Monday, March 12, 2012

कर्म करोनि म्हणती साधू!

 मराठी साहित्यिक आणि सार्वजनिक चारित्र्य : एक मीमांसा ( भाग 3)
- अरुण टिकेकर
लेखांक : तीन

 टिकेकर यांनी लोकमतच्या मंथन (11 March.12) या रविवार पुरवणीत लिहिलेला हा लेख.
एका वृत्तपत्रानं टीका केली म्हणून ‘मी वृत्तपत्रं वाचत नसतो’ असं मानभावीपणानं म्हणणारा लेखकराव नवी ‘क्रांतिकारक’ कादंबरी प्रसिद्ध होताना मोठय़ा वृत्तपत्रांनाच नव्हे, तर लुंग्या-सुंग्या वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना हस्ते-परहस्ते आमंत्रणं देत त्यांच्यासाठी तासन्तास मुलाखती देऊ लागतो. ही अशी घटना निष्कपटी, निरपराधी निश्‍चितच नाही. आजच्या मराठी सारस्वतात ती प्रातिनिधिक असल्यानं ती लक्षणीय आणि दखलपात्र ठरते. कारण परमताचा आदर करण्याच्या लोकशाही मूल्याची जी अपेक्षा साहित्यिकाकडून असते, तिचा गळा घोटण्याचा प्रयत्न त्यात असतो. जो मला, माझ्या शब्दकळेला, माझ्या साहित्यकृतीला नावाजेल तो खरा आणि जो टीका करेल तो खोटा या मतलबी समजातच कंपूशाहीची बीजं असतात. कंपूशाही ही साहित्यबाह्य गुणावगुणांना महत्त्व देते. म्हणून वाड्मयीन महत्तेला बाधक ठरते.
मागे एकदा एका ऐतिहासिक कादंबरीच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या प्रसंगी त्या कादंबरीचे प्रकाशक (मराठी लेखकांना ‘घडविण्याचं’ श्रेय हल्ली प्रकाशक आपल्याकडे घेतात!) आणि एक साक्षेपी (अतिवापरामुळे गुळगुळीत झालेला, पण संपादक म्हणताच त्याच्या मागे अपरिहार्यपणे लावण्यात येणारा शब्द!) संपादक असे दोघेही इतरांबरोबर बोलले. साक्षेपी संपादक म्हणाले, ‘या कादंबरीचं हस्तलिखित वाचताच माझ्या ध्यानात आलं की, ही टॉलस्टॉयच्या ‘वॉर अँड पीस’च्या तोडीची कादंबरी आहे.’ अर्थ उघड होता की, संपादकमजकुरांनी ‘वॉर अँड पीस’ वाचलेली नाही. कारण शीर्षक असं असलं तरी ती कादंबरी मानवी संबंधाची गुंतागुंत दाखवणारी, धागेदोरे उलगडून दाखवणारी आहे आणि मराठीतील कादंबरी प्रभावी युद्धकथा आहे. ते असंही म्हणाले की, लेखकानं इतिहासाचा इतका अभ्यास केला आहे की, या कादंबरीतील प्रत्येक विधान आणि घटना ऐतिहासिक आहे. मग तिला कादंबरी का म्हणायचे? इतिहासच म्हणावं की रसाळ भाषेत लिहिलेला आणि गोष्टीरूपानं सांगितलेला.
आज मराठी साहित्यविश्‍वात कोणीही कोणतंही कशाही प्रकारचं विधान करावं, दावा करावा, त्याकडे कोणीही पाहत नाही, त्यावर कोणी प्रतिवाद करण्याच्या भानगडीत पडत नाही. अशा प्रकारच्या वाड्मयीन वातावरणात प्रत्येक पुस्तकात आगळं-वेगळंपण शोधलं जातं. चांगल्याला चांगलं म्हणताना वाईट पुस्तकालाही चांगलं म्हटलं जातं. वाड्मयीन निकष मोडीत काढले जातात आणि पुस्तक परीक्षणाची घसरण ‘पुस्तक परिचया’त होते. परीक्षण करणं ही नवे शत्रू निर्माण करण्याची कला होऊन बसते. (म्हणून तर मराठी वृत्तपत्रांनीही परीक्षणांऐवजी परिचय छापण्यास सुरुवात नाही ना केली?)
