Monday, January 30, 2012

सावध ऐका पुढल्या हाका!

काळाच्या बरोबर जाणारांचा निदान पराभव होऊ शकत नाही. काळाच्या मागे राहणारांना मात्र इतरांच्या मागून केवळ फरफटत जावे लागते आणि त्यांचा केवळ पराभवच नव्हे, तर नाशही होण्याचा धोका संभवतो. इकडे ज्याच्याशी स्पर्धा करावयाची, त्या काळाची गती तर इतकी प्रचंड आहे की, आपण सध्या जेथे आहोत, तेथेच टिकून राहण्यासाठी देखील आपल्याला खूप वेगाने पळण्याची आवश्यकता आहे. आणि..आणि आपण तर चक्क झोपलोच आहोत!  - डॉ. आ. ह. साळुंखे, जून 1981
मराठी ही प्रादेशिक भाषा असल्याने तिची इंग्रजीशी तुलना होऊ शकत नाही. म्हणून आपण भारतीय भाषांपैकी हिंदीशी तुलना करून पाहू या. हिंदीतलं साहित्यविश्व आणि मराठीतलं साहित्यविश्व यांपैकी कोण आजच्या काळाशी सुसंगत आहे?
 
उदय प्रकाश हे हिंदीतले आघाडीचे कथाकार आहेत. uday-prakash.blogspot.com हा त्यांचा ब्लॉग  ब्लॉगजगतात सर्वाधिक वाचला जात असावा! या ब्लॉगवर उदय प्रकाश यांचे लेखन, त्यांच्या लेखनाचे अनुवाद, त्यांची मुखपृष्ठं, अनुवादक यांचीही अपडेट माहिती असते. हा अतिशय देखणा आणि सुंदर ब्लॉग आहे. याशिवाय उदय प्रकाश इंग्रजीमध्येही एक स्वतंत्र ब्लॉग लिहितात. प्रदीप जिलवाने हा तरुण लेखक pradeep-jilwane.blogspot.com या त्याच्या ब्लॉगवर हिंदीतील वेगवेगळ्या नियतकालिकांची, त्यांच्या विशेषांकांची ओळख करून देतो. सचिन महज सचिन हा तरुण पत्रकार naiebaraten.blogspot.com या नावानं ब्लॉग लिहितो. ‘मैं खिलाफ़ हूं, इस तरह दुनिया के.. यानी तुम्हारे जो इसे सही मानते हो.’ असं त्यानं आपल्या ब्लॉगवर लिहिलं आहे. hindilekhak.blogspot.comवर हिंदीतील साहित्यिकांची नवनवी छायाचित्रं पाहायला मिळतात. त्यांचं साहित्यप्रकारानुसार वर्गीकरणही केलं आहे. ही फक्त काही उदाहरणादाखल नावं झाली. याशिवाय अनेक तरुण लेखक, पत्रकार सातत्यानं हिंदीमध्ये मोठय़ा प्रमाणावर ब्लॉग लिहितात.
 
नेटवर किती हिंदी नियतकालिकं उपलब्ध असावीत? ‘कथादेश’, ‘तथा’, ‘दोआबा’, ‘नया ज्ञानोदय’, ‘पाखी’, ‘प्रतिलिपि’, ‘बहुवचन’, ‘वागर्थ’, ‘संस्कृति’, ‘हंस’, ‘हिमाचल मित्र’, ‘समकालीन साहित्यसमयांतर’ अशी तब्बल पन्नासपेक्षाही जास्त नियतकालिकं आणि त्यांचे ताजे अंक उपलब्ध असतात. www.kavitakosh.orgमध्ये हिंदीतल्या जान्यामान्या कवींच्या कवितांचा समावेश आहे. कवींनुसार त्यांची वर्गवारी केली आहे.
 
हिंदीतलं हे साहित्यविश्व नेटवर पाहताना साहित्याला समाजजीवनाचा आरसा का मानलं जातं, हे लक्षात येतं. नव्हे त्याची खात्रीच पटते.
 
