Saturday, March 28, 2015

गरज ‘हिंदू डाव्यां’ची

मोदी सरकारच्या पराक्रमाच्या बातम्या रोजच्या रोज प्रसारमाध्यमांतून ज्या गतीने येत आहेत, तो माराच इतका जोरदार आहे की, त्यांच्याकडे शांतपणे पाहायला बहुतेकांना जमत नाही. आणि नेमका त्याचाच फायदा उठवला जातो आहे. मोदी सरकारची रणनीती इतकी चाणाक्षपणाची आणि हुशारीची आहे की, त्याचा अजूनही भल्याभल्यांना अंदाज येताना दिसत नाही. किंबहुना, दुसरी शक्यता अशी आहे की, भारतातील पुरोगामी विचारवंत-लेखक यांनी हे सर्व अपरिहार्य आहे असे मानून त्याकडे ‘जे जे होईल ते ते पाहावे’ या न्यायाने शांत बसणेच पसंत केले असावे. या शक्यतांमुळे मागच्या आठवड्यात ‘पांचजन्य’ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्राचे माजी संपादक बलदेवभाई शर्मा यांची निवड ‘नॅशनल बुक ट्रस्ट’च्या अध्यक्षपदी केली गेली, या बातमीकडे फारसे कुणाचे लक्ष गेले नाही. इंग्रजी प्रसारमाध्यमांत त्याच्या तुरळक बातम्या आल्या, पण मराठी प्रसारमाध्यमांनी तर त्याची फारशी दखलही घेतली नाही.
मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांची कामगिरी खरोखरच प्रशंसेस आणि कौतुकास पात्र आहेत, यात काहीच शंका नाही. काही महिन्यांपूर्वी त्यांनी ‘इंडियन कौन्सिल ऑफ    हिस्टोरिकल रिसर्च’च्या अध्यक्षपदी वाय. सुदर्शन राव या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या इतिहासकाराची तर विश्राम जमादार या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनुयायाची ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या अध्यक्षपदी नेमणूक केली.
असाच प्रकार ‘नियोजन आयोगा’बाबतही झाला. त्याचा तर थेट ‘नीती आयोग’च करण्यात आला. हे असेच चालू राहिले तर लवकरच साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी, ललित कला अकादमी, राष्ट्रीय अनुदान आयोग यांच्या अध्यक्ष वा संचालकपदीही हिंदुत्ववादी, विशेषत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निष्ठावान अनुयायांची निवड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शर्मा, राव, जमादार यांच्या पात्रतेचा, क्षमतेचा ऊहापोह इंग्रजी प्रसारमाध्यमांत झाला आहे, होत आहे. राव यांच्या पात्रतेवर थेट बोट ठेवणारे लेख तर रामचंद्र गुहा यांच्यासारख्या आजच्या सर्वात विद्वान इतिहासकारानेच लिहिले होते. हिंदुत्ववादी लेखक-विचारवंतांना विरोध करण्याचे एकमेव कारण असे आहे की, हे लोक विचार, संशोधन, विश्लेषण आणि अभ्यास यांच्याऐवजी केवळ मिथके आणि रूढीप्रामाण्य यांचाच उदोउदो करतात. के. सुदर्शन राव यांनी त्यांची निवड झाल्यावर जातिव्यवस्थेविषयी जी मुक्ताफळे उधळली होती, ती गोष्ट फार जुनी नाही.
डाव्या विचारसरणीला प्रमाण मानणाऱ्या इतिहासकारांना भारतात महत्त्वाचे स्थान आहे, याचे कारण त्यांची मांडणी ही केवळ मार्क्स-लेनिन यांची विचारसरणी पुढे रेटते म्हणून नव्हे तर ते इतिहासाकडे शोषित, कामगार यांच्या बाजूने पाहण्याचे काम करतात म्हणून. तसा प्रकार हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लेखक-विचारवंतांच्या बाबतीत होताना दिसत नाही. कारण ते पुरस्कार करतात तो जातिव्यवस्थेचा, रूढीप्रामाण्य, मिथके आणि कर्मकांडे यांचा. ब्रिटिशांनी या देशाचे वाटोळे केले, हिंदूच या देशाचे खरे रहिवासी आहेत, जातिव्यवस्थेनेच या देशाची एकता टिकवून ठेवली, मुस्लिम-ख्रिश्चन हे परकीय आहेत, अशी शेंडाबुडखा नसलेली मिथके ठासून सांगण्याचे काम सगळे हिंदुत्ववादी लेखक-विचारवंत करत असतात. त्यांना नेहमी सत्ताधाऱ्यांचे स्तुतिपाठक म्हणून राहायला आवडते, आयुष्याचे जीवितकर्तव्य असल्यासारखे. गतानुगतिकतेचे टोकाचे प्रेम आणि आपल्या विचारांना विरोध करणाऱ्यांचा टोकाचा द्वेष, एवढाच कार्यक्रम हिंदुत्ववादी लेखक-विचारवंत राबवतात हा तर नेहमीचा अनुभव आहे.
थोडक्यात, सगळेच हिंदुत्ववादी हे ‘अरुण शौरी’ असतात. म्हणजे ते अभ्यास करतात पण फक्त स्वत:च्या सोयीपुरता, संशोधन करतात पण फक्त आपल्या फायद्याचे असेल तेवढ्यापुरतेच आणि लेखन करतात तेही आपल्याला आपला अजेंडा पुढे रेटता येईल यासाठी. मग संशोधनाच्या नावाखाली मागचे-पुढचे संदर्भ तोडून विधाने निवडायची, निष्कर्ष काढताना जेवढी म्हणून पूर्वग्रहदूषित टीका झालेली असेल तेवढ्याचाच विचार करायचा आणि आजच्या प्रश्नांसाठी मध्ययुगीन नीती-मूल्यांची उदाहरणे द्यायची, असा ‘अरुण शौरी’ पुरस्कृत आदर्श हा सर्वच हिंदुत्ववादी लेखक-विचारवंतांचा असतो.
हिंदुत्ववाद्यांमध्ये सगळेच उजवे असतात, ‘हिंदू डावे’ असा शब्दप्रयोग त्यांच्यातल्या कुणा-लेखक विचारवंतांविषयी वापरला जाताना दिसत नाही. ‘हिंदू डावे’ कधी काळी भारतात होते, असे म्हणतात. पण ते काळाच्या ओघात नामशेष झाले. महात्मा गांधी या हिंदु डाव्यांचे शिरोमणी होते. गांधीच्या हत्येनंतर गांधी आणि त्यांचे ‘हिंदू डावे’ समर्थकही अंतर्धान पावत गेले. आता परत त्या ‘हिंदू डाव्यां’चे पुनरुज्जीवन करण्याची नितांत निकडीची गरज निर्माण झालेली आहे. ‘हिंदू उजव्यां’ना ‘हिंदू डावे’ हाच चांगला पर्याय ठरू शकतो...निदान तूर्तास तरी.
 

