Sunday, January 1, 2012

चिंतन करायला काय हरकत आहे?

एक दिवस संपून दुसरा सुरू होतो. एक महिना संपून दुसरा सुरू होतो. तसंच एक वर्ष संपून दुसरं सुरू होतं. त्याला शके म्हणा नाही तर इसवी सन म्हणा! काळ त्याच्या गतीनं बदलत असतो. आपण त्याच्या गतीवर ताल धरायचा असतो. आज नववर्षाच्या पहिल्याच दिवसाचं स्वागत करताना आपल्या मनाशी मागील वर्षातलं काय काय ठेवायला हवं आणि काय काय विसरायला हवं याची (ढोबळ का होईना) यादी करणं आवश्यक आहे. तशी ती करता आली तर आपण काही एक निष्कर्षापर्यंत येऊ शकतो.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

सरतं वर्ष दोन कारणांसाठी भारताच्या इतिहासात दखलपात्र ठरण्याची शक्यता आहे. एक, 1991 मध्ये भारतानं स्वीकारलेल्या आर्थिक उदारीकरणाला या वर्षी 20 वर्ष पूर्ण झाली. आणि दोन, लोकपाल विधेयकाच्या निमित्तानं भारतीय राजकारणाला मोठं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली.

या दोन्हींमुळे 1991 ते 2011 हा वीस वर्षाचा काळ स्वातंत्र्योत्तर भारतातील एक महत्त्वाचं पर्व मानला जाण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. आर्थिक उदारीकरणानं गेल्या वीस वर्षात भारतीय जनमानस चांगलंच ढवळून काढलं आहे. शेती, सेवा, उद्योग, शिक्षण, आरोग्य, प्रसारमाध्यमं, नाटक, चित्रपट, साहित्य अशा अनेक क्षेत्रांवर उदारीकरणाचा बरा-वाईट परिणाम झाला आहे. गेल्या वीस वर्षात भारतातील सर्व सेवासुविधा आणि क्षेत्रं उदारीकरणाच्या तडाख्यात सापडली आहेत. त्यांच्यामध्ये नेमके कोणते बदल झाले, याचा सविस्तर आढावा मागच्या वर्षात घेतला जायला हवा होता, पण माध्यमांनी या क्रांतिकारी म्हणता येईल अशा बदलाकडे फारसं लक्ष दिलं नाही. ‘इंडियन एक्सप्रेस’ या राष्ट्रीय पातळीवरील इंग्रजी वृत्तपत्रानं मात्र ‘रिफॉर्म्स 20-20’ यावर गेल्या वर्षभरात 50-60 पानांच्या, मासिकाच्या आकाराच्या तब्बल पाच स्वतंत्र पुरवण्या काढून सेवा आणि उद्योग यातील बदलांचा सविस्तर आढावा घेण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही वर्षात कुठल्याही क्षेत्राचा आढावा घेताना 91 पूर्व आणि नंतर अशीच मांडणी केली जात आहे. मग ते शिक्षण असो की सेवा उद्योग असोत.
बर्लिनची भिंत पडल्यानंतर केवळ पूर्व आणि पश्चिम जर्मनीतच बदल झाला असं नव्हे तर जगही बर्लिन भिंतपूर्व आणि नंतर असं विभागले गेलं. ‘एण्ड ऑफ आयडिऑलॉजी’, ‘एण्ड ऑफ हिस्ट्री’ असे सिद्धांत तेव्हा मांडले गेले होते. त्या सिद्धांतांना नंतरच्या काळात बळकटी मिळाली नाही हे खरं, पण म्हणून तसंच भारतीय उदारीकरणांचही होईल, असं मानायचं कारण नाही. आता तर ते चित्र पुरेसं स्पष्टही झालं आहे. तंत्रज्ञान आणि मध्यमवर्ग यांची गेल्या वीस वर्षात अतिशय वेगानं झालेली वाढ यातून त्याचा पुरावाच ढळढळीतपणे मिळतो आहे. 91 साली दुर्दैवानं भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी होते, जात आणि धर्म. 2011 साली मात्र त्या केंद्रस्थानी विकास आणि प्रशासन या गोष्टी आल्या आहेत. लोकपाल विधेयकाचा मसावि काहीही असला तरी त्याचा लसावि मात्र या नव्या केंद्रस्थानाला बळ देणाराच ठरेल, अशी आशा करायलाही हरकत नाही.
पण सरत्या वर्षाचे 27 ते 29 डिसेंबर हे तीन दिवस अतिशय कळीचे आणि महत्त्वाचे ठरले. मुंबईत अण्णा हजारे यांचे उपोषण आणि दिल्लीत संसदेत लोकपाल विधेयकावर झालेली घमासान चर्चा या काळात पार पडली. अण्णांच्या आंदोलनाचा शो फ्लॉप झाला आणि संसदेत सरकारलाही थोडीशी नामुष्की स्वीकारावी लागली..पण यातूनही काहीतरी विधायक घडलेच अशी आशा आज करायला हरकत नाही. नव्या वर्षाचा पहिलावहिला दिवस आहे म्हणून!

विंदा करंदीकरांनी एके ठिकाणी म्हटलं आहे की, ‘मानवी जीवनाला स्वातंत्र्याप्रमाणेच शिस्तीचीही जरुरी असते.’ तेव्हा निदान नव्या वर्षात जगाला समजून घेण्याच्या शिस्तीबाबत आपण थोडंसं जागरूक व्हायला काय हरकत आहे?