एरवीही संस्कृतीविषयी बोलताना साहित्याचा केवळ उल्लेखच केला जात नाही तर ‘साहित्य म्हणजेच संस्कृती’ असं गृहीत धरलं जातं. म्हणजे साहित्याशिवाय संस्कृतीचा विचारच होऊ शकत नाही.
 पण मराठी साहित्यविश्वाला याची जाणीव आहे? ते समजून घेण्याचा त्यांनी आजवर गंभीरपणे प्रयत्न केला आहे का? या प्रश्नांची उत्तरं फारशी समाधानकारक नाहीत.
मराठीतल्या इंटरनेटवर असणा-या वेबसाईट्स, ब्लॉग यांच्या संख्येत केवळ साहित्यिकच नाही तर प्रकाशनसंस्था, वाङ्मयीन व इतर नियतकालिकं यांचा समावेश केला तरी ही संख्या फारच तोकडी भरते.
 ग्रंथाली, पॉप्युलर, राजहंस, मेहता पब्लिशिंग हाऊस, मॅजेस्टिक, ज्योत्स्ना,  लोकवाङ्मय गृह, साकेत अशा काही आघाडीच्या प्रकाशनसंस्थांच्या स्वत:च्या वेबसाइट्स आहेत. यातल्या बहुतेकांच्या स्वत:च्या गृहपत्रिकाही आहेत. ‘रूची’, ‘प्रिय रसिक’, ‘राजहंस ग्रंथवेध’, ‘मेहता मराठी ग्रंथजगत’, ‘आपले वाङ्मयवृत्त’, या त्यापैकी काही. या  गृहपत्रिकांचे कुठले अंक या वेबसाइट्सवर उपलब्ध आहेत? ‘प्रिय रसिक’चे फक्त जून ते सप्टेंबर या  2011 वर्षातले चार अंक, ‘रूची’चा ताजा अंक म्हणून ऑक्टोबर 2011 चा अंक, ‘मेहता मराठी ग्रंथजगत’चे फक्त सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2011 चेच तीन अंक उपलब्ध आहेत. ‘राजहंस’च्या साइटवर इतके दिवस ‘ग्रंथवेध’ उपलब्धच नव्हते. ते नुकतेच उपलब्ध झाले आहे. पण त्याचेही अलीकडचेच अंक आहेत. ‘वाङ्मयवृत्त’ला अजून साइटचं आकाश मिळालेलं नाही.हे करण्यासाठी काही मोठय़ा मनुष्यबळाची वा गुंतवणुकीचीही गरज नाही. फक्त थोडय़ाशा कल्पकतेचीच गरज आहे. पण तीही कुणी दाखवायला तयार नाही.
हे केवळ गृहपत्रिकांबाबतच आहे का? नाही कारण, प्रकाशनसंस्थांच्या ताज्या पुस्तकांची माहिती त्यांच्या वेबसाइट्सवर मिळेलच याचीही खात्री नसते.
 
‘मिळून सा-याजणी’, ‘शेतकरी संघटक’, ‘परिवर्तनाचा वाटसरू’, ‘साधना’, ‘पालकनीती’, ‘अंतर्नाद’, ‘आजचा सुधारक’, ‘नवभारत’, ‘ललित’, ‘अनुभव’, ‘कवितारती’, ‘पंचधारा’, ‘मसापपत्रिका’, ‘ढोल’, ‘विचारशलाका’, ‘सत्याग्रही विचारधारा’, ‘आंदोलन’, ‘किशोर’, ‘वास्तव रूपवाणी’, ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’, ‘बळीराजा’, ‘वनस्थळी’, ‘किलरेस्कर’, ‘आपला परममित्र’, ‘केल्याने भाषांतर’, ‘भाषा आणि जीवन’, ‘समाज प्रबोधन पत्रिका’, ‘साक्षात’ अशी 250-300 मराठी नियतकालिकं प्रसिद्ध होतात. यांपैकी किती नेटवर वाचता, पाहता येतात? यातल्या ‘मिळून साऱ्याजणी’, ‘शेतकरी संघटक’, ‘अनुभव’ आणि ‘साधना’ यांच्याच तेवढय़ा वेबसाइट्स आहेत. पण हे अंकही लगोलग साइटवर उपलब्ध होतीलच असं नाही.
 अशीच संख्या आहे मराठी ब्लॉग लिहिणा-या साहित्यिकांची. कविता महाजन यांचे muktvachan.blogspot.com, kavita-mahajan.blogspot.com, bhinn.blogspot.com, bharatiyalekhika.blogspot.com, ku-hoo.blogspot.com असे तब्बल पाच ब्लॉग आहेत. महाजन यांच्यासारखी आजची आघाडीची लेखिका या माध्यमाचा इतका उपयोग करून घेते, यातून इतरांनी बरंच काही शिकण्यासारखं आहे. पण हेही खरं की, महाजन यांचे हे ब्लॉग अलीकडच्या काळात फारसे अपडेट होताना दिसत नाहीत.
रेखा शहाणे यांनी अशोक शहाणे, भाऊ पाध्ये, तुळशी परब, वसंत दत्तात्रय गुर्जर या अनियतकालिकांच्या चळवळीतल्या शिलेदारांचे ब्लॉग सुरू करून त्यांच्याविषयीची शक्य तेवढी माहिती त्यावर उलब्ध करून दिली आहे.
 
