Wednesday, June 27, 2012

`पार्टनर, तुम्हारी पॉलिटिक्स क्या है?'

अजिबात मुद्देसुद नसलेले टीपण. यावर मुद्देसुद चर्चा कशी होणार? आणि तिची अपेक्षा तरी कशी करणार? कधी कधी मुद्देसुद बोलत नाही आपण तसेच कधी कधी मुद्देसुद लिहित पण नाही. हे टीपण त्यातलाच प्रकार.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

हिंदीतील मान्यवर कवी (कै.) गजानन माधव मुक्तिबोध यांच्या एका कवितेतील ही ओळ म्हटलं तर फार साधीसुधी आहे. सूचक आहे. आणि तितकीच मर्मभेदक आहे, खोचक आहे. तशी भोचकही आहे. कारण `राजकारण' या शब्दाविषयी आपल्याकडे भयानक आणि भयंकर असे समज-गैरसमज आहेत. हा शब्द भारतीयांनी इतका बदनाम करून ठेवला आहे की, तो आता शिवी म्हणूनच वापरला जातो. अर्थात इथे `राजकारण' या शब्दाचा इतिहास, वर्तमान किंवा त्याची व्युपत्ती आणि मूलार्थ हा प्रतिपाद्य विषय नाही. त्यामुळे ती चर्चा इथेच थांबवू. मुक्तिबोध यांच्या या कवितेत `पॉलिटिक्स' हा शब्द कोणत्या अर्थाने आला आहे, ते समजून घेऊ. ही संपूर्ण कविता वाचल्यावर लक्षात येते की, मुक्तिबोधांनी इथे `रोल' वा `भूमिका' या अर्थाने हा शब्द वापरला आहे. म्हणजे `पार्टनर, तुम्हारी पॉलिटिक्स क्या है?'
याचा अर्थ, `मित्रा, तुझी नेमकी भूमिका काय आहे?'

...या एका प्रश्नातच समोरच्याची दांडी उडवता येते. त्याला कोंडीत पकडता येतं. `प्रश्न विचारण्यातून शहाणपण दिसतं तर उत्तरातून हुशारी दिसते' असं म्हणतात. `पार्टनर, तुम्हारी पॉलिटिक्स क्या है?' या प्रश्नाचं उत्तर कोण कसं देईल, यावरूनही या अनुमानाचा प्रत्यय येतोच. पण हाही जरा तात्त्विक विचार झाला. बहुतेक लोकांनी - त्यात पत्रकार-लेखक-संपादक-प्राध्यापक-वकील-डॉक्टर-सामाजिक कार्यकर्ते असे सर्व लोक आले - याचा कधी विचारच केलेला नसतो. स्वत:ला सतत प्रश्न विचारण्याची आणि स्वत:ची सतत समीक्षा करण्याची `सवय' अनेकांना नसते, ती त्यांच्या अंगवळणी पडलेली नसते. आणि अशी `सवय' लावून घेतली पाहिजे, याचाही त्यांनी कधी विचार केलेला नसतो. त्यामुळे `पार्टनर, तुम्हारी पॉलिटिक्स क्या है?' या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळेलच याची पुरेशी खात्री नसते. कारण विचार आणि व्यवहार यातली तफावत कमीत कमी ठेवण्यासाठी धडपडणारे लोकही कमीच असतात...आणि म्हणूनच `पार्टनर, तुम्हारी पॉलिटिक्स क्या है?' हा प्रश्न सतत समोरच्याला विचारत राहून त्याला त्यावर विचार कराण्यासाठी सूचित करणं, या प्रश्नाचाही आपण विचार करायचा असतो, हे ध्यानात आणून देणं, हे `सामाजिक काम' ठरतं. भलेही त्याला प्रत्येक जण योग्य प्रतिसाद देईल न देईल. आपण आपला संयम पूर्ववत ठेवत हा प्रश्न विचारात राहिलं पाहिजे

पण हा प्रश्न कुणी कुणाला विचारावा? ज्याचं स्वत:चं पॉलिटिक्स ठरलेलं आहे, त्याच्याकडेच हा प्रश्न विचारण्याचं नैतिक बळ असेल. पण मग आता पॉलिटिक्स म्हणजे काय? जॉर्ज ऑर्वेल म्हणतो, `राजकारण हा शब्द शक्य तितक्या उदारपणे घ्यावा. जगाला एका विशिष्ट हेतूने ढकलणं, हाही राजकीय हेतूचा/धोरणाचाच भाग असतो.' 

