Monday, July 30, 2012

वाचणा-याची रोजनिशी

११ फेब्रुवारी
आज पुस्तक प्रदर्शनाचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सकाळी लवकरच ते पाहायला गेलो. कुणीही आलेलं नव्हतं. त्यामुळे मला सर्व पुस्तकं निवांत पाहता आली. आधी बंगाल डिव्हायडेड-१९३८ टू १९४७हे पुस्तक घेतलं. नंतर भारतातल्या एका ब्रिटिश नोकरशहाचं-आर्किटेक्टचं चरित्र घेतलं. पण ज्यामुळे खूप आनंद व्हावा, असं एकही पुस्तक मिळालं नव्हतं. शिवाय या दोन्हीपैकी पहिलं सीकॅटेगेरीतलं म्हणजे १२० रुपयांना तर दुसरं डीकॅटेगेरीतलं म्हणजे ५० रुपयांना होतं. त्यामुळे तीच घेण्याच्या विचारात होतो, तोच द प्लेजर्स ऑफ रीडिंगहे अण्टोनिया फ्रेझर या लेखिकेने संपादित केलेलं पुस्तक मिळालं. प्रत थोडी कराब झालेली होती, पण पुस्तक चांगलं होतं. यात ४० वेगवेगळ्या लेखकांनी आपल्या वाचनाविषयी लेख लिहिले आहेत. त्यांना पूरक अशी उत्कृष्ट चित्रं ४० चित्रकारांनी काढलेली आहेत. रॉयल आकाराचं हे आर्टपेपरवर छापलेलं आणि संपूर्ण रंगीत असलेलं पुस्तक फारच सुंदर आहे. त्यातील लेखकांनी आपल्या वाचनावर झालेला घरचा - आजूबाजूच्या वातावरणाचा, सहवासातल्या लोकांचा-शिक्षकांचा - परिणाम, मनावर परिणाम करून गेलेली पुस्तकं, प्रभावित केलेली पुस्तकं याविषयी समरसून लिहिलं आहे. त्या त्या लेखाला चित्रकारानं अतिशय सुंदर चित्रं काढली आहेत. पुस्तकांचं महत्त्व, त्यांचे उपयोग आणि त्यांची फँटसी याविषयीची ही चित्रं बेहद्द अप्रतिम म्हणावी अशी आहेत. शिवाय प्रत्येक लेखकानं लेखाच्या शेवटी माझी आवडती पुस्तकं म्हणून दहा पुस्तकांची यादी दिली आहे. काहींनी तीच का आवडली, याची कारणमीमांसा केली आहे, तर काहींनी आवडती दहा पुस्तकं सांगणं कठीण आहे, तरीही फार विचार करून ही दहा नावं देत आहे, असा अभिप्राय दिला आहे. हे पुस्तक वर्गातलं असल्यानं त्याची किंमत २५० रुपये होती. अर्थात ते ६०० रुपयांना असतं तरी मी घेतलंच असतं म्हणा. मग आधीची दोन्ही पुस्तकं टाकून देऊन हे एकच पुस्तक घेतलं आणि आनंदानं ऑफिसाला परतलो.
१२ फेब्रुवारी
अलीकडच्या काळात अगदी भरमसाठी म्हणावी इतकी पुस्तकं विकत घेतली. वाचलीही तशीच अधाशासारखी. त्यामुळे इंग्रजीतल्या अनेक नव्या लेखकांच्या आणि परकीय भाषांतल्या कितीतरी मान्यवर लेखकांच्या ओळखी झाल्या. हा ग्रंथसंचय भरपूर आनंद देणारा ठरला. आपलं अजून लग्न झालेलं नाही, वयाच्या या टप्प्यावरही आपण लग्नाविषयी फार गंभीर नाही आणि लग्न न होण्याचं वैषम्यही वाटत नाही, याचं मुख्य कारण म्हणजे मैं और मेरी किताबें’!
