुलतानहे एलकुंचवारांचे पहिले नाटक. तिथपासून ते अलीकडच्या वासांसि जीर्णानिपर्यंतचा एलकुंचवारांचा नाटय़प्रवास वेगवेगळ्या आव्हानांनी भरलेला आहे. त्यांची नाटके दिग्दर्शकांसाठी जशी आव्हाने निर्माण करतात, तशीच ती प्रेक्षक-रसिकांसाठीही करतात. एलकुंचवार हा सतत अस्वस्थ असलेला, मानवी नातेसंबंधांचा नितांत शोध घेणारा नाटककार आहे. त्यांचा जगण्याशी सारखा झगडा चाललेला असतो. या झगडय़ातून माणसांच्या चंगळवादाचे, भोगवादाचे आणि मूल्यांना सोडचिठ्ठी दिल्यामुळे टोचायला लागलेली सुखे यांची व्यामिश्रता त्यांच्या नाटकात दिसते. मूल्यांची पडझड, मध्यमवर्गीय लोकजीवनातल्या दांभिकपणावर प्रहार करणारे आणि जगण्याशी चाललेला सततचा झगडा हे एलकुंचवारांचे आवडीचे विषय. तेंडुलकर, आळेकर आणि एलकुंचवार यांच्या नाटकांवर तुच्छतावादी परंपरेचे जनक अशी टीका बऱ्याचदा झाली आहे. पण त्यांच्या नाटकातला मानवी संबंधांचा झगडा नीट बारकाईने पाहिला तर ती अतिशय सघन, आशयसंपन्न आणि वास्तवाला कवेत घेऊ पाहणारी नाटके आहेत हे लक्षात येते. प्रायोगिक नाटकातल्या सर्व शक्यता आजमावणारा, कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडणारा आणि मानवी जगण्याशी थेट भिडणारा नाटककार म्हणून महेश एलकुंचवार यांचे नाव भारतीय पातळीवर आदराने घेतले जाते. अशा या नाटककाराला जनस्थान पुरस्काराने गौरवले जात आहे, हे कुसुमाग्रजांच्या परंपरेला शोभणारे आहे. 

No comments:

Post a Comment