Monday, August 27, 2012

शहाणा वाचक आणि पुस्तकं

दुपारी एकपर्यंतचा वेळ टंगळमंगळ करण्यात गेला. नंतर सुशील आला. मग दोघं अविनाश काळे यांच्याकडे गेलो. रात्री नऊला त्यांच्याकडून परतलो. दुपारी सुशीलसोबत काम करताना एक गंमत सुचली. सुशीलच्या कायम बॅगेत असलेलं पुस्तक म्हणजे प्रा. यास्मीन शेख यांचं ‘मराठी शुद्धलेखन मार्गदर्शिका’ आणि माझ्या बॅगेत अरुण फडके यांचे ‘शुद्धलेखन तुमच्या खिशात’ व ‘मराठी लेखन कोश’. सुशीलने त्याच्या पुस्तकावर ‘माझं बायबल’ असं लिहिलं आहे. ते वाचून मी माझ्या दोन्ही पुस्तकांवर ‘माझं कुराण’ असं लिहिलं.
..................................................
काल रात्री साडेनऊच्या सुमारास सुनीता देशपांडे यांचं ‘प्रिय जी. ए.’ हे पुस्तक वाचायला घेतलं. मौजेने आतापर्यंत जीएंच्या पत्रांचे चार खंड काढले आहेत. त्यातल्या पहिल्या खंडात त्यांनी फक्त सुनीताबाईंना लिहिलेली पत्रं आहेत, तर इतर तीन खंडांत म. द. हातकणंगलेकर, जयवंत दळवी, माधव आचवल, अशा लेखकांना लिहिलेली पत्रं आहेत. ‘प्रिय जी. ए.’मध्ये सुनीताईंना लिहिलेली एकंदर 47 पत्रं आहेत. जी. एं.च्या पत्रांचे चारही खंड चाळताना ते पटकन विकत घ्यावे आणि निवांत वाचावे, अशी काही इच्छा झाली नाही. पण सुनीताबाईंचं हे पुस्तक चाळताना मात्र ते विकत घ्यावं, असं तीव्रतेनं वाटलं. किंबहुना हे जी. एं.च्या पत्रांपेक्षा सरसच वाटलं. म्हणून ते परवा मुद्दाम विकत घेतलं. काल रात्री इतर कुठलं काम करायचा कंटाळा आल्याने वाचायला घेतलं. अगदी दोन वाजेपर्यंत 155 पानं वाचून काढली. पुस्तक एकंदर 184 पानांचं आहे. पण पुस्तक काही विशेष आवडलं नाही. किंबहुना जवळवळ नाहीच. उगाच विकत घेतलं, असं वाटलं. एखाद्या ग्रंथालयातून मिळवून वाचलं असतं तरी चाललं असतं. सुनीताबाईंनी तशी कुठल्याच विषयांवर फार गंभीर चर्चा केलेली नाही. अमूक पुस्तक मी वाचलं, तुम्ही वाचलं का; मला आवडलं, तुम्हालाही आवडेल; अमूक पुस्तक तुम्हाला पाठवू का, अशी अगदीच प्राथमिक स्वरूपाची चर्चा आहे. बाकी नुसत्याच अळमटळम गप्पा. चकाट्या म्हणाव्यात अशा. 

हे पुस्तक चाळताना त्यातले पुस्तकांवरचे एक-दोन अभिप्राय वाचून सुनीताबाईंची वाचक म्हणून प्रगल्भता चांगली वाटली, म्हणून पुस्तक तत्परतेनं विकत घेतलं. वर वाचायचे कष्टही घेतले. पण निराशा झाली. मग ते ठेवून ज्यॉ पॉल सात्र्चं ‘वर्ड’ हे आत्मचरित्र वाचायला घेतलं. त्यातील ‘रीडिंग’ या पहिल्या प्रकरणातील 20-30 पानं वाचली. नंतर ‘उत्तम पुस्तक वाचताना लेखकाबरोबरचे मतभेद शोधले पाहिजेत’ हा विश्वास पाटील यांचा ‘ललित’च्या 2000सालच्या दिवाळी अंकातील लेख वाचायला घेतला. पाटील यांनी अतिशय चांगला लेख लिहिला आहे. पण तो पहिल्या चार पानांतच संपवायला हवा होता. नंतरचा मजकूरही सुरेख आहे खरा, पण तो आधीच्या मजकुराशी विसंगत वाटतो. कारण नंतर वाचनसंस्कृतीवरील चर्चा एकदम धर्माच्या प्रश्नाकडे वळते. पाटील लिहितात, ‘‘थोडक्यात बरेच काही सांगता येते. तो कौशल्याचा आणि तुमच्या भाषाप्रभुत्वाचा भाग असतो. पण मराठीतल्या साहित्य शारदेच्या वारसदारांना आणि मराठी प्राध्यापकांना हे किमान कौशल्य अवगत करता येत नाही, याचे पुरावे त्यांच्या लेखनातून, भाषणांतून, बोलण्यातून मिळत राहतात.’’ याच लेखात पाटील यांनी ‘क्रिटिक ऑफ रिलिजन अँड फिलॉसफी’ या पुस्तकाचा आणि त्याचा लेखक वॉल्टर कॉफमान याचा गौरवपूर्वक उल्लेख केला आहे. कॉफमान लिहितो, ‘‘एका परिच्छेदात सांगून होईल ते सांगण्यासाठी पानंच्या पानं व पाच-दहा पानांत सांगून होईल त्याच्यासाठी पुस्तकच्या पुस्तक खर्ची घालणा-या लेखकांपासून शहाण्या वाचकानं दूर राहावं.’’
..................................................
आज रविवार असल्याने दिवसभर सुट्टी होती. त्यामुळे एका ग्रंथप्रेमी मित्राचा ग्रंथसंग्रह पाहायला त्याच्या घरी जायचं होतं. निघायला थोडासा वेळ होता म्हणून प्रा. रा. ग. जाधव यांचा एक चरित्र-वाङ्मयाविषयीचा लेख वाचायला घेतला. त्यात त्यांनी एके ठिकाणी व्हॉल्टेअरचं एक चिंतनीय वचन उद्धृत केलं आहे. ते असं - We owe consideration to the living; to the dead we owe truth only.  म्हणजे, जे जे गतकालीन आहे, गतार्थ आहे, केवळ इतिहास, परंपरा किंवा स्मृती यांच्या रूपानेच अवशिष्ट आहे; त्या त्या सर्वाबद्दल सत्य जाणून घेणं हीच आपली जबाबदारी आहे. उलट जे जे विद्यमान आहे, जिवंत व जगत आहे, वर्तमानकालीन आहे, त्याबाबत सत्यापेक्षा तारतम्यविवेक बाळगणं, ही आपली जबाबदारी आहे.’ श्रेष्ठ लेखक एका वाक्यात किती मोठा आशय आणि किती महत्त्वाचं सांगून जातो नाही? वॉल्टर कॉफमान म्हणतो ते खरंच आहे.

No comments:

Post a Comment