Sunday, December 11, 2011

केवळ पुस्तकं वाचतो, म्हणून..

मी तेव्हा पुण्यात राहत होतो. सकाळ दैनिकाच्या जवळ असणा-या एका लस्सी, सँडविच आणि दही विकणा-या दुकानात काम करत होतो. तिथे सर्वात जास्त आजूबाजूचे आणि ‘सकाळ’मधील लोक येत. तिथल्या ताकाची चव चांगली होती. आणि विशेषत: अजिबात आंबट नसलेले दही मिळायचं. त्यामुळे दुकान तसं व्यवस्थित चालायचं. ‘सकाळ’मध्ये कँटीन होतं. पण दुपारच्या जेवणानंतर ताक प्यावंसं वाटणारे लोक तिथे आवर्जून ताक प्यायला येत. त्यांना हवे ते पदार्थ देऊन झाल्यावर आणि ब-याचदा त्यांना पदार्थ देताना माझ्या हातात पुस्तक असे. ते मी इतर वेळी वाचत बसलेला असे. लोक सँडविच खात गप्पा मारत बसत, त्यांचा तो निवांत वेळ असे काहीसा. पण मी मात्र त्यांच्याशी ओळख झाल्यावरही फारसा बोलत नसे. हातातलं पुस्तक वाचत असे. हळूहळू त्यातल्या काहींनी मी कुठलं पुस्तक वाचतोय ते विचारायला सुरुवात केली. मी त्यांना पुस्तक दाखवायला लागलो.

तेव्हा आचार्य जावडेकर, नरहर कुरंदकर, श्री. म. माटे, वा. म. जोशी यांची पुस्तकं मी आवडीने वाचत असे. ती पाहून ‘सकाळ’चे एक निवृत्त कर्मचारी काका गाडगीळ  फार खुश होत. ते मला नवनव्या पुस्तकांची नावं सांगत, लेखकांची नावं सांगत. ती पुस्तकं वाचायचा आग्रह करत. कधी कधी म्हणत, ‘जरा वेळाने घरी ये. तुला एक मस्त पुस्तक वाचायला देतो.’ त्यांच्या घरी खूपच पुस्तकं होती. ते एकटेच राहत, त्यामुळे घरात ते आणि पुस्तकंच पुस्तकं असत. मी जाई तेव्हा ते नवनवी पुस्तकं मला दाखवत, त्यातलं मला हवं असलेलं पुस्तक दोन दिवसांच्या अटीवर वाचायला देत. त्यामुळे माझी जावडेकर, माटे, कुरुंदकर, गोविंद तळवळकर, साने गुरुजी, ग. प्र. प्रधान, अशा अनेक लेखकांची पुस्तकं वाचून झाली. मी माझं शुद्धलेखन सुधारण्याचा प्रयत्न करत होतो. आपल्या लेखनात एकही चूक राहून नये म्हणून मी व्याकरणाचे नियम समजून घेत होतो. हे त्यांना समजल्यावर त्यांनी मला य. ए. धायगुडे यांचे ‘मराठी मुद्रितशोधन’चे दोन भाग भेट दिले. मी एकदा पुलंचं ‘बटाटय़ाची चाळ’ वाचत होतो. ते पाहून ते म्हणाले, ‘अरे, हे पुस्तक तू वाचतोस ते ठीक आहे. पण पुलंची वाचावीत अशी पुस्तकं म्हणजे, ‘व्यक्ती आणि वल्ली’ आणि ‘मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास’. ते तू वाच. नाहीतर असं करतो मी ती तुला भेटच देतो.’ त्यानुसार त्यांनी मला ती भेट दिली.


काकांची पुस्तकांची आवड तशी चोखंदळ होती. भलतीसलती पुस्तकं ते मला वाचायला देत नसत. मी एकदा वपु काळे यांचं ‘पार्टनर’ हे पुस्तक वाचत होतो. पुस्तक तसं बेकारच होतं. ते काकांनी पाहिलं. मला म्हणाले, ‘मित्रा, वा.म. जोशी, कुरुंदकर, माटे वाचणा-या माणसानं वपु काळे यांच्या वाटय़ाला जाऊ नये.’


काका असं थोडंच बोलत. पण मी ते गांभीर्यानं घेत असे. त्यामुळे माझं वाचन फार भरकटलं नाही. त्याला एक शिस्त लागली. ते विचारप्रधान राहिलं. एकदा शांता शेळके यांचा कुठलासा कार्यक्रम होता. त्यात त्या म्हणाल्या की, मी माझ्या आयुष्यातला बराचसा वेळ नको ती पुस्तकं वाचण्यात घालवला. तेव्हा मी त्याचं समर्थन केलं खरं पण आयुष्याच्या उतारवयात मला त्याचं वाईट वाटतं.’ आदल्यादिवशीच मी त्यांचा एक जुना लेख वाचला होता. त्यांनी त्यात म्हटलं होतं की, ‘काही लोक केवळ जीवनसत्त्वाच्या गोळ्या खाऊनच जगावं, तशी काही निवडक पुस्तकं वाचत असतात.’ त्याचा प्रतिवाद त्यांनीच केला होता.


मी ते दुस-या दिवशी काकांना सांगितलं. काका तर चांगले वाचक होते, त्यांना त्यांच्या वाचनाचा अभिमानच होता. पण त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक, ते मला म्हणाले, ‘तू या आठवडय़ापासून दर रविवारी माझ्या घरी यायचं आणि तुझ्या आवडीची पाच पुस्तकं घेऊन जायची.’ माझा माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. पण ते खरंच म्हणत होते. नंतर मला वाटलं, एक दोन आठवडे देतील. पण सतत सहा महिने दर रविवारी ते मला त्यांनी दिलेल्या शब्दांप्रमाणे पाच पुस्तकं देत होते. त्यात समग्र टिळक, श्री. व्यं. केतकरांच्या ज्ञानकोशाचे सर्व खंड, त्र्यं. शं. शेजवलकरांची पुस्तकं, माटे-कुरुंदकर-जोशी यांची पुस्तकं. किती नावं घ्यावीत?


खरं तर मी काही काकांचा नातेवाइक नव्हतो. त्यांच्यासाठी मी कुठलंही काम केलं नव्हतं. त्यांनीही कुठलीही कामं कधी मला करायला सांगितली नाहीत. मी केवळ पुस्तकं वाचतो, म्हणून त्यांच्याकडची सर्व पुस्तकं त्यांनी मला देऊन टाकली. ते मला तेव्हाही स्वप्नवत वाटत होतं आणि आजही आश्चर्यकारकच वाटतं.   

No comments:

Post a Comment