Saturday, May 16, 2015

गांधी आडवा येतो

सत्र, उच्च आणि सर्वोच्च या तिन्ही न्यायालयांना मिळून गेली २१ वर्षे वसंत दत्तात्रेय गुर्जर यांच्या ‘गांधी मला भेटला’ या एका कवितेचा न्यायनिवाडा करता येऊ नये, यावरूनच या न्यायव्यवस्थेच्या भयकारी दिरंगाईची कल्पना यावी. खरे तर गांधीजी हे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडलेले महात्मा आहेत. गांधीजींवर त्यांच्या हयातीतच खूप टीका झाली, त्यांच्यावर दोषारोप करणारी पुस्तके लिहिली गेली, व्यंगचित्रे काढली गेली, कविताही लिहिल्या गेल्या. आजही ते सुरूच आहे. गांधीजींना आजही कोणी ‘समलिंगी संबंध’ ठेवणारे म्हणतात, तर कोणी ‘नेकेड अँम्बिशन’ असणारे ठरवतात. गांधीजी तसे साधेसुधे नाहीत. ते खूप बेरके आणि चिवट आहेत. त्यामुळे ते आपला आडमुठेपणा न सोडता त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना आडवे आल्याशिवाय राहत नाहीत. गुर्जरांनाही ते आडवे आलेच. गुर्जरांची ‘गांधी मला भेटला’ ही दीर्घ कविता जानेवारी १९८३मध्ये पोस्टरस्वरूपात प्रकाशित झाली. त्यानंतर बारा वर्षांनी, ती ऑल इंडिया बँक असोसिएशनच्या जुलै-ऑगस्ट, १९९४च्या द्वैमासिकात पुनर्प्रकाशित झाली. तेव्हा तिच्यामुळे गांधीजींची प्रतिमा एकदम  डागाळली, हा शोध गांधीजींच्या विचारधारेशी शून्य संबंध असलेल्या पुण्याच्या पतित पावन संघटनेला लागावा, हा एक थोर विनोदच. गुर्जर, प्रकाशक-संपादक देविदास तुळजापूरकर आणि मुद्रक धनंजय दादासाहेब कुलकर्णी यांच्याविरोधात खटला भरला गेला. लातूर मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या खटल्यात तिघेही दोषी ठरले. त्याला मुद्रक-प्रकाशकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. २०१०मध्ये ही कविता ‘अश्लील, बीभत्स आणि अनुचित’ असल्याचा निर्वाळा देऊन या खंडपीठाने ‘या कवितेतील ओळींमुळे महात्मा गांधी यांची प्रतिष्ठा व प्रतिमा डागाळली,’ असा निवाडाही दिला. त्यालाही प्रकाशकाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पण मुद्रक-प्रकाशक यांनी त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल होण्यापूर्वीच नोव्हेंबर-डिसेंबरच्या अंकात माफी मागितल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आरोपातून मुक्त केले आणि कविता अश्लील व असभ्य असल्याच्या आरोपांतून निर्दोषत्व सिद्ध करण्याची जबाबदारी कवीवर सोपवली आहे. गुर्जरांच्या कवितेतले गांधी हे खरे तर ‘गांधींनंतरचे गांधी’ आहेत. ते भारतात कुठे-कुठे भेटले, त्याचे वर्णन गुर्जरांनी या कवितेत केले आहे. हे गांधी त्यांना जेथे सामान्यत: गांधी भेटूच शकत नाहीत, अशा ३२-३३ ठिकाणी भेटतात. त्यांना गुर्जर आपल्या कवितेत एका रांगेत उभे करतात. त्यातून गांधींपश्चातच्या भ्रष्ट भारताचे बीभत्स चित्र उभे राहत जाते. अश्लील आणि असभ्य मानले जाणारे काही शब्दप्रयोग आणि गांधी हे नाव एकत्र आल्यामुळे ही कविताच अश्लील आणि असभ्य असल्याचा निष्कर्ष निघालेला दिसतो. मुळात गांधी न वाचताच गांधीवादी असणाऱ्यांची संख्या भारतात सर्वात जास्त आहे. गांधीजींची बसताउठता नालस्ती करणारेही सोयीनुसार त्यांचे प्रात:काळी स्मरण करतात आणि गांधीजींच्या वतीने खटलेही लढवतात. गुर्जरांनी या कवितेत ज्यांच्यावर टीका केली आहे, त्यांनी ती गांधीजींवर ढकलून या कवीला आणि कवितेला २१ वर्षे नाडले आहे. न्यायालयानेही ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य, उच्चारस्वातंत्र्य यांनाही सभ्यतेची चौकट लागू आहे. गांधीजींसारख्या ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्वाच्या संदर्भात असभ्य भाषेचा वापर कुणालाही करता येणार नाही,’ असे नमूद करताना तीच री ओढून गुर्जरांना स्वत:चे निर्दोषत्व सिद्ध करण्यास सांगितले आहे. या आधी मराठीत अश्लीलतेच्या कारणावरून बा. सी. मर्ढेकर, चंद्रकांत काकोडकर अशा अनेकांना न्यायालयाची पायरी चढावी लागली होती. त्यात शेवटी त्यांचे निर्दोषत्व सिद्ध झाले. तसे गुर्जर यांचेही होईल. कायद्यातील अश्लीलतेची ‌व्याख्या संदिग्ध आहे. शिवाय, न्यायालयांचे कामकाज इंग्रजीत चालते. तिन्ही न्यायालयांत कवितेचा इंग्रजी अनुवाद सादर झाला. त्यात मराठीतील उपरोध प्रभावीपणे सादर झाला असेल का, याची शंका येते. सतत दुर्बोधतेचा आरोप झाल्यानंतर कवी ग्रेस यांनी ‘स्वत:च्या कवितेविषयी स्पष्टीकरणे द्यायला मी काय गुन्हेगार आहे का?’ असा संतप्त सवाल केला होता. गुर्जर यांनीही असाच सवाल न्यायालयाला करायला हवा. गांधीनंतरचे हे छोटे आणि खोटे गांधी कायद्यातील संदिग्धतेचा आधार घेत कवितेला आडवे येत असतील तर हे कायदे आणि त्यांचा आधार घेणारे बदमाष लोक, या दोघांनाही सरळ करण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment