मुलांची पुस्तके म्हणजे मोठय़ा टाइपातील पुस्तके इतकी साचेबंद संकल्पना मराठीमध्ये अजूनही रूढ आहे. त्यात फार फार बदल झाला तर टाइप थोडा लहान आणि काही चित्रांची भर एवढाच काय तो ‘क्रांतिकारक’ बदल मराठीमध्ये अलीकडच्या काळात झाला आहे. या संकल्पनेला पहिल्यांदा सुरूंग लावण्याचे काम पुण्यातील ज्योत्स्ना या प्रकाशनाने केले! मुलांच्या पुस्तकांच्या रूढ संकल्पना बदलवण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. अर्थात हे बदल इंग्रजी भाषेतील आणि इतर पाश्चात्य भाषेतील मुलांच्या पुस्तकांमध्ये होत होतेच! पण ज्योत्स्ना प्रकाशनने ते पहिल्यांदा मराठीमध्ये आणण्याचे काम केले. नॅशनल बुक ट्रस्ट आणि अगदी अलीकडे पुण्याच्याच ऊर्जा प्रकाशनने तो कित्ता गिरवला आहे. विंदा कंरदीकरांचे बालकवितासंग्रह पॉप्युलर प्रकाशनने सचित्र काढले तेव्हा त्याचे कोण कौतुक झाले! ते उचितच होते. पण त्याला इतर भाषांच्या तुलनेने बराच उशीर झाला होता हेही खरे!
कसेही असले तरी मराठीतल्या या काही मोजक्या प्रकाशनसंस्थांनी मुलांची पुस्तके प्रेक्षणीय केली! त्यांना मुलांचा विचार करून सचित्र केले, जिवंत केले. त्यामुळे या पुस्तकांनी मुलांशी संवाद साधायला सुरुवात केली आणि मुलांनीही त्यांना प्रतिसाद दिला, देत आहेत. मुलांच्या पुस्तकांसंदर्भात हा दुहेरी स्वरूपाचा संवाद नितांत गरजेचा असतो. पण मराठीमध्ये मुलांसाठी लिहिणारे बहुतेक लेखक हे मोठय़ांसाठी लिहिता येत नाही म्हणून मुलांसाठी लेखन करणारे असतात. त्यामुळे त्यातला बाळबोधपणा, उपदेशांचे डोस आणि संस्कारांची नको तितकी भरमार उबग आणणारी ठरते. त्याला सुरूंग लावले ते विंदा करंदीकर, माधुरी पुरंदरे, श्रीनिवास पंडित यासारख्या काही लेखकांनी. ते बरेच झाले. ज्यांना मोठय़ांसाठी चांगले लिहिता येते, त्यांनीच मुलांसाठी लिहिले पाहिजे, हे त्यांनी स्वत:च्या उदाहरणाने दाखवून दिले. त्यामुळे त्यांच्या पुस्तकांचा दर्जा अव्वल ठरला.
मुलांशी अशा प्रकारची बांधीलकी बाळगायला प्रतिभा लागते आणि गुणवत्ताही. पण हे प्रयोग तसे संख्येने अजूनही कमी आहेत. त्यांची संख्या जसजशी वाढत जाईल तसतसा मुलांच्या पुस्तकांचा व्यवहार प्रगल्भ होत जाईल. पण याचबरोबर मुलांनी फक्त वाचायचे किंवा पुस्तकातील चित्रे पाहायची हा दृष्टिकोनही बदलण्याची गरज आहे. त्या दृष्टीने पुस्तकांची निर्मिती होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी करंदीकर, पुरंदरे आणि पंडित यांच्या जातकुळीतल्या काही लोकांनी पुढे येण्याची गरज आहे.
असाच एक प्रयत्न नुकताच श्रीनिवास आगवणे या तरुण चित्रकाराने केला आहे. त्याने ‘आय हेट कलरिंग बुक’ या नावाने दोन चित्रांचे संच तयार केले आहेत. या दोन्ही संचात पंधरा-पंधरा चित्रांचा समावेश आहे. या संचासोबत एकेक पेन्सिलही दिली आहे.