थोडक्यात राजकारण म्हणजे आपली जगाबद्दलची, जगण्याबद्दलची भूमिका काय आहे? पण मग ही भूमिका कशी ठरते? वा ठरवायची? लोकशाही ही फक्त केवळ शासनप्रणाली नसून ती जीवनप्रणाली आहे, असं म्हणतात. तसंच भूमिकेचं असतं. ती जीवनप्रणाली असावी लागते. तरच तिचं महत्त्व कळू शकतं. शिवाय ती तुम्ही कुठे जन्म घेता, बालपण-जडणघडणीच्या वयात तुमच्या अवतीभवतीचं वातावरण कसं आहे आणि तुमचे शिक्षक-मित्रमैत्रिणी कोण असतील यावर अवलंबून असतं. पण निसर्गानं आई-वडील, आजूबाजूचं वातावरण व लोक आणि शिक्षक-प्राध्यापक यांच्या प्रभावातून बाहेर पडायचा पर्यायही आपल्याला दिलेला असतोच. त्याचा सुयोग्य वापर करून घेण्याची संधू फारच कमी जण घेतात, तो भाग वेगळा!

माणसाला जगण्यासाठी धर्माची गरज असते की नाही, धर्माशिवाय माणूस सुखा-समाधानाने जगू शकतो की नाही हा नेहमीच विवादाचा विषय राहिला आहे. त्यामानाने माणसाला जगण्यासाठी आयडिऑलॉजीचा किती उपयोग होतो, आयडिऑलॉजीमुळे माणसाचं जगणं किती सुखकर, समृद्ध बनू शकतं, याविषयीही वाद होत आले आहेत. आयडिऑलॉजी प्रमाण मानून जगणारे स्वत:च्या संपन्न आयुष्याची उदाहरणं देऊन त्याचे समर्थन करतील, तर त्यांचे विरोधक आयडिऑलॉजी प्रमाण मानूनही ज्यांचं आयुष्य विपन्नावस्थेत गेलं, त्यांची उदाहरणं देऊन आधीच्यांचा प्रतिवाद करतील. आयडिऑलॉजी ही भौतिकतेशी संबंधित गोष्ट नाही, ती बौद्धिकतेशी संबंधित गोष्ट आहे. थोडक्यात माणूस म्हणून जगण्यासाठी विचारसरणी गरजेची असते, हे स्वत:ला आणि इतरांना पटवून देणं ही फार म्हणजे फारच अवघड गोष्ट असते.

शिवाय अशी आयडियॉलॉजी प्रमाण मानून आयुष्यभर तिच्याशी प्रामाणिक राहणारे, त्यासाठी कुठलीही तडजोड न करणारे लोक आपल्याला आजूबाजूला असतात. आपल्या देशातल्या हिंदुत्ववादी आणि कम्युनिस्ट हे आपली आयडिऑलॉजी प्रमाण मानणारे लोक आहेत. आयुष्यभर आपल्या आयडिऑलॉजीला चिकटून राहणारे हिंदुत्ववादी, कम्युनिस्ट वा इतर वादी आपल्या आयडिऑलॉजीविरोधात बोलणाऱयांशी सतत पंगा घेत राहतात. पण आयुष्याच्या उत्तरार्धात आक्रमकता कमी झाली की, गडबड होते. काही सुविद्यांना आपल्या आयडिऑलॉजीमधील वैगुण्य दिसायला लागतात. मग ते तिचा त्याग करतात. काहींच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा उजागर होऊन त्यांना वैफल्य येतं. ते बाजूला होतात. काही मात्र या आयडिऑलॉजीचा सरळ त्याग करून दुसऱया आयडिऑलॉजीचा स्वीकार करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- भाजपा किंवा कम्युनिस्ट पक्ष यातून बाहेर पडलेले लोक त्याविषयी नंतर अत्यंत कडवटपणे बोलतात, लिहितात. मराठीमध्ये अशा पद्धतीच्या पुस्तकांची संख्या बरीच आहे