१४ फेब्रुवारी
काही पुस्तकं पुन्हा पुन्हा भेटत राहतात. प्रदीप सॅबॅस्टीयन या पुस्तकप्रेमी लेखकाविषयी पहिल्यांदा ऐकलं ते जयप्रकाश सावंतांकडून. मग त्यांचे द हिंदूमधील लेख वाचायचा सपाटा लावला. अतिशय सुंदर लेख लिहितो हा माणूस! एके दिवशी सावंतांनी सांगितलं की, सॅबॅस्टीयन यांचं पुस्तक आलं आहे. मग ते फ्लीपकार्टवरून मागवलं. ‘द ग्रोनिंग शेल्फ अँड अदर इन्स्टन्सेस ऑफ बुक लव्हहे त्यांचा वाचन, ग्रंथसंग्रह आणि ग्रंथांविषयीच्या ग्रंथांविषयीचा लेखसंग्रह आहेही उत्तम. त्याची निर्मितीही प्रकाशकानं चांगली केली आहे. या पुस्तकाच्या शेवटी पूरक वाचनासाठी संदर्भग्रंथांची यादी दिली आहे. त्यातली एक्स लिब्रिस’, ‘द मॅन हू लव्हड बुक्स टू मच’, ‘८४ चेरिंग क्रॉस रोड’, ‘द बुक ऑफ लॉस्ट बुक्स’, ‘हिस्ट्री ऑफ रीडिंगअशी काही पुस्तकं आपल्या संग्रही आहेत आणि ती आपण यापूर्वीच वाचली आहेत, याचं समाधान वाटलं. पण इतर काही पुस्तकं मात्र वाचलेली नाहीत आणि ती आपल्या संग्रहीपण नाहीत, याचं वाईटही वाटलं. त्यामुळे ती आता एकेक करून मागवायची, असं ठरवलं.
१५ फेब्रुवारी
पाशा पिंपळापुरे यांनी मागच्या महिन्यात अमेरिकेहून येताना माझ्यासाठी पॅशन फॉर बुक्सहे पुस्तक आणलं होतं. ते त्यांनी मला ६ फेब्रुवारीला दिलंही. पण त्यांनी ते आधीच वाचायला सुरुवात केली होती. त्यामुळे तेच त्याच्या प्रेमात पडले. पुस्तक देताना ते मला म्हणाले, ‘‘हे पुस्तक आणलंय तुझ्यासाठी, पण सध्या मीच ते वाचतोय. खूपच छान पुस्तक आहे. मलाही आवडलंय. माझं एक प्रकरण वाचून व्हायचं आहे, ते झालं की पुस्तक तुला देतो. दरम्यान या पुस्तकावर तुझं नाव लिहून ठेव.’’ मला पुस्तकावर स्वत:चं नाव लिहायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी विकत घेतलेल्या कोणत्याही पुस्तकावर - मग ते नवे असो की जुने - स्वत:चं नाव लिहीत नाही. पण हे पुस्तक परत आपल्या ताब्यात येईल की नाही, या धास्तीपोटी त्यावर मी नाव लिहून ते परत पिंपळापुरेंना वाचायला दिलं.
पण या पुस्तकाचा किस्सा भारी आहे. ‘पॅशन फॉर बुक्सबद्दल मी पहिल्यांदा ऐकलं ते नीतीन रिंढे यांच्याकडून. गेल्या वर्षी त्यांनी त्यावर एक लेखही लिहिला. नंतर त्यांनी मला ते पुस्तक वाचायला दिलं. पुस्तक फार मस्त होतं. मग मी ते शोधायचा प्रयत्न केला. पण ते आता आऊट ऑफ प्रिंट झालं होतं. त्यामुळे निराश होऊन मी त्याचा पिच्छा सोडला. काही दिवसांनी या पुस्तकाची महती उन्मेष अमृते या मित्रापर्यंत गेली. तोही त्याच्या प्रेमात पडला. पण त्यालाही ते मिळेना, तेव्हा त्याने ते अमेरिकेतल्या मित्राकडून मागवायचं ठरवलं. तेव्हा त्याने माझ्यासाठीही एक प्रत मागवली. या दोन्ही प्रती हार्ड बाऊंड होत्या. नीतीन रिंढेंकडची प्रत मात्र पेपरबॅक होती. अमृतेने मागवलेल्या प्रती महिनाभरात आल्या. माझी प्रत त्याने रिंढेंकडे दिली. पण रिंढेंनी माझी हार्ड बाऊंड प्रत स्वत:कडेच ठेवून मला स्वत:कडची पेपरबॅक प्रत दिली. रिंढे मित्रच असल्याने मला काही बोलता आलं नाही. पण मी नाही म्हटलं तरी थोडा नाराज होणार, हे त्यांनी आधीच हेरून स्वत:कडची इतर दोन-चार पुस्तकं मला भेट दिली. ती पुस्तकं चांगली होती. त्यामुळे ही तडजोड मी मान्य केली.
