Monday, August 13, 2012

ज्ञान ते सांगतो पुन्हा!

अथातो ज्ञानजिज्ञासा हे यशवंत रायकर यांचे पुस्तक ज्ञान संकल्पनांची ओळख करून देणारे आहे. या पुस्तकाचा पहिला भाग 2010 मध्ये प्रकाशित झाला, तर दुसरा भाग नुकताच प्रकाशित झाला आहे. भाग दोन प्राधान्याने तत्त्वज्ञ, त्यांच्या संकल्पना यांची ओळख करून देणारा आहे. यातील बहुतेक तत्त्वज्ञ, विचारवंत विदेशी आहेत. भारतीय तत्त्वज्ञानात शंकराचार्य यांच्यानंतर नवा कोणताही तत्त्वविचार मांडला गेला नाही, अशी मांडणी सुरेश द्वादशीवार यांनी अलीकडेच लिहिलेल्या त्यांच्या मन्वंतरया पुस्तकात केली आहे. म्हणजे भारतीय तत्त्वज्ञान शंकराचार्य यांच्याबरोबरच थांबलं, त्यानंतर त्यात नवी भर कुणीच टाकलेली नाही, असा या मांडणीचा स्वच्छ अर्थ होतो. असो. हा मुद्दा वेगळा आहे. पण अथातो ज्ञानजिज्ञासाअसे म्हणताना भारतीय तत्त्वविचारापलीकडे जगात काय काय आहे आणि ते कुणी कुणी मांडलं आहे, याचा परामर्ष घ्यावा लागतो. रायकरांचं हे पुस्तक (भाग एक व दोनसह) त्यासंबंधीचा एक प्रयत्न आहे.
‘प्रस्थापित ज्ञानाने काही शंकांचे निरसन न केल्याने जिज्ञासेची कांस धरावी लागणे’, ही प्रस्तुत पुस्तकामागची रायकरांची भूमिका आहे. इथं प्रस्थापित ज्ञान म्हणजे भारतीय तत्त्वज्ञान असं रायकरांना अभिप्रेत असावं. भाग एकमध्ये ‘एका अभ्यासूने जिज्ञासूंशी साधलेले मुक्तसंवाद’ अशी रायकरांची भूमिका होती, ती या भाग दोनमध्ये ‘एका वाचकाने जिज्ञासूंशी साधलेला मुक्तसंवाद’ अशी झाली आहे. जगातील ज्ञान संकल्पनांच्या अफाटतेचा केवळ अंदाज आल्यावर, त्यातील काहींचा प्रत्यक्ष परिचय करून झाल्यावर अशी नम्र भूमिका होणं अपरिहार्य असतं.
पुस्तकाची सुरुवात सॉक्रेटिस-प्लेटो-अ‍ॅरिस्टॉटल या ग्रीक तत्त्वज्ञ त्रयीपासून होते. मग गॅलिलिओ, व्हॉल्टेर, कांट, आँग्यूस्त काँत, चार्लस डार्विन, नित्शे, युनॅमुनो, ऑर्तेगा, बट्र्राड रसेल, सात्र्, कार्ल पॉपर, खलिल जिब्रान, जॉर्ज मिकेश अशा जवळपास तीसेक तत्त्वज्ञांचा समावेश आहे. त्यात विसाव्या शतकातील दोन प्रसिद्ध विचारवंतांचाही समावेश आहे. ते म्हणजे इसाया बर्लिन आणि एडवर्ड सैद. ‘विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ विचारवंत’ असा बर्लिन यांचा सार्थ गौरव केला जातो. रायकरांनी त्यांचं ‘संकल्पनांचे इतिहासकार’ असं वर्णन केलं आहे. बर्लिन यांनी ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेची नव्याने मांडणी केली. त्यावर गेली पन्नास-साठ वर्षे चर्चा चालू आहे, या एकाच गोष्टीतून बर्लिन यांचं महत्त्व अधोरेखित होतं. सैद यांना ‘दुर्दम्य विचारवंत’ असं रायकरांनी म्हटलं आहे, ते मात्र फारसं समर्पक वाटत नाही. सैद यांच्या व्यक्तिगत आयुष्यापेक्षा त्यांचा विचार आणि त्यासाठीचा त्यांचा त्याग या गोष्टी ते हयात असतानाही वरचढ होत्या आणि आहेत. ‘ओरिएण्टॅलिझम’ या 1979 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात सैद यांनी पाश्चिमात्यांचा पौर्वात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा पूर्वग्रहदूषित आहे, याची सोदाहरण चिरफाड केली. या पुस्तकाने पाश्चिमात्यांच्या बौद्धिक एकाधिकारशाहीला पहिल्यांदाच इतक्या ठोसपणे तडाखे लगावले. याचबरोबर पॅलेस्टिनींची भरभक्कमपणे बाजू मांडण्याचं, इंडालॉजीचा पुरस्कार करण्याचं आणि