Tuesday, May 19, 2015

पार्टनर, तुम्हारी पॉलिटिक्स क्या है?

चित्र - प्रदीप म्हापसेकर
हिंदीतील मान्यवर कवी (कै.) गजानन माधव मुक्तिबोध आपल्या मित्रांना, तरुण साहित्यिकांना, “पार्टनर, तुम्हारी पॉलिटिक्स क्या है?” हा प्रश्न विचारत. भेटायला येणाऱ्या अनेकांना ते हा प्रश्न विचारत. तो काळ होता साठीचा. त्यानंतर नव्वदोत्तरी काळ आला आणि तोही संपला. सध्या निष्कि्रयोत्तरी काळ सुरू झालेला आहे. गेल्या पाच दशकांहून अधिकच्या काळात हिंदीमध्ये मुक्तिबोधांच्या या वाक्याला ‘कोटेबल कोट’चं रूप आलेलं आहे. कुणाच्याही भूमिकेविषयी प्रश्न उपस्थित करायचा झाल्यास, कुणाच्याही भूमिकेची चिकित्सा करायची झाल्यास या विधानाचा संदर्भ दिला जातो. मग, ते साहित्यिक असोत वा पत्रकार असोत. आणि ते योग्यच आहे. हा प्रश्न प्रत्येकाला पुन्हापुन्हा विचारायला हवा. सध्या तर त्याची नितांत निकडीची गरज आहे. असं म्हणतातच की, प्रश्न विचारण्यातून शहाणपण कळतं आणि उत्तरातून हुशारी कळते.
मुक्तिबोध यांचा हा प्रश्न म्हटलं तर साधासुधा आहे. सूचक आहे आणि तितकाच मर्मभेदक-खोचकही आहे. कारण ‘राजकारण’ या शब्दाविषयी आपल्याकडे भयानक आणि भयंकर असे समज-गैरसमज आहेत. हा शब्द भारतीयांनी इतका बदनाम करून ठेवला आहे की, तो आता जवळपास तुच्छतेनेच वापरला जातो. अर्थात, इथं ‘राजकारण’ या शब्दाचा इतिहास, वर्तमान किंवा त्याची व्युत्पत्ती आणि मूलार्थ हा प्रतिपाद्य विषय नाही. त्यामुळे ती चर्चा इथेच थांबवू. मुक्तिबोध ‘पॉलिटिक्स’ हा शब्द कोणत्या अर्थानं वापरतात, ते समजून घेऊ. ते ‘रोल’ वा ‘भूमिका’ या अर्थाने हा शब्द वापरतात. म्हणजे, “पार्टनर, तुम्हारी पॉलिटिक्स क्या है?” याचा अर्थ, “मित्रा, तुझी नेमकी (राजकीय) भूमिका काय आहे?”
...या एका प्रश्नातच समोरच्याची दांडी उडवता येते. त्याला कोंडीत पकडता येतं; पण बहुतेक लोकांनी- त्यात पत्रकार-लेखक-संपादक-प्राध्यापक-वकील-डॉक्टर-सामाजिक कार्यकर्ते असे सर्व आले- याचा कधी विचारच केलेला नसतो. स्वत:ला सतत प्रश्न विचारण्याची आणि स्वत:ची सतत समीक्षा करण्याची ‘सवय’ अनेकांना नसते, ती त्यांच्या अंगवळणी पडलेली नसते. अशी ‘सवय’ लावून घेतली पाहिजे, याचाही त्यांनी कधी विचार केलेला नसतो. त्यामुळे “पार्टनर, तुम्हारी पॉलिटिक्स क्या है?” या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळेलच याची पुरेशी खात्री नसते. कारण विचार आणि व्यवहार यातली तफावत कमीत कमी ठेवण्यासाठी धडपडणारे लोकही कमीच असतात... आणि म्हणूनच हा प्रश्न सतत समोरच्याला विचारत राहून, त्याला त्यावर विचार करण्यासाठी उद्युक्त करणं गरजेचं असतं, आहे. भलेही तो योग्य प्रतिसाद देईल न देईल. मुक्तिबोधांसारखा संयम पूर्ववत ठेवत आपणही हा प्रश्न आपल्या आजूबाजूच्यांना सतत विचारत राहिलं पाहिजे.