कारण जोपर्यंत मानवी मेंदूच या सा-यामागचा कारागीर असेल तर तोपर्यंत फार मोठय़ा समूहाचं नुकसान कुणाही माणसाला करता येणार नाही. सारं जग जसं सुष्टांनीच भरलेलं नाही, तसंच ते दुष्टांनीही भरलेलं नाही. त्यामुळे हा लंबक मध्यभागीच राहण्याची शक्यता जास्त आहे. तो कधी कधी डावी-उजवीकडेही झुकताना दिसतो, पण तो कोणत्याही एकाच टोकाला स्थिर राहण्याची शक्यता जगाच्या आजवरच्या इतिहासावरून तरी कमीच दिसते.

संगणकामुळे माहितीची मोठा स्त्रोत एका बटणासरशी उपलब्ध होऊ शकतो, होतो. त्याचा वापर करून आपले दाम दुप्पट करणारे लोकही तयार झाले. पण त्यांना समाजच फार प्रतिष्ठा देत नाही. इंटरनेटवरची माहिती मिळवून आंतरराष्ट्रीय राजकारणावर लंबेचौडे लेख लिहिणारे वृत्तपत्रीय लेखक आणि पुस्तकं लिहिणारे लोक यांना समाजात किती प्रतिष्ठा आहे? आणि त्यांची संख्या किती आहे?

विश्वकोश काय, शब्दकोश काय, ज्ञानकोश काय, संदर्भकोश काय यामुळे जगातलं ज्ञान संपलं असं काही झालं का? कारण ही शेवटी साधनंच असतात, स्वतंत्र लेखन करणा-यांची, माहितीच्या भुकेलेल्या लोकांची. ती शमवण्यापलीकडेही माणसाची भूक असते. आणि तिला तो स्वत:च्या स्वयंप्रज्ञेनं समोरा जातो. पण जग समजून घेण्याची महत्त्वाकांक्षा काही प्रत्येक माणसाला असत नाही. ज्यांना असते, त्यांनाही ते पूर्णपणे समजून घेता येत नाही. जग नेमकं कसं आहे आणि केवढं आहे, हे जोपर्यंत माहीत नसतं तोपर्यंतच तशी महत्त्वाकांक्षा बहुतेक जण बाळगून असतात. जगाच्या अफाटतेचा अंदाज यायला लागला की, ते पुरतं समजून घेणं शक्य नाही याची जाणीव होते. या जाणीवेपर्यंत पोहचण्यातच अनेकांची आयुष्यं खर्ची होतात. जे फारच बुद्धिमान आणि प्रतिभावान असतात, त्यांना जगाच्या ज्ञानाचे काही तुकडेच समजून घेता येतात. आणि पुढच्या काही पिढय़ांनी ते तुकडे समजून देण्यात आपली आयुष्यं खर्ची करावी लागतात.

तंत्रज्ञानामुळे दिवसेंदिवस शारीरिक कष्टांचं महत्त्व कमी होत आहे आणि बौद्धिक कष्टांना प्रतिष्ठा मिळत आहे. हा मानवी उत्क्रांतीचा अपरिहार्य भाग आहे. तो होणार, व्हायलाच हवा. माणसाला स्वत:चा विकास करून घ्यायला त्याचा अंतिमत: फायदाच होतो आहे. त्यामुळे सतत निषेधाच्या, आंदोलनांच्या आणि विरोधासाठी विरोध करणा-यांच्या आरडाओरडीकडे फार लक्ष द्यायचं नसतं. विरोध करणारे असणार, तसे पुरस्कार करणारेही असणार आणि उपभोग घेणारेही असणार. जग ही एकाच छापाचे गणपती बनवावेत तशी माणसं बनवणारी शाळा नाही, ही चांगलीच गोष्ट आहे.
त्यामुळेच मानव जात ही जगातली सर्वात अनप्रेडेक्टिबल आहे. तिच्याबद्दल एकच एक विधान करता येणं कठीण आहे, हेच आजवर सिद्ध होत गेलेलं आहे. अणुबॉम्बच्या निर्मितीनंतर जगप्रसिद्ध लेखक आर्थर कोस्तलरनं ‘समिंग अप’ हे पुस्तक लिहून अणुबॉम्बनं जगाला विनाशाच्या पायरीवर आणून ठेवलं आहे, असं भाकीत केलं होतं. त्यानंतरच्या काळात म्हणजे आजवर जगानंच पुढाकार घेऊन त्या पाय-या सातत्यानं लांबवल्या आहेत. हा तर अगदी अलीकडचा इतिहास आहे.

थोडक्यात तंत्रज्ञानानं कितीही नेत्रदीपक प्रगती केली तरी ज्ञानाला पर्याय होऊ शकणार नाही, होऊ शकत नाही, हे जाणून घेण्याची गरज आहे. कारण आपला अडाणी गोंधळ हा शेवटी आपल्याच दु:खाचं कारण होऊन बसतं. बट्र्राड रसेलनं म्हटलंच आहे की, ‘‘जगाविषयीचे चुकीचे दृष्टिकोन, चुकीच्या नैतिक कल्पना आणि चुकीच्या वर्तन सवयी हीच आमच्या दु:खांची कारणं आहेत असं मला वाटतं.’’
त्यामुळे जगाच्या दु:खाची काळजी करणा-यांनी आणि जगातल्या सुखाची काळजी करणा-यांनी आधी जग नीट समजून घेतलं पाहिजे. नाहीतर त्याचं स्वत:चंच दु:ख दूर होणार नाही. नववर्षाच्या निमित्तानं निदान एवढं चिंतन तरी करायला काय हरकत आहे?

No comments:

Post a Comment