शिक्षक, प्राध्यापक या शब्दांचे हल्ली नको तेवढे अवमूल्यन झाले
आहे, तर विचारवंत हा शब्द स्वस्त झाला आहे. पण ज्यांना गंभीरपणे ‘विचारवंत’
हे विशेषण वापरता येईल, अशा मोजक्या व्यक्तींमध्ये प्रा. रामचंद्र महादेव
उर्फ राम बापट यांचा समावेश होता. अगदी नेमकेपणाने सांगायचे तर बापटसर हे
‘लोकाभिमुख विचारवंत’ होते. पेशाने प्राध्यापक असलेल्या आणि वृत्तीने
शिक्षक असलेल्या बापटसरांनी विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडवल्या, तशाच
महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळींतील कार्यकर्ते घडवण्याचेही मोठे काम केले!
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
जगाला
एका विशिष्ट दिशेने ढकलण्याचे काम करण्यासाठी आपल्या परिघापुरते काम करून
भागत नाही तर त्यासाठी आधी जगाचे नीट आकलन करून घेण्याचीही गरज असते. जग जसे आहे, ते तसे का आहे हे समजून घेतल्याशिवाय त्याविषयी काही विधाने करणे हे फारसे बरोबर ठरत नाही. हे तारतम्य आपल्या भाषणांमधून कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवण्याचे, त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम बापटसरांनी केले.
आत्मटीका करणे हे खरे मर्म
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
काही योगायोग मोठे करुण असतात. बापटसरांच्या निधनाची बातमी सोमवारी सक्काळी सक्काळी समजली. त्यानंतर तासा-दोन तासाने इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिरचे पत्र वाचायला मिळाले. ते पत्र होते, बापटसरांच्या ‘परामर्श’ या पहिल्यावहिल्या पुस्तकाला ‘उत्कृष्ट मराठी गद्या’चा पुरस्कार जाहीर झाल्याचे. बापट सर गेले काही दिवस आजारी होते. पण तरीही त्यांच्या निधनाच्या बातमीने महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्ते, प्राध्यापक आणि बुद्धिवाद्यांना खचल्यासारखे वाटले असेल.
आपल्या मृदू स्वभावाने आणि प्रकांड व्यासंगाने गेली पन्नास वर्षे महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीतील कितीतरी नेते-कार्यकर्ते बापटसरांकडे आकर्षित झाले होते. बापट सर कित्येक चळवळी-संघटनांचे मेंटॉर होते.
‘आयडेंटिटी क्रायसिसमध्ये वाढलेली पिढी’
1960 ते 80 या काळात महाराष्ट्रातली तरुण पिढी समाजबदलाच्या ध्येयाने झपाटून गेली होती. भारताला स्वातंत्र्य मिळून बारा-तेरा वर्षे झाली होती. त्यामुळे उज्ज्वल आणि संपन्न भारताची स्वप्ने पाहणारी आधीची पिढी आणि विशी-बाविशीची तरुण पिढी स्वप्नाळू होती. पण स्वतंत्र भारताची सुरुवातीची पंधरा-सोळा वर्षे मोठी धामधुमीची होती. त्यातच 1962च्या युद्धात भारताला चीनकडून पराभवाची नामुष्की स्वीकारावी लागली. त्यानंतर अशा नामुष्कीची एक मोठी मालिकाच घडत गेली. 64 साली भारताचे आशास्थान असणा-या नेहरूंचे निधन झाले. 65 साली पाकिस्तानबरोबर युद्ध झाले. ताश्कंदमध्ये दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे आकस्मिक निधन झाले. त्यातच 67- 68 साली उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये प्रचंड मोठे दुष्काळ पडले.
साधारणपणे याच काळात अमेरिकेत हिप्पी संस्कृतीचा उदय झाला होता. फिडेल कॅस्ट्रो, चे गव्हेरा हे तरुणाईचे हिरो म्हणून पुढे येत होते, तर शेजारच्या पाकिस्तानमध्ये लष्कराचे वर्चस्व वाढत होते आणि पूर्व पाकिस्तानमध्ये बरेच अराजक माजले होते.
