गेल्या वर्षी भारताविषयी पाच, तर चालू वर्षाच्या पहिल्याच महिन्यात चार महत्त्वाची पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. भारताचा इतिहास, वर्तमान आणि भविष्यकाळ याविषयी काही सांगू पाहणारी ही पुस्तकं आवर्जून वाचायला हवीत. या लेखकांचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं आणि जमलंच तर त्यातून काही शिकायलाही हवं. पण त्या आधी या पुस्तकांकडे कसं पाहावं याविषयीचा हा लेख...
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
भारतात प्रवासासाठी, व्यापारासाठी येणाऱ्या किंवा केवळ भारताला भेट देऊ इच्छिणा-या परकीय प्रवाशांची आणि व्यापाऱ्यांची भारताविषयीची उत्सूकता व कुतूहल तसं फार जुनं आहे. अगदी पुरातन म्हणावं असं! शिवाय भारताबद्दलचे त्यांचे आधीचे आणि प्रत्यक्ष भेट दिल्यावर झालेले समज-गैरसमजही तितकेच जुने आहेत. पण भारत हा परकीयांसाठी सतत कुतूहलाचा विषय राहिलेला आहे, यात काही नवल नाही.
ब्रिटिश काळात भारताविषयी जी पुस्तकं लिहिली गेली, ती एकतर काहीशी नकारात्मक मानसिकता रंगवणारी होती किंवा भारत नीट समजून न घेता लिहिली गेलेली होती, असा एक मतप्रवाह आहे. दीडशे वर्षे ब्रिटिशांच्या गुलामगिरीत असलेला भारत स्वतंत्र झाला, तेव्हा लोकशाही देश म्हणून भारत फार काळ टिकाव धरू शकणार नाही, असा परकीय लेखक-विचारवंतांचा आडाखा होता. तसं त्यांनी जाहीरपणे, पुस्तकांच्या माध्यमातून बोलूनही दाखवलं होतं. पण त्या काळीही भारताविषयी सहानुभूती असलेल्या काही परकीय अभ्यासकांचा-लेखकांचा छोटासा गट होताच. ग्रॅनविल ऑस्टिनसारख्या लेखकानं तर भारताची राज्यघटना प्रत्यक्षात कशी साकारली, तिची बलस्थानं काय आहेत आणि जगातल्या इतर देशांच्या घटनांपेक्षा तिचं वेगळेपण काय याविषयी दोन पुस्तकंच लिहिली आहेत.पण भारत लोकशाही देश म्हणून फार काळ टिकाव धरू शकणार नाही, हा मतप्रवाह अगदी कालपर्यंत जोरकस म्हणावा इतपत प्रबळ होता. पण भारत गेल्या साठ वर्षात लोकशाही देश म्हणून केवळ उभाच राहिला नाहीतर त्यानं आपली दमदार घोडदौड चालू ठेवली आहे. आजघडीला भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे. पण तो जागतिक महासत्ता भविष्यात होईल की नाही, तसं स्वप्न त्यानं बाळगावं की नाही, हा मुद्दा बाजूला ठेवूनही भारताच्या आजवरच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करता येईल; त्याच्या वाटचालीबद्दल आशावाद व्यक्त करता येईल, अशी कामगिरी आणि प्रवास भारत करत आहे.
1990 साली भारतानं जागतिकीकरणाचा पुरस्कार केला. त्याला आता वीस वर्षे पूर्ण झाली आहेत. 2007 साली भारताला स्वातंत्र्य मिळून साठ वर्षे झाली. त्यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी ‘इंडिया आफ्टर गांधी’ हे पुस्तक लिहून ‘भारत टिकून का आहे?’ याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. या पुस्तकासाठी नुकतंच त्यांना साहित्य अकादमीच्या पुरस्कारानंही गौरवण्यात आलं.
गेल्या वीस वर्षात भारतानं केलेली प्रगती फार भव्यदिव्य नसली तरी ती जगानं दखल घ्यावी इतपत नक्कीच आहे. ‘चिंडिया’च्या (म्हणजे भारत आणि चीनच्या) शर्यतीत कोण पुढे जाईल हाही वेगळा मुद्दा आहे. पण भारत आज जो काही आहे, तो तसा का आहे? आणि तो तसाच या पुढेही राहिल का? पुढे जाईल की मागे जाईल? त्यासाठी भारताला काय करावं लागेल? असे अनेक प्रश्न राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील बुद्धिवंतांना, विचारवंतांना, इतिहासकारांना आणि लेखकांना पडत आले आहेत. प्रश्न पडणं आणि त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणं हे बुद्धिवंतांचंच काम असतं! आणि ते आपापल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्नही करत आहेत. त्यामुळेच अलीकडच्या काळात भारताविषयी भारतीय आणि परकीय लेखकांनी लिहिलेली पुस्तकं चर्चेचा विषय ठरू पाहत आहेत. त्यांची संख्याही दखल घ्यावी अशी होऊ पाहात आहे, ही चांगलीच गोष्ट आहे. आवड, वाचन, अभ्यास, व्यासंग, विवेचन, विश्लेषण, पुनर्माडणी आणि समीक्षा ही चढती भाजणी असते. पण या साऱ्याच गोष्टी कुणा एकालाच करता येतील असं नव्हे. अनेक जण यातील एकेक विषय घेऊन त्यावरच आपलं लिखाण बेतू शकतात. कुणी यातले दोन-चार विषय घेऊन त्यावर आधारित लेखन करेल, तर कुणी फक्त पुनर्माडणी करेल वा समीक्षा करेल. विचारवंत, बुद्धिवंत, इतिहासकार, अभ्यासक, पत्रकार यांची स्वत:ची म्हणून काही बलस्थानं असतात, तशीच त्यांचे स्वत:चे म्हणून काही खास विषय असतात; ज्यांना सामान्यत: प्रभावक्षेत्र म्हटलं जातं. त्यांची त्यांची म्हणून एक अभ्यासाची, संशोधनाची पद्धत असते. त्यामुळे यापैकी कुणा एकाचंच संपूर्ण लेखन शंभर टक्के विश्वासार्ह आणि प्रमाण मानलं जाण्याची शक्यता नसते, जातही नाही. प्रत्येकाचं लेखन पडताळून, ताडून घेऊन त्यातून कुठल्या योग्य गोष्टींची नोंद घ्यायला हवी, कुठल्या विषयाबाबत प्रस्तुत लेखकाचं आकलन फारसं बरोबर नाही, कुठला विषय त्याला नेमकेपणानं उलगडला आणि कुठला नाही, हे समजावून घेऊन पुढे जावं लागतं.
कारण शेवटी सत्य असलं तरी सत्याचा अनुभवही ब-याचदा व्यक्तिसापेक्षच असतो. म्हणजे असं की, माणसाविषयी जगातल्या इतक्या लेखकांनी, विचारवंतांनी आणि अभ्यासकांनी लिहूनही अजूनही त्याच्याविषयीचं लिहिणं काही थांबलेलं नाही. माणसाविषयी जर असं असेल तर एखाद्या देशाविषयी लिहिणंही थांबणार नाही. त्याविषयीही एकच एक भाकित, निष्कर्ष कुणाला काढता येणार नाही. कुणी काढला तरी तो प्रमाण मानला जाईल, स्वीकारला जाईलच असंही नाही. जे सिद्धांत काळाच्या ओघातही टिकून राहतात, ते आपोआपच स्वीकारले जातात. मात्र आपलं म्हणणं भविष्यात कुणीतरी खोडून काढेल म्हणून कुणी ते मांडण्याचा प्रयत्नच करू नये असंही नाही. ज्ञानमार्गाचं मूळ आकर्षण फार जबरदस्त असतं. अशा आकर्षणानं झपाटलेले आणि पछाडलेले लोक आपण लोकांपर्यंत पोहचू का, लोक आपल्याला स्वीकारतील का, याची कधीच फिकीर करत नाहीत.
म्हणून तर गेल्या कित्येक वर्षापासून भारताविषयी वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून, वेगवेगळ्या पैलूंची चर्चा करणाऱ्या पुस्तकांमध्ये सतत भरच पडत आहे. गेल्या वर्षी ‘इंडिया : अ पोर्ट्ेट’ हे ब्रिटिश लेखक आणि इतिहासकार पॅट्रीक फ्रेंच यांचं पुस्तक प्रकाशित झालं. याशिवाय बीबीसीचे माजी भारतीय प्रमुख मार्क टुली यांचं ‘नॉन-स्टॉप इंडिया’, आनंद गिरीधरदास यांचं ‘इंडिया कॉलिंग’, थंत मिंट-यू यांचं ‘व्हेअर चायना मिटस इंडिया’, एम. एम. सुरी यांचं ‘ट्वेंटी इअर्स ऑफ इकॉनॉमिक्स रिफॉर्म्स इन इंडिया, 1991-2011’ ही पुस्तकं प्रकाशित झाली.
तर याच महिन्यात ‘इमर्जिग इंडिया - इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स अँड रिफॉर्म्स : बिमल जालान’, ‘इंडिया आफ्टर द ग्लोबल क्रायसिस : शंकर आचार्य’ आणि ‘इंडिया सिन्स 1950 - सोसायटी, पॉलिटिक्स, इकॉनॉमी अँड कल्चर :ख्रिस्तोफ जेफ्रेलोट’ आणि इंडियन एक्सप्रेस समूहाचं ‘रिफॉर्म्स 20-20 : लास्ट 20 इयर्स, नेक्स्ट 20 इयर्स’ ही चार पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. एक्सप्रेस समूहानं जवळपास 60-60 पानांच्या पुरवण्या असलेले पाच विशेषांक गेल्या वर्षभरात प्रकाशित केले. त्याचं हे पुस्तकरूप. एक्सप्रेसच्या वेबसाइटवर या पुरवण्या उपलब्ध आहेत. पाचवा भाग डिसेंबर महिन्यात प्रकाशित झाला होता. तो त्यांच्या वेबसाइटसवरून आतापर्यंत 436,000 लोकांनी डाऊनलोड करून घेतला आहे. आणि याच आठवडय़ात तो पुस्तकरूपानंही उपलब्ध झाला आहे.
म्हणूनच तर हे परकीय आणि आप्तस्वकीय लेखक काय म्हणताहेत, हे आपण जाणून घ्यायला हवं. हे सर्व आपापल्या क्षेत्रातले जाणकार आणि अभ्यासक आहेत. तेव्हा त्यांच्या हाकांना निदान प्रतिसाद तरी द्यायलाच हवा.
No comments:
Post a Comment