Tuesday, June 9, 2015

वाङ्मयाभिरुची कुपोषित होऊ द्यायची नसेल तर...

परवा मुंबईत ‘सत्यकथा’चे संपादक राम पटवर्धन यांचा पहिला स्मृतिदिन साजरा झाला. मराठी साहित्यक्षेत्रातील काही निवडक मान्यवर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. त्यात ‘सत्यकथा’ आणि ‘राम पटवर्धन’ या ‘अभिन्न समीकरणा’ला पुन्हा उजाळा दिला गेला, त्यांच्या आठवणी जागवल्या गेल्या. पण आज मराठीतल्या सर्वच प्रकारच्या वाङ्मयीन नियतकालिकांना ओहोटी लागलेली दिसते. ही नियतकालिके नित्यनेमाने प्रकाशित होत आहेत; पण त्यांची चर्चा मात्र समाजात होताना दिसत नाही. त्यातील साहित्याची फारशी दखलही घेतली जात नाही आणि त्यांच्या अंकाचीही फारशी कुणी वाट पाहताना दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाङ्मयाभिरुचीविषयी आणि साहित्याभिरुचीविषयी प्रश्न निर्माण झाला आहे. त्या कुपोषित होऊ लागल्या आहेत. आजघडीला तरी यावर काही उपाय सुचवला जातो आहे, तसा प्रयत्न कुणाकडून केला जातो आहे, अशी स्थितीही नाही. पण एकेकाळी महाराष्ट्रात वाङ्मयीन नियतकालिकांची अतिशय समृद्ध परंपरा होती. त्या वाङ्मयाभिरुचीचे विहंगावलोकन केले, तरी बरेच काही हाती लागू शकते.
१८४० मध्ये ‘दिग्दर्शन’ हे मराठीतले पहिले मासिक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. याच वर्षी ‘ज्ञानचंद्रोदय’ हे दुसरे नियतकालिक सुरू झाले. जुनी मराठी कविता मुद्रित स्वरूपात प्रकाशित करणे, एवढ्याच हेतूने ते पांडुरंग बापू जोशी-पावसकर यांनी सुरू केले होते. जांभेकर यांच्या ‘दिग्दर्शन’चे अनुकरण करणारी बरीचशी मासिके १८४० ते १८६० या काळात निघाली; पण त्यातील बहुतेक अल्पजीवी ठरली. १८४० ते १९०० काळात ११५ नियतकालिके सुरू झालेली दिसतात. त्यातली काही लवकरच बंद पडली. १८६० मध्ये ‘सर्वसंग्रह’, १८६७ मध्ये ‘विविध ज्ञानविस्तार’ सुरू झाले. विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे ‘निबंधमाला’ १८७४ मध्ये सुरू झाले. मराठी साहित्यात ‘निबंधमाला’ने क्रांती केली, असे म्हटले जाते. चिपळूणकरांनी ‘निबंधमाला’च्या माध्यमातून महाराष्ट्राची अभिरुची घडवण्याचे काम काही प्रमाणात केले, असे म्हणायला हरकत नाही. ‘केरळकोकीळ’ हे मासिक १८८६ मध्ये सुरू झाले. ते १९१५ पर्यंत प्रकाशित होत राहिले. हे महाराष्ट्राबाहेर असलेल्या कोचीन येथून प्रकाशित होत होते. का. र. मित्र यांचे ‘मासिक मनोरंजन’ १८९५ मध्ये सुरू झाले. (त्यांनीच १९०९ मध्ये मराठीतला पहिला दिवाळी अंक प्रकाशित केला.) आधुनिक मराठी वाङ्मयाचे पहिले व्यासपीठ म्हणता येईल, असे त्याचे स्वरूप होते. लघुकथेचा पूर्वज म्हणता येईल, अशा गोष्टींना मित्र यांनी ‘मनोरंजन’मधून सुरुवात केली. त्याला महाराष्ट्रात भरपूर लोकप्रियता मिळाली. मनोरंजनच्या ४० वर्षांत मराठीतील जवळपास सर्व तत्कालीन नामवंत लेखकांनी ‘मासिक मनोरंजन’मधून लिहिले. तत्कालीन महाराष्ट्राच्या विद्वत्तेचा आणि रसिकतेचा संगम या मासिकात पाहायला मिळतो. २० व्या शतकाच्या पहिल्या २५ वर्षांतले मराठीतले सर्वश्रेष्ठ मासिक म्हणजे ‘मासिक मनोरंजन’. १९२६ नंतरचा काळ हा वाङ्मयीन नियतकालिकांचा काळ आहे. ‘नवयुग’, ‘रत्नाकर’, ‘यशवंत’, ‘प्रतिभा’, ‘पारिजात’, ‘प्रगति’, ‘ज्योत्स्ना’, ‘विहंगम’, ‘विश्ववाणी’, ‘वागीश्वारी’ या नियतकालिकांनी मराठी लघुकथेच्या विकासाला मदत केली. नंतरच्या काळात ‘अभिरुची’, ‘सत्यकथा’, ‘छंद’, ‘आलोचना’, ‘ललित’, ‘मसाप पत्रिका’, ‘प्रतिष्ठान’, ‘हंस’, ‘अनुष्टुभ’, ‘कवितारती’, ‘पंचधारा’ यांसारख्या अनेक नियतकालिकांनी मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले.
त्यातील ‘सत्यकथा’ हे १९३३ ते १९८२ या काळात प्रकाशित झालेले मासिक हा मराठी साहित्यातील मानदंड मानला जातो. श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन हे दोन दिग्गज ‘सत्यकथा’चे संपादक. ‘सत्यकथा’ने नवकथा, नवकविता, नवसमीक्षा आणि ललितगद्य यांच्याबाबतीत मराठी साहित्यात भरीव असे काम केले. साठच्या दशकातली मराठीमधली नवकथेची चळवळ ‘सत्यकथा’मधूनच सुरू झाली. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, व्यंकटेश माडगूळकर हे नवकथेचे प्रवर्तक. त्यांचे सर्वाधिक लेखन ‘सत्यकथा’मधून प्रकाशित झाले.