या सा-या परिस्थितीचा आणि अस्वस्थतेचा त्या वेळच्या तरुणाईवर मोठा परिणाम झाला. या घुसळणीतून ती तावूनसुलाखून निघाली. ‘युक्रांद’चे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी ‘आयडेंटिटी क्रायसिसमध्ये वाढलेली पिढी’ असे त्या वेळच्या त्यांच्या पिढीचे वर्णन करतात. ‘भारत स्वतंत्र झाला असला तरी सामाजिक-राजकीय पातळीवर आमूलाग्र बदलाची गरज आहे. क्रांती झाल्याशिवाय भारत सामर्थ्यशाली होणार नाही, म्हणून क्रांती करायची. पण कशी, तर आधी वैचारिक क्रांती, नंतर सामाजिक क्रांती आणि मग सर्वागीण क्रांती करायची,’ असा मूलमंत्र काही जाणत्या लोकांनी तरुणाईला दिला. त्याबाबत योग्य मार्गदर्शन केले. त्यातून महाराष्ट्रभर तरुण सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळी उभी राहिली.
ही फळी शिक्षण, मार्गदर्शन आणि प्रबोधन या मार्गाने उभी करणा-यांमध्ये गं. बा. सरदार, आचार्य जावडेकर, प्रा. राम बापट यांचा समावेश होता.
निराशाजनक चित्र आणि समस्यांचा बागुलबुवा
महाराष्ट्रातील सामाजिक चळवळी म्हणताना एक लक्षात घेतले पाहिजे की, तो काही एकट समूह नाही. त्यात अनेक त-हा आणि परी आहेत. लहान-मोठे अनेक गट आहेत. त्यांचा दृष्टिकोन वेगळा आणि कार्यपद्धतीही तितकीच भिन्न. यात पुरोगामी, सामाजिक, राजकीय चळवळी आहेत, तशा स्त्रीवादी, डाव्या चळवळी-संस्था-संघटनाही आहेत. पण या सर्वाना बापटसरांविषयी आस्था होती. थोडय़ाफार फरकानं या सर्वच संस्था त्यांच्याकडे मार्गदर्शक म्हणून, आपला पाठिराखा म्हणून पाहत.
सामाजिक
चळवळींचा उद्देश कितीही नेक असला तरी त्या व्यवस्थेविषयी आणि सभोवतालच्या
परिस्थितीविषयी जरा जास्तच निराशाजनक चित्र रंगवत असतात. परिस्थिती आहे त्यापेक्षा जास्तच फुगवून सांगितल्याशिवाय आणि समस्यांचा बागुलबुवा केल्याशिवाय कार्यकर्ते पेटून उठत नाहीत, असा त्यांच्या नेत्यांचा समज असतो. आणि तशी कार्यपद्धतीही. शासनयंत्रणेविषयीची नकारात्मकता हा तर सर्वामध्ये कॉमन म्हणावा असा फॅक्टर असतो. अशा या चळवळी-संस्था-संघटनांचे शिक्षण करण्याचे काम बापटसरांनी आयुष्यभर केले.
आत्मटीका करणे हे खरे मर्म
‘माणूस, निसर्ग व पर्यावरण’ या 1998 साली लेखात बापटसरांनी लिहिले आहे, ‘‘गांधी, मार्क्स व बुद्ध यांचा वारसा आपल्याला लाभला पाहिजे. त्यातील सत्त्वांश उचलून व त्यावर परिस्थितीनुसार योग्य ते संस्कार करून आपली नवी पर्यावरणविषयक भूमिका निश्चित केली पाहिजे. गरिबीच्या
प्रश्नावर तोडगा काढला तर पर्यावरणाचा गुंता सुटेल आणि पर्यावरणाच्या
गुंत्यात लक्ष घातले तर गरिबीची पाळेमुळे कुठे कुठे दडलेली आहेत, हे पुरतेपणी समजून येईल. पर्यावरणाच्या प्रश्नाकडे पाहण्याची सत्याग्रही भूमिका यापेक्षा फार वेगळी असणार नाही.’’ आपल्याकडच्या तथाकथित पर्यावरणवाद्यांना आणि घायकुत्या पर्यावरणप्रेमींना या विधानात सणसणीत अशी चपराक आहे. पर्यावरणाच्या प्रश्नाचा गुंता कसा समजून घ्यायचा, याची दिशा यातून बापटसरांनी सूचित केली आहे.
