Monday, April 16, 2012

मराठी विनोदातला शुभशकुन

बब्रुवान रुद्रकंठावार हे मराठवाड्यातील अलीकडे विनोदी लेखन करू लागलेले लक्षवेधी साहित्यिक. त्यांचं या आधीचं बर्ट्रांड रसेल विथ देशी फिलॉसॉफीहे विनोदी लेखांचं पुस्तक बरंच नावाजलं गेलं. त्यानंतरचा त्यांचा हा संग्रहही लक्षवेधी आणि त्यांच्या लेखनाचं सामर्थ्य जाणवून देणारा आहे. पण गंमत म्हणजे दोन पुस्तकं प्रकाशित होऊनही हे बब्रुवान रुद्रकंठावार आपल्या मूळ अवतारात उतरायला तयार नाहीत असं दिसतं. म्हणजे बब्रुवान रुद्रकंठावार हे त्यांचं टोपणनाव आहे. या नावाचा कुणीही माणूस मराठवाड्यात नाही. तर त्या नावानं लेखन करणारी वेगळीच व्यक्ती आहे, हे आता बहुतेकांना कळून चुकलं आहे. तर ते असो.
 
या रुद्रकंठावार यांच्या लेखनाची काही वैशिष्ट्यं सांगायची तर तिच्यात मराठवाडी त-हेवाईक बेरकीपणा प्राध्यान्यानं दिसतो. मराठवाड्यातील सर्वसामान्य माणसं काही फारशी हिंग्लिश बोलत नाहीत, पण रुद्रकंठावार यांची पात्रं सराइतपणे मराठीवाडी वळणाचं हिंग्लिश बोलतात. ती भाषा त्यांच्या तोंडी कुठंही कृत्रिम वाटणार नाही, याची काळजीही रुद्रकंठावार घेतात. त्यामुळे ग्रामीण पात्रं आणि त्यांची वैश्विक समज यांचं अफलातून मिश्रण रुद्रकंठावार यांच्या लेखनात वाचायला मिळतं.
 
प्रस्तुत संग्रहात एकंदर अठरा लेखांचा समावेश आहे. या प्रत्येक लेखाच्या शीर्षकात एक तरी इंग्रजी शब्द आहे. लेखात तर इंग्रजी शब्दांचा सढळ म्हणावा इतका वापर आहे. काही ठिकाणी तो फार बेमालूमपणे येतो. सुटय़ासुटय़ा लेखांत तर तो जाणवतही नसणार. पण पुस्तक सलग वाचताना ते प्रकर्षाने जाणवत राहतो. पण तरीही प्रस्तुत लेखकाचा विनोद खास त्याचा मराठवाडी बाणा कुठंही सुटू देत नाही, हेही नमूद करण्याजोगं आहे.
 
विनोदी लेखकाचं जे प्रधान वैशिष्टय़ असतं, त्यात त्याच्या भाषेचा मोठा वाटा असतो. लेखकानं मराठवाडय़ातील अनेक बोलीभाषा, त्यांची ढब, लकब यांची स्वत:च्या लेखनासाठी एक स्वतंत्र भाषा तयार केली आहे. ग्रामीण लोकांकडे वरवर असणारा साधेपणा आणि क्षणार्धात स्वभावत: येणारा बेरकीपणा या गोष्टी हे या लेखकाचं दुसरं बलस्थान आहे.
 
शिवाय लेखकाची ही पात्रं, विशेषत: बब-या, जी समज आणि बेरकीपणा दाखवतात, तो इरसालपणाच्या पातळीवर जाणारी असल्यानं त्यांचं लेखन वाचकाला पकडून ठेवतं. आता हा इरसालपणा नोंदवायचा तर कथा तपशीलबहुल असून चालणार नाहीत. त्यामुळे लेखकाच्या या कथांमध्ये/खरं तर लेखांमध्ये संवादांवर जास्त भर आहे. हे लेख बहुतांश संवादमय आहेत. वर्णनं करण्यात लेखक कुठंही स्वत:चे शब्द आणि वाचकांचा वेळ वाया जाऊ देत नाही. तो थेट मुद्दय़ाला हात घालतो. त्यातून त्याला सांगायची असते, ती गोष्ट तो सांगतोच, पण ती उलगडतो संवादातून. त्यामुळे त्यात एक प्रकारचा ठसका येतो. त्यातून खूप गमतीजमती घडतात अणि आपोआपच विनोदनिर्मिती होते. पण लेखकाचा अजूनही भर फक्त विसंगती शोधण्यावरच आहे की काय, अशी शंकाही चाटून जाते.
 
खरं तर असं संवादात्मक लिहिणं आणि तोच फॉर्म सतत वापरणं हे काही सोपं काम नाही. त्यासाठी भाषेवर हुकूमत हवी. विषयाच्या लांबी-रूंदीचं अचूक टायमिंग हवं आणि कुठं थांबायचं आणि कुठं नाही, याचंही व्यवधान सांभाळता यायला हवं. या सर्वामध्ये लेखक आता पारंगत होत असल्याच्या खुणा या संग्रहात जागोजागी जाणवतात.
 त्यामुळे या पुढच्या काळात बब्रुवान रुद्रकंठावार यांना स्वत:च्या मूळ नावाबरहुकूम अवतरून लेखन करायला हरकत नसावी. त्यांनी जाणकार वाचकांचं कधीचंच लक्ष वेधून घेतलं आहे, पण सर्वसामान्य वाचकांमध्येही स्वत:चं स्थान ते धिम्या गतीने का होईना, पक्कं करत आहेत. हा मराठी विनोदी लेखनातला शुभशकुन मानायला हवा. आणि तो वर्धिष्णूही व्हायला हवा. विनोदी लेखकाला सातत्य पाळावं लागतं आणि आपल्या लेखनाचा आलेख नेहमी चढता ठेवावा लागतो, या दोन कसरती त्याला करता आल्या तर मग त्याला मागे वळून पाहण्याची फुरसत वाचकच देत नाहीत. बब्रुवान रुद्रकंठवार यांच्या बाबतीत तशा शक्यता या दुस-या संग्रहाने खुणावू लागल्या आहेत, एवढं मात्र निश्चितपणाने म्हणता येतं.  
ट-या, डिंग्या आन गळे : बब्रुवान रुद्रकंठावार
जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 
पाने : 168, किंमत : 150 रुपये

No comments:

Post a Comment