Monday, March 19, 2012

जगाच्या भूगोलासाठी तीन पावलं...

OCT 1888

भूगोल रुक्ष असतो या समजाला चारीमुंडय़ा चित करण्याचे आणि त्यातील रोमांचकता व थरार दाखवून देण्याचं काम ‘नॅशनल जिओग्राफिक सोसायटी’(नॅजिसो) गेली 124 वर्ष करते आहे. भूगोलाला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा मिळवून देण्याचा, ही संकल्पना सतत विकसित करण्याचा आणि तिला विज्ञानाची समर्पक जोड देण्याचा सुज्ञपणा ‘नॅजिसो’ गेली 124 वर्ष करते आहे. कालच्या 13 जानेवारीला ‘नॅजिसो’ने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे, (तर ‘नॅशनल जिओग्राफिक’ हे सोसायटीचे मासिक येत्या ऑक्टोबर महिन्यात शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे) त्यानिमित्ताने हा विशेष लेख.... भूगोल हा रुक्ष विषय आहे, असा समज आपल्या समाजात रूढ आहे. का कोण जाणे, पण ज्या अत्यंत थरारक, रोमांचक आणि मानवी आयुष्य समृद्ध करणा-या ज्ञानशाखा आहेत, त्याचीच नेमकी बहुतेकांना नावड असते. विज्ञान, भूगोल, गणित-भूमिती या ज्ञानशाखा हे त्याचे उदाहरण म्हणून सांगता येतील. या क्षेत्राकडे वळणारे जसे हाताच्या बोटावर मोजण्याइतके असतात, तसेच या विषयांबद्दल केवळ कुतूहल असणा-यांची संख्याही साधारणच असते.
पण भूगोल ही सतत उत्क्रांत होत आलेली आणि त्यामुळे जगातल्या लोकांचे आयुष्य विज्ञानासारखेच बदलवणारी संकल्पना आहे. भूगोलामुळे जगाचा, पृथ्वीचा नकाशा तयार करता आला; राष्ट्रांच्या, देशांच्या, प्रदेशांच्या सीमा ठरवण्यात आल्या; समुद्रमार्ग, नद्या, पर्वत, जंगले, वाळवंटे यांची ठिकाणे निश्चित करता आली आणि भूगोलामुळेच साम्राज्यवाद, भांडवलशाही, राष्ट्रवाद या संकल्पना जन्माला आल्या!
आपला परिसर, राज्य, देश आणि जगातले इतर देश समजून घ्यायचे तर भूगोलाचाच आधार घ्यावा लागतो. भूगोलाशिवाय आपण एका ठिकाणावरून दुस-या ठिकाणी जाऊ शकत नाही. तसा शालेय पातळीपासून आपण भूगोल शिकतो, पण त्याची महती मात्र जाणून घेत नाही. वैज्ञानिक शोधांचा उपभोग घेणारे जसे विज्ञानाचे काही लागत नाहीत, तसेच भूगोलाचा पावलोपावली आसरा घेणारेही त्याविषयी कृतज्ञ राहत नाहीत. आणि असे उपराटे लोकच भूगोलाकडे दुर्लक्ष करतात!
म्हणून या क्षेत्रांकडे वळणाऱ्यांना असाधारण म्हटले जाते. असेच काही असाधारण आणि झपाटलेले 33 लोक 13 जानेवारी 1888 रोजी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये एकत्र जमले. त्या आधी या सभेला हजर राहणारे निवेदन काही जणांना पाठवण्यात आले होते. त्यात लिहिले होते, kincrease and diffusion of geographical knowledgel. या जमलेल्यांमध्ये बँकर, ट्रेकर्स, धाडसी प्रवासी, संशोधक, शिक्षक, पर्यावरण अभ्यासक, हवामानतज्ज्ञ आणि भूगोलाचे अभ्यासक होते. यापैकी सगळेच काही गर्भश्रीमंत नव्हते आणि काही श्रीमंतही नव्हते. पण या सर्वाना जगाचा भूगोल समजावून घेण्याची आणि उर्वरित जगाला समजावून देण्याची तीव्र महत्त्वाकांक्षा होती. या बैठकीत जगाला भूगोल साक्षर करण्यासाठी काही संघटित प्रयत्न करण्याचा ठराव संमत करून गार्डिनर ग्रीन ह्युबर्ड यांची नॅशनल जिओग्राफिक सोसायटी (नॅजिसो)चे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