पॅशन फॉर बुक्सची एक प्रत असताना पुन्हा त्याचीच दुसरी प्रत पिंपळापुरेंनी भेट दिली. तेव्हा माझ्याकडे हे पुस्तक आहे, असं मी त्यांना अजिबात सांगितलं नाही. कशाला सांगा? आपल्या आवडत्या पुस्तकाच्या एकापेक्षा जास्त प्रती संग्रही असलेल्या बऱ्याच. शिवाय मित्रांनी प्रेमाने दिलेल्या भेटीचा अनमान का करायचा? उन्मेषला मी पुस्तकाचे पैसे देऊ केले, तेव्हा तो तडकून म्हणाला होता, ‘‘लेका, फार पैसे झाले का तुझ्याकडे?’’ फार पैसे झाले नाही पण एकाच पुस्तकाच्या दोन प्रती झाल्या ना!
१९ फेब्रुवारी

एक्स लिब्रिसया अॅनी फीडमनच्या पुस्तकाविषयी पहिल्यांदा अरुण टिकेकरांच्या अक्षरनिष्ठांची मांदियाळीया पुस्तकात वाचलं होतं. त्यानंतर दोनेक वर्षानी एक्स लिब्रिसप्रत्यक्षात पाहायला मिळालं ते जयप्रकाश सावंतांकडे. मग ते झपाटल्यासारखे वाचून काढलं. अॅनीनं अतिशय जिव्हाळ्यानं पुस्तकांविषयी, तिच्या संग्रहाविषयी आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणींविषयी लिहिलं आहे. यातला मॅरिइंग लायब्ररीहा पहिला लेख लेख तर केवळ अप्रतिम आहे. अॅनी आणि तिचा नवरा दोघांचाही ग्रंथसंग्रह एकाच घरात स्वतंत्र असतो. लग्न झालं, मुलं झाली, तेव्हा अॅनीला वाटलं की, आपण आता एकजीव झालेले पती-पत्नी आहोत, मग आपला ग्रंथसंग्रह तरी का स्वतंत्र ठेवायचा? तोही एकत्र करून टाकू. पण तो एकत्र करताना धम्माल उडते. दोघांच्या त - हा वेगवेगळ्या. त्यामुळे ग्रंथांचं सामिलीकरण करताना मतभेद होतात. पण प्रचंड चर्चा, वाद होऊन शेवटी ग्रंथसंग्रह एकत्र केला जातोच. अॅनी लेखाच्या शेवटी लिहिते, ‘हीज बुक्स अॅण्ड माय बुक्स आर नाऊ अवर बुक्स. वुई आर रिअली मॅरिड!’
हे पुस्तक वाचलं खरं, पण त्याच्या शीर्षकाचा काही तेव्हा उलगडा झाला नाही. अलीकडे पाशा पिंपळापुरे यांनी पॅशन फॉर बुक्सहे पुस्तक भेट दिलं. अमेरिकेत दोन-तीन महिने लेकीकडे असताना त्यांनी ते हाफ प्राइज असणाऱ्या एका पुस्तकाच्या दुकानात घेतलं होतं. हे पुस्तक सेकंडहॅण्ड आहे. मात्र तरीही त्याची प्रत फारच चांगली आहे. अगदी नवी म्हणावी अशी. आधी हे पुस्तक ज्याचं होतं, तो उत्तम वाचक असावा आणि ग्रंथप्रेमीही. त्यामुळे त्याने हे पुस्तक फार जपून वाचलं. विकताना त्यावर आपली नाममुद्रा नोंदवून ठेवली. ती अशी - ‘एक्स लिब्रिस - डॅनिअल आर. विंटरिच.’ म्हणजे हे पुस्तक विंटरिंच यांच्या मालकीचं होतं. तेव्हा मला अॅनीच्या एक्स लिब्रिसया पुस्तकाच्या शीर्षकाचा उलगडा झाला. हा मूळ लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ अमूकच्या मालकीचंअसा आहे. इंग्रजीमध्ये अनेक लेखक-ग्रंथालयं त्यांनी विकत घेतलेल्या नव्या-कोऱ्या पुस्तकावर एक्स लिब्रिस..’ असा स्टिकर लावतात. त्याचेही वेगवेगळे प्रकार आहेत. या स्टिकरवर पुस्तकाशी संबंधित एक चित्र असतं. त्या चित्राच्या वरच्या बाजूला एक्स लिब्रिसहे दोन शब्द आणि चित्राच्या खाली ज्याचं ते आहे त्याचं नाव असतं.