2006 साली प्रकाशित झालेल्या ‘भारतीय राष्ट्रवादापुढील आव्हाने’ या संपादित पुस्तकात ‘राष्ट्रवाद : काही सैद्धांतिक प्रश्न’ हा बापटसरांचा प्रदीर्घ लेख आहे. राष्ट्रवादाच्या मूळ संकल्पनेपासून भारतीय राष्ट्रवादाच्या वाटा-वळणापर्यंत जागतिक परिप्रेक्ष्याची ओळख करून देत बापटसर शेवटी म्हणतात, ‘‘आत्मटीका करणे हे राष्ट्रवादाचे खरे मर्म आहे असे मला वाटते. आपण जरी मार्क्सवादी असाल, मिलवादी, रेननवादी असाल, धर्मवादी असाल किंवा आंबेडकरांच्या अर्थाने धम्मवादी असाल तरी या सर्वानीच आत्मटीका करणे महत्त्वाचे आहे. कारण ते एक ऊर्जास्थान आहे. आपल्यात सुधारणा घडवून आणण्याचे ते एकमेव साधन आहे. संस्थात्मक पातळीवर आत्मटीका न करणारा राष्ट्रवाद मारकच ठरणार आहे. जागतिकीकरणाच्या युगात तुम्ही जर आत्मटीका केली नाही तर तुम्ही स्मृती हरवाल व त्यातून प्रवाहपतित होण्याचा धोका असतो. मग आजच्या जागतिकीकरणाच्या संदर्भात भूगोल व राष्ट्र यांचे अस्तित्व अप्रस्तुत ठरले आहे, या प्रचाराला आपण बळी पडू.’’ पण आत्मटीकेची सुरुवात दुस-यापासून व्हावी, अशी आपल्या समाजाची धारणा असल्याने बापटसर म्हणतात, त्या प्रचाराला आपण बळी पडतो आहोत. सामाजिक चळवळी, साहित्य, राजकारण, सर्वत्र याचा अनुभव येतो.
बापट यांनी 1972 साली ‘समाजवादी मित्रांना अनावृत पत्र’ लिहून त्यांच्या समाजकारणाची व राजकारणाची जी चिरफाड केली आहे, ती तर अफलातून आहे.
लोकाभिमुख विचारवंत
थोडक्यात, बापट सर समाजशिक्षक, लोकाभिमुख विचारवंत होते. शिक्षक-प्राध्यापक या शब्दांना हल्ली जवळपास शिव्यांचे स्वरूप आले आहे. इतके या शब्दांचे अवमूल्यन अलीकडच्या काळात झाले आहे. त्याला अपवाद असणाऱ्या मोजक्या प्राध्यापकांमध्ये बापटसरांचा प्राध्यान्याने समावेश केला जाई.
लोकशिक्षणाचे व्रत स्वीकारणे, ही खायची गोष्ट नाही. तिच्यासाठी प्रचंड मोठा त्याग करावा लागतो. डोक्यावर सतत बर्फाची लादी ठेवावी लागते. आणि एकच मुद्दा परत परत समजावून सांगावा लागतो. शिवाय एखाद्या प्राध्यापकाने असे उद्योग करणे, कमीपणाचे मानले जाते. स्वतंत्र लेखन सोडून असे उद्योग करणाऱ्याला विद्यापीठीय बुद्धिवाद्यांच्या जगात फारसे स्थान नसते. पण बापटसरांनी त्याची कधी तमा बाळगली नाही. प्राध्यापकाने लेखक असलेच पाहिजे, या दांभिक अट्टाहासाला ते कधी बळी पडले नाहीत. याउलट या अपप्रचाराला बळी पडलेले पुस्तकी पंडित, गेल्या वीस वर्षात ज्या जागतिकीकरणाच्या नावाने बोंबा मारत आहेत, नेमके याच काळात कालबाह्य होऊ लागलेत.
या पार्श्वभूमीवर बापटसरांसारख्या लोकाभिमुख विचारवंतांची गरज पुन्हा पुन्हा अधोरेखित होते. आता बापट नाही पण पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्रा. यशवंत सुमंत त्यांचा हा वारसा गेली काही वर्षे नेटाने आणि समर्थपणे चालवत आहेत. एवढेच नव्हे तर पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाला बापट, सुमंत, सुहास पळशीकर, राजेश्वरी देशपांडे या तत्त्वनिष्ठ प्राध्यापकांनी राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवून दिला आहे.
