Thursday, December 22, 2011

त्या नांव ग्रंथ

वर्षाची अखेर आणि नववर्षारंभ हा काळ साहित्यक्षेत्रातील चैतन्याचा असतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षांची निवड, साहित्य अकादमीचे पुरस्कार, दमाणी पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशनचे पुरस्कार, 26 जानेवारी रोजी जाहीर होणारे पद्मसन्मान मागेपुढे जाहीर होतात. साहित्य अकादमीचे पुरस्कार तर 24 भारतीय भाषांतील लेखकांना दिले जातात. नुकत्याच जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये 20 भाषांचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. आठ पुरस्कार कवितासंग्रहांना, सात कादंब-यांना, तीन निबंधांना, एक कथासंग्रहाला, एक इतिहासाला, एक नाटकाला आणि एक आत्मचरित्राला जाहीर झाला आहे. म्हणजे, सर्जनशील लेखनाचाच पुरस्कारांसाठी प्रामुख्याने विचार केला गेला आहे. निवड समितीच्या सदस्यांमध्ये प्रामुख्याने सर्जनशील लेखकच असतात, हे याचे कारण असावे. त्यामुळेच यंदा रामचंद्र गुहा यांच्या इंडिया आफ्टर गांधीया इतिहासलेखनाला मिळालेला पुरस्कार सर्वार्थाने वेगळा ठरतो. भारतीय भाषांमध्ये वैचारिक लेखन होतच नसावे किंवा होत असेल तर ते पुरस्काराच्या गुणवत्तेचे नसावे! मराठीमध्ये तर गेली काही वर्षे वैचारिक लेखन म्हणजे गांधी, आंबेडकर, फुले, शाहू, टिळक, भांडवलवाद-समाजवाद, जातिवास्तव याच विषयावरील लेखन. म्हणजे भूतकाळाचंच पुनर्मूल्यांकन करण्यात सारी ऊर्जा खर्च केली जाते. आजच्या समाजवास्तवाचा वेध घेणारी, आजच्या समस्या-प्रश्नांची उकल करणारी पुस्तके मराठी आणि भारतीय भाषांमध्ये लिहिली जात नाहीत. एखाद्या पुस्तकाला वा लेखकाला पुरस्कार दिला जातो, याचा अर्थच असा असतो की, ते पुस्तक, तो लेखक  आणि त्याचा विचार आजच्या समाजासाठी उपयोगाचा आहे. इतकी साधी अपेक्षाही राष्ट्रीय पातळीवरच्या पुरस्कारांमधूनही पूर्ण होताना दिसत नाही. आज कधी नव्हे इतकी वैचारिक मंथनाची-घुसळणीची भारतीय समाजाला नितांत गरज आहे. कारण, त्यातूनच समाजाला आपल्यापुढील आणि देशापुढील आव्हानांना समजून घेता येते. त्यांचा योग्य अन्वयार्थ लावता येतो. सामाजिक उत्तरदायित्वासाठी भूतकाळाचा डिंडिम वाजवून निभत नाही. त्यासाठी वर्तमानाची पालखी उचलावी लागते. ही जबाबदारी सुशिक्षित आणि बुद्धिवादी वर्गावरच असते. हा वर्ग सर्वकाळ संख्येने छोटाच असतो. त्याला उद्देशूनच तर कविवर्य केशवसुतांनी म्हटले आहे की, ‘प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणीत तयात खोदा, निजनामे वरीती नोंदा’. आणि केशवसुतांच्याही कितीतरी आधी समर्थ रामदासांनी म्हणून ठेवले आहे, जेणें धारिष्ट चढे, जेणें परोपकार घडे, जेणें विषयवासना मोडे, त्या नांव ग्रंथ’.

1 comment:

  1. 100% agreed with "मराठीमध्ये तर गेली काही वर्षे वैचारिक लेखन म्हणजे गांधी, आंबेडकर, फुले, शाहू, टिळक, भांडवलवाद-समाजवाद, जातिवास्तव याच विषयावरील लेखन. म्हणजे भूतकाळाचंच पुनर्मूल्यांकन करण्यात सारी ऊर्जा खर्च केली जाते. आजच्या समाजवास्तवाचा वेध घेणारी, आजच्या समस्या-प्रश्नांची उकल करणारी पुस्तके मराठी आणि भारतीय भाषांमध्ये लिहिली जात नाहीत."

    u made a perfect point there

    ReplyDelete