Monday, January 30, 2012

कवी पाडगावकरांची गोष्ट

या पुस्तकाचा लसाविमसावि समजून घेण्याची गरज आहे. आणि तो आहे पाडगावकरांना माणूस समजून घेण्यात असलेलं अनिवार कुतूहल. इतकी वर्षे सातत्यानं कविता लिहूनही मला माणूस कळला आहे, असं पाडगावकर म्हणत नाहीत, हे फार सूचक आहे.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
मंगेश पाडगावकर हे मराठीतले आनंदयात्री कवी आहेत. प्रेमकविता वयाच्या ऐंशीनंतरही सुचू शकणा-या कवीला खराखुरा प्रतिभावान म्हणायला हवे. शिवाय मी फक्त माझाच नाही तर इतरांचाही प्रेमानुभव माझ्या कवितेतून सांगतो म्हणून मला या वयातही प्रेम कविता सुचतात, हा पाडगावकरांचा युक्तिवाद त्यांची भवतालाकडे पाहण्याची दृष्टी सांगतो. अलीकडेच पाडगावकरांना महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. तेव्हा त्यांनी व्यक्त केलेले मनोगत आणि भाषणही त्यांची जीवनदृष्टी सांगणारेच होते. खरे तर त्यांचे हे भाषण पाडगावकरांमधील कवीची साक्ष पटवणारे होते. 
पाडगावकरांनी शालेयवयातच कविता लेखनाला सुरुवात केली. म्हणजे गेली साठ-पासष्ट वर्षे ते सातत्याने कविता लिहीत आहेत. अधिक नेमकेपणाने सांगायचे तर 1950 साली ‘धारानृत्य’ हा पाडगावकरांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला, तर ‘शब्द’ हा 23वा कवितासंग्रह 2009 साली प्रकाशित झाला. या शिवाय त्यांनी मुलांसाठी दहा कवितासंग्रह लिहिले आहेत. मीरा, कबीर, सूरदास यांचे मराठी अनुवाद केले आहेत. शेक्यपिअरच्या तीन नाटकांचेही त्यांनी मुळाबरहुकूम अनुवाद केले आहेत. आणि बायबलच्या नव्या कराराचेही.
 
म्हणजे पाडगावकरांची मुख्य प्रेरणा कविता हीच होती हे यातून सिद्ध होते. त्यामुळेच त्यांनी केलेले अनुवाद आणि इतर लेखन थोडे आहे हे साहजिक आहे. फार पूर्वी पाडगावकरांनी ‘निंबोणीच्या झाडामागे’ हा लघुनिबंधांचा संग्रह प्रकाशित केला होता. त्यानंतर अगदी अलीकडे पॉप्युलर प्रकाशनाने त्यांच्या गद्य लेखनाची पाच पुस्तकं प्रकाशित केली आहेत. ‘शोध कवितेचा’ हे त्यापैकीच एक. यात पाडगावकरांनी आपल्या काव्यप्रेरणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण हे लेख वेळावेळी नैमित्तिक प्रसंगाने लिहिले गेले आहेत. काही भाषणांचाही त्यात समावेश आहे. म्हणजे असे की, हे पुस्तकासाठी ठरवून झालेले लेखन नाही. पण तरीही या सुटय़ा सुटय़ा लेखांतून पाडगावकरांची कवितालेखनामागील भूमिका जाणून घेता येते. अर्थात पाडगावकरांना त्याविषयी फार काही सांगायचेही नाही. मोजक्याच गोष्टी त्यांना सांगायच्या आहेत. पण परत परत सांगाव्या लागल्यामुळे या पुस्तकांतल्या बऱ्याचशा लेखांत आणि भाषणांत उदाहरणे व मुद्दय़ांची पुनरुक्ती झाली आहे.
 
कविता हा उत्स्फूर्त वाङ्मयप्रकार असल्याने त्याविषयी ठामपणे काही सांगता येत नाही. मुळात सर्जनशील लेखनाबाबतच कुठलेच ठाम विधान करता येत नाही. कारण अमूक कविता कशी सुचली याविषयी खुद्द कवीलाही निश्चितपणे काही सांगता येत नाही. त्यामुळे सर्जनशील लेखकाला त्याच्या लेखनाकडे तटस्थपणे पाहणे बऱ्याच वेळा शक्य होते नाही. त्यामुळे कवी, कादंबरीकार आणि कथाकार यांना तुमच्या लेखनामागच्या प्रेरणा, निर्मितीप्रक्रिया, साहित्यकृतींचा आस्वाद याविषयी विचारले तर त्याचे समाधानकारक उत्तर मिळेलच असे नाही. आणि त्यातून वाचकांचे समाधान होईल असेही नाही. पण तरीही सर्जनशील लेखकाला या दिव्यातून जावे लागते. पाडगावकरांनी ते दिव्य या पुस्तकाच्या माध्यमातून पारड केले आहे असे म्हणावे लागेल.
 