सबाल्टर्न स्टडीजला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं अतिशय महत्त्वाचं कामही सैद यांनी केलं आहे. रायकरांनी सैद यांच्या या योगदानाचाही उल्लेख केला आहे. पण एक उल्लेख त्यांच्याकडून बहुधा अनावधानाने राहून गेला असावा. तो म्हणजे सैद हे विसाव्या शतकातल्या ‘विचारवंतांचे प्रतिनिधी’ होते-आहेत. ‘रिप्रझेंटेशन ऑफ इंटेलेक्च्युअल’ या पुस्तकात त्यांनी विचारवंत कोणाला म्हणावे आणि विचारवंतांची कर्तव्यं कोणती याची मांडणी करताना विचारवंतांनाही चार खडे बोल सुनावले आहेत. सैद यांनी ‘ओरिएण्टॅलिझम’मध्ये भारताचा समावेश केला नाही, अशी तक्रार केली आहे. ते मात्र तर्काला धरून नाही.
या विदेशी तत्त्वज्ञांनंतर टिळक, टागोर, इकबाल या भारतीयांचा तर पृथ्वी, मृत्यू, लोकसंख्या, शेतीची जन्मकथा, फलज्योतिष, बलात्कार अशा नऊ-दहा घटितांचाही समावेश आहे. या विषयसूचीवरून पुस्तकाचे सरळसरळ तीन भाग पडतात. रायकरांनी ते स्वतंत्रपणे नमूद केले नसले तरी ते लक्षात यावेत अशी उतरत्या क्रमाने त्यांची मांडणी केली आहे.
जागतिक पातळीवरील तत्त्वज्ञांनी मांडलेल्या ज्ञान संकल्पनाची थोडक्यात ओळख करून देत, त्या तत्त्वज्ञांचाही परिचय करून दिल्याने हे पुस्तक रोचक झाले आहे. तत्त्वज्ञान हाच मुळात काहीसा रुक्ष आणि अवघड विषय. त्यामुळे तो सर्वसामान्यांना कंटाळवाणा आणि दुबरेध वाटतो. हे लक्षात घेऊन रायकरांनी या पुस्तकाचं लेखन सर्वसामान्यांना रुचेल आणि पचेल अशाच पद्धतीने केलं आहे. पुस्तकभर या व्यवधानाचा प्रत्यय येत राहतो. बहुधा यातील सर्व लेख हे सदररूपाने वेगवेगळ्या नियतकालिकांसाठी लिहिले असल्याचा हा परिणाम असावा.
‘ज्या वेळी जे मनाला भिडले त्याचा अमूक एक मर्यादेपर्यंत पाठपुरावा केला’ या विधानातून रायकरांनी स्वत:च एकप्रकारे या पुस्तकाची मर्यादाही सांगितली आहे. म्हणजे हा अभ्यास ज्ञानमार्गाच्या शिस्तीपेक्षा रायकरांच्या स्वत:च्या कुतूहलातून झाला आहे. दुसरं म्हणजे ही काही कथा-कादंबरी नव्हे. हे तत्त्वज्ञ आणि तत्त्वविचार यांची सांगड घालणारं पुस्तक आहे. ज्ञानाची आस काही सर्वानाच असत नाही आणि ज्यांना ती असते त्यांनाही ते पूर्णपणे समजावून घेता येतेच असं नाही. यातील पहिल्या प्रकारातल्या वाचकांना ज्ञानाकडे वळवण्याचं आणि दुस-या प्रकारातल्या लोकांना आश्वस्त करण्याचं काम, हे पुस्तक काही प्रमाणात निश्चित करू शकते.
रायकरांच्या भाषेला संशोधनाची शिस्त आहे. त्यामुळे ती सौष्ठवपूर्ण आणि आटोपशीर आहे. प्रगल्भ भाषा हा लेखकाच्या जमेचा भाग असतो, तेव्हा तो वाचकांच्या कसोटीचाही असतो. कारण लेखकाने जे लिहिले आहे ते आणि बिटविन द लाइन्स या दोन्ही गोष्टी समजावून घेत वाचकाला पुढे जावं लागतं.
‘अथातो ज्ञानजिज्ञासा’ हा ‘ज्ञान ते सांगतो पुन्हा’ असा स्वत:ला आकळलेलं इतरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे ज्ञानसंकल्पना आणि वाचक यांच्यामध्ये संवादाची भूमिका निभावू पाहणारं पुस्तक आहे. या पुस्तकातील तत्त्वज्ञांचा विचार समजावून घेऊन त्यांच्या मूळ पुस्तकांपर्यंत वाचकाने गेलं पाहिजे, तेव्हाच ती ज्ञानजिज्ञासा ‘अथातो’ ठरेल!
अथातो ज्ञानजिज्ञासा : यशवंत रायकर
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे
पाने : 171,
किंमत : 200 रुपये                  

No comments:

Post a Comment