Wednesday, March 30, 2011

अपप्रवृत्तीः माध्यमातल्या आणि समाजातल्या


मराठी पत्रकारितेतल्या ज्या काही मोजक्या संपादकांकडे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उत्तमप्रकारे लेखन करण्याची हातोटी आहे, त्यात डॉ. अरुण टिकेकर आणि कुमार केतकर यांचा प्राधान्याने समावेश करावा लागेल. खरे तर या दोन संपादकांची मराठी वर्तमानपत्रातली कारकीर्द आणि त्यांची पत्रकारिता हा स्वतंत्र अभ्यासाचा आणि एका स्वतंत्र पुस्तकाचाही विषय आहे.


डॉ. अरुण टिकेकरांनी जवळपास दीड दशक मराठी वर्तमानपत्रांत संपादक म्हणून काम केले असले तरी त्यांचा मूळ पिंड हा अभ्यासक-संशोधकाचाच राहिला आहे. पत्रकारितेत येण्याआधी त्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया, मुंबई’ आणि ‘अमेरिकन लायब्ररी ऑफ काँग्रेस, दिल्ली’ या दोन संस्थांमध्ये जवळजवळ दीड दशक काम केले होते. त्याही आधी त्यांनी इंग्रजी विषयाचे पाच वर्षे अध्यापनही केले. तर मागील पाच वर्षापासून टिकेकर ‘एशियाटिक लायब्ररी’ या तब्बल दोनशे वर्षाचा इतिहास असलेल्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. टिकेकरांची आजवर मराठीमध्ये ‘जन-मन’, ‘स्थलकाल’, ‘कालमीमांसा’, ‘सारांश’, ‘अस्वस्थ महाराष्ट्र’, ‘ऐसा ज्ञानसागरू : बखर मुंबई विद्यापीठाची’ अशी बारा-तेरा पुस्तके प्रकाशित झाली आहेत; तर इंग्रजीमध्ये ‘द किंकेड-टू जनरेशन्स ऑफ अ ब्रिटन फॅमिली इन द इंडियन सिव्हिल सव्‍‌र्हिस’, ‘द क्लोस्टर्स पेल-अ बायोग्रफी ऑफ द यूनिव्हर्सिटी ऑफ मुंबई’, ‘रानडे : द रेनेसांस मॅन’ आणि ‘मुंबई डी-इंटेलेक्च्युलाईज्ड : राइज अँड डीक्लाईन ऑफ अ कल्चर ऑफ थिंकिंग’ ही चार इंग्रजी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. नुकतेच त्यांचे पुण्याच्या रोहन प्रकाशनाने ‘पॉवर, पेन अँड पॅट्रोनेज : मीडिया, कल्चर अँड मराठी सोसायटी’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे.


गेल्या वीस वर्षात टिकेकरांनी केलेली भाषणे आणि इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये लिहिलेल्या लेखांचा या संग्रहात समावेश केला आहे. या पुस्तकाचे विषया- नुसार टिकेकरांनी चार विभाग केले आहेत. पहिल्या, ‘मीडिया’ या विभागात प्रसारमाध्यमांविषयीच्या दहा लेख-भाषणांचा समावेश आहे. आणि हा या पुस्तकातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे असेही म्हणायला हरकत नाही. अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमांविषयी बरीच उलटसुलट चर्चा होत आहे. वर्तमानपत्रांच्या विश्वासार्हतेला गालबोट लागावे, अशा घटना अलीकडच्या काळात वाढत चालल्या आहेत. पत्रकारितेची तत्त्वे आणि नीतिमूल्ये जपली जाणे लोकशाही असलेल्या देशात नितांत गरजेचे असते. कारण प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जातात. पण अलीकडच्या काळात वृत्तवाहिन्यांचा उच्छाद आणि काही पत्रकार-संपादकांची न्यायाधीश होण्याची महत्त्वाकांक्षा, पत्रकारितेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. या पार्श्वभूमीवर टिकेकरांनी आपल्या लेखनातून राज्यकर्ते, पत्रकार, पत्रकारिता, समाज-संस्कृती अणि नीतिमूल्ये यांविषयी उपस्थित केलेले प्रश्न मूलभूत आणि विचारणीय आहेत.


दुस-या ‘कल्चर’ या विभागात महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयीचे सोळा लेख आहेत. त्यातील शेवटचे सहा लेख मुंबई विद्यापीठ आणि त्याविषयीच्या वादांचा समाचार घेणारे आहेत. 1857 साली स्थापन झालेले, भारतातले दुसरे विद्यापीठ असा मान असणाऱ्या आणि न्या. तेलंग यांच्यापासून न्या. पी. बी. गजेंद्रगडकर अशी वैभवशाली परंपरा असलेल्या मुंबई विद्यापीठामधला राजकारण्यांचा वाढता हस्तक्षेप, कुलगुरू निवडीचा घोळ, रोहिंग्टन मेस्त्रीच्या पुस्तकावरून सेनेने केले आकांडतांडव या घटनांचा टिकेकरांनी संयत पण परखडपणे समाचार घेतला आहे. ‘द डेथ ऑफ मुंबई यूनिव्हर्सिटी’ हा लेख तर आवर्जून वाचावा असा आहे. मुंबई विद्यापीठाचा अलीकडच्या काळात चाललेला खेळखंडोबा टिकेकरांनी अतिशय नेमकेपणाने या लेखांमधून टिपला आहे.