पण मग पॉलिटिक्स म्हणजे नेमकं काय? जॉर्ज ऑर्वेल हा ब्रिटिश लेखक म्हणतो, “राजकारण हा शब्द शक्य तितक्या उदारपणे घ्यावा. जगाला एका विशिष्ट हेतूनं ढकलणं, हाही राजकीय हेतूचा/धोरणाचाच भाग असतो.” थोडक्यात, राजकारण म्हणजे आपली जगाबद्दलची-जगण्याबद्दलची भूमिका काय आहे, हे ठरवणं. ही भूमिका कशी ठरते? वा ठरवायची? लोकशाही ही फक्त केवळ शासनप्रणाली नसून ती जीवनप्रणाली आहे, असं म्हणतात, तसंच भूमिकेचं असतं. ती जीवनप्रणाली असावी लागते, तरच तिचं महत्त्व कळू शकतं. शिवाय, ती तुम्ही कुठे जन्म घेता, बालपण-जडणघडणीच्या वयात तुमच्या अवतीभोवतीचं वातावरण कसं आहे आणि तुमचे शिक्षक-मित्रमैत्रिणी कोण असतील, यावर अवलंबून असतं; पण निसर्गानं आईवडील, आजूबाजूचं वातावरण व लोक आणि शिक्षक-प्राध्यापक यांच्या प्रभावातून बाहेर पडायचा पर्यायही आपल्याला दिलेला असतोच. त्याचा सुयोग्य वापर करून घेण्याची संधी फारच कमी जण घेतात, तो भाग वेगळा!
माणसाला जगण्यासाठी धर्माची गरज असते की, नाही; धर्माशिवाय माणूस सुखा-समाधानाने जगू शकतो की, नाही हा नेहमीच विवादाचा विषय राहिला आहे. त्यामानाने माणसाला जगण्यासाठी आयडियॉलॉजीचा किती उपयोग होतो, आयडियॉलॉजीमुळे माणसाचं जगणं किती सुखकर, समृद्ध बनू शकतं, याविषयीही वाद झाले आहेत. आयडियॉलॉजी प्रमाण मानून जगणारे स्वत:च्या संपन्न आयुष्याची उदाहरणं देऊन तिचं समर्थन करतील, तर विरोधक आयडियॉलॉजी प्रमाण मानूनही ज्यांचं आयुष्य विपन्नावस्थेत गेलं, त्याची उदाहरणं देऊन प्रतिवाद करतील. आयडियॉलॉजी ही भौतिकतेशी संबंधित गोष्ट नाही, ती बौद्धिकतेशी संबंधित गोष्ट आहे. माणूस म्हणून जगण्यासाठी विचारसरणी गरजेची असतेच. “पार्टनर, तुम्हारी पॉलिटिक्स क्या है?” हा प्रश्न विचारला जातो, तेव्हा तुझी आयडियॉलॉजी नेमकी काय आहे, कोणती आहे, हेच अभिप्रेत असतं.
कुठली तरी एक आयडियॉलॉजी प्रमाण मानून आयुष्यभर तिच्याशी प्रामाणिक राहणारे, त्यासाठी कुठलीही तडजोड न करणारे लोक आपल्याला आजूबाजूला असतात. आपल्या देशात हिंदुत्ववादी आणि कम्युनिस्ट हे आपापली आयडियॉलॉजी प्रमाण मानणारे लोक आहेत. आयुष्यभर आपल्या आयडियॉलॉजीला चिकटून राहणारे तिच्या विरोधात बोलणाऱ्यांशी सतत पंगा घेत राहतात; पण आयुष्याच्या उत्तरार्धात आक्रमकता कमी झाली की, गडबड होते. काही सुविद्यांना आपल्या आयडियॉलॉजीमधील वैगुण्य दिसायला लागतात. मग, ते तिचा त्याग करतात. काहींच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा उजागर होऊन त्यांना वैफल्य येतं. ते बाजूला होतात. काही मात्र या आयडियॉलॉजीचा सरळसरळ त्याग करून दुसऱ्या आयडियॉलॉजीचा स्वीकार करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजप किंवा कम्युनिस्ट पक्षातून बाहेर पडलेले लोक त्याविषयी नंतर अत्यंत कडवटपणे बोलतात, लिहितात. मराठीमध्ये कम्युनिस्टांनी लिहिलेल्या अशा आत्मचरित्रांची संख्या बरीच आहे.