पुस्तक-परीक्षण सर्वसामान्य वाड्मयप्रेमींना मार्गदर्शक ठरू शकतं. पण ते प्रकाशकांच्या नजरेत कुसळासारखं खुपतं. म्हणून आजकाल एखाद्या थोडंबहुत नाव असलेल्या व्यक्तीकडून लेखक वा प्रकाशकच तथाकथित परीक्षण लिहून घेऊन ते पुस्तकांबरोबरच संपादकांकडे पाठवू लागले आहेत. त्यालाही आयती ‘परीक्षणं’ मिळू लागल्यानं तोही खूश. शिवाय प्रत्येक मोठय़ा प्रकाशकांची आपापलं ‘गृह-नियतकालिक’ आहेच. त्यावर थोडा खर्च केला की, आपल्या प्रत्येक प्रकाशनाची वाड्मयीन ‘महत्ता’ सांगता येतेच. हे वातावरण ग्रंथांच्या वाड्मयीन दर्जातला फरक पुसून टाकणारे असल्याचं आपल्या ध्यानी येतं की नाही? त्यातही नवे गोंधळ आहेत. सर्जनशील साहित्यिक आणि समीक्षक हे आताआतापर्यंत आपण जो विचार, जी भावना शब्दांत पकडली त्यातील अपूर्णता जाणवून आपल्या लेखनाबद्दल नेहमीच समाधानी नसत. पण आताचे साहित्यिक स्वत:वरच खूश असतात. एखादा साहित्यिक वृत्तपत्राच्या संपादकासमोर ‘ही घ्या, मी एक सुंदर कथा लिहिली आहे’ असं स्वत:च म्हणतो, तेव्हा तो काय करू इच्छित असतो? संपादकावर मानसिक दबाव आणत असतो? हल्ली बहुतांश लेखक अशी आत्मप्रशंसा बिनदिक्कत करताना आढळत आहेत. इतरांसाठी आत्मस्तुती असली तरी ही आत्मवंचनाच म्हणावी लागेल.
प्राध्यापकांची समीक्षा ही जनसामान्यांपासून दूर तर गेलेलीच आहे, पण ती परभृत झाली आहे. पाश्‍चात्य वाड्मयीन संकल्पनांच्या आहारी गेली आहे. त्यामुळे प्राध्यापकांच्या गोतावळ्याशिवाय अन्य वाचक ती वाचत नाहीत. शैक्षणिक क्षेत्रातील चर्चा, परिचर्चा, परिसंवाद यांच्यापलीकडे ती पोहोचत नाही.
या सार्‍याचा परिणाम एखाद्या साहित्यकृतीचं खरं मोल समाजघटकांना न समजण्यात होत आहे. त्यामुळे अधिकार नसलेल्या मंडळींकडून नवनवे पण अनावश्यक वाड्मयीन निकष तयार केले जात आहेत. उदाहरणार्थ, स्त्री असल्याशिवाय स्त्रियांचे प्रश्न कळणार नाहीत. ग्रामीण भागात राहिल्याशिवाय ग्रामीण क्षेत्रांच्या समस्यांचं आकलन होणार नाही, शेतकरी असल्याशिवाय शेतकर्‍यांचे प्रश्न समजणार नाहीत. दलित नसलेल्यांना दलितांचे प्रश्न कळणार नाहीत, मग त्यांच्या वाड्मयनिर्मितीचं आकलन कसं होणार, हा एक अनावश्यक नवा निकष आजच्या मराठी वाड्मयक्षेत्रात रूढ झाला आहे. त्याचं खंडन करण्याचंही कुणा समीक्षकानं मनावर घेतल्याचं आढळत नाही. शेक्सपिअरची काव्यात्म नाटकं, इब्सेन, शॉची नाटकं, डिकन्स-हार्डीच्या कादंबर्‍या आताआतापर्यंत विद्यापीठीय विद्यार्थ्यांना कित्येक पिढय़ा शिकवल्या गेल्या. किती विद्यार्थ्यांनी लंडन वा तत्सम प्रदेश पाहिले होते हो? तरीही त्यांना हॅम्लेट कळला, लेडी मॅक्बेथ कळली, शायलॉक कळला, वृद्ध लियरची मानसिक अवस्था कळली, इब्सेनच्या नाटकातील नोराचं वागणं उमजलं वगैरे. पण मग आजच आपण तक्रार का करत आहोत? साधे-सोपे वाड्मयीन सिद्धान्तही आपल्याला कोणी सांगत नाही का? विदारक जीवनानुभव कच्चाच आपल्यासमोर ठेवला, तर त्याचा आपल्याला मानसिक धक्का बसेल. पण तो वाड्मयानुभव नव्हे. असं लेखन सामाजिक दस्तावेज म्हणता येईल. जीवनानुभवाचं वैश्‍विकीकरण झालं तरच तो वाड्मयनिर्मितीची उंची गाठू शकेल. हे आपल्या वाचकांना, लेखकांना तसंच प्रकाशकांना सांगणार कोण? समीक्षकांनी आपला हात कधीच आखडता घेतला आहे. वाईटाला वाईट म्हणण्याचं धैर्य ते जणू गमावून बसले आहेत. एखाद्या सुमार वाड्मयकृतीतील उणिवा दाखवणारी किती परीक्षणं आज प्रसिद्ध होत आहेत? सगळ्याच वाड्मयकृती मग आगळ्या-वेगळ्या, नवप्रवाह आणणार्‍या ठरणार. ही वाड्मयीन भोंदूगिरीच म्हणता येईल. लेखक-प्रकाशकांनी अनभिज्ञ वाचकांची फसवणूक केली तरी पुस्तकं विकली जातील, वाचक बिचारे ‘साहित्याभिरुची’ वाढवण्यासाठी पदराला खार लावून ती मुला-बाळांसाठी विकतही घेतील. राजा राममोहन रॉय फाउंडेशनच्या आर्थिक साह्यावर आपल्या सार्वजनिक ग्रंथालयांची कपाटं भरतील, पण तरुण वर्ग त्या ग्रंथांकडे फिरणारसुद्धा नाही.