तारा भवाळकर, डॉ. सदानंद मोरे यांचेही ब्लॉग आहेत. पण त्यावर त्यांच्या बायोडाटाशिवाय फारसं काही  त्यावर नाही. मोरे यांच्या ब्लॉगवर काही लेख आहेत म्हणा, पण हा ब्लॉगही अपडेट नाही. 
नंदिनी आत्मसिद्ध, ज्ञानदा देशपांडे यांचेही ब्लॉग आहेत आणि ते अपडेटही होतात.
 
गणेश मतकरी, अभिजीत रणदिवे हे तरुण गंभीरपणे ब्लॉग लिहितात.
 
कुमार सप्तर्षी आपले लेखन सतत ब्लॉगवर टाकून त्याची लिंक फेसबुकवर देतात. वाचकही त्यावर चर्चा करतात. सत्तरीच्या या कार्यकर्त्यांचा हा उत्साह वाखाणण्याजोगा आहे.
 
पण ब्लॉग लिहिणारे मराठी साहित्यिक एवढेच. चार-दोन कमीजास्त. हौस म्हणून ब्लॉग लिहिणा-यांची संख्या मात्र खूपच आहे, पण तो स्वतंत्र लेखाचा विषय असल्यानं त्यांचा विचार करण्याचं कारण नाही.
 
आता फेसबुकवरील मराठी साहित्यिकांचा वावर पाहू. रा. रं. बोराडे हे मराठवाडय़ातील ज्येष्ठ साहित्यिक आणि साहित्य-संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष फेसबुकवर सतत जो बाष्कळपणा करत असतात तो उबग आणणारा आहे. भालचंद्र मुणगेकर, आनंद तेलतुंबडे ही मंडळीही सतत फेसबुकवर दिसतात. पण आपण उच्चभ्रू आहोत, हा अहंकार त्यांच्या नेटवरील वर्तनातही डोकावत राहतो. त्यामुळे त्यांच्याविषयीचं कुतूहल कुमार सप्तार्षीसारखं वाढताना दिसत नाही.
 
थोडक्यात मराठी साहित्यविश्वाला वेबसाइट्स-ब्लॉग या माध्यमांची ताकद समजलेली नाही असंच म्हणावं लागेल. पण काळाबरोबर कुणी असायला हवं हाही कळीचा मुद्दा आहे. सरसकट सर्वानीच त्यासाठी आटापिटा करायला हवा असंही नाही.
 
1) -40 हा साहित्यिक वयोगट या माध्यमांचा वापर काही प्रमाणात करताना दिसतो. पण अगदी स्पष्टच सांगायचं तर त्यांची या माध्यमावरील उपस्थिती ही ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ या प्रकारची आहे. मराठीमधले तरुण लेखक सर्वाधिक त्यांच्या ब्लॉगवर, साईटवर दिसत नाहीत, ते फेसबुकवर दिसतात. तिथे उथळ प्रश्नावर बाष्कळ चर्चा करण्यात या वर्गाचा मोठा पुढाकार आहे. या लोकांकडून सर्वाधिक अपेक्षा आहेत. त्यामुळे त्यांनी असा उथळपणा न करता अधिक जबाबदारीनं वागणं अपेक्षित आहे. कारण हेच लोक उद्याच्या साहित्याचे शिलेदार आहेत. उद्याचे सांस्कृतिक प्रवक्ते आहेत.
 
2) 40-60 या वयोगटातल्या साहित्यिकांकडून या माध्यमांचा योग्य त-हेनं आणि सक्षमपणे वापर होणं अपेक्षित आहे. कारण हे लोक आजच्या आणि उद्याच्या साहित्याचे शिलेदार आहेत. त्यामुळे या लोकांची उदासीनता क्षम्य नाही.
 
