खरं तर या पुस्तकाची दखल घ्यायला अंमळ उशीरच झालेला आहे. पण अशी पुस्तकं, तीही अतिशय देखण्या स्वरूपात प्रकाशित करण्याची जिद्द, त्या विषयाची खुमखुमी असल्याशिवाय होत नाही. अन् आपल्या मनासारखं पुस्तक प्रकाशित करून घेणंही ब-याचदा व्यावसायिक प्रकाशकांकडून लेखकांनाही शक्य होत नाही. कारण पुस्तक कितीही देखणं असलं तरी तो विषय वाचकांच्या किती जिव्हाळ्याचा आहे, हेही पाहावं लागतं. कारण प्रकाशन व्यवसाय हा एकमेव व्यवसाय असा आहे की, ज्यात प्रत्येक नवं पुस्तक हे स्वतंत्र प्रॉडक्ट असतं. त्यामुळे त्याची उस्तवार सुरुवातीपासून करावी लागते.
त्यामुळेच ‘चिदाकाश-घटाकाश’ हे नावावरून फारसा पटकन बोध न होणारं ‘शिल्पकलेवरील निवडक लेखांचं पुस्तक’ पुण्यातील एका आर्किटेक्चर कॉलेजनं काढावं, ते अरुण ओगले या वास्तुशास्त्राच्या अभ्यासक-प्राध्यापकानं लिहावं आणि त्याची निर्मिती रम्य आणि देखणी व्हावी हे कौतुकास्पद नक्कीच आहे. हे पुस्तक वास्तुकलेवरील असूनही ते अतिशय साध्या सोप्या शैलीत लिहिलेलं आहे. त्यामुळे वास्तुसौंदर्याच्या दृष्टीनं साक्षर होऊ पाहणा-या वाचकांना ते बाजारात सहजासहजी उपलब्ध होत नाही, एवढाच काय तो तोटा आहे.
अरुण ओगले यांनी गेल्या चाळीसेक वर्षात वेळोवेळी वास्तुकलेवर लिहिलेले हे लेख आहेत आणि यातील जवळपास सर्वच लेख त्यांनी वर्तमानपत्रांतून लिहिलेले आहेत. 1967 पासून ओगले यांनी 150 पेक्षाही जास्त लेख लिहून वास्तुकलेविषयीची जाण आपल्यापरीनं वाढवण्याचा प्रयत्न केला ही स्वागतार्ह गोष्ट म्हटली पाहिजे. वास्तुकलेसारखा विषय मराठी भाषेतून फार चांगल्या प्रकारे मांडायला वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र यांच्याप्रमाणेच अनेक अडचणी येतात. त्यावर मात करत, मध्यममार्ग काढत ओगले यांनी हे लेखन केलं.
प्रसिद्ध वास्तुतज्ज्ञ बाळकृष्ण दोशी यांनी या पुस्तकाला छोटीशी प्रस्तावना लिहिली आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘मानवी जीवन अधिकाधिक संपन्नतेनं व अर्थपूर्ण जगण्यासाठी वास्तुकलेचा सौंदर्यपूर्ण उपयुक्त आविष्कार म्हणजेच अवकाशाची समर्थ निर्मिती. अशा अत्यंत आशयपूर्ण जाणिवा प्रत्येक लेखात ओगले वाचकांना करून देतात. वास्तुकलेतील अवकाशासंदर्भातील महत्त्वाच्या सूत्राची उकल त्यांच्या लेखांतून कौशल्यानं केलेली दिसते. हे काम तसं सोपं नाही, परंतु योग्य अभ्यास व त्यासाठी लागणारी मेहनत या जोरावर ते तशी उकल करण्यात यशस्वी होतात. प्रत्येक लेखात एक आंतरिक प्रेरणा स्फूर्ती व वास्तुकलाविषयक संवेदनांचं योग्य शब्दांकन म्हणजेच शब्दात रूपांतर करण्याची हातोटी त्यांनी हासिल केली आहे.’’
या निवडक संकलनात काही वास्तुंची ओळख ओगले यांनी करून दिली आहे, तशीच काही वास्तुतज्ज्ञांचाही परिचय करून दिला आहे. पुस्तकाचे एकंदर पाच भाग असून ‘आढावा’, ‘प्रासंगिक’, ‘वास्तुतज्ज्ञ’, ‘रसग्रहण’ आणि ‘माझ्या लिखाणाचा प्रवास’ अशी त्यांची वर्गवारी केली आहे. वास्तुकलेचं नेमकं मर्म काय आहे आणि कसं समजावून घ्यावं याविषयीच्या लेखानं पहिल्या विभागाला सुरुवात होते. त्यानंतरच्या लेखात महाराष्ट्रातील वास्तुकलेचा आढावा घेतला आहे. हा लेख पंचवीस वर्षापूर्वी लिहिलेला असला तरी तो वाचनीय आणि परिप्रेक्ष्य समजावणारा आहे.