‘आपल्या काव्यनिर्मितीच्या तळाशी आत्मशोध असतो’ असे पाडगावकर इतक्या वेळा आणि इतक्या ठिकाणी म्हणालेले आहेत की, हे विधान आता सपक वाटू लागले आहे. पण खरोखरच पाडगावकरांचा आत्मशोध अजून संपलेला नाही. इथे आत्मशोध याचा अर्थ माणसाचा शोध, माणूस समजून घेण्याचा प्रयत्न असा आहे. त्यामुळेच त्यांना रोज जगण्याचे वेगवेगळे विभ्रम भुरळ घालतात. पाडगावकर ‘साहित्यनिर्मितीचे प्राणतत्त्व’ या लेखात लिहितात, ‘‘एक कवी म्हणून मी सतत माझ्या खांद्याचे हे स्वातंत्र्य जपत आलो. ख्रिस्त, बुद्ध, गांधी, मार्क्‍स, डॉ. आंबेडकर, जे. कृष्णमूर्ती, ओशो रजनीश यांचे खोल संस्कार माझ्यावर झाले. पण कुणाच्याही झेंडय़ाखाली मी कधीही उभा राहिलो नाही, किंवा कुठल्याही झेंडा बांधलेल्या काठीला मी माझ्या खांद्यावर चढून स्वार होऊ दिले नाही. माझ्या खांद्यावर काठीला बांधलेला झेंडा नाही, कुठलाही राजकीय, कलात्मक, इझमचा झेंडा नाही. यामुळे कुठलीही संघटना माझ्या पाठीशी उभी नाही. तसा मी अगदी एकटा आहे. पण झेंडा बांधलेली काठी माझ्या खांद्यावर नाही याचा एक फार मोठा फायदा मला झालेला आहे. अनुभवांचे त-हात - हांचे पक्षी निर्भयपणे माझ्या खांद्यावर येऊन बसतात आणि आपले गाणे गाऊ लागतात.’’
 
पाडगावकरांनी प्रेमकविता खूप लिहिल्या असल्या तरी त्यांनी कवितेच्या फॉर्ममध्ये अनेक प्रयोगही केले आहेत. ‘सलाम’मधील प्रचंड उपरोध आणि उपहास असलेली कविता, ‘उदासबोध’मधील विडंबन आणि ‘बोलगाणी’मधील लयबद्धता हे पाडगावकरांनी जाणीवपूर्वक केलेले प्रयोग आहेत. एकाच फॉर्ममध्ये त्यांनी अडकून घ्यायला नकार दिला याचे ते उदाहरण आहे. पाडगावकरांवर शेक्सपिअरचा आणि बायबलच्या नव्या कराराचा मोठा प्रभाव पडला. शालेयवयात त्यांना सक्तीनं बायबल शिकावं लागलं. पण शेक्सपिअर आणि बायबल दोन्हींचीही इंग्रजी भाषा प्रेमात पडावी अशीच आहे. पाडगावकरांचा कबजा तिनं घेतला. त्यामुळेच त्यांनी शेक्सपिअरच्या तीन नाटकांचे आणि बायबलच्या नव्या कराराचे अनुवाद मोठय़ा तन्मयतेने केले. भाषेचा नादानं असं नादावत राहिल्यामुळेच पाडगावकरांची काव्यउर्मी चिरंतन राहिली असावी.
 
खरं तर पाडगावकरांच्या या पुस्तकाचं सारं सार वरील परिच्छेदात आले आहे. त्यामध्ये वेगवेगळी उदाहरणं, प्रास्ताविकं यांची भर घालून, मुद्यांचा अधिक विस्तार करत, त्यांना नैमित्तिक जोड देत पाडगावकरांनी या संबंध पुस्तकातले लेख लिहिले आहेत.
 
पाडगावकर आणखी एके ठिकाणी म्हणतात, ‘‘सर्जनशील साहित्याची निर्मिती म्हणजे रांगोळीच्या रंगीत ठिपक्यांची आणि रेषांची आकर्षक आरास नव्हे! सर्जनशील साहित्य हे मानवी जीवनातल्या नानाविध अनुभवांना भिडून माणूस समजून घेते. ते माणसाच्या जगण्याचा, त्याच्या माणूसपणाचा अर्थ शोधत असते. हा शोधच ललित साहित्याच्या कलात्मक आकृतिबंधाचे रूप घेत असतो. शोधाची ही प्रेरणा क्षीण झाली की, साहित्य हे शब्दांच्या रंगीत पोकळ ठिपक्यांची आरास होऊन बसते.’’ हे विधान फारच सामान्य आहे असा याविषयी आक्षेप घेतला जाऊ शकतो.
 
त्यामुळे या पुस्तकाचा लसाविमसावि समजून घेण्याची गरज आहे. आणि तो आहे पाडगावकरांना माणूस समजून घेण्यात असलेलं अनिवार कुतूहल. इतकी वर्षे सातत्यानं कविता लिहूनही मला माणूस कळला आहे, असं पाडगावकर म्हणत नाहीत, हे फार सूचक आहे.
शोध कवितेचा : मंगेश पाडगावकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई,  
पाने : 180, किंमत : 250 रुपये

No comments:

Post a Comment