या पहिल्याच बैठकीत सोसायटीने नॅशनल जिओग्राफिक मॅगझिन(नॅजिमॅ) सुरू करायचे ठरवले. लेखक-संशोधकांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, माहिती जमा करून, रितसर संशोधन करून, लोकांशी बोलून लिहिलेल्या साध्या सोप्या भाषेतल्या लेखांना चित्रे व नकाशांच्या जोडीने सादर करायचे, असे या मासिकाचे स्थूल स्वरूप ठरवण्यात आले. त्यानुसार सुरुवातीच्या काही अंकांमध्ये अल्बर्ट लॉईड यांनी आफ्रिकेतल्या नरभक्षक टोळ्यांबरोबर केलेल्या प्रवासाचे सविस्तर वृतान्त छापले, उत्तर ध्रुवाचा शोध लावणाऱ्या रॉबर्ट पियरीने लिहिलेले अनुभव नॅजिमॅमध्ये छापण्यात आले, तेव्हाच या नियतकालिकाचा प्रवास भविष्यात कुठल्या दिशेने होणार आहे, याची झलक पाहायला मिळाली होती.
ऑक्टोबर १८८८मध्ये नॅशनल जिओग्राफिक मॅगझिनचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. त्यात नॅजिसोने आपली भूमिका स्पष्ट केली ती अशी...It will contain memoirs, essays, notes, correspondence, reviews, etc. ralating to Geographic matters. As it is not intended to be simply the organ of the society, its pages will be open to all persons interested in Geography, in the hope that it may become a channel of intercommunication, stimulate geographic investigation and prove an acceptable medium for the publication of results...पण नॅजिसोचे सुरुवातीचे काही अंक चाचपडतच निघाले. ते नियमितपणेही निघत नव्हते1888 ते 97 या दहा वर्षात फक्त 37 अंक प्रकाशित झाले. जानेवारी 1896 पासून नॅजिमॅ नियमितपणे मासिक स्वरूपात प्रसिद्ध होऊ लागले. या अंकाची किंमत 25 सेंट ठरवण्यात आली आणि नॅजिसोने पहिल्यांदाच अंकासाठी जाहिराती स्वीकारण्याचेही ठरवले. पण पुढच्याच वर्षी अध्यक्ष ह्युबर्ड यांचे निधन झाले. मग त्यांचा जावई अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल जानेवारी 1898 मध्ये नॅजिसोचा दुसरा अध्यक्ष झाला. बेलच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या वर्षानंतर सोसायटीचे सभासद फक्त 1400 चा आकडा गाठू शकले. बेल त्यात फक्त 260 ची भर घालू शकले. पण सोसायटीवर 2000 डॉलर्सचे कर्ज झाले होते आणि नॅजिमॅवर कधीही बँकेकडून जप्ती येण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण तरीही बेल डगमगले नाहीत. त्यांनी सोसायटीच्या सभासदांना सांगितले की, Geography is a fascinating subject, and it can be made interesting. Let’s hire a promising young man to put some life into the magazine and promote the membership. I will pay his salary... बेल यांनी असे सांगितले असले तरी त्या तरुणाची त्यांनी आधीच मनाशी निवड केली होती. त्याचे नाव होते, गिल्बर्ट हॉवी ग्रॉसव्हेनोर. हा अवघ्या 23 वर्षाचा तरुण शाळाशिक्षक होता (आणि बेल यांच्या मुलीचा प्रियकरही. अर्थात तेव्हा हे त्यांना माहीत नव्हते.) बेल