‘सत्यकथा’मध्ये फक्त ‘स्टॉलवर्ट’ लेखक लिहीत होते असे नाही. भागवत-पटवर्धन यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांत राहणाऱ्या लेखकांचा शोध आपल्यापरीने घेतला. त्यांच्या साहित्याला ‘सत्यकथा’मध्ये जागा दिली. त्यांना प्रोत्साहन दिले. ‘सत्यकथा’ हे केवळ वाङ्मयीन मासिक नव्हते, ती वाङ्मयीन चळवळ होती. साहित्य, चित्रकला, रंगभूमी, चित्रपट, संगीत असा विविध क्षेत्रातील मंडळी ‘सत्यकथा’शी जोडली गेलेली होती. भागवत-पटवर्धन या संपादकद्वयींनी ते जाणीवपूर्वक केले होते. केवळ मजकुराचे संपादन हे संपादकाचे काम नसते तर माणसांचेही संपादन त्याने निगुतीने आणि चाणाक्षपणे करायचे असते. ‘सत्यकथा’च्या भागवत-पटवर्धन या जोडगोळीने तेही मोठ्या प्रमाणावर केले आणि हेच ‘सत्यकथा’चे सर्वात मोठे बलस्थान होते.
‘सत्यकथा’ हा मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह होता. त्यात सामील न होता, तिच्या प्रस्थापितपणाला आव्हान देत, ‘सत्यकथा’ला पर्याय म्हणून १९५५ ते १९७५ या काळात लघुनियतकालिकांची चळवळ सुरू झाली. ‘शब्द’, ‘अथर्व’, ‘आत्ता’, ‘भारुड’, ‘फक्त’, ‘येरू’, ‘वाचा’, ‘अबकडई’ अशी विविध लघुनियतकालिके याच चळवळीतली. दुसऱ्या महायुद्धानंतर जगभर व्यवस्थाविरोधाच्या संघर्षातून ज्या विविध चळवळी निर्माण झाल्या, त्यातला महाराष्ट्रातला, मराठी साहित्यातला आविष्कार म्हणजे लघुनियतकालिकांची चळवळ होय. या चळवळीने चाकोरीबाहेरच्या साहित्याला मोठे व्यासपीठ मिळवून दिले. साहित्यातली लेखन-प्रकाशन यांच्या मिरासदारीला आव्हान दिले. त्यांच्या हस्तिदंती मनोऱ्यालाही काही प्रमाणात भगदाडे पाडली. त्यामुळे या लघुनियतकालिकांचे मराठी साहित्यावर काही परिणाम नक्कीच झाले. लघुनियतकालिकांचा प्रयोग तसा अल्पजीवी ठरला, पण त्यातून डॉ. भालचंद्र नेमाडे, भाऊ पाध्ये, अरुण कोलटकर, तुळशी परब, वसंत दत्तात्रेय गुर्जर, मनोहर ओक, नामदेव ढसाळ, अरुण खोपकर, चंद्रकांत खोत, चंद्रकांत पाटील, अशोक शहाणे यांसारखे शैलीदार, आशयसंपन्न आणि कसदार लेखन करणारे लेखक पुढे आले.