1 comment:

  1. असं म्हणता येईल का?
    माझ्यामते डाव्या इतिहासकारांचे महत्व नाकारता येत नसले तरी त्यांना अनेकदा इतिहासाला स्वतःच्या निष्कर्षांच्या सोयीसाठी वाकवले हि बाबसुद्धा नाकारता येणार नाही. मुस्लीम किंवा ख्रिश्चन हे देशात परके नसले तरी भूतकाळात एक टप्पा असा होता जेव्हा आज भारताचा जो भौगोलिक भाग आहे त्यात हे धर्म नव्हते हे कधीही डाव्या इतिहासकारांनी निर्विवादपणे सांगितले का? त्यांना 'धर्म' ह्या गोष्टीची भीतीच एवढी आहे कि ती नाहीच असं सतत म्हणत राहिल्याने ती एका टप्प्याला नाहीशी होईल असं त्यांनी ठरवलं असावं. त्यामुळे संघाने 'होमो रीलीजीयस' उभा केला आणि डाव्यांनी 'होमो एक्सप्लॉयटेड'. गांधीजी हे कडवे धर्मनिष्ठ होते, पण त्यांची धर्मनिष्ठ त्यांनी स्वतः समजवून घेतलेली आणि त्यांच्या स्वतःच्या एथिक्सवर आधारित होती. आणि हे बाब डॉ/ आंबेडकर ह्यांनीसुद्धा दर्शवलेली आहे. 'धर्म' नावाच्या गोष्टीला अनुल्लेखाने मारण्याचा डावे आणि नेहरू ह्यांचा प्रयत्न हाच आजच्या परिस्थितीच्या मुळाशी आहे.

    ReplyDelete