Sunday, February 12, 2012

पुस्तकवेडा!

२७ जानेवारी २०१६ रोजी काढलेले छायाचित्र
वसंत आठवले हा पुण्यातील एक अवलिया माणूस आहे. आजच्या जमान्यात जुनी पुस्तकं विकून कितीसे पैसे मिळणार, पण हा माणूस  गेली 35-40 वर्षे हाच व्यवसाय निष्ठेनं करतो आहे. एवढंच नव्हेतर तर आपल्या मुलांनाही आपला हा वारसा दिलाय.
 
सोमवार हा आठवडय़ाचा पहिला दिवस. या दिवशी एरवी गजबजलेल्या पुण्याच्या लक्ष्मी रोडवरील बहुतांशी दुकानं बंद असतात. त्यामुळे दोन्ही बाजूचा फुटपाथ रिकामा असतो. इथंच बाजीराव रस्त्यालगतच्या युनायटेड बँकेच्या शेजारच्या फुटपाथवर सकाळी सकाळी आठवले आपलं जुन्या पुस्तकांचं दुकान मांडून बसतात. ते साधारणपणे नऊ वाजेपर्यंत येतात. पण पुस्तकवेडे लोक तासभर आधीपासूनच त्यांची वाट पाहात ताटकळत थांबलेले असतात. आठवले आले की, सर्व जण त्यांच्या पुस्तकांवर तुटून पडतात. यात कुणाला कधी काय मिळेल याचा नेम नसतो. अनेकांना कितीतरी वर्षापासून शोधत असलेला दुर्मीळ ग्रंथ मिळतो, तर काहींना त्यांच्या अभ्यासाचे पण त्यांना माहीत नसलेले ग्रंथ मिळतात. त्यामुळे आठवल्यांच्या या रस्त्यावरच्या दुकानाला भेट दिली की, रा. चिं. ढेरे, निरंजन घाटे, ह. अ. भावे, आनंद हर्डीकर, सु. रा. चुनेकर, महावीर जोंधळे असे पुण्यातील अनेक साहित्यिक भेटतात. तुम्ही आठवलेंकडे जायला लागलात की, या साहित्यिकांशीही तुमची हळूहळू मैत्री व्हायला लागते.
 पण आठवले नुसते पुस्तकविक्रेते नाहीत. त्यांच्याकडे तुम्ही जायला लागलात की, आठवले सुरुवातीला तुम्ही कुठली पुस्तकं घेता याचं बारकाईनं निरीक्षण करतात आणि मग तुम्हाला कुठली पुस्तकं हवी असतात, याचा त्यांना अचूक अंदाज येतो. त्यानुसार ते तुमच्यासाठी त्या प्रकारची पुस्तकं वेगळी काढून ठेवायला लागतात. पुण्यातल्या अनेक पुस्तकवेडय़ा मंडळींना आठवलेंनी कितीतरी दुर्मीळ पुस्तकं दिली आहेत. पुणे विद्यापीठाच्या ग्रंथालयात तर अनेक पुस्तकं आठवलेंकडचीच आहेत.
आठवले चांगले वाचकही आहेत. विशेषत: दुर्मीळ पुस्तकांबद्दलची त्यांची माहिती खूपच दांडगी आहे. त्यामुळे कुठल्या पुस्तकाचं नेमकं काय महत्त्व आहे, सध्या ते बाजारात उपलब्ध आहे की नाही, झालं तर त्याची किंमत काय असेल याचा त्यांना अचूक अंदाज असतो.
 
शिवाय आठवलेंची आणखी एका गोष्टीसाठी ख्याती आहे. त्यांना तुम्ही कुठलेही दुर्मीळ पुस्तक सांगा, ते पुस्तक आठवले तुम्हाला दोन-चार महिन्यांत मिळवून देतातच. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या ‘ज्ञानकोशा’चे खंड, ‘केसरीप्रबोध’, ‘केसरीचे छोटे फाइल’, श्री. म. माटे यांचा ‘विज्ञानबोध’, त्रिं. ना. आत्रे यांचं ‘गावगाडा’, त्र्यं. शं. शेजवलकरांचे मोटे प्रकाशनाने काढलेले लेखसंग्रह, ‘सकाळ’चे संस्थापक ना. भि. परुळेकरांचं ‘निरोप घेता’, ‘विविधज्ञानविस्तार’चे बांधीव अंक असं अगदी कुठलंही. शिवाय आपण आठवलेंकडे जायला लागलो की, आपल्याला अनेक शोध लागतात. आत्रे यांच्या ‘गावगाडा’मधील अनघड शब्दांचा अर्थ सांगणारं एक स्वतंत्र पुस्तकच प्रकाशित झालेलं आहे, स्वातंत्र्यपूर्वकाळात गांधीजींविषयी इंग्रजी वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या व्यंग्यचित्रांचा स्वतंत्र संग्रहच आहे इत्यादी इत्यादी. १८२८मधील पुण्याचा नकाशा पुणे महानगरपालिकेला मिळाला तो आठवलेंमुळेच.
 