3) वय वर्षे 60 नंतरचे साहित्यिक या माध्यमांचा विचार करत नसतील, तर ते एकवेळ समजण्यासारखं आहे. या वयात त्यांचे आरोग्याचे प्रश्न, उर्वरित लेखन सोडून त्यांना या माध्यमाबरोबर धावणं शक्य नाही. पण त्यातल्या काहींना या माध्यमांबद्दलचं कुतूहल स्वस्थ बसू देत नसेल, ही माध्यमं जाणून घेण्याची त्यांची इच्छा असेल तर ते स्वागतार्हच आहे.
 
लेखकांच्या स्वत:च्या वेबसाईटस हा प्रकार मात्र मराठीमध्ये अजूनही फारसा रुजताना दिसत नाही.
 मराठी लेखकांसाठी उच्चभ्रू आणि सेलिब्रेटी हे शब्द वापरले जाऊ शकत नाहीत. कारण त्यासाठी स्वत:ची डिग्निटी सांभाळता यावी लागते आणि पुरेसं सोशलही असावं लागतं. मराठी साहित्यिकांना या दोन्ही गोष्टी जमत नाहीत. ज्यांनी तसं करून पाहण्याचा प्रयत्न केला, त्यांचं हसं होतं. मराठीमध्ये उच्चभ्रू समाजातले जे काही हाताच्या बोटावर मोजण्याएवढे लेखक आहेत, त्यांना समाज विचारत नाही अन् तेही स्वत:च्या विद्वतेचा विनाकारण दर्प बाळगतात, सर्वसामान्यांना तुच्छ लेखतात. त्यामुळे ते समाजापासून तुटतात आणि एकटे पडतात. समाजाला सतत कुणाला ना कुणाला डोक्यावर घेऊन नाचायचं असतं, मग तो जे आपल्याला सहजासहजी उपलब्ध असतील त्यांचा उदोउदो करतो. सुमारांची सद्दी फोफावत चालली आहे, याचं एक कारण साहित्यिकांची उदासीन करणारी बधिरता हेही आहे.
ट्विटर हे माध्यम उच्चभ्रू आणि सेलिब्रिटी लोकांचं झालं आहे. खरं तर तसं त्याचं प्रयोजन नाही. पण अमिताभ बच्चन, शशी थरूर, सलमान रश्दी, शाहरूख खान, आमीर खान असे लोक (आणि आता पंतप्रधान मनमोहन सिंगसुद्धा!) त्यावर असल्यामुळे आणि ते सतत काहीतरी ‘ट्विट’ करत असल्यामुळे ट्विटर हे उच्चभ्रू समाजाचं झालं आहे. बच्चन, थरूर, रश्दी काय ‘ट्विट’ करतात याकडे प्रसिद्धीमाध्यमांचं लक्ष लागलेलं असतं. त्यांच्या ‘ट्विट’च्या बातम्या, हेडलाईन होतात. मराठीतल्या कुठल्याही लेखकाच्या नशिबी असे भाग्य येण्याची शक्यता नाही.
 
थोडक्यात मराठी साहित्यिक आणि साहित्यविश्वातले लोक सांस्कृतिक पुढारपण निभावण्याच्या बाबतीत प्रभावहीन का झाले आहेत?
 
1) आपल्या पाठीमागून येणा-यांना मागदर्शन करणं, आपला अनुभव त्यांच्याशी शेअर करणं, आपल्याकडून झालेल्या चुका त्यांच्याकडून होऊ नयेत यासाठी त्यांच्याशी सतत संपर्क ठेवून असणं.
 
2) सर्वसामान्यांना जगाच्या आकलनाबाबत, त्यांच्या दैनंदिन जगण्यातील सुख-दु:खांबाबत आणि जगण्याच्या प्रेरणेबाबत मार्गदर्शन करणं.
 
3) राजकीय नेते-पुढा-यांवर सतत दबाब टाकून, त्यांना स्वत:च्या म्हणण्याची दखल घ्यायला लावून त्यानुसार कृती करण्यास भाग पाडणं. त्यांना आपला वचक वाटेल, धाक वाटेल अशी तजवीज करणं.
 या तिन्ही प्रकारे पुढारपण करायचं असतं. पण याबाबतीतल मराठी साहित्यिक प्रभावहिन आहेत. कारण हे लोक काळाच्या प्रचंड मागे आहेत. काळ ज्या गतीनं आणि पद्धतीनं बदलत आहे, ते समजून घेण्याएवढीही कुवत ज्यांच्याकडे नाही, व्हिजन नाही. मग ते पुढारपण करणार तरी कसं?
केवळ साहित्य एके साहित्य याच गोष्टीचा ध्यास घेतल्यामुळे मराठी साहित्यिकांचं फार मोठं नुकसान होत आलं आहे. जीवनाच्या इतर अंगांचा, बदलांचा त्यांना जणू काही विसरच पडला आहे. त्यामुळे त्यांच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि इतर वैकल्पिक जाणिवा पुरेशा प्रगल्भच झाल्या नाहीत. परिणामी मराठी साहित्याचाही स्तर फारसा उंचावायला तयार नाही.
 