या दोन्ही संचातील सर्व चित्रे ही कृष्णधवल (म्हणजे ब्लॅक अँड व्हाइट) रंगामध्ये आहेत. मुलांनी ती तशीच रंगवायची आहेत. पण दोन्ही संचातील कुठेलच चित्र पूर्ण नाही. चित्रकार-लेखकाने फक्त त्या चित्रांची थोडीशी आऊटलाइन करून दिली आहे वा चित्रातला एखादा भाग काढला आहे. उर्वरित चित्र मुलांनी त्यांच्या कल्पनाशक्तीने पूर्ण करायचे आहे.
काय आहेत ही चित्रे? तुटलेली अर्धवट मूर्ती, भारतीय, चिनी आणि ऑस्ट्रेलियन विमाने, जंगल सफारीसाठीचे बूट, आदिवासी चित्रकाराचे अर्धवट चित्र, आईच्या आवडत्या साडीवर बसलेला श्ॉमेलियन, बुद्धिबळाच्या सोंगटय़ा अशा पंधरा चित्रांचा एका संचात समावेश आहे. म्हणजे या संचातील कुठलेच चित्र केवळ रंगवण्याचे काम मुलांनी करावयाचे नाही तर प्रत्येक चित्र त्यांनी स्वत:च्या कल्पनाशक्तीने स्वत: काढावयाचे आहे.
कारण आजची मुले फार चोखंदळ आणि स्वतंत्र असतात. त्यांना त्यांच्या मनानुसार चित्रे काढायची असतात. त्यांच्या कल्पनेतील चित्रे आणि पुस्तकातील चित्रांचे रूढ आकार यांचा बऱ्याचदा मेळ बसत नाही. त्यामुळे मुलांची चित्रे म्हणजे ही त्यांच्या अभ्यासासारखी घोकंपट्टी होऊन बसते. या दोन्ही चित्रसंचामध्ये या कल्पनेला पूर्णत: फाटा दिला आहे. इतर पुस्तकांतून पाहून यातले कुठलेच चित्र काढायचे नाही, तर स्वत:च्या कल्पनेनुसार चित्रे काढायची आहेत. पण स्वत:च्या कल्पनेने चित्रे काढणाऱ्या मुलांचेही काही प्रकार असतात. चित्र नीट काढून ते तन्मयतनेने रंगवणारे आणि चित्र रंगवायला आवडत नाही म्हणणारे, असा या चित्रसंचाच्या लेखक-चित्रकाराचा निष्कर्ष आहे. त्यामुळे अशा मुलांचे आग्रह लक्षात घेऊन आगवणे यांनी त्यांच्या धाडसाला आणि कल्पकेतला उजागर करता येईल अशा पद्धतीने या संचाची रचना केली आहे.
हा मराठीमधला एक अभिनव प्रयोग म्हणायला हवा. कारण मुलांच्या कल्पकतेचा आणि धाडसाचा विचार करून त्यांना प्रोत्साहन देण्याची कल्पनाच भन्नाट आहे. पण मुलांचे हे धाडस आणि कल्पकता त्यांच्या पालकांच्याही पचनी पडायला हवी. दुर्दैवाने तशा ‘साक्षर’ पालकांची संख्या आपल्याकडे अजून कमी आहे. पण हे चित्रसंच नीट समजून घेणाऱ्या पालकांना आपला तो दृष्टिकोन बदलायला भाग पाडतील, अशी आशा आहे.
आय हेट कलरिंग बुक (दोन चित्रांचा संच): श्रीनिवास आगवणे
प्रकाशक लेखक स्वत:
किंमत : प्रत्येकी 200 रुपये
माहितीसाठी संपर्क : 9930329575
No comments:
Post a Comment