दुस-या विभागातल्या ‘मुंबई शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी वातावरण-निर्मिती हवी’ या पहिल्याच लेखाचं शीर्षक पुरेसं बोलकं आहे. त्यात ओगले म्हणतात, ‘‘प्रत्यक्ष वातावरणनिर्मितीसाठी काय केले पाहिजे? सौंदर्य वाढविण्यापेक्षा शहर सुधारणे अशा व्यापक दृष्टिकोनातून विचार करावयाचा झाल्यास कोणत्याही शहरात सुधारणा करावयाची असल्यास त्याचा सर्व शहराच्या, त्यातील मानवी जीवनाचा योग्य विचार झाला पाहिजे. यामुळे सर्व शहरात एकजिनसीपणा, एकवाक्यता येऊन सर्व वातावरण शिस्तबद्ध होते व या पद्धतशीर वातावरणामुळे शहराचा वेगळाच ठसा मनावर निर्माण होतो.’’ हा लेख तब्बल 40 वर्षापूर्वी लिहिलेला आहे. मुंबईचं नियोजन ज्या पद्धतीनं या 40 वर्षात झालं आहे आणि ज्या गतीनं या शहरानं माणसांना सामावून घेतलं आहे, त्यात मुंबईत वास्तुरचनेच्या दृष्टीनं सुधारणा होण्यावर आता कमालीच्या मर्यादा आहेत.
‘रसग्रहण’ या विभागात षण्मुखानंद, विज्ञान भवन, मुंबईचे वास्तुतज्ज्ञ चार्ल्स कोरिया यांच्या कल्पकतेतून साकारलेलं साबरमतीचं महात्मा गांधी स्मारक संग्रहालय, दिल्लीतील राजघाटाशेजारचे गांधी : जीवन व तत्त्वज्ञान प्रदर्शन, अहमदाबादमधील पूर्णपणे विटांमध्ये बांधलेली आयआयएमची वास्तू, जुहूचं पृथ्वी थिएटर, फ्रान्सजवळील रोशां चर्च आणि पेन्सिल्व्हानियामधील फॉलिंग वॉटर या वास्तूंचं ओगले यांनी केलेलं वर्णन फार तपशीलवार नसलं तरी त्या त्या वास्तूंचं सौंदर्य, त्यांच्या निर्मितीमागील वास्तुतज्ज्ञांची दृष्टी त्यांनी चांगल्या प्रकारे उलगडून दाखवली आहे.
‘वास्तुतज्ज्ञ’ या विभागात बाळकृष्ण जोशी, चार्ल्स कोरिया, जोसेफ अॅलन स्टाइन, ल कार्बुझिए, रिचर्ड बकमिन्स्टर फुलर, वॉल्टर ग्रोपियस आणि डॉ. कॉन्स्टँटिनॉस डॉक्सीअॅडीस या वास्तुरचनाकारांची, त्यांनी निर्माण केलेल्या वैशिष्टय़पूर्ण वास्तूंची आणि त्यामागील त्यांच्या सौंदर्यवादी दृष्टिकोनाची ओघवत्या भाषेत ओळख करून दिली आहे.
शेवटच्या विभागात ओगले यांनी स्वत:च्याच लेखनाचा आढावा घेतला आहे.
या संकलनाचं आणखी एक वैशिष्टय़ नमूद करायला हवं. ते म्हणजे या पुस्तकाचे संपादक चेतन सहस्र्बुद्धे यांनी या पुस्तकाच्या निमित्तानं मराठीतील वास्तुकलाविषयक लेखनाचाही थोडक्यात आढावा घेतला आहे. हा आढावा फारच आटोपशीर असला तरी तो या विषयावरील मराठी पुस्तकांची सद्यस्थिती सांगणारा आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मराठीतलं वास्तुकलेचं रसग्रहण करणा-या पहिल्या पुस्तकाचा मान माधव आचवल यांच्या ‘किमया’ या पुस्तकाकडे जातो. आचवलांचं हे पुस्तक 1961 साली प्रकाशित झालं. म्हणजे आचवलांच्या ‘किमया’ला आणि पर्यायानं मराठीतील वास्तुकलाविषयक लेखनाला पन्नास वर्ष झाली आहेत.
त्यानिमित्तानं प्रस्तुत संकलन प्रकाशित झालं हे उचितच म्हणावं लागेल. आचवलांनी ताजमहालाविषयी या पुस्तकात तीन लेख लिहिले आहेत. ते मराठीमध्ये ताजमहालाविषयी झालेलं सवरेत्कृष्ट लेखन मानायला कुणीही फारशी खळखळ करणार नाही. तर ते असो. पण ‘किमया’नंतर दुर्गाबाई भागवतांचं ‘पैस’, विजय दीक्षितांचं ‘वास्तुकला : काल, आज, उद्या’, नरेंद्र डेंगळे यांचं ‘झरोका’, फिरोज रानडे यांचं ‘इमारत’ एवढीच काय ती वास्तुकलेविषयीची पुस्तकं प्रकाशित झाली, असं सहस्र्बुद्धे यांचं प्रतिपादन आहे. या पार्श्वभूमीवर ओगले यांच्या प्रस्तुत पुस्तकाचं वेगळेपण ठसठशीतपणे अधोरेखित होतं, हे वेगळं सांगायला नको.
वास्तुकलेचा एक शास्त्र म्हणून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या पुस्तकाचा संदर्भग्रंथ म्हणून नक्कीच उपयोग होईल, पण त्यापेक्षाही जास्त उपयोग जिज्ञासू वाचकांना होईल. आचवलांचा लेख वाचल्यावर जसा ताजमहालाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो, अगदी तसंच हे पुस्तक वाचल्यानंतर प्रत्येक वास्तूचं सौंदर्य नेमकं कशात आहे आणि ते कशात शोधलं पाहिजे याची दृष्टी काही प्रमाणात तरी आत्मसात करता येईल, असं वाटतं.
चिदाकाश-घटाकाश : अरुण ओगले, डॉ. भानुबेन नानावटीकॉलेज ऑफ आर्किटेक्चर, फॉर विमेन, पुणे,
पाने : 172, किंमत : 550 रुपये
No comments:
Post a Comment