नव्या गोष्टींना सतत नाकं मुरडणारे, बदलांना विरोध करणारे, त्यांचं स्वागत करणारे, त्याकडे त्रयस्थपणे पाहणारे आणि त्याची अजिबात पर्वा न करणारे लोक सगळ्याच समाजात असतात. मात्र यातला कुठला गट संख्येनं जास्त आहे, प्रभावशाली आहे, यावर त्या समाजाचा प्रवास ठरत असतो. महाराष्ट्र ही सतत नाकं मुरडणा-या कर्मदरिद्री लोकांचीच छावणी असेल तर त्यातलं साहित्यही तसंच असणार यात काही शंका नाही.
 
साहित्यिकांनी बंदूकधारी कार्यकर्ते होण्याची गरज नसते, तशीच त्यांनी केवळ स्वत:च्याच कोशात राहण्याचीही आवश्यकता नसते. कारण या दोन्हींमुळे अंतिमत: त्यांचं आणि समाजाचंही नुकसानच होतं. मराठी साहित्यिकांना सामाजिक बांधीलकी-राजकीय बांधीलकी या शब्दांची फार अ‍ॅलर्जी आहे. लेखकानं इतरही भूमिका करायला हव्यात असा प्रश्न केला जातो, तेव्हा ‘अशा अपेक्षा लेखकाकडून का केल्या जातात? डॉक्टर, इंजिनीअर, सुतार, लोहार, गवंडी, इस्त्रीवाला यांच्याकडून का केल्या जात नाहीत? तेही समाजाचेच घटक आहेत ना?’ असा प्रतिसवाल ही मंडळी करतात. हा प्रतिसवाल बालिश आहे, आपण पुरेसे समंजस आणि प्रगल्भ नसल्याचाच पुरावा आहे. याचं भान त्यांना कधी येणार देव जाणे!
 
कारण ज्यांच्या मतांचा, विचारांचा आणि वर्तनाचा समाजावर भला-बुरा परिणाम होत असतो, त्यांच्याकडूनच समाज अशा अपेक्षा करत असतो. जे लोक या गोष्टींचे वाहक नसतात, त्यांना समाज हे प्रश्न विचारायला जात नाही इतका साधा विचार करता येत नसेल तर ती फारच शोचनीय बाब म्हणावी लागेल.
 
‘कलेसाठी कला की, जीवनासाठी कला’ या वादानं एकेकाळी मराठी साहित्यविश्वात बराच गदारोळ माजवला होता. हा वाद तेव्हाही, आजही आणि उद्याही निर्थकच गणला जाणार याचा अदमास वाद घालणा-यांना आणि त्यात सामील होणा-यांना येत नसेल तर ते दुर्दैवच म्हणावं लागेल आपल्या समाजाचं! ‘कलेसाठी कला’ आणि ‘जीवनासाठी कला’ या दोन्ही भूमिका जीवनवादी असल्यानं, त्या मानवी जीवनापेक्षा थोर नव्हेत, तर त्याची एक्स्टेंशन्स आहेत, इतकाही विचार करता येऊ नये?
 मराठी साहित्याचा मराठी समाजावर पुरेसा प्रभाव  पडत नाही, त्याचं कारण मराठी साहित्यिकांमध्ये असलेला वैचारिक व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि पक्या-प्रगल्भ धारणांचा अभाव हेच आहे. त्यामुळे त्यांनी काळाच्या हाका सावधपणे ऐकण्याची नितांत गरज आहे.

1 comment:

  1. एका कळीच्या प्रश्नाला वाचा फोडणारा लेख लिहिल्याबद्दल आभार. अधिकाधिक मराठी वाचक-लेखकांपर्यंत तुमचा लेख पोचायला हवा.

    ReplyDelete