२१ फेब्रुवारी
आज फ्लीपकार्टवरून मागवलेली दोन पुस्तकं आली. त्यातील पहिलं आहे अर्नोल्ड बेनेट या लेखकाचं हाऊ टू लिव्ह ऑन २४ अवर अ डे’. हे पुस्तक १९०८ साली प्रकाशित झालेलं पुस्तक आहे. या पुस्तकाविषयी पहिल्यांदा वाचलं होतं, ते प्लेजर ऑफ रीडिंगमध्ये. त्यात मायकेल फूट या लेखक-राजकारण्याने अनरेल्ड बेनेटच्या हाऊ टू लिव्ह ऑन २४ अवर अ डेआणि लिटररी टेस्ट : हाऊ टु फॉर्म इटया दोन पुस्तकांचा उल्लेख केला आहे. ही दोन्ही पुस्तकं, पुस्तिका म्हणाव्यात इतकी छोटी आहेत. जेमतेम शंभरेक पानांची. पण फूटने त्यांचं खूपच कौतुक केलं आहे. फूट लिहितात, ‘आय डू थिंक दॅट लिटल बुक, लिटरली, चेंजज्ड माय लाइफ’.
दुसरं आलेलं पुस्तक आहे पलाश कृष्ण मेहरोत्राचं द बटरफ्लाय जनरेशन’. या पुस्तकाविषयी फ्लीपकार्टवर पहिल्यांदा न्यू रिलिजया विभागातली पुस्तकंपाहताना वाचलं होतं. पण आपल्या आवडीचा विषय नाही म्हणून ते दोन-चार वेळा पाहून सोडून दिलं होतं. पंधरा दिवसांपूर्वी त्यावर इंडियन एक्स्प्रेसमध्ये परीक्षण आलं. ते फार छान लिहिलं होतं. त्यामुळे त्याविषयीची उत्सुकता पुन्हा चाळवली गेली. मागच्या आठवडय़ात ते फ्लीपकार्टवर पाच-सात वेळा पाहिलं. मग एकदाचं परवा मागवून टाकलं. आज आलंही. या पुस्तकाच्या फ्लॅपवर लिहिलं आहे, ‘‘हाफ ऑफ इंडियाज पॉप्युलशन इज अण्डर द एज ऑफ ट्वेन्टी फाइव्ह. इन २०२०, द अव्हरेज पर्सन इन इंडिया विल बी ओन्ली २९ इयर्स ओल्ड, कम्पेअर्ड विथ ४८ इन जपान, ४५ इन वेस्टर्न युरोप अॅण्ड ३७ इन चायना अॅण्ड द युनायटेड स्टेटस.’’ आजच्या भारतीय तरुणांना पलाशने टेक्नीकुलर यूथअसं म्हटलं आहे.
ही दोन्ही पुस्तकं पाशांनी पाहिली तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तू असली पुस्तकं कशाला घेतोस? ती फार ऑर्डिनरी आहेत.’’ मी त्यांना म्हणालो, ‘‘पलाश कृष्ण मेहरोत्राचं पुस्तक आजच्या तरुणाईविषयीचं आहे. म्हणून मी ते मागवलं आहे. तर अनरेल्ड बेनेटच्या हाऊ टू लिव्ह ऑन २४ अवर अ डेविषयी मायकेल फूटने प्लेजर्स ऑफ रीडिंगमधल्या लेखात असं म्हटलंय की, या पुस्तकानं माझं आयुष्य बदलवलं. फूट हा काही ऑर्डिनरी माणूस नाही.’’ त्यावर पाशा म्हणाले, ‘‘फूट मार्क्सवादी होता. तो एमपी होता. लंडनचा पंतप्रधान होता होता राहिला. त्यानं असं म्हटलंय म्हणजे ते पुस्तक नीट वाचलं पाहिजे. नंतर मला वाचायला दे.’’

1 comment: