भारतामध्ये येताना ब्रिटिशांनी आपल्याबरोबर दोन गोष्टी आणल्या असे मानले जाते. त्या म्हणजे शेक्सपिअर आणि बायबल. किंबहुना ब्रिटिशांनी जिथे जिथे वसाहती केल्या, त्या त्या ठिकाणी त्यांनी हा आपला सांस्कृतिक वारसा पोहचवला. भारतामध्येही ब्रिटिशांनी शेक्सपिअर आणि बायबल या दोन्ही गोष्टी रुजवण्याचे काम जास्त जाणीवपूर्वक केले, असे म्हटले तर ते फारसे वावगे होणार नाही. इंग्रजी वाङ्मयात अभिजात नाटककार म्हणून गणल्या गेलेल्या शेक्सपिअरची मोहिनी भारत समाजजीवनावर आणि साहित्यजीवनावर पडली. शेक्सपिअरच्या साहित्याचा मोठा वाचकवर्ग भारतामध्ये तयार झाला. महाराष्ट्रातही एकेकाळी शेक्सपिअरच्या साहित्याने वेडावून गेलेला एक वर्ग होता. मराठी साहित्यिक आणि नाटककारांवर शेक्सपिअरचा मोठाच प्रभाव पडला. तसाच तो बायबलचाही काही प्रमाणात पडला. मराठी मुद्रणाची सुरुवातच मुळी ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी केली. विल्यम कॅरे या ख्रिस्ती धर्मप्रसारकाकडे त्याचा मान जातो. ख्रिस्ती धर्म आणि बायबलचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या मिषाने कॅरे यांनी मराठीसह इतरही अनेक भारतीय भाषा शिकून त्यामध्ये बायबलची भाषांतरे करण्याचे मोठे काम केले!
ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी ख्रिस्ती धर्माचा अतिशय शिस्तबद्ध आणि सांस्कृतिक अंगाने प्रसार करायला सुरुवात केली. त्यावरून एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात वादळही निर्माण झाले. त्याचवेळी अनेकांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. ‘स्मृतिचित्रे’कार लक्ष्मीबाई टिळकांचे पती रेव्हरंड ना. वा. टिळक, पंडिता रमाबाई ही यातील काही प्रमुख नावे. बायबलचे मराठीतले पहिले भाषांतर करण्याचा मान पंडिता रमाबाई यांच्याकडे जातो. त्यानंतर बायबलची अनेकांनी भाषांतरे केली. ‘बायबलचे मराठी अवतार’ या पुस्तकामध्ये बायबलच्या मराठी भाषांतरांची तपशीलवार आणि इत्यंभूत माहिती दिली आहे. अगदी अलीकडे कविवर्य मंगेश पाडगावकर यांनीही ‘नवा करार’चे भाषांतर केले आहे!
सांगायचे असे की, ख्रिस्ती धर्मामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक-धार्मिक जीवनात बरीच उलथापालथ झाली. त्याचे वस्तुनिष्ठ म्हणता येईल असे चित्रण करण्याचा प्रयत्न मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश नरेन्द्र चपळगावकर यांनी ‘सावलीचा शोध’ या पुस्तकात केले आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांनी प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘चपळगावकरांची भूमिका या घटनांचे आणि मतांचे मूल्यमापन करण्याची नसून त्यांना जन्म देणा-या परिस्थितीचा शोध घेण्याची आहे. म्हणून त्यांनी या ग्रंथातील लेखनासाठी निवडलेल्या व्यक्तींचे मानस, त्यांना घडवणारी परिस्थिती, त्यांच्या कार्यामागील प्रेरणा, इच्छित कार्य करताना त्यांना करावा लागलेला संघर्ष, त्यांच्या मनात निर्माण झालेले ताणतणाव, त्यांच्या कार्याचे समाजावर होणारे अनुकूल-प्रतिकूल परिणाम-आणि या सर्वातील नाटय़ याचे मनोवेधक चित्र रेखाटण्यात चपळगावकर पूर्णत: यशस्वी झाले आहेत.’’
तर चपळगावकर यांनी आपली पुस्तकामागची भूमिका स्पष्ट करताना लिहिले आहे, ‘‘सातासमुद्रांपलीकडून सुखाचे जीवन सोडून धर्मप्रसाराच्या उद्दिष्टाने काही मिशनरी भारतात येतात, अनेक कष्ट सोसतात, काही तर येथेच देह ठेवतात. धर्मातराचे काम हा मतभेदाचा विषय असू शकतो; परंतु सगळे जीवनच ज्याला अर्पण करावे असे एक ध्येय त्यांना उपलब्ध झाले आणि त्यांच्या जीवनाला एक अर्थ मिळाला. जे तरुण ख्रिस्ती झाले व आपण काही नवे मिळवले आहे या आनंदात सर्व अडचणी सहन करून जीवन जगले त्यांचे जीवन समजून घेणे हा एक वेगळाच अनुभव आहे.’’
या पुस्तकामध्ये एकंदर नऊ प्रकरणे आहेत. आणि ती सर्वच प्रकरणे व्यक्तिचित्रे म्हणावी अशी आहेत. म्हणजे या प्रकरणांमध्ये चपळगावकर यांनी ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणाऱ्या काही महत्त्वाच्या व वैशिष्टय़पूर्ण धर्मप्रसारकांवर आणि त्यांच्या कामावर भर दिला आहे. त्यातून या धर्मप्रसारकांचे काम आणि त्यांना करावा लागलेला संघर्ष यांची ओळख होते. ‘दोन पारशी तरुणांचे धर्मातर’, ‘कहाणी : दोन भावांची आणि एका गावाची’, ‘आई, बाप आणि लेक’, ‘तंटा : पाण्याचा आणि धर्माचा’, ‘रेव्हरंड खंडनमिश्र’, ‘भारतातील पहिली स्त्री वकील’ आणि ‘रावसाहेब’ या प्रकरणांतून त्याचा प्रत्यय येतो.
धर्माची प्रेरणा सर्व प्रकारच्या त्यागाला कशी उद्युक्त करू शकते आणि तसा त्याग करणारे ख्रिस्ती धर्मप्रसारक कसे असतात याचे चित्रण चपळगावकर यांनी या पुस्तकात समर्थपणे रेखाटले आहे. ख्रिस्ती धर्मप्रसारकांच्या कामांमागच्या प्रेरणांचा शोध घेण्याचा प्रयत्न चपळगावकरांनी केलेला असल्याने त्यांनी ख्रिस्ती धर्माची चिकित्सा केलेली नाही, तो या पुस्तकाचा उद्देश नाही. त्यामुळे त्या दृष्टीने या पुस्तकाकडे पाहता येणार नाही, पाहूही नये. पण धर्माची प्रेरणा ज्या पद्धतीने ख्रिस्ती धर्मप्रसारकांना आपले जीवन त्यागायला उद्युक्त करते, तसे इतर धर्माबाबत होते का, होत असेल तर कशा पद्धतीने होते, त्या धर्म प्रसारकांचा त्याग काय पद्धतीचा आहे, हा विचार हे पुस्तक वाचताना मनात बळावत जातो. तसा इतर धर्माचा विशेषत: हिंदू धर्माचा विचार प्राधान्याने करून पाहावासा वाटतो. ख्रिस्ती धर्माची तत्त्वे आणि मूल्ये मात्र शांत आणि सुखी जीवनाचा मंत्र देतात, कर्मकांड आणि बुवावाजीला थारा देत नाहीत; जे हिंदू धर्मात फार मोठय़ा प्रमाणावर होते. त्यामुळे हिंदू धर्म ख्रिस्ती धर्मासारखा स्वीकारार्ह होत नाही का किंवा कसे असे प्रश्नही निर्माण होतात. असो. तो स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. कुणा जाणकाराने त्याबाबत स्वतंत्र लेखन करायला हवे.
कार्ल मार्क्सने धर्माला अफूच्या गोळीची उपमा दिली आहे. त्या अफूची चांगल्या प्रकारे गुंगी आणणा-या आणि त्यातून महाराष्ट्राच्या समाजजीवनात एकेकाळी वादळे निर्माण करणा-या धर्मप्रसारकांच्या कामाविषयीचे हे पुस्तक वाचनीय आहे, एवढे मात्र खरे!
सावलीचा शोध : नरेन्द्र चपळगावकर
मौज प्रकाशन गृह, मुंबई
पाने : 172, किंमत : 220 रुपये
No comments:
Post a Comment