Monday, April 12, 2010

विनय हर्डीकर-मराठीतले जॉर्ज ऑर्वेल?


कार्यकर्ता, पत्रकार, प्राध्यापक आणि लेखक म्हणून लक्षणीय काम केलेल्या विनय हर्डीकर यांनी नुकतीच आपल्या वयाची 60 वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने त्यांच्या मित्रपरिवाराने पुण्यात चार दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याचा पूर्वार्ध मागच्या महिन्यात झाला. 10 आणि 11 एप्रिलला झाला. त्यानिमित्ताने...(दै. सकाळ, १२ फेब्रुवारी २०१०) 
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, 


विनय हर्डीकर अतिशय मोजकं लिहितात. वर्षाला एखाद्‌ दुसरा लेख. त्यामुळे गेल्या 30-32 वर्षांत त्यांची अवघी चारच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वयाच्या 29 व्या वर्षी लिहिलेले 'जनांचा प्रवाहो चालला' हे त्यांचे पहिलेच पुस्तक चांगलेच गाजले होते. आणीबाणीच्या विरोधात लिहिलेल्या या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारने आधी पुरस्कार जाहीर करून नंतर तो नाकारला होता. बा. सी. मर्ढेकरांच्या कवितेवरील 'कारुण्योपनिषद' (1999) साहित्य-समाज क्षेत्रातील मान्यवरांविषयीच्या लेखांचे "श्रद्धांजली' (1997) आणि अलीकडचे 'विठोबाची आंगी' (2005) ही उरलेली तीन पुस्तके.
'माझं लेखन हे फर्स्ट पर्सन डॉक्‍युमेंटरी आहे' असे हर्डीकर स्वतःच्या लेखनाविषयी म्हणतात. कारण स्वतःचे अनुभवसिद्ध विश्‍व (आणि वाचन) हा त्यांच्या लेखनाचा गाभा असतो. हर्डीकरांचे अनुभवविश्‍वही तसे खूपच विस्तृत आणि वैविध्यपूर्ण आहे. साहित्य (मराठी-हिंदी-इंग्रजी), राजकारण, समाजकारण, सामाजिक चळवळी-आंदोलने, शास्त्रीय संगीत अशा क्षेत्रांत त्यांना कमालीचा रस आहे आणि त्यांची उत्तम जाणही.
ज्ञानप्रबोधिनी, न्यू क्वेस्ट, इंडियन एक्‍स्प्रेस, ग्रामायण, शेतकरी संघटना, देशमुख आणि कंपनी, रानडे इन्स्टिट्यूट (पुणे विद्यापीठ) आणि सध्या फ्लेम हे पुण्यातील खासगी विद्यापीठ, असा विनय हर्डीकरांचा आजवरचा प्रवास आहे. या प्रत्येक ठिकाणी ते स्वतःहून गेले आणि मनासारखं काम करता येत नाही हे लक्षात आल्यावर सुरुवातीच्या पाच ठिकाणांहून स्वतःहून बाहेर पडले.
हर्डीकरांनी 'इंडियन एक्‍स्प्रेस' या आघाडीच्या इंग्रजी दैनिकात तब्बल आठ वर्षे शोधपत्रकारिता केली. वस्तुनिष्ठ आणि समतोल बातमी हाच धर्म मानून त्यांनी पत्रकारिता केली. एका बातमीसाठी ते किती यातायात करीत याविषयीचा एक लेख त्यांच्या 'विठोबाची आंगी' या पुस्तकात आहे. तो प्रत्येकाने (आणि पत्रकारांनीही) आवर्जून वाचावा असा आहे. पाच-सात वर्षांपूर्वी त्यानी लिहिलेल्या 'सुमारांची सद्दी' या दोन भागातील लेखाचे बरेच कौतुक झाले होते; परंतु हा लेख लिहून झाल्यावर त्याचे 'सुमारांची सद्दी' हे शीर्षक सुचायला मात्र त्यांना तब्बल एक वर्ष लागले. 'प्रमोद महाजन-एक चिन्हांकित प्रवास' हा त्यांचा 'साप्ताहिक सकाळ'च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेखही महाजनांवर लिहिल्या गेलेल्या लेखांतील सर्वोत्कृष्ट लेख होता. नव्वदीनंतरच्या काळात 'विचारसरणीचा अंत' आणि 'मार्क्‍सवादाचा अंत' या संकल्पना लोकप्रिय होत असताना हर्डीकरांनी लिहिलेला 'एण्ड ऑफ आयडिऑलॉजी - एक मतलबी भ्रम' हा लेखही असाच मूलगामी आणि त्यांच्या व्यासंगाची साक्ष पटवणारा होता. अगदी अलीकडे त्यांनी लिहिलेले दोन लेख- पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक अप्पा पेंडसे आणि समाजवादी विचाराचे नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्याविषयीचे- असेच उत्तम लेखाचे नुमने ठरावेत! हर्डीकरांच्या लेखांची अशी मोठी यादीच देता येईल, पण आणखी एकच उदाहरण देतो- "भारतातल्या कोणत्याही पक्षाचे कॉंग्रेसीकरण झाल्याशिवाय त्याला सत्ता मिळवता येत नाही" या आपल्या एकाच विधानाच्या स्पष्टीकरणासाठी त्यांनी साधना साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीचीही बरीच चर्चा झाली होती.