बदलाची सुरुवात साहित्यिकांकडून व्हायला हवी, साहित्य-सेवकांकडून नव्हे, असे मला वाटतं. ‘मला दज्रेदार वाटतं तेच मी छापायला देईन’ अशी व्यावसायिक अस्मिता साहित्यिकांनी बाणवली, तरच काही बदल होऊ शकेल. त्या अस्मितेत ‘मी हे करेन, हे करणार नाही’ अशी आचारसंहिताही समाविष्ट असेल.
कविवर्य कुसुमाग्रज यांच्या संबंधातील एक घटना सांगावीशी वाटते. दिवाळी अंकासाठी कविता पाठविण्याचं पत्र मिळाल्यानंतर ‘यंदा माझ्याकडे कविता नाही, एक लेख मनात आहे. तो पाठविल्यास चालेल का?’ अशी उलटटपाली पृच्छा करणारा तो एकमेव कविराज! नाहीतर बहुतेक कवींना संपादकाचं पत्र येताच कवितेमागून कविता स्फुरू लागतात! यंदा केलेल्या कवितांपैकी सर्वात चांगली तुम्हालाच पाठवत आहे, अशी वर मखलाशी! जणू संपादक निरक्षर किंवा कार्यबाहुल्यामुळे वाचन न करणारा प्राणी! ‘ऐसे कैसे सारे भोंदू। कर्म करोनि म्हणती साधू।।’
या सार्‍या वातावरण बिघाडीची कारणं शोधू लागलं तर एक महत्त्वाची बाब ध्यानी येते. ती ही की, मराठी साहित्यिकांच्या मांदियाळीतील बहुतांश ‘अर्धवेळ लेखक’ आहेत. म्हणजे त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय वेगळा आहे. केवळ आत्ममग्नतेपोटी आणि खोट्या प्रतिष्ठेपोटी हा व्यवसाय करणार्‍यांना ‘लेखन-कामाठी’ ही गाजराची पुंगी वाटते. वाजली तर वाजली, नाही तर नाही! वाजली तर प्रतिष्ठित साहित्यिक म्हणून मिरवता येईल, नाही वाजली तरी साहित्यिकांच्या मेळाव्यांत ऊठबस तर होईल. स्वामित्व-धन नाही मिळालं (मराठी पुस्तकांसाठी ते अनेक वेळा मिळतच नाही!) तरी आपली नोकरी, व्यवसाय आहेच. साहित्यिकाची सामाजिक जबाबदारी स्वीकारून अपुर्‍या आणि तुटपुंज्या मानधनावर जगायचा प्रसंग मराठी साहित्यिकांवर येतच नाही कधी. मग सामाजिक जबाबदारी स्वीकारण्याचा आणि ती निभावण्याचा संबंधच कोठे येतो? दहा-पंधरा पुस्तकं स्वखर्चानं प्रसिद्ध केली तर दोन-चार वाड्मयीन पुरस्कार मिळतातच. हल्ली वाड्मयीन पुरस्कारच इतके झाले आहेत की कोणाचंही पुस्तक पुरस्कारापासून वाचणं कठीण झालं आहे.
साहित्यिक म्हणून प्रतिष्ठा मिळवताना यशस्वी साहित्यिकांच्या आवडी-निवडी सांभाळत त्यांच्याबरोबर ऊठबस करताना गंभीर मत-प्रदर्शनाची सक्तीही नसते. ना राजकीय मतांमुळे होणारा छळ, ना युद्धात सहभागी व्हावं लागल्यामुळे शत्रूकडून होणार्‍या शारीरिक-मानसिक त्रासाची झळ. तो विठ्ठल पोटापुरते देतोच आहे. राज्यघटनेनं सर्वांना लिहिण्याचं स्वातंत्र्यही दिलं आहे. सुमार दर्जाचं लेखन करू नये असं कायदाही सांगत नाही. जीवनानुभव तोकडा, लेखन-तंत्र दोषपूर्ण, प्रसिद्धी- तंत्र विकसित आणि विचार-अभ्यास न करण्याचं स्वातंत्र्य मात्र अर्मयाद! असा हा साहित्यिक मामला असल्यानं वाड्मयीन मूल्यं, प्रत्येक मराठी वाड्मयकृतीत परीक्षकांना आढळणार. पण मराठी वाचकांवर त्या वाड्मयकृतींचा प्रभाव पडणार नाही. राज्यस्तरावर, राष्ट्रस्तरावर, आंतरराष्ट्रीय जगतात मराठी साहित्यिकांचा दबदबा असणार नाही. नोबेल पुरस्कार मात्र मराठीला सतत हुलकावणी देत राहणार! एवढंच काय, विंदा करंदीकरांसारख्यांचा महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून विचारसुद्धा पद्मश्री, पद्मभूषणसाठी होणार नाही. तो मान सैफ अली खानसारखे पटकवणार!
(समाप्त)

No comments:

Post a Comment