2010 साली पुण्यात भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांना ना. धों. महानोर यांच्या बरोबरीनं संमेलनाच्या उद्घाटनासाठी खास निमंत्रण देण्यात आलं होतं. पण ही कुणा पुणेरी साहित्यिकाला सुचलेली गोष्ट नव्हती. ती सुचली नगरसेवक असलेल्या आणि आठवलेंच्या शेजारी राहणाऱ्या सतीश देसाई यांना. त्यांच्या सूचनेला सर्वानी अनुमोदन देऊन आठवलेंचा यथोचित गौरव केला.
 
आठवले यांचे वडील संगीत नाटकांमध्ये काम करत. ‘प्रभात’चे ‘आधी बीज एकले’सारखी उत्तम गाणी लिहिणारे शांताराम आठवले हे या आठवले यांचे पुतणे. त्याविषयीच्या आठवणी हा आठवले यांच्या आयुष्यातला एक ठेवणीतला कप्पा आहे. त्यांचा पुरेसा विश्वास संपादन केल्यानंतरच तो हा कप्पा उघडा करतात. असो. वसंत आठवले किर्लोस्कर ऑईल इंजिन्समधील ग्रंथालयात काम करत. 1985 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि जुन्या पुस्तकांचा व्यवसाय सुरू केला. पण आठवलेंनी आपल्या व्यवसायाचं दुकान काही अजून थाटलेलं नाही. सोमवारी लक्ष्मी रोडवर ते फूटपाथवर आपलं  दुकान उघडून बसतात, तर मंगळवार ते शनिवार या दिवशी सकाळी नऊ ते साडेबारापर्यंत बाजीराव रोडवरील सरस्वती भुवन रात्र विद्यालयाच्या फुटपाथवर जुन्या पुस्तकांची पथारी मांडून बसलेले असतात. तिथं अनेक लोक पुस्तकं शोधत असतात, चाळून पाहत असतात. रस्त्यावरून चालणारा कुणीतरी गंमत म्हणून डोकावून पाहतो आणि त्याला त्याच्या आवडीचं काहीतरी मिळून जातं.
 
आठवलेंमुळे आता सरस्वती भुवनच्या फुटपाथवर त्यांच्या शेजारीच अजून एक-दोन लोक जुनी पुस्तकं घेऊन येतात. सोमवारी लक्ष्मी रोडवर तर आता आठवलेंच्या शेजारच्या पुस्तकवाल्यांची संख्या बाजीराव रोडपर्यंत लांबत गेली आहे. त्यांच्याकडेही पुस्तकं मिळतातच, पण आठवले ते आठवलेच! त्यांच्याकडे जसे आश्चर्याचे सुखद धक्के अनुभवायला मिळतात तसे इतरत्र मिळत नाहीत. त्यामुळे सर्वाची पावलं पुन्हा पुन्हा आठवलेंकडेच वळतात.
 
आठवलेही आपला व्यवसाय निष्ठेनं करतात. जुनी पुस्तकं कुठे मिळतील याचा ते सतत शोध घेत असतात, ज्यांना आपला ग्रंथसंग्रह विकायचा आहे, त्यांच्याकडून आठवले तो घेऊन येतात आणि त्यातले माणिक-मोती ज्यांना हवे असतात त्यांना देतात. शिवाय त्यांचे वाचन उत्तम असल्यामुळे त्यांच्याविषयी सर्वाना ममत्व वाटत असतं. जे खरे दर्दी असतात, ते भावात फार घासाघीस न करता आठवले सांगतील ती किंमत प्रमाण मानतात. रा. चिं. ढेरे, निरंजन घाटे यांचा त्यात प्राधान्यानं समावेश करावा लागेल.
 फार पूर्वी पुण्यात ढमढरे हे जुन्या पुस्तकांचे विक्रेते होते. त्यांनी स. ग. मालशेंना ताराबाई शिंदे यांचं ‘स्त्रीपुरुषतुलना’ हे महाराष्ट्राला माहीत नसलेलं पुस्तक दिलं. मालशेंनी त्याची मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीनं दुसरी आवृत्ती काढली. मालशेंची ही प्रत प्रमाण मानून नंतर या पुस्तकाच्या अनेकांनी आवृत्त्या काढल्या. हे सगळं घडलं ते केवळ ढमढेरेंमुळे. त्यांचा हा ज्ञानदानाचा एकहाती वारसा गेली काही वर्षे आठवले चालवत आहेत. त्यांनी अनेकांना ज्ञानसंपन्न करण्याचं काम केलं आहे. त्यातून त्यांची अनेक साहित्यिकांशी स्नेह जुळला आहे. ही श्रीमंती शब्दात न मोजता येणारी, पण ती आठवले रोजच्या रोज अनुभवत असतात. पण त्याचा दुराभिमान तर सोडाच पण साधा अभिमानही त्यांच्या वागण्या-बोलण्यात नसतो. तुम्ही त्यांच्याकडे कधीही जा, ते तुमचं स्वागत करतील, तुम्हाला हवी ती पुस्तकं मिळवून देण्यासाठी शक्य तेवढा प्रयत्न करतील.

No comments:

Post a Comment