यांची ही निवड किती सार्थ होती, याची चुणूक लवकरच सोसायटीला पाहायला मिळाली. ग्रॉसव्हेनोर एप्रिल 1899 मध्ये सहसंपादक म्हणून रुजू झाले आणि नोव्हेंबर 1899 पर्यंत त्यांनी 750 नवे सभासद सोसायटीला मिळवून दिले. फेब्रुवारी 1903 मध्ये ग्रॉसव्हेनोर नॅजिमॅचे संपादक झाले आणि सोसायटीचे अध्यक्षही. तेव्हा ते केवळ 27 वर्षाचे होते. सोसायटीची सर्व सूत्रे त्यांच्याकडे सोपवण्यात आली. आणि नॅजिसोच्या बहराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली!
गिल्बर्ट ग्रॉसव्हेनोर यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये सोसायटीला वैभव मिळवून दिले. ते 1899 ते 1954 अशी सलग 55 वर्षे नॅजिमॅचे संपादक राहिले. 1920 ते 54 ही 34 वर्षात ग्रॉसव्हेनोर यांनी सोसायटीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहत होते, तर 1954 ते 1966 या काळात ते सोसायटीच्या संचालक मंडळाचे चेअरमन होते. या काळात त्यांनी नॅजिमॅला जो वैश्विक चेहरा मिळवून दिला, तो केवळ थक्क करणारा आहे. या काळात नॅजिमॅचा खप पाच हजारांवरून 50 लाखांवर गेला!
डिसेंबर 1904 मध्ये छायाचित्र-मालिकेची सुरुवात ग्रॉसव्हेनोरने केली. या पहिल्याच अंकात तिबेटमधल्या ल्हासा प्रांताची झलक दाखवणारी 11 पाने छायाचित्रे छापली. एप्रिल 1905 च्या अंकात फिलिपाइन्समधील शिरगणतीची 138 छायाचित्रे 32 पानांवर छापली. कॅनेडियन पर्वताचे आठ फूट लांब छायाचित्र ग्रॉसव्हेनोर यांनी जून 1911 च्या अंकात छापले. ग्रॉसव्हेनोर सतत सुंदर आणि वैशिष्टय़पूर्ण छायाचित्रांच्या शोधात असत. 1908 मध्ये नॅजिमॅचा अर्धा अंक छायाचित्रांसाठी दिला जाऊ लागला.
या नव्या प्रयोगामुळे नॅजिमॅमध्ये जान आली. त्याची लोकप्रियता झपाटय़ाने वाढू लागली. 1905 पर्यंत नॅजिसोचे सभासद 3400 वरून 11000 झाले.
सोसायटीच्या वतीने लोकांसाठी व्याख्यानांचे आयोजन केले जात असे. ग्रॉसव्हेनोर सतत इतर नियतकालिकांचा आणि सोसायटीत व्याख्यानांसाठी येणाऱ्या लोकांचा अभ्यास करत असत. त्यांना नेमके काय हवे आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आणि ते पूर्ण करण्यासाठी धडपडतही! त्यामुळे नॅजिमॅ वाचकाभिमुख होऊ लागले.
1954 मध्ये वयाच्या 78 वर्षी ग्रॉसव्हेनोर निवृत्त झाले, तेव्हा सोसायटीच्या सभासदांची संख्या, वीस लाख झाली होती! त्यानंतर त्यांचा मुलगा गिल संपादक झाला (आणि अध्यक्षही). त्याच्या काळात सभासदांची संख्या एक कोटीवर गेली. गिलने ट्रॅव्हलर, वर्ल्ड आणि नॅशनल जिओग्राफिक रिसर्च ही तीन नवी नियतकालिके सुरू केली; ‘नॅजिसोच्या शतकमहोत्सवानिमित्त नॅजिसो एज्युकेशन फाउंडेशन स्थापन केले.
आता नॅजिमॅ अरेबिक, चायनीज, कोरियन, बल्गेरियन, डच, ग्रीक, जर्मन, हिब्रू, पोलिश, रशियन अशा 35 भाषांमध्ये प्रसिद्ध होते. (या सर्व आवृत्त्या 1997 नंतर सुरू झाल्या आहेत.) प्रत्येक आवृत्तीची स्वतंत्र वेबसाइट आहे. नॅजिमॅच्या सर्व आवृत्त्यांचा मिळून एकंदर खप 90 लाखांवर आहे. याशिवाय नॅजिसोचा पुस्तक प्रकाशनाचाही स्वतंत्र विभाग आहे. नॅशनल जिओग्राफी चॅनेलही लोकप्रिय आहे.