‘मला उमजलेले’
बापट हे काही बैठक मारून लिहिणारे लेखक नव्हते. ते त्यांच्या स्वभावातच नव्हते आणि बहुधा त्यांना ते करायचेही नव्हते. त्यामुळे गेल्या पन्नास वर्षात त्यांचे एकही स्वतंत्र पुस्तक प्रकाशित झालेले नाही. वेगवेगळ्या
ठिकाणी लिहिलेले काही लेख आणि मराठीतल्या काही महत्त्वाच्या पुस्तकांना
लिहिलेल्या प्रस्तावना एवढेच काय ते लेखन त्यांच्या नावावर जमा आहे. मात्र त्यांचा राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास, नाटय़शास्त्र, कला, सौंदर्यशास्त्र, संरक्षणशास्त्र, सामाजिक चळवळी, महाराष्ट्राची वैचारिक परंपरा यांचा गाढा अभ्यास होता.
गेल्या वर्षी त्यांचे ‘परामर्श’ हे संकलित पुस्तक प्रकाशित झाले. ते त्यांचे पहिले पुस्तक. (इतर दोन लेखसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.) या पुस्तकात त्यांनी ‘स्वातंत्र्य, समता आणि न्याय’ (मे. पुं. रेगे), ‘न्याय आणि धर्म’ (अशोक चौसाळकर), ‘इतिहासचक्र’ (राम मनोहर लोहिया), ‘तुकारामदर्शन’ (सदानंद मोरे), ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य’ (गो. मा. पवार), ‘कथा मुंबईच्या गिरणगावची’ (नीरा आडारकर व मीना मेनन) या सहा पुस्तकांना लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनांचा समावेश आहे. यातील काही प्रस्तावना पन्नास-साठ पानांच्या आहेत.
या प्रस्तावना त्या त्या पुस्तकाचे मर्म आणि त्यामागची संबंधित लेखकांची भूमिका उलगडून दाखवतात. (ग. प्र.) प्रधानमास्तरांनी अशाच इतरांच्या पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावनांच्या संग्रहाला ‘मला उमजलेले’ असे अन्वयर्थक शीर्षक दिले आहे. बापटांची भूमिकाही त्यापेक्षा वेगळी नाही. प्रस्तावना नेमकी कशासाठी आणि कशी लिहायची याचा वस्तुपाठ म्हणाव्या अशा आहेत.
समाजशिक्षक
पण बापटसरांचं मुख्य योगदान त्यांच्या समाजशिक्षकाच्या भूमिकेत आहे. त्यांनी गेल्या 40-50 वर्षात सामाजिक संस्था- संघटना व चळवळी यांच्या विविध उपक्रमांत, अभ्यासवर्गात व शिबिरांत विश्लेषक व चिकित्सक मांडणी करणारी काही हजार भाषणे तरी दिली असतील. महाराष्ट्रातील जिल्हे, तालुके इतकेच काय पण छोटी-मोठी खेडीही त्यांनी अभ्यासवर्ग, शिबिरे आणि व्याख्यानांसाठी पालथी घातली आहेत. नियोजित कार्यक्रम कितीही आडबाजूला असो, वाहतुकीची कशीही सोय असो ते तिथे जाणार. सलग दीड-दोन तास आपला विषय रसाळपणे मांडणार. बापट हे दीर्घ पल्ल्याचे वक्ते होते. दहा-पंधरा मिनिटांत त्यांना विषय मांडता येत नसे. त्यासाठी त्यांना दीड-दोन तास लागत. मग त्यांनाही समाधान मिळत असे आणि समोरच्या श्रोत्यांची अवस्था तर ‘अजि म्या ब्रह्म पाहिले’ अशीच होई.
बापट यांची भाषणे विचारप्रवर्तक असत. ती एकाच प्रश्नाला किती बाजू असतात, याचा पट उभा करत. प्रश्नाची व्यामिश्रता सांगताना त्यावरील मार्ग सांगण्याचे कामही करत. त्यांच्या भाषणामुळे आपल्या विचारांना दिशा मिळते. मुख्य म्हणजे विचार कसा करावा, याचा परिप्रेक्ष्य मिळतो. लोकाभिमुख विचारवंताचे हेच काम असते. ते बापटसरांनी अगदी शेवट शेवटपर्यंत निष्ठेने केले.

भावगर्भ.मर्मस्पर्शी आणि मनाची पकड घेणारे शब्दचित्र.
ReplyDelete