‘अंतर्नाद’, ‘मसाप पत्रिका’, ‘ललित’, ‘कवितारती’, ‘पंचधारा’, ‘अनुष्टुभ’ ही मराठी नियतकालिके अजूनही प्रकाशित होत आहेत, पण या सर्व नियतकालिकांचे स्वरूप आता मरगळले आहे. सध्या आवर्जून वाचावे, नाव घ्यावे, ज्याचा दबदबा आहे असे म्हणावे असे एकही वाङ्मयीन नियतकालिक मराठीमध्ये नाही. ‘अंतर्नाद’ने सुरुवातीच्या काळात त्यादृष्टीने काहीएक चमक दाखवली होती. ‘प्रतिसत्यकथा’ असेही त्याचे वर्णन केले गेले, पण त्याच्या मर्यादा लवकरच उघड झाल्या. अलिकडच्या काळात ‘अभिधा’, ‘अभिधानंतर’, ‘नवाक्षर दर्शन’, ‘खेळ’, ‘ऐवजी’, ‘शब्दवेध’, ‘मुक्त शब्द’, ‘इत्यादी’, ही नियत-अनियतकालिके सुरू झाली आहेत, पण त्यांच्या वाङ््मयीन योगदानाची दखल घेण्यासाठी आणखी काही काळ जाऊ द्यावा लागेल. त्यामुळे सध्यातरी मराठीमध्ये वार्षिक दिवाळी अंक सोडले तर भरीव आणि ठोस वाङ्मयीन योगदान देणारे दुसरे कुठलेही नियतकालिक नाही आणि ही परिस्थिती फारशी स्पृहणीय नाही.
प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी आपल्या Patriots and Partisans या पुस्तकात Economic and Political Weeklyवर दीर्घ लेख लिहिला आहे. त्याच्या सुरुवातीला त्यांनी एच. एल. मेंकेन या अमेरिकन पत्रकार-सांस्कृतिक समीक्षकाचे अवतरण दिले आहे. मेंकेन म्हणतो - A magazine is a despotism or it is nothing. One man and one man alone must be responsible for all its essential contents. कुठलंही नियतकालिक हे एका माणसाच्याच खांद्यावर उभे असते आणि त्यामुळेच ते काहीएक भरीव कामगिरी करू शकते. स्वत:च्या व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून, निरलसपणे आणि असिधाराव्रताने काम केले, तर मराठी वाङ््मयाच्या नव्या पायाची उभारणी करण्यात, त्यासाठीचे नवे लेखक घडवण्यात किती आणि कशा प्रकारची कामगिरी करता येते, याचा आदर्श वस्तुपाठ राम पटवर्धन यांनी ‘सत्यकथा’च्या माध्यमातून घालून दिला. त्यामुळेच तर त्यांचे पुन्हा पुन्हा, दरवर्षी स्मरण करणे ही साहित्यप्रेमींची, वाङ्मयीन नियतकालिकांच्या संपादकांची आणि मराठी लेखकांची सांस्कृतिक जबाबदारी आहे. ती त्यांनी निभवायला हवी. महाराष्ट्राची वाङ्मयाभिरूची आणि साहित्याभिरूची कुपोषित होऊ द्यायची नसेल तर राम पटवर्धन यांच्या स्मरणाला, त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याला पर्याय नाही.

No comments:

Post a Comment