राजकीय-सामाजिक क्षेत्रातील प्रश्‍नांविषयी योग्य भूमिका असणारा, आपल्या भाषणांतून, लेखनातून तिचा आग्रह धरणारा, थोडक्‍या, 'करेक्‍टिव्ह फॅक्‍टर म्हणून रोल करण्याची' हर्डीकरांची भूमिका असते. मराठीतल्या बहुतांशी साहित्यिकांना राजकीय भूमिकांचे वा आयडिऑलॉजीचे वावडे असले, तरी ते हर्डीकरांना अजिबात नाही. आयडिऑलॉजी मानणारे लेखन हे कसदार असते, असे मराठीतल्या ललित साहित्याच्या बाबतीत त्यांनी (आपल्या पीएच.डी. प्रबंधाच्या निमित्ताने) मांडून दाखवण्याचाही प्रयत्न केला होता, पण दुर्दैवाने तो पूर्ण होऊ शकला नाही.
विनय हर्डीकर हा काहीसा कलंदर माणूस आहे. काही माणसं विनाकारण स्वतःविषयी गैरसमज निर्माण करून ठेवतात; तर काही माणसांबद्दल इतर लोक गैरसमज निर्माण करून घेतात. हर्डीकर या दोन्ही प्रवादांचे धनी आहेत आणि याची त्यांना स्वतःलाही चांगली जाणीव आहे, पण तरीही 'आपण बुवा असे आहोत आणि असेच राहू' हा त्यांचा बाणा आहे. त्यामुळे हर्डीकर इतरांना हेकेखोर वाटतात; तर त्यांना आपण बाणेदार आहोत असे वाटत असावे. हा त्यांचा बाणेदारपणा वयाच्या साठीनंतरही फारसा कमी झालेला नाही.
मूळचा सामाजिक कार्यकर्त्याचा पिंड, पत्रकाराची शोधक दृष्टी, चौफेर भ्रमंती आणि जोडीला अनेकविध विषयांचा व्यासंग-अभ्यास आणि प्रत्येक विषयावरची स्वतःची खास ठाम आणि परखड मतं, यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची अनेकांना भुरळ पडते. हर्डीकरांशी मैत्री असणं हा बौद्धिकदृष्ट्या फार आनंदाचा भाग असला, तरी ती सहज परवडणारी नसते. त्यांच्या वागण्या-बोलण्याला एक तीक्ष्ण आणि तिखट धार असते. अघळपघळपणा वा शिळोप्याच्या गप्पा या गोष्टी त्यांचा शब्दकोषात नाहीत.
माणूस म्हणून विनय हर्डीकर काहीसे तऱ्हेवाईक असले, तरी लेखक म्हणून मात्र अतिशय समतोल, तारतम्यपूर्ण आणि समंजस आहेत. त्यांचं बोलणं आणि लिहिणं यात कमालीचं साम्य आहे, त्यामुळे एकदा कागदावर उतरलेला मजकूर हाच त्यांचा अंतिम खर्डा असतो. त्यात काही बदल करण्याची गरज त्यांना पडत नाही. लेखनाबाबतचा त्यांचा हा शिस्तबद्ध आणि काटेकोरपणा वाखाणण्याजोगा आहे. (हर्डीकरांच्या विचार आणि व्यवहारातही असंच साम्य आहे).
तर असा हा स्वतःच्याच "टर्म ऍण्ड कंडिशन'वर जगणारा माणूस. त्यांच्या बेशिस्तीतही एक वेगळ्या प्रकारची शिस्त असते. गेली काही वर्षे विनय हर्डीकर 'मला कुणी मराठीतला जॉर्ज ऑर्वेल म्हटलं तर आवडेल' असं जाहीरपणे बोलून दाखवत आहेत. त्यांचा हा दावा कुणी खोडून काढायचा प्रयत्न केला नसला, तरी ते खरोखरच 'मराठीतले जॉर्ज ऑर्वेल' आहेत का? जॉर्ज ऑर्वेल आणि विनय हर्डीकर यांच्यात 'राजकीय बांधिलकी मानून लेखन करणे' हे अतिशय लक्षणीय साम्य आहे. तेव्हा हर्डीकरांच्या या विधानाचा मराठीच्या प्राध्यापक-समीक्षकांनी अभ्यास करण्याची गरज आहे. पण हर्डीकरांचे लेखन पेलवण्याजोगे समीक्षक मराठीत आहेत का हाही प्रश्‍नच आहे.

3 comments:

  1. विनय हर्डिकरांशी संपर्क साधायचा असला तर ? त्यांचा काही ब्लॉग आहे का ? किंवा ई-मेल !
    माझे काही ब्लॉग असे :
    http://naaradaachi-kal.blogspot.com/2010/04/blog-post_16.html
    http://www.blogger.com/
    http://thebhalerao.blogspot.com/2010/03/blog-post_04.html
    http://arunodayazala.blogspot.com/2010/03/blog-post_05.html

    ReplyDelete
  2. राम,
    राम, राम! दोन्ही लेख म्हणजे चांगला लेख जोखा आहे. शहाणेन सारखी माणसं आता दुर्मिळ प्रजातीतली माणसं ठरताहेत.
    Save tiger ! Preserve wildlife!

    ganesh visputay

    ReplyDelete
  3. छान माहिती मिळाली.

    ReplyDelete