नॅजिमॅमध्ये भूगोल, विज्ञान, इतिहास, संस्कृती, चालू घडामोडी आणि छायाचित्रे या विषयांवरील लेखांचा समावेश असतो. पर्यावरण, जंगलतोड, रासायनिक प्रदूषण, ग्लोबल वार्मिग या विषयांवर नॅजिमॅ सातत्याने लेखन छापून लोकांना साक्षर करण्याचे काम करते आहे. प्रसंगोपात एकाच देशावर संपूर्ण अंक, प्राचीन संस्कृती आणि नैसर्गिक साधनसंपत्ती या विषयांवरही विशेषांक प्रसिद्ध करते.

नॅजिमॅशिवाय सोसायटीचे इतर अनेक उपक्रम असले तरी तिची खरी ओळख आहे, ती या मासिकामुळेच. सोसायटी म्हणजे हे मासिक आणि मासिक म्हणजे सोसायटी, असे हे समीकरण आहे. आणि या मासिकाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे ते त्यातल्या छायाचित्रांसाठी. या लेखाभोवतीच्या नॅजिमॅच्या मुख्यपृष्ठांवरील छायाचित्रांवरून या मासिकाच्या डिझाइनमध्ये, लोगोमध्ये होत गेलेला बदल पाहता येईल. त्यात अफगाणिस्तानतल्या एका मुलीच्या भयभीत चेह-याचे मुखपृष्ठ आहे. त्यानंतर 16 वर्षानी नॅजिमॅच्या टीमने पुन्हा अफगाणिस्तानात जाऊन त्या तरुणीचा शोध घेतला व तिचा फोटो मुखपृष्ठावर छापला. या एकाच घटनेतून नॅजिमॅची टीम आपल्या कामासाठी, एकेका छायाचित्रासाठी किती मेहनत घेते, याचा अंदाज येईल. अशा कितीतरी विक्रमांची मालिकाच या मासिकाच्या नावावर आहे.

अंटार्टिकावरील स्वारीपासून उत्तर-दक्षिण ध्रुवाच्या शोधापर्यंत नॅजिमॅने सर्व महत्त्वाचे बदल छायाचित्रांच्या माध्यमांतून टिपले आणि वाचकांपर्यंत पोहचवले आहेत. सोसायटीने प्रकाशित केलेली नॅजिमॅमधील उत्कृष्ट छायाचित्रांची पुस्तके पाहताना तर आपण स्तंभित होऊन जातो!
पण असे असले तरी नॅशनल जिओग्राफिक सोसायटी ही पक्की अमेरिकेधार्जिणी असल्याचा आरोप काही मंडळी करत असतात. पण हेही तितकेच खरे की, ‘टाइम साप्ताहिक भारताबाबत जितका पूर्वग्रहदूषित आणि कोतेपणा दाखवते, त्याचा लवलेशही नॅजिसोकडे नाही. या फरकांच्या उदाहरणांची मोठी मालिकाच सांगता येईल. पण एकच उदाहरण पुरेसे ठरावे. विसाव्या शतकातल्या महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणारे द सेंच्युरी कलेक्शन : द ग्रेटेस्ट इव्हेंट्स हे देखणे पुस्तक टाइमने 1997 साली काढले आहे. त्यात म. गांधींची दांडीयात्रा आणि भारतीय स्वातंत्र्यदिन या दोनच घटनांचा अन् तोही तळटिपा म्हणाव्यात असा त्रोटक उल्लेख आहे. पण नॅजिसो भारताबाबतच नव्हे तर जगातल्या कुठल्याच देशाविषयी असा दुजाभाव करत नाही, हेही त्याच्या मोठेपणाचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे1997 मध्ये भारतीय स्वातंत्र्याला पन्नास वर्षे झाली, तेव्हा नॅजिमॅने खास विशेषांक काढला होता. याशिवाय इतरही अनेक वेळा भारताविषयी मुखपृष्ठकथा केल्या, लेख-छायाचित्रे छापली आहेत.
अशोक शहाणे यांच्या तिरकस शब्दांचा आधार घेऊन सांगायचे तर ही थोरच गोष्ट म्हणायला हवी की, नॅशनल जिओग्राफिक सोसायटी अमेरिकेत सुरू झाली आणि त्याहून थोर म्हणजे या सोसायटीच्या महत्त्वाकांक्षांना पुरी पडणारी माणसे अमेरिकेत होती!
गेल्या 124 वर्षात जग किती बदलले! अनेक साम्राज्ये उदयाला आली, तशी लयाला गेली. क्रांत्या झाल्या, माणूस चंद्रावर गेला, समुद्राच्या तळाशी गेला.. वामनाने जशी एका पावलात जमीन व्यापून टाकली, एका पावलात आकाश व्यापले आणि तिसरा पाऊल बळीच्या डोक्यावर ठेवला, अगदी त्याच पद्धतीने माणसाने आकाश, जमीन आणि जगाच्या कानाकोपऱ्यातला माणूस व्यापायला सुरुवात केली आहे. विज्ञानाने एकेका क्षेत्राचा कायापालट करून टाकायचा धडाका लावलाय, अवघे जगच कवेत घ्यायला सुरुवात केली आहे. ते सारे बदल टिपण्याचा प्रयत्न नॅजिसोने आपल्या मासिकाच्या माध्यमातून केला आहे, करत आहे!
थोडक्यात आज वैश्विक सांस्कृतिक जीवनाचे जे काही मानदंड मानले जातात, त्यात बीबीसी, टाइम्स लिटररी सप्लिमेंट, नॅजिमॅ हे काही महत्त्वाचे मानदंड आहेत. त्यांना टाळून पुढेच जाताच येत नाही.
रंगीत छायाचित्रणाचा, चित्रपटांचा आणि टीव्हीचा शोध लागण्याच्या आधी अ विंडो ऑन द वर्ल्ड होण्याचे काम नॅजिसोने केले, आजही करत आहे आणि उद्याही करत राहील. कारण जगाच्या भूगोलाचा इंच न् इंच धुंडाळायचा अजून बाकी आहे. त्यामुळे जगाचा सगळा भूगोल आकळला नसल्याने नॅजिसोचे ध्येय पूर्ण झालेले नाही. पण सोसायटीने आजवर केलेले कामही थोडेथोडके नाही. नॅजिमॅचे आजवरचे नुसते अंक चाळले तरी जगाबद्दलचे आपले आकलन, माहिती आणि ज्ञान किती तोकडे आहे, याची खात्रीच पटते!
गेल्या 124 वर्षातल्या नॅजिसोच्या इंग्रजीसह 35 भाषांतील नॅजिमॅच्या एकूण एक प्रतींची चळत केली तरी तिची उंची आपल्या हिमालयाएवढी भरू शकेल!