या दोन्ही आयडिऑलॉजी `प्रेम आणि द्वेष' (Lover and Hate) यावर संकल्पनेवर आधारलेल्या आहेत. हिंदुत्ववादी मुस्लिमांचा द्वेष करतात, जातीयवादाचं समर्थन करतात; तर याच कारणांसाठी कम्युनिस्ट त्यांचा तिरस्कार करतात. कम्युनिस्टांना दीनदलितांबद्दल प्रेम वाटतं. कारण कामगार मुख्यत: याच वर्गातून येतात. शिवाय क्रांती नेहमी खालच्या वर्गातून सुरू होते, हा सिद्धान्त मार्क्सने सांगून ठेवलाय. तो 100 टक्के अजून तरी कसोटीला उतरला नसला तरी कम्युनिस्ट मार्क्सला अभिप्रेत असलेली क्रांती जगात होणारच, असा दुर्दम्य विश्वास बाळगून असतात. इकडे हिंदुत्ववादीही हा देश केवळ हिंदूंचा देश होणार, असा दुर्दम्य विश्वास बोलून दाखवत असतात

या दोघांचेही स्वप्न पूर्ण होणार नाही. कसे होणार? भारतात ते शक्य तरी आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित करून त्यावर आपण प्रश्नचिन्ह कायमस्वरूपी ठेवून देऊ शकतो.
पण एक खरेच आहे की, या दोन्ही आयडिऑलॉजी काहीशा आक्रमक आणि वास्तवाशी विसंगत ठरणाऱया आहेत. दोन्हींमध्ये `प्रेम आणि द्वेष' (Lover and Hate) हा फॉर्म्युला असल्याने त्यांना भारतात व्यापक जनाधार आजवर तरी मिळालेला नाही.
पण म्हणून या आयडियॉलॉजी संपलेल्या आहेत असे मानायचे कारण नाही. तशी कुठलीही आयडियॉलॉजी संपत नाही. फार तर तिची पिछेहाट होते

बर्लिनची भिंत पडली तेव्हा आता आयडिऑलॉजीचा अंत झाला आहे, अशी जगभर चर्चा सुरु झाली. Francis फुकुयामा यांनी तर The End Of History and the Last Man असे पुस्तकच लिहिले. पण त्या आधी Daniel Bell यांनी १९५० मध्ये The End of Ideology: On the Exhaustion of Political Ideas in the Fifties   असे पुस्तक लिहून आयडिऑलॉजीचा अंत या विचाराला सुरुवात केली होती. या पुस्तकांवर जगभर खुप चर्चा झाली. त्यावर अनेक लेख, पुस्तके लिहिली गेली. सध्या भांडवलवादाची सरशी आणि साम्यवादाची पिछेहाट झालेली दिसते. पण ती अजून काही काळ अशीच चालू राहून भांडवल वादाची पिछेहाट सुरु होईल असे अनेक विचारवंतान्ना वाटते. 

खर्या आयडिऑलॉजी दोनच. भांडवलवाद आणि साम्यवाद असेही काही विचारवंत मानतात. पण ही संकल्पना फारशी स्वीकारली गेलेली नाही.


1 comment:

  1. लेख आवडला, विशेषतः सुरूवातीचे तीन परिच्छेद फारच आवडले.

    'लव्ह-हेट' विचारधारा काही काळासाठी ठराविक समाजामधे यशस्वी झालेली दिसते. उदाहरणार्थ, पहिल्या महायुद्धाच्या पराभवाची जबाबदारी ज्यू लोकांवर टाकण्यात आणि मातृभूमी (जर्मनमधे पितृभूमी) बद्दल प्रेम जागवण्यात हिटलर कमालीचा यशस्वी झाला. जेव्हा तो लढाया जिंकत होता तेव्हा बहुसंख्य जर्मन जनतेला त्याचं म्हणणं खरं वाटतही असणार. आपल्याकडे विशिष्ट वर्गामधे कम्युनिझम आणि कम्युनलिझम प्रभावी ठरताना दिसलं तरीही बहुसंख्यांनी ते मान्य केलेलं नाही हे मान्यच. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीची झालेली होती तशी वाताहत भारताच्या किंवा बहुसंख्य जनतेच्या वाट्यालाही कधी आली नाही हे ही तेवढंच खरं.

    ReplyDelete