या दोन्ही आयडियॉलॉजी ‘प्रेम आणि द्वेष’ (Love and Hate) या संकल्पनेवर आधारलेल्या आहेत. हिंदुत्ववादी मुस्लिमांचा द्वेष करतात, जातीयवादाचं समर्थन करतात, तर याच कारणांसाठी कम्युनिस्ट त्यांचा तिरस्कार करतात. ते भांडवलदारांचा आणि त्यांचं समर्थन करणाऱ्या सर्वांचा द्वेष करतात. त्यांना दीनदलितांबद्दल प्रेम वाटतं. कारण कामगार मुख्यत: याच वर्गातून येतात. शिवाय, क्रांती नेहमी खालच्या वर्गातून सुरू होते, हा सिद्धांत मार्क्सनं सांगून ठेवलाय. तो १०० टक्के अजून तरी कसोटीला उतरला नसला, तरी कम्युनिस्ट मार्क्सला अभिप्रेत असलेली क्रांती जगात होणारच, असा दुर्दम्य विश्वास बाळगून असतात. भारतात हिंदुत्ववादीही हा देश केवळ हिंदूंचा देश होणार, असा दुर्दम्य विश्वास बोलून दाखवत असतात. सध्या तर ते या दिवास्वप्नाच्या वेडाने झपाटून गेले आहेत.
या दोघांचंही स्वप्न पूर्ण होणार की नाही, भारतात ते शक्य आहे का, असे अनेक प्रश्न आहेत आणि तो वेगळा विषय आहे; पण एक खरंच आहे की, या दोन्ही आयडियॉलॉजी काहीशा आक्रमक आणि वास्तवाशी विसंगत ठरणाऱ्या आहेत. दोन्हींमध्ये ‘प्रेम आणि द्वेष’ हा फॉर्म्युला असल्याने त्यांना भारतात व्यापक जनाधार आजवर तरी मिळवता आलेला नाही.
पण म्हणून या आयडियॉलॉजी संपलेल्या आहेत, असं नाही. तशी कुठलीही आयडियॉलॉजी संपत नाही. फार तर तिची पिछेहाट होते.
बर्लिनची भिंत पडली, तेव्हा आता आयडियॉलॉजीचा अंत झाला आहे, अशी जगभर चर्चा सुरू झाली. फ्रान्सिस फुकुयामा यांनी तर ‘द एंड ऑफ द हिस्ट्री अँड द लास्ट मॅन’ असं पुस्तकच लिहिलं; पण त्याआधी डॅनिअल बेल यांनी १९५०मध्ये ‘द एंड ऑफ आयडियॉलॉजी - ऑन द एक्झॉशन ऑफ पॉलिटिकल आयडियाज इन द फिफ्टीज’ असं पुस्तक लिहून आयडियॉलॉजीचा अंत या विचाराला सुरुवात केली होती. या पुस्तकांवर जगभर खूप चर्चा झाली. त्यावर अनेक लेख, पुस्तकं लिहिली गेली. सध्या भांडवलवादाची सरशी आणि साम्यवादाची पिछेहाट झालेली दिसते. मध्यमवर्ग हा भांडवलदारांचा सांगाती असतो. आर्थिक उदारीकरणाच्या गेल्या २५ वर्षांत मध्यमवर्गाला केंद्रस्थानी ठेवूनच भारतीय राजकारण घडतं-बिघडतं आहे. हिंदुत्ववादाचा अश्व मोदी सरकारच्या कृपेनं चौखूर उधळला आहे, त्यामागे हाच मध्यमवर्ग आहे. त्या वावटळीत भारतातील सुशिक्षित बुद्धिवादी, बुद्धिजीवी, लेखक-पत्रकार असे सारेच सापडले आहेत. त्यांच्याकडे, “पार्टनर, तुम्हारी पॉलिटिक्स क्या है?” या प्रश्नाचं उत्तर मागायलाच हवं.  

No comments:

Post a Comment