JAN 2012
शतकोत्तर रौप्यमहोत्सवाची भेट : नॅजिसोची जेट मोहीम
 नॅशनल जिओग्राफिक सोसायटीला 125 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सोसायटीनं 2013 मध्ये एका जेट एक्सिपिडिशनचं आयोजन केलंय. या मोहिमेत जगभरातील विस्मयकारक ठिकाणं, प्राचीन शहरं, नैसर्गिक आश्चर्याची सफर घडवली जाणार आहे. अर्थात, ही निव्वळ सहल असणार नाही, तर या प्रत्येक ठिकाणी जाऊन नॅशनल जिओग्राफिकचे तज्ज्ञ आपल्या महत्त्वाच्या संशोधनाची आणि फिल्डवर्कची आतली माहितीही देणार आहेत. सागरी जीवशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, मानववंशशास्त्र, पुराजीवशास्त्र, जनुकशास्त्र, जतनशास्त्र या विषयातील संशोधक, तज्ज्ञ, विशेषज्ञांचा त्यात समावेश असेल.

एका खाजगी जेट विमानातून ही सफर घडवली जाणार आहे. एकूण 24 दिवसांच्या या सफरीला लंडन येथून सुरुवात होईल. ओमानची राजधानी मस्कत, भूतानमधील पारो व थिम्पू, पलाऊ येथील रॉक आयलँड्स, मालदिव, ओकॅवांगो (डेल्टा), बोस्टवाना येथील कलहारी वाळवंट, रवांडा येथील व्होल्कॅनोज नॅशनल पार्क, स्पेनची राजधानी बार्सिलोना या ठिकाणांचा या सफरीत समावेश आहे. इतिहास, भूगोल, संस्कृती, निसर्ग, पुरातत्त्व, विज्ञान या अंगाने या ठिकाणं उलगडून दाखवली जाणार आहेत. जॉन रेनहार्ड, फ्रेंड हिबर्ट, एन्रिक साला, सिल्व्हिया इर्ले, डेरेक आणि बेव्हर्ली ज्युबर्ट, मिरिया मेयर हे तज्ज्ञ या मोहिमेत सहभागी होणार आहेत. तर प्रसिद्ध संशोधक आणि नॅशनल जिओग्राफिकचे एक्सप्लोरर इन रेसिडन्स वेड डेव्हीस हे या संपूर्ण मोहिमेत सहभागी असतील26 फेब्रुवारी ते 21 मार्च या काळात होणाऱ्या या मोहिमेचं शुल्क आहे प्रतीमाणशी 72,950 डॉलर्स. यातले 3 हजार डॉलर्स नॅशनल जिओग्राफिकच्या द फंड फॉर एक्सप्लोरेशनला जाणार आहेत. हा फंड संशोधन, जतन आणि विविध मोहिमांसाठी आर्थिक मदत देतो.

No comments:

Post a Comment