तिस-या विभागाचे नाव आहे, ‘द मराठी सोसायटी’. यात एकंदर बारा लेख आहेत. त्यातून राज ठाकरे, मराठी अस्मितेचे राजकारण, मुंबईची मिलकडून मॉलकडे झालेली वाटचाल आणि मराठा आरक्षणाची मागणी व त्यावरून केले जाणारे राजकारण यांचा आढावा घेतला आहे.
चौथ्या ‘फादर फीगर्स’ या विभागात जमशेटजी जीजीभाय, श्री. पु. भागवत, य. दि. फडके, बाबा आमटे, ग. प्र. प्रधान, गंगाधर गाडगीळ, विंदा करंदीकर, विजय तेंडुलकर, सुधीर फडके आणि टी. एन. शानभाग यांना आदरांजली वाहणारे लेख आहेत. हे लेख बहुधा आयत्यावेळची गरज म्हणून लिहिलेले असल्याने ते तीन ते पाच पानांचेच आहेत. पण त्यातूनही टिकेकरांनी संबंधित व्यक्तीच्या योगदानाविषयी अतिशय नेमकेपणाने लिहिले आहे. 29 मे 2010 रोजी ग. प्र. प्रधान यांचे निधन झाले. त्यानंतर पाच जूनच्या साधना साप्ताहिकात टिकेकरांनी प्रधान मास्तरांविषयी ‘साधुमुखे समाधान’ हा छोटासा लेख लिहिला होता. पण नंतर त्यांना मीनू मसानी यांच्या ‘फ्रीडम फर्स्ट’ या मासिकाच्या जुलैच्या अंकात प्रधान मास्तरांविषयी ‘द डेमॉक्रॅटिक सोशॅलिस्ट’ हा लेख लिहिला. तोच इथे पुनर्मुद्रित केला आहे. या लेखात ते म्हणतात, He was every inch a professor and loved his vocation till the end. Whether in the profession of teaching or in politics or as a public speaker or a social critic, he loved to educate.श्री. पु. भागवत, य. दि. फडके, विंदा करंदीकर यांच्याबद्दलचे लेखही असेच उत्तम झाले आहेत. तेंडुलकरांकडे कुठलीही फिलॉसफी नसली तरी ते उदारमतवादी होते आणि वेगवेगळ्या वेळी त्यांनी वेगवेगळ्या वैचारिक भूमिका घेतल्या म्हणून ते विचारवंत होते, हे टिकेकरांनी त्यांच्यावरच्या लेखात मांडले आहे, पण त्याचा अधिक विस्तार करायला हवा होता. कारण टिकेकरांचा मुद्दा बरोबर असला तरी त्याचे स्पष्टीकरण त्यांच्या लेखात मिळत नाही. पण ते स्पष्टीकरण त्यांनी तेंडुलकरांवर ‘सकाळ’मध्ये लिहिलेल्या ‘विचार-कलहांचा अग्रनायक’ या लेखात मिळते. असा थोडाफार फरक या विभागातील लेखांत झाला आहे.


थोडक्यात या पुस्तकात टिकेकरांनी प्रसारमाध्यमे आणि मराठी समाजातल्या अपप्रवृतींवर बोट ठेवले आहे. काही राजकीय आणि सांस्कृतिक शक्तींनी मराठी समाजाला जो संकुचित आणि प्रतिगामी बनवण्याचा विडा उचलला आहे, त्यातले धोके टिकेकरांनी दाखवून दिले आहेत. त्याचबरोबर हा संग्रह आदर्श पत्रकारिता कशी करावी याचेही उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे हे पुस्तक तरुण पत्रकारांनी आणि इतरांनी आवर्जून वाचावे असे आहे. जाता जाता एक मुद्दा आवर्जून नोंदवायला हवा. तो म्हणजे टिकेकरांच्या पत्रकारितेचा गाभाच मुळी तारतम्यपूर्ण विचार कसा करावा आणि तो कसा मांडावा हा राहिला आहे. संयत भाषेतही आपले म्हणणे किती ठामपणे आणि बिनतोडपणे मांडता येते याचे अलीकडच्या काळातले उत्तम उदाहरण म्हणून टिकेकरांच्या लेखनाचा दाखला देता येईल. यादृष्टीने त्यांची ‘सारांश’, ‘तारतम्य-खंड 1 ते 5’ आणि ‘अस्वस्थ महाराष्ट्र-खंड 1 व 2’ ही पुस्तकेही अभ्यासण्यासारखी आहेत. विशेषत: समकालीन समाजाविषयीचे सात निबंध असलेले ‘सारांश’ आणि ‘अस्वस्थ महाराष्ट्र-खंड 1 व 2’ ही दोन पुस्तके बारकाईने समजून घेतल्याशिवाय टिकेकरांच्या विचारशैलीशी समरस होता येणार नाही